...आम्ही कोण म्हणुनी काय पुसता? (प्रवीण टोकेकर)

...आम्ही कोण म्हणुनी काय पुसता? (प्रवीण टोकेकर)

या जगात अनेक कवी होऊन गेले. त्यांनी भाषा घडवली. काहींनी तर इतिहास घडवला. काहींनी अनेकांची जीवनं उजळून टाकली. काहींनी यातलं काहीच केलं नाही...आणि ते गेले; पण खरंच ते गेले का? नाही. ते कुठंच गेले नाहीत. त्या मृत कवींचं गाव इथंच कुठंतरी आसपास आहे. शोधायला हवं. त्या गावाच्या वेशीचा दगड सहजी दिसत नाही; पण शोधला तर सापडेल. तो शोधायचा तर एखादा माहीतगार वाटाड्या हवा. ‘डेड पोएट्‌स सोसायटी’ हा नितांतसुंदर चित्रपट असाच एक वाटाड्या आहे.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I ,
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
- रॉबर्ट फ्रॉस्ट,  कविता : द रोड नॉट टेकन, १९१६.
* * *
चा  र यमकं जुळवता आली की कविता होत नाही. शब्दांच्या कारागिरीला काव्य म्हणत नाहीत. कविता सुचणं हे प्रकरण जीवघेणं आहे. कविता म्हणजे धरतीवर उतरणारी वीजच जणू. ती मुठीत पकडायला जाऊ नये; पण खरा कवी दिलेर असतो. ती वेदना तो फक्‍त मुठीत पकडत नाही. रक्‍तात भिनवतो. काव्य हे त्याचं जीवनाला भिडण्याचं एक अमोघ शस्त्र असतं. कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी ती कविता विजयासाठी नसते, त्यामुळं तिला पराजयाचीही भीती नसते. या जगात अनेक कवी होऊन गेले. त्यांनी भाषा घडवली. काहींनी तर इतिहास घडवला. काहींनी अनेकांची जीवनं उजळून टाकली. काहींनी यातलं काहीच केलं नाही...आणि ते गेले; पण खरंच ते गेले का? नाही. ते कुठंच गेले नाहीत. त्या मृत कवींचं गाव इथंच कुठंतरी आसपास आहे. शोधायला हवं. त्या गावाच्या वेशीचा दगड सहजी दिसत नाही; पण शोधला तर सापडेल. तो शोधायचा तर एखादा माहीतगार वाटाड्या हवा. ‘डेड पोएट्‌स सोसायटी’ हा नितांतसुंदर चित्रपट असाच एक वाटाड्या आहे.

१९८९ मध्ये पडद्यावर आलेल्या या चित्रपटानं संगणकयुगाचा उंबरा ओलांडणाऱ्या जगाला स्तिमित केलं. मॅनेजमेंट, कॉर्पोरेट, मनुष्यबळ विकास (एचआर), स्किलसेट, आउटपुट, डिलिव्हरी, कॉन्सेप्ट्‌स, आयडिएशन, इनिशिएटिव्ह, आउट ऑफ बॉक्‍स थिंकिंग अशा शब्दांचा खच पडत होता. अशा बदलत्या काळात ‘डेड पोएट्‌स सोसायटी’नं सगळ्यांचा जणू वर्गच घेतला. आजही अनेक सेमिनार्स, व्याख्यानांमध्ये या चित्रपटातली उद्धरणं हमखास दिली जातात. तेव्हा तर या चित्रपटाचे अनेक कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांसाठी खास खेळही आयोजिले होते. अभिजात हॉलिवूडपटांच्या यादीत ‘डेड पोएट्‌स सोसायटी’नं कायमस्वरूपी स्थान मिळवलं. चित्रपटातल्या काही संवादांचे आणि वाक्‍यांचे इंग्लिश भाषेतले मुँहावरे झाले, पुस्तकांची शीर्षकं झाली; पण यापलीकडं जाऊन हा चित्रपट एक वेगळाच संस्कार करतो. अभिजाताची ओढ असणाऱ्या रसिकांनी हा चित्रपट चुकवणं म्हणजे बम्पर लॉटरीचं लागलेलं तिकीट खिशात ठेवून पॅंट धुवायला टाकण्यापैकी आहे.
* * *

