राजवाडे आणि पाटील: इतिहासातील काव्यन्याय

राजवाडे आणि पाटील: इतिहासातील काव्यन्याय

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आयुष्याच्या उत्तरार्धात बदलले होते. जातिव्यवस्थेबद्दल आणि स्त्रियांबद्दल त्यांनी काढलेले उद्‌गार आणि उत्तरायुष्यात त्यांनी घेतलेली भूमिका वेगळी होती. भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासावरची त्यांची लेखमाला वैदिक पूर्वजांच्या व त्यांच्या नीतिमत्तेच्या कल्पनांना तडे देणारी होती. त्याचबरोबर राजवाडे हे गांधीजींच्या तत्त्वांचाही पुरस्कार करायला लागले होते. राजवाडे यांच्यातला हा बदल अज्ञातच राहिला आहे.  

समाजातल्या प्रतिभावंत व्यक्तींच्या संदर्भात समाजाला इशारा देऊन इतिहासाचार्य राजवाडे यांनी महत्त्वाचं काम केलं असंच म्हणावं लागतं. राजवाड्यांनी त्यांच्या काळातल्या प्रतिभावंत व कर्तबगार व्यक्तींची यादी केली, जी पुढील पिढ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. समाजानं आपल्यातच वावरणाऱ्या अशा मातब्बरांची उपेक्षा व हेळसांड करू नये, या व्यक्तींचं अस्तित्व व कार्य समाजाला उपयुक्त व पथदर्शक असतं. त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्यानं त्यांचं जेवढं नुकसान होईल, त्यापेक्षा अधिक नुकसान समाजाचं होईल, हा राजवाड्यांच्या इशाऱ्याचा इत्यर्थ.

राजवाड्यांनी केलेल्या यादीला आता एक शतक उलटलं आहे. राजवाड्यांच्या निकषांना अनुसरून किंवा त्यात काही फेरफार करून शंभर वर्षांतील मातब्बरांची यादी करून या यादीची संक्षिप्त यादी करून अंतिम यादी करायचा प्रकल्प उद्‌बोधक ठरेल. त्या शंभर वर्षांच्या कालखंडाचं पन्नास-पन्नास वर्षांचे भाग, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वीचा पहिला व निर्मितीनंतरचा दुसरा असे करून, म्हणजे त्यांची तुलना करून महाराष्ट्रानं नेमकी किती प्रगती केली याचाही हिशेब करता येईल. शिवाय, तत्कालीन समाजानं आपल्यातल्या प्रतिभावंतांना काय प्रतिसाद दिला याचाही शोध घेता येईल.

इतक्‍या तपशिलात जायचं हे स्थळ नव्हे. पण, सहज आठवणाऱ्या काही नावांचा उल्लेख करायला हरकत नसावी.

राजवाड्यांच्या यादीत स्थान मिळवून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचाही साक्षीदार ठरलेला एकमेव थोर पुरुष म्हणजे स्त्री शिक्षणाचे कैवारी धोंडो केशव तथा अण्णासाहेब कर्वे. राजघराण्यांच्याच काळात कोल्हापूरचे शाहू छत्रपती मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी काम करीत होते. परंतु, त्यांच्या तीव्र ब्राह्मणविरोधामुळं त्यांना राजवाड्यांच्या यादीत स्थान मिळणं शक्‍य नव्हतं. राजवाड्यांनी प्रस्तुत यादी केल्यानंतर; पण त्यांच्याच हयातीत पुढे आलेल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समावेश करता येईल. गडकरी, अत्रे, वरेरकर, तेंडुलकर असे नाटककार, मर्ढेकर, चित्रे, कोल्हटकर, ढसाळ हे कवी, अच्युतराव पटवर्धन, नाना पाटील असे स्वातंत्र्यसैनिक, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शरद जोशी असे राजकीय मुत्सद्दी, खाशाबा जाधव, बापू नाडकर्णी, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे खेळाडू, मिराशी, दप्तरी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुरुंदकर, बारलिंगे हे विचारवंत, शेजवलकर, शरद पाटील, मिराशी, ब्रह्मानंद देशपांडे, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, ग. ह. खरे यांच्यासारखे इतिहासमिमांसक, मंगेशकर भावंडं, सी. रामचंद्र, पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्यासारखे संगीतक्षेत्रातले दिग्गज, फडके, खांडेकर, नेमाडे असे कादंबरीकार ही नावं सहज आठवली तेवढी. या आणि अशा इतर नावांना चाळणी लावून संक्षिप्त यादी करायची व त्यातून राजवाड्यांप्रमाणे ‘सप्तर्षी’ची अंतिम यादी सिद्ध करायची हे काही सोपं काम नाही.

