इब्ने मरियम हुआ करे कोई... (पराग पेठे)

इब्ने मरियम हुआ करे कोई... (पराग पेठे)

दो रॅंगियाँ यह जमाने की जीते जी है सब
कि मुर्दों को न बदलते हुए कफन देखा...।
गालिब यांचा हा शेर किती यथार्थ आहे!


या स्वार्थी जगात माणूस नेहमीच (किमान!) दोन रूपांत वावरत असतो. एक समाजासाठीचं रूप आणि एक त्याचं मूळचं. खरं. एरवी मुखवटे लावूनच जगत असतो माणूस नेहमी. गालिब म्हणतात ः ‘हे मुखवटे लावून फिरणं इथल्यापुरतंच ! एकदा मृत्यू पावलात की हे मुखवट्यांचं नाटक संपलं. कारण मृतांना कफन नाही बदलता येत! कसे बदलू शकतील ते मुखवटे? वाह्‌ मिर्जा नौशहा! बादशहा बहादूरशहा जफर हे गालिब यांना मिर्झा नौशहा असं गमतीत म्हणत असत. नौशहा म्हणजे जावई. गालिब हे दिल्लीचे जावई होतेच! दिल्लीत त्याच सुमाराला दंगे सुरू झाले होते. त्या सर्व अराजकतेचं, अंदाधुंदीचं वर्णन करणारी एक छोटीशी पुस्तिका गालिब यांनी लिहिली होती. तिचं शीर्षक ‘दस्तम्बू’. त्या पुस्तिकेसाठी गालिब यांनी फार मेहनत घेतली होती. त्यांचं हे सगळं लेखन फार्सीत होतं. एकही अरबी शब्द त्या पुस्तिकेत येऊ नये, याची त्यांनी खूप काळजी घेऊनसुद्धा ‘नहिब’ हा एक अरबी शब्द तीत आलाच. तो त्यांनी बदलायला लावून ‘नवाय’ असा करून घेतला. ते याबाबतीत फार काटेकोर होते. १३ नोव्हेंबर १८५८ रोजी या पुस्तिकेच्या ३३ प्रती गालिब यांच्या हाती आल्या. त्यांना अतिशय आनंद झाला. आनंदाचा लाभ देणाऱ्या फार थोड्या गोष्टी गालिब यांच्या आयुष्यात होत्या.

मात्र, अपत्यवियोगाच्या सलग दुःखातून ते कधीच सावरले नाहीत. अशाच एका अपत्याच्या अकाली मृत्यूनंतर तर गालिब यांनी ही गझल लिहिली नसावी ?
***
इब्ने मरियम हुआ करे कोई ।
मेरे दुख की दवा करे कोई ।

अर्थ ः  (गालिब म्हणतात) मेरीला येशूसारखा देवासमान (देवच) पुत्र देऊन तू जगाचं कल्याण केलंस. मला निदान अतिसामान्य का होईना एक तरी अपत्य दे. माझ्या जीवनातले कष्ट संपव. माझ्या दुःखावर काहीतरी इलाज कर.
(*इब्न = पुत्र/*मरियम = मेरी. येशूची आई/*इब्न-ए-मरियम = मेरीचा पुत्र (येशू))
***
शर-ओ-आईन पर मदार सही
ऐसे कातिल का क्‍या करे कोई?

अर्थ ः ‘खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी’, असं धर्मशास्त्रात सांगून ठेवलेलं आहे; पण शिरच्छेद न करता प्राण घेणाऱ्या प्रेयसीला कुठली शिक्षा आहे? तिच्या या ‘गुन्ह्या’ला शिक्षा व्हावी, असा कुठला कायदा आहे का? खरंतर खुनापेक्षाही भयंकर गुन्हा आहे हा! पण अशा (कातिल) प्रेयसीचं काय करायचं? (*शर-ओ-आईन = मुस्लिम धर्मशास्त्र, कायदा /*मदार = आधार, आश्रय/ *कातिल = खुनी. इथं ‘प्रेयसी’ हा अर्थ ) (वाचकांच्या माहितीसाठी ः एकाच गझलेच्या दोन शेरांचा परस्परांशी काही संबंध असलाच पाहिजे, असा नियम नाही. पहिला शेर प्रेयसीबद्दल, दुसरा देवा-धर्माबद्दल, तर तिसरा आणखी वेगळ्याच विषयावरसुद्धा असू शकतो. गझल या काव्यप्रकाराचं हे प्रमुख वैशिष्ट्य होय.)
***
चाल जैसे कडी कमान का तीर
दिल में ऐसे के जा करे कोई ?

अर्थ ः तिचं चालणं असं की जणू कमानीतून सुटलेला तीरच. लवलवत्या पात्याचा बाणच जणू. तिच्या हृदयापर्यंत पोचावं तरी कसं? जर चालणंच इतकं तोऱ्याचं, तर मग स्वभाव कसा असावा? तिच्या हृदयात जागा तरी कशी मिळवावी? कसं जिंकून घ्यावं तिचं मन? (*कमान का तीर = धनुष्यातून सुटलेला बाण/ * जा करे = जागा मिळवणं)
***
बात पर वाँ जबान कटती है
वो कहे और सुना करे कोई ।

अर्थ ः  तिच्यापुढं कुणीही बोलू शकत नाही, असं मी ऐकून आहे. कारण, तिच्याशी वाद घालणाऱ्यांची जीभ कापली जाते म्हणे! किती हा गर्विष्ठपणा, क्रूरपणा! तिनं बोलावं आणि इतरांनी (मुकाटपणे) ऐकून घ्यावं असं काही आहे का? (तसं असेल तर मग) कमालच म्हणायची ही निष्ठूरपणाची!
(*वाँ = तिथं, तिकडं/*जबान=जीभ)
***
बक रहा हूँ जुनूँ में क्‍या क्‍या कुछ
कुछ न समझे, खुदा करे कोई ।

अर्थ ः या प्रेमवेडात काय काय बरळतोय मी! माझं मलाच कळत नाहीये; पण तिचंच कौतुक करत असणार मी बहुतेक किंवा तिच्या सौंदर्याची स्तुती तरी... मात्र, ते काहीही असो, मी हे जे बरळलो आहे, ते  लोकांना कळता कामा नये. नाहीतर ते खरोखरच वेडा समजतील मला. (*जुनूँ/जुनून = प्रेमोन्माद, प्रेमातला वेडेपण)
***
न सुनो, गर बुरा कहे कोई
न कहो, गर बुरा करे कोई ।

अर्थ ः कुणी काही वाईट बोललं तर ते सोडून द्या. विसरून जा. कुणी वाईट वागलं तर माफ करून टाका त्याला. अज्ञानानंच आनंद मिळवा जीवनात. हा शेर गालिब यांनी त्यांच्या बेगमला-पत्नीला उद्देशून लिहिला असावा, असं आपलं मला वाटतं. कारण, सात अपत्यं होऊनसुद्धा त्यातलं एकही मूल जिवंत राहिलं नाही. त्यामुळं त्यांना लोकांकडून बरंच वाईटसाईट ऐकून घ्यावं लागलं असणार आणि तशा वेळी आपल्या पत्नीच्या सांत्वनार्थ गालिब यांनी तिची समजूत काढली असणार ः ‘न सुनो अगर बुरा कहे कोई...।’
***
रोक लो, गर गलत चले कोई
बख्श दो, गर खता करे कोई...

अर्थ ः कुणी चुकीच्या मार्गावरून जात असेल, तर त्याला तसं करण्यापासून थांबवा. कुणी चुकला असेल, तर त्याला उमदेपणानं, दिलदारपणे माफ करून टाका! (*बख्श देना = माफ करणं/*खता = चूक)
***
कौन है जो नही है हाजतमंद?
किस की हाजत रवा करे कोई ?

अर्थ ः किती साधा विचार! मी याला ‘आधुनिक अध्यात्म’ म्हणीन! आपल्या अडचणीत कुणी मदतीला आलं नाही तर आपण लगेच त्या व्यक्तीविरुद्ध वाईट मत करून घेतो. त्या संबंधित व्यक्तीलाही काही अडचणी, काळज्या, विवंचना असू शकतात, असं आपल्या मनातच कधी येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या अडचणीत आपण कधी त्याच्या उपयोगी पडलोय का, पडलो असू तर किती हा विचारही सोईस्कररीत्या विसरून जातो आपण. गालिब म्हणतात ः ‘ज्याला दुःखं, अडचणी नाहीत असा माणूस सापडणं कठीणच! त्याच्यावर न रागावता त्याला समजून घ्या.’ साधा-सोप्पा विचार.
(*हाजतमंद = गरजू/*हाजत रवा करना = गरज पूर्ण करणं / गरज पूर्ण करणारा)
***
क्‍या किया खिज्र ने सिकंदर से?
अब किसे रहनुमा करे कोई?

अर्थ ः अशी एक कथा आहे, की खिज्र नावाचे एक पैगंबर होते. ज्या ‘अमृता’च्या कुंडातलं पाणी प्यायल्यानं अमरत्व येतं, असं म्हटलं जाई, त्या  ‘अमृत’कुंडापर्यंतचा रस्ता खिज्र यांनी सम्राट सिकंदरला दाखवला होता. मात्र, अमर झालेल्या तिथल्या काही लोकांची अवस्था बघून सिकंदर ते ‘अमृत’प्राशन करू धजला नाही.) गालिब म्हणतात ः एवढा महान योद्धा सिकंदर आणि त्याला मार्ग दाखवणारा खिज्र यांच्यासारखा महागुरू. तरीसुद्धा सिकंदर ‘अमृत’प्राशन न करताच परत आला, तर मग माझ्यासारख्या सर्वसामान्यांची काय गत? आणि आमच्या सारख्यांना गुरू तरी कोण मिळणार? कुणाला गुरू मानावं? (*खिज्र = एक पैगंबर/*रहनुमा = मार्ग दाखवणारा, गुरू)
***
जब तवक्को ही उठ गई ‘गालिब’
क्‍यूँ किसी का गिला करे कोई?

अर्थ ः गालिब म्हणतात ः आता कुठलीच आशा राहिलेली नाहीय. अगदी कुठलीच. जिवंत आहे म्हणून जगतोय... बस्स!
आणि कसलीच आणि कुणाविषयीच काही तक्रारही राहिलेली नाहीय.
गालिब यांनी कुणाविषयीच कधी तक्रार केली नाही. स्वतःवर ते सतत विनोद करत असत.
ते म्हणत ः
न सताइश की तमन्ना, न सिले की पर्वा
गर नहीं है मेरे अशआर में मानी न सही ।

अर्थ ः मला कुठल्या कौतुकाचीही अपेक्षा नाही किंवा कसल्या बक्षिसाची किंवा बक्षिशीचीही !
आणि ‘माझ्या शेरांमध्ये काही अर्थच नाही,’ ‘ते अर्थपूर्णच नाहीत,’ असं (तुम्हाला) वाटत असेल, तर वाटो बापडं ! (त्याला मी काय करणार?)

* सताईश = प्रशंसा, कौतुक /*सिला = बक्षीस/*अशआर = अनेक शेर/मानी = अर्थ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com