निळ्याशार अटलांटिकचा शेजार लाभलेल्या न्यू इंग्लंडमधल्या एका शानदार शाळेत हे नाट्य घडलं. सुमारे १९५० चं दशक. शाळा कशी स्वप्नवत्‌. बुद्धिमान, तल्लख गुरुजन. हुशार विद्यार्थी. निसर्गरम्य आवार. भारदस्त चिरेबंदी वास्तू. मुलांचं वसतिगृहही सळसळतं. वेलकम टू वेल्टन ॲकॅडमी फॉर बॉइज्‌. होय, ही फक्‍त मुलांची शाळा आहे. गुरुकुल पद्धतीची. इथंच राहायचं. इथंच शिकायचं. इथूनच उत्तीर्ण होऊन आयुष्यात यशस्वी व्हायचं. इथं प्रवेश मिळणं म्हणजे यशाच्या मार्गावरचं पहिलं पाऊल. इथले पासआउट विद्यार्थी थेट आयव्ही लीगच्या प्रतिष्ठित महाविद्यालयातच जातात. कारण, ते उत्तमच असतात.

उत्तम अभ्यास. उत्तम वर्तन. उत्तम शिष्टाचार. उत्तम संस्कार. परंपरा. प्रतिष्ठा. शिस्त आणि सर्वोत्तमाचा ध्यास...हे या संस्थेचे चार प्रमुख स्तंभ आहेत. बुजऱ्या, अबोल टॉड अँडरसनला पहिला दिवस जाम जड गेला. ओरिएंटेशनच्या व्याख्यानात प्राचार्य नोलन यांनी अत्यंत अभिमानानं शाळेची महती सांगितली. चार स्तंभांचा उल्लेख केला. इथं शिकून गेलेल्यांपैकी ७५ टक्‍के विद्यार्थी आयव्ही लीगमध्ये शिकताहेत, हेही सांगितलं.

टॉडवर भयंकर दडपण आलं. इथं शिकल्यानंतर थेट येल विद्यापीठात प्रवेश. तिथं कायद्याचं शिक्षण घेतल्यावर नामांकित वकील व्हायचं...त्याच्या वडिलांनी असा रोडमॅपच काढून दिला होता. कारण, टॉडचा भाऊ इथला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आजही नाव काढत होता. ...तेव्हा तुलाही सर्वोत्तम असायलाच हवं. नो चॉइस. ‘पण आपल्याला तर लेखक व्हायचंय’ हे तोंड वर करून वडिलांना सांगण्याची तेव्हा पद्धत नव्हती आणि टॉडची हिंमतही नव्हती. टॉडला इथं नील पेरी नावाचा मित्र गवसला. नील थोडा मोठा होता; पण त्याचा ‘डॉर्म’मधला रूममेट होता. नीलच्या कडक शिस्तीच्या वडिलांनी - मि. पेरी यांनी - त्याला डॉक्‍टर करायचा प्लॅन आखला होता. मिसेस पेरींनाही आपला होनहार छोकरा डॉक्‍टरच व्हायला हवा आहे. अब क्‍या करें? नील पेरी मस्ट बिकम डॉ. नील पेरी. सो, गाणी-बजावणी, नाटकाबिटकात कामं करणं टोटल बंद. नो चॉइस अगेन! परंपरा-शिस्त आणि प्रतिष्ठेच्या तोऱ्यात आपलं श्रेयस आणि प्रेयस दूर राहतंय, हे त्या पौगंडवयातल्या पोरांना कळत होतं; पण वळणार कसं?  इतक्‍यात त्यांना इंग्लिशचे प्राध्यापक मि. जॉन कीटिंग भेटले, आणि...
तीच तर ही कहाणी आहे. कीटिंगसर ही एक वल्ली होती. विलक्षण बोलके नि हसरे डोळे. त्यांचा वर्ग ही एक धम्माल गोष्ट होती; पण कडक शिस्तीनं आधीच पिचलेले विद्यार्थी ती धम्माल धड एंजॉय करू शकायचे नाहीत. कीटिंगसर नव्यानंच आले होते; पण तेही वेल्टनचे माजी विद्यार्थीच होते. अर्थात बुद्धिमान.