हे काम जो कोणी आणि जेव्हा केव्हा करील तेव्हा करो. मुख्य मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा राजवाडे यांनीच केला असल्यामुळं त्यात त्यांनी स्वतःचा समावेश करणं सभ्यतेला आणि औचित्याला धरून झालं नसतं. एरवी राजवाडे हे नको तेवढ्या आत्मविश्‍वासाने वावरणारे गृहस्थ होते हे जाणकारांना सांगायला नकोच. कृ. पां. तथा नानासाहेब कुलकर्णी यांनी आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणं त्यांची मुद्रा बेदरकार, वृत्ती बेगुमानी, चालताना पाऊल टाकलं, की ते लांब व जोरातच पडायचं, असं की खालची धरित्री जणू काही नमलीच पाहिजे. गत चालण्याची तीच बोलण्याची? तरीही प्रतिभावंतांच्या प्रकरणी राजवाड्यांनी संयम पाळला! पात्रता असूनही स्वतःचं नाव टाळलं.

पण, याचा अर्थ ते इतरांनी टाळावं असा होत नाही. मराठ्यांच्या इतिहासाची साधनं जमवून ती बावीस खंडांमध्ये प्रकाशित करण्यासाठी राजवाड्यांनी जे श्रम केले त्याला तोड नाही. राजवाड्यांनी एवढा उत्साह दाखवला नसता, परिश्रम घेतले नसते, तर जेवढा इतिहास आपण जाणतो तेवढा जाणू शकलो नसतो.
विशेष म्हणजे राजवाड्यांनी स्वतः स्वतंत्र ग्रंथनिर्मिती केली नाही बावीस खंडांपैकी काही खंडांना जोडलेल्या प्रस्तावना, काही संपादनं आणि विविध नियतकालिकांमधून छापून आलेले लेख हे त्यांचे भांडवल. पण ते अभ्यासकांसाठी आजही पुरून उरलं आहे!

राजवाड्यांच्या या विखुरलेल्या लेखनात त्यांच्या प्रतिभेची व पल्ल्याची चुणूक ठायीठायी दिसते. इतिहासाचं तत्त्वज्ञान व इतिहासलेखनाची पद्धती याविषयी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. शिवाय महाराष्ट्रातल्या इतिहास संशोधनाच्या कार्याला संस्थात्मक रूप देण्यातही मोठा वाटा राजवाड्यांचाच आहे. त्यांनीच सरदार खं. चिं. मेहंदळे यांच्या मदतीनं पुण्यात ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन केलं. पुढं मतभेद झाल्यावर त्यानी पुणं सोडून धुळ्याला प्रस्थान ठेवलं व तिथं नवी संस्था उभारली.

स्वतः राजवाडे यांनी सिद्ध केलेली इतिहासलेखन पद्धती समाजशास्त्रीय होती. त्यांच्यावर फ्रेंच समाजशास्त्र ऑगस्ट कोंत याचा प्रभाव होता, आता भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला समाजशास्त्रीय आकलनाची बैठक द्यायची झाली, तर जातिव्यवस्थेचा विचार अपरिहार्य ठरतो. त्यामुळं राजवाड्यांना तो करावा लागला आणि नेमके तिथंच ