दिल ही तो है... (पराग पेठे)

दिल ही तो है... (पराग पेठे)

गालिब यांच्या काळात ‘उस्ताद-शागीर्द’ अशी परंपरा होती; पण गालिब यांनी गझलेच्या बाबतीत कधी कुणी उस्ताद केला नाही. काही मोजक्‍या गझलकारांची तारीफ मात्र ते नेहमी करत असत. गालिब यांच्यावर आजपर्यंत जेवढं लिहिलं गेलं आहे, तेवढं क्वचितच कुणा गझलकाराच्या-कवीच्या बाबतीत लिहिलं गेलं असेल. ज्येष्ठ कवी-गझलकार ‘बेदिल’ यांचा मात्र गालिब यांच्यावर खूप प्रभाव होता. गालिब यांना ज्येष्ठ असणारे प्रतिभावंत गझलकार मीर तकी मीर यांनी तर गालिब यांच्याबद्दल म्हटलं होतं ः ‘‘अगर इसे कोई कामिल (सिद्धहस्त) मिल गया और उसने इसे सीधे रास्ते पर डाल दिया तो ये लाजवाब शायर बनेगा...वर्ना यूँही बकता रहेगा।’’ परंतु गालिब यांनी कुणी गुरू न करताच इतकी सफलता मिळवली.

प्रत्येक कलावंताचा स्वतंत्र असा एक बाणा असतो. स्वाभिमान असतो. गालिब यांनाही तो होताच...जरा जास्तच होता ! १८५२ मध्ये दिल्ली कॉलेजमधून त्यांना नोकरीसाठी बोलावणं आलं. फार्सीचे मुख्य शिक्षक म्हणून. ते तिथं गेले; परंतु तिथला ब्रिटिश अधिकारी (टॉम्सन) त्यांच्या स्वागतास न आल्यानं ते गेल्यापावली परत आले. हा स्वाभिमान, आत्मसन्मान ! नंतर ते टॉम्सनला म्हणालेः ‘‘जनाब-ए-आली, अगर नौकरी का मतलब यह है की इससे इज्जत में कमी आ जाएगी, तो ऐसी नौकरी मुझे मंजूर नहीं!’’

‘दिल्ली आणि मी यांच्यात खूपच साम्य आहे,’ असंही ‘गालिब म्हणत असत. ते म्हणत ः‘‘आमच्यावर (दिल्ली आणि गालिब!) संकटांवर संकटं येऊनसुद्धा आम्ही आपला आब राखून आहेत!’’

गालिब यांची सात अपत्यं मृत्युमुखी पडली. येणारं पेन्शन बंद झालं. खूप कर्जही झाले. छोटा भाऊ यूसुफ याला वेड लागलं... अशी एकामागोमाग एक संकटं गालिब यांच्यावर येतच राहिली. तेव्हाच्या काळातलं ४०-४५ हजार रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्‍यावर होतं. त्यातूनच एका दाव्यात पाच हजार रुपयांची डिक्री झाली. त्यामुळं गालिब यांनी घराबाहेर पडणंच बंद केलं. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्याच्या घरात जाऊन कैद करणं, हे कायद्यात बसत नसे तेव्हा ! यामुळं त्यांनी स्वतःलाच स्वतःच्या घरात जणू कैद करून घेतलं होतं! या परिस्थितीवरच ते म्हणाले असावेत ः ‘मुश्‍किलें मुझपर पडी इतनी की आसां हो गयी’ । या सगळ्या संकटांना रोज सामोरं जाताना त्यांच्या मनाली किती यातना, क्‍लेश झाले असतील? हृदय दुःखानं भरून आलं असेल...आणि मग असं काव्य बाहेर पडलं असेल...!

***
दिल ही तो है, न संग-ओ-खिश्‍त,
दर्द से भर न आए क्‍यूं?
रोएंगे हम हजार बार, कोई हमे रुलाएं क्‍यूं?

अर्थ ः शेवटी रक्ता-मांसाचं हृदय आहे हे माझं; रस्त्यावरचा दगड नव्हे किंवा वीटही नव्हे ! मनाचा बांध हा कधीतरी फुटणारच ना!
आणि मग रडूही येणारच. एकदाच नव्हे, तर हजार वेळा रडेन मी ! पण हे लोक का रडवत आहेत मला? असा त्रास का देत आहेत, ज्यानं मला रडू फुटावं?
(संग-ओ-खिश्‍त=दगड आणि वीट)

***
दैर नही, हरम नही, दर नही, आस्ताँ नही
बैठे है रहगुजर पे हम, कोई हमें उठाए क्‍यूँ?

अर्थ ः मंदिरासमोर नाही, मशिदीसमोर नाही, कुणाच्या दारापुढं नाही की कुणाच्या उंबरठ्यावरही नाही...मी बसलोय तो रस्त्यावर ! तरी तिथूनसुद्धा उठवत आहेत मला लोक. असं का?  (प्रेयसीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर तिची वाट बघत बसलेत बहुतेक गालिब!)
(दैर= मंदिर/हरम= मशीद/ दर= दार/ आस्ताँ= उंबरठा, दाराची चौकट/रहगुजर= मार्ग, रस्ता)

***
जब वो जमाल-ए-दिल फरोज,
सूरत-ए-मेहर-ए-नीमरोज
आपही हो नज्जारा-सोज, पर्दे में मूँह छुपाए क्‍यूँ?

अर्थ ः तुझ्या सौंदर्याचं काय वर्णन करू? माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी तू. तुझ्या रूपानं हृदय प्रकाशित व्हावं, एवढी त्या रूपात ताकद! कुणाची हिम्मत आहे तुझ्याकडं नजर लावून बघायची? असं असताना तू बुरखा का वापरावास?
(जमाल-ए-दिल फरोज=जमाल=सौंदर्य/ दिलफरोज= हृदयाला प्रकाशित करणारं/ सूरत= रूप;
(सूरत-ए-मेहर-ए-नीमरोज= नीम=अर्धा/ नीमरोजः माध्यान्ह, दुपार. माध्यान्हीच्या सूर्यासारखा लखलखीत चेहरा/नज्जारासोज = दृष्टीला जाळणारा)

***
दश्‍ना-ए-गम्जा जाँसिताँ, नावक-ए-नाज बेपनाह
तेरा ही अक्‍स-ए-रुख सही, सामने तेरे आए क्‍यूँ?

अर्थ ः तुझ्या मादक हालचाली बघून, बघणारा प्राणास मुकतो जणू! हृदयात खंजीर खुपसतात तुझे ते डोळे! खरंतर तुझ्यासमोर कुणीच  उभं राहू शकत नाही. आरशातल्या प्रतिबिंबालासुद्धा भीती वाटत असेल.
(दश्‍ना-ए-गम्जा = दश्‍ना = खंजीर/ गम्जा= विभ्रम. प्रेयसीच्या मोहक विभ्रमांचा खंजीर/ जाँसिताँ =प्राणघातक/ नावक-ए-नाज=सौंदर्याभिमानाचा बाण/बेपनाह= अमर्याद, ज्याच्यापासून बचाव करता येणार नाही असा/ अक्‍स-ए-रुख ः चेहऱ्याचं प्रतिबिंब)

***
संपूर्ण मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान गालिब यांनी पुढच्या शेरात सांगितलंय, पाहा...
कैद-ए-हयात-ओ, बंद-ए-गम अस्ल में दोनों एक है
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्‍यूँ?

अर्थ ः हा जीवनरूपी कारावास आणि ही दुःखांची बंधनं...म्हणजे खरंतर एकाच गोष्टीची दोन वेगवेगळी रूपं आहेत...मृत्यू येईपर्यंत साथ सोडत नाहीत दुःखं! निराशा, दुःखं, संकटं यातून जिवंत असेपर्यंत सुटका शक्‍य नाही. मृत्यूनंतरच काय ती या संकटांमधून मुक्तता ! (कैद-ए-हयात =जीवनरूपी कैद, कारागृह /बंद-ए-गम=दुःखाचं बंधन/ नजात=मुक्ती, सुटका)

***
हुस्न और उस पे हुस्न-ए-जन,
रह गई बुलहवस की शर्म
अपने पे ऐतमाद है, गैर को आजमाए क्‍यूँ?

अर्थ ः तुझं अप्रतिम सौंदर्य आणि त्यात भर म्हणजे तुझे सात्त्विक विचार! माझं सोडा, माझे विलासी शत्रू पण तिच्याकडे नजर उचलून बघत नाहीत. तुझा तुझ्या सौंदर्यावर एवढा जर विश्‍वास आहे तर दुसऱ्याची परीक्षा का घेतस?
(हुस्न=सौंदर्य/ हुस्न-ए-जन= सुविचार, चांगलं मत/बुलहवस=विलासी, लोभी/ऐतमाद= विश्‍वास)

***
वाँ वो गुरूर-ए-इज्ज-ओ-नाज,
याँ ये हिजाब-ए-पास-ए-वज्‌’अ
राह में हम मिलें कहाँ, बज्म में वो बुलाए क्‍यूँ?

अर्थ ः तिला तिच्या सौंदर्याचा (सार्थ) अभिमान आणि मला माझा बाणा प्रिय! पण मी संकोची आहे आणि रीतभात सोडून वागण्याची भीतीसुद्धा आहे मनात. मग आमची गाठ-भेट कशी होणार? आणि आम्ही एकमेकांना भेटलोच नाही कधी तर ती तिच्या मैफलीत बोलवणार तरी कशी मला?
(वाँ=तिथं, तिकडं/गुरूर-ए-इज्ज-ओ-नाज=गुरूर=अभिमान/ इज्ज=प्रतिष्ठा, नाज=तोरा (सौंदर्याचा)/याँ= इथं, इकडं/ हिजाब-ए-पास-ए-वज्‌’अ = आपले रीती-रिवाज सोडण्याविषयीचा संकोच)

***
हाँ, वो नहीं है खुदापरस्त, जाओ वो बेवफा सही
जिस को हो दीन-ओ-दिल अजीज,
उस की गली में जाए क्‍यूँ?

अर्थ ः एक तर ती देवा-धर्माला मानत नाही आणि दुसरं असं की ती अजिबात एकनिष्ठ नाही! असं असताना एखाद्या पापभीरू, धर्मनिष्ठ माणसानं तिच्याकडं जावंच कशाला? का पायऱ्या चढाव्यात तिच्या घराच्या?
(खुदापरस्त=ईश्‍वरभक्त/बेवफा=अविश्‍वासू/दीन-ओ-दिल = धर्म आणि हृदय/अजीज = प्रिय)

***
गालिब-ए-खस्ता के बगैर कौन से काम बंद है?
रोइए जार जार क्‍या, कीजिए हाए हाए क्‍यूँ?

अर्थ ः माझ्या मृत्यूनं जग थोडंच थांबणार आहे? मी गेल्यावर  कुणी धाय मोकलून रडून तरी काय उपयोग आहे? जगरहाटी काही थांबणार नाही. नका करत बसू ‘हाय’ ‘हाय’ असा दुःखविलाप मी गेल्यावर ! कविवर्य भा. रा. तांबे यांच्या ‘मी जाता राहिल कार्य काय?’ या ओळीसारखंच हे काहीसं !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com