पहिल्याच दिवशी त्यांनी टॉड आणि त्याच्या वर्गाला बाहेरच्या दालनात नेलं. तिथं भिंतीवर हारीनं खेळाडूंचे फोटो लावलेले होते. शाळेचं नाव मैदानावर रोशन करणारे हे सितारे. सगळे तगडे, नजरेत चॅम्पियन असल्याचा कैफ. विजयी वीरच.कीटिंगसर हळू आवाजात बोलू लागले...
‘‘हे तुमचे पूर्वसुरी आहेत. नीट बघा, तुमच्यात आणि त्यांच्यात फारसा फरक नाही. तस्साच हेअरकट. तश्‍शीच हॉर्मोन्सची उत्फुल्लता...तुमच्यासारखीच. हे जग त्यांच्यासाठी एक शिंपला आहे, शिंपला. जग जिंकायची ऊर्मी त्यांच्या नजरेत दिसतेय बघा...तुमच्यासारखीच. त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रचंड हुरूप आणि आशा आहे...तुमच्यासारखीच. ही मंडळी आता काय करतायत? नाही, नाही...त्यांनी जगबीग जिंकलं नाही...खरं सांगायचं तर ते आत्ता, या क्षणी डॅफोडिल्सच्या रोपांखालची माती झालेले आहेत. निव्वळ माती! असं का घडलं? कारण, उत्कटतेनं जीवनाला भिडणं त्यांना जमलंच नाही. बाहेरच्या कल्लोळात अंतर्मनाचा आवाज हळूहळू बंद होत जातो. मग? मग डायेरक्‍ट खतच!... नीट कान देऊन ऐका...त्यांचा वारसा तुम्हाला ऐकू येईल...carpe diem...कार्पे डिएम...कार्पे...डिएम...सीझ द डे, बॉइज्‌. मेक युअर लाइव्हज्‌ एक्‍स्ट्रॉ-ऑर्डिनरी!’’ आपण कविता का करतो? कविता करणं क्‍यूट आहे म्हणून? नोप! आपण माणूस आहोत म्हणून कविता करतो किंवा वाचतो. माणूसजातीतच ‘पॅशन’ नावाची गोष्ट असते. डॉक्‍टरकी, वकिली, इंजिनिअरिंग या गोष्टी जगण्यासाठी आवश्‍यक असतातच. पोट त्यानंच तर भरतं; पण ती झाली उपजीविका. मग तुमची जीविका कोणती?’’
carpe diem...या लॅटिन मंत्रानं पोरांच्या मनात घर केलं ते कायमचं. (ख्रिस्तपूर्व २३ व्या शतकात होरेस नावाचा एक रोमन कवी होऊन गेला. त्याच्या ‘ओडेस’ या काव्यातली ही संज्ञा आहे.)
* * *

कीटिंगसरांचा तास अफलातून असायचा. एकदा ‘काव्याची गणितीय समीक्षा’ हा विषय शिकवत असताना सर म्हणाले ः ‘‘हा शुद्ध गाढवपणा आहे. कविता गणितात मोजायचीच कशाला? तुम्ही तुमच्या पद्धतीनं या समीक्षेचीच वासलात लावा. नेहमी लक्षात ठेवा, अभिव्यक्‍तीचं दमन आणि गतानुगतिकासारखं जगणं यासारखा दुसरा शाप नाही. कुणी लिहिलंय याला काय महत्त्व आहे? काय लिहिलंय ते महत्त्वाचं. कमॉन, हे बायबल नाहीए. हे युद्धही नाहीए. अरे, ही भाषा आहे. अभिव्यक्‍ती! दचकायचं कशाला?’’

कधी ते धाडकन उडी मारून टेबलावरच चढायचे. म्हणायचे,‘‘ इथून वरून बघितलं की वेगळंच दृश्‍य दिसतं. तुम्हीही तुमच्या बाकावर उभं राहून बघा!’’ कधी मैदानावर घेऊन जायचे. कवितेची ओळ म्हणत फुटबॉलला लाथ हाणायची. कीटिंगसरांनी स्वत:हून विचार करायची पोरांमध्ये खोड निर्माण केली. शेक्‍सपीअरचे डायलॉग्ज्‌ मार्लन ब्रॅंडो कसे म्हणेल, याची ते मस्त नक्‍कल करायचे. कधी कधी शेक्‍सपीअर जाम बोअर मारतो, असंही बेधडक म्हणायचे. साक्षात शेक्‍सपीअरला बोअर म्हणण्यासाठी धाडस लागतं. तेही अभिजनांच्या अड्ड्यात! पोरांना कीटिंगसरांबद्दल कुतूहल निर्माण झालं. शिस्तप्रिय शाळेचं नाव वेल्टन असं न घेता तिथली पोरं तिला हेल्टन (हेल म्हणजे इंग्लिशमध्ये नरक!) म्हणत. कीटिंगही मागं नव्हते. त्यांचे हे मुक्‍तवर्गाचे उद्योग टीचर्स रूममधला हेटाळणीचा विषय झाले होते; पण कीटिंगसरांनी त्याची पर्वा केली नाही. बाऊदेखील केला नाही.

‘‘मला मि. कीटिंग म्हणा किंवा खरं तर ‘ओ कॅप्टन! माय कॅप्टन!’ अशी हाक मारा...’’ असं ते विद्यार्थ्यांना रुबाबात सांगायचे. अब्राहम लिंकनसाठी विख्यात कवी वॉल्ट व्हिटमन यांनी या शीर्षकाचं एक दीर्घकाव्य लिहिलं होतं. त्याचा संदर्भ होता तो. पोरं खुळी झाली नसती तरच नवल. कधी शेक्‍सपीअर त्याचे गडद जांभळे रंग घेऊन यायचा. कधी रॉबर्ट फ्रॉस्टच्या भावमग्न कवितांचं गारुड व्हायचं. कधी हेन्‍री डेव्हिड थोरोच्या ‘वाल्डन’चे मनोरम उतारे वाचले जायचे. थोरोच्या वाक्‍यांनी पोरं थरारायची. : ‘‘मी रानात राहायला गेलो, कारण मला उत्कटपणे जगायचं होतं. जीवनात इतकं खोल बुडायचं होतं की हाडांमध्ये शिरून जगण्याचा मगज शोषून घेता यावा... मरताना असं म्हणायची वेळ माझ्यावर येऊ नये की ‘छे, मी धड जगलोच कुठं?’’

‘‘इथं मगज शोषून घेणं म्हणजे हाडूक चघळणं नव्हे हं पोराहो!’’ कीटिंगसरांची लागलीच टिप्पणी यायची. असं भारलेलं वातावरण होतं. carpe diem या मंत्रानं तर कमालच केली. नंतर कधीतरी कीटिंगसरांनी त्याचं गुपित सांगितलं. ‘‘आम्ही इथं शिकायचो, तेव्हा एक ‘डेड पोएट सोसायटी’ स्थापन केली होती. हा एक सीक्रेट क्‍लब होता. आमचा हेतू होता, जीवनाचा अर्थ वगैरे शोधण्याचा. साहित्याची समज वाढवणं हा हेतूही होताच. मैदानाच्या पलीकडं तळ्याकाठी - इथून जवळच - एक गुहा आहे. त्या गुहेत आम्ही जमत असू. गाणी-बजावणी, सिगार, कवितांचं वाचन, नाटकांचे प्रवेश...धमाल करायचो. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत हजर.’’ लेखकू व्हायला निघालेला बुजरा टॉड अँडरसन, नाटकाचा किडा चावलेला नील पेरी, अखंड प्रेमवीर नॉक्‍स ओव्हरस्ट्रीट, वेंधळा चार्ली डाल्टन, व्यवहारवादी रिचर्ड कॅमेरॉन, स्वातंत्र्याचा कैवारी स्टीव्हन मीक्‍स आणि नेमस्त प्रकृतीचा जेरार्ड पिट्‌स या वर्गमित्रांचा एक कंपू जमला. त्यांना कीटिंग यांच्या अद्भुत ‘शिक्षणा’नं पागल केलं होतं. वेल्टनच्या ‘बिघडलेल्या’ पोरांनी पुन्हा एकवार ‘डेड पोएट्‌स सोसायटी’चं पुनरुज्जीवन केलं.
* * *

टॉड अँडरसनला कविता जमू लागली. चारचौघांत बोलण्याचा संकोच वितळला. नॉक्‍स ओव्हरस्ट्रीटला काहीही करून क्रिस्तिन डॅनबरीला पटवायचं होतं; पण ती दुसऱ्याच ‘फुटबॉल्या’च्या आकंठ प्रेमात पडलेली! ‘डेड पोएट सोसायटी’च्या मेम्बरशिपनंतर नॉक्‍सनं बेधडक तिला विचारलंच. राग, समजूत, कंटाळा अशा टप्प्यांनंतर शेवटी क्रिस्तिनला त्यानं जिंकलं. ‘डॉक्‍टरकीच्या बैलाला...’ असं म्हणून शेक्‍सपीअरच्या ‘मिडसमर नाइट ड्रीम्स’मध्ये नील पेरीनं ‘पक’चा रोल केलाच. (पक हे जर्मन मिथकांमधलं एक प्रकारचं भूत आहे. त्याला ‘एल्फ’ असं म्हणतात). या नाटकात काम करण्यासाठी तो वडिलांशी खोटं बोलला होता...पकचं सुप्रसिद्ध स्वगत संपता संपता त्याला प्रेक्षकांमध्ये बसलेले रौद्रावस्थेतले वडील दिसले. नाटकानंतर वडिलांनी त्याला सरळ काढून नेला. मि. कीटिंग यांना चार खडे बोल सुनावले. नीलला फाडफाड बोलले. ‘तुला आता लष्करी शाळेत घालण्यावाचून पर्याय नाही,’ हे वडिलांचे उद्गार त्याला घायाळ करून गेले; पण आपल्याला डॉक्‍टर नाही, अभिनेता व्हायचंय, हे त्याला काही पटवून देता आलं नाही. त्या रात्री नीलनं आत्महत्या केली.

...व्यवहारवादी कॅमेरॉननं ‘डेड पोएट सोसायटी’चं गुपित थेट प्राचार्य नोलन यांच्या कानावर घातलं. जणू आग्यामोहोळ उठलं. फितूर कॅमेरॉनच्या कानसुलीत देणाऱ्या वेंधळ्या डाल्टनला शाळेतून डच्चू मिळाला. ‘माफीनाम्यावर सह्या केल्या तर शाळेत टिकाल,’ असा निर्वाणीचा दम प्रा. नोलन यांनी पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष दिला. टॉडनं सपशेल नकार दिला; ‘पण शाळेतून जावं लागेल’, असं प्रा. नोलन म्हणाले आणि पालकांनीही ‘तुला घरात घेणार नाही,’ असं सांगून टाकलं. माफीनाम्यावर डाल्टन, मीक्‍स, पिट्‌स सगळ्यांच्याच सह्या होत्या. टॉडनं खालमानेनं सही केली. मि. कीटिंग यांची नोकरी तर गेलीच होती. दुसऱ्या दिवशी स्वत: प्राचार्य नोलन इंग्लिशचा तास घेण्यासाठी आले. ‘नवे शिक्षक येईपर्यंत मी शिकवत जाईन,’ असं त्यांनी सांगितलं. वर्ग सुरू असतानाच, आपलं राहिलेलं सामान घ्यायला मि. कीटिंग आले. आख्खा वर्ग स्तब्ध झाला.

मि. कीटिंग जायला वळणार, त्याच क्षणी टॉड अँडरसन आपला नेभळटपणाचा कोष फोडून आवेगानं बाहेर आला. बाकावर उभं राहत त्यानं मोठ्यांदा हाक मारली : ‘ओ कॅप्टन! माय कॅप्टन!’ सारे थक्‍क होऊन पाहत राहिले. प्रा नोलन यांच्या संतापाला पारावार उरला नाही. तेवढ्यात नॉक्‍स उभा राहिला. मग स्टिव्हन, मग पीटस,..पाठोपाठ अवघा वर्ग बाकावर उभा राहून आपल्या गुरूला सलाम करत राहिला : ओ कॅप्टन! माय कॅप्टन!...ओ कॅप्टन! माय कॅप्टन!...ओ कॅप्टन! माय कॅप्टन!....ओ कॅप्टन! माय कॅप्टन!...
* * *

‘डेड पोएट सोसायटी’ हा चित्रपट संपताना तुम्ही तुमचे राहत नाही. तुम्ही वेल्टनच्या शाळेत थेट भरती होता. ती संस्कृती आपल्याला अनोळखी असली, तरी ते सगळं कमालीचं आपलं वाटतं. मि. कीटिंगच्या अजरामर भूमिकेत रॉबिन विल्यम्स आहे. अप्रतिम भूमिका असूनही त्याचं ऑस्कर हुकलं; पण नंतर मि. कीटिंग ही त्याची ओळख कायम होती. इतकी की २०१४ मध्ये त्याचं निधन झालं, तेव्हा अनेक वृत्तपत्रांनी त्याला ‘ओ कॅप्टन! माय कॅप्टन!’ या ओळींनिशीच श्रद्धांजली वाहिली होती. टॉम शूलमन यांनी आपल्या लहानपणच्या गुरुजनांच्या स्मृतीपोटी ही संहिता लिहिली होती. टेनेसीमधल्या ‘माँटगोमेरी बेल ॲकॅडमी’त त्यांचं शिक्षण झालं होतं. तिथं सॅम्युअल पिकरिंग (ज्युनिअर) नावाचे एक गुरुजी होते. त्यांना हा ट्रिब्यूट होता. शूलमन यांना अर्थातच त्या वर्षीचं ऑस्कर मिळालं. या चित्रपटाचं आख्खं स्क्रिप्ट इंटरनेटवर उपलब्ध आहे. शिवाय, चित्रपट झाल्यानंतर त्याचं एन. एच. क्‍लाइनबॉम या लेखकानं कादंबरीरूप लिहिलं. तेही बेस्टसेलर ठरलं. तेही टॉप आहे. चित्रकथा लोकांना इतकी आवडली होती, की विख्यात नट डस्टिन हॉफमन स्वत: ही भूमिका आणि दिग्दर्शन करायला तयार झाला होता; पण ते जमलं नाही. शूलमनच्या उत्कट चित्रकथेला दिग्दर्शक पीटर वायरनं मात्र ‘चार चाँद’ लावले. चढता परिणाम साधण्यासाठी त्यानं हा चित्रपट एकरेषीय पद्धतीनं चित्रित केला. पुढं थरारपटांमध्ये गाजलेला हॉलिवूडचा अभिनेता इथन हॉक इथं पोरगेलासा टॉड अँडरसन झालेला आहे. भलताच कोवळा दिसतो. इथन हॉकपेक्षाही हा चित्रपट नील पेरी याची अजरामर भूमिका करणाऱ्या रॉबर्ट शॉन लिओनार्ड याचा आहे. वेल्टनच्या मुलांना मि. कीटिंग यांच्यासारखा वाटाड्या मिळाला. तसा आपल्यापैकी काही जणांनाही मिळालेला असतो. एखाद्या शाळेतल्या बाईंच्या किंवा सरांच्या रूपात. शाळेतल्या या गुरुजनांनी आपल्याला भरभरून दिलेलं असतं. किमान त्यांच्याकडं जेवढं असतं, तेवढं तर सगळंच्या सगळंच दिलेलं असतं. फक्‍त जगण्याच्या धामधुमीत त्यांच्या आठवणी धूसर झालेल्या असतात. चित्रपट संपताना त्यांच्यापैकी कुणीतरी हळूचकन्‌ मनात डोकावतं. मग मन कृतज्ञतेनं भरून जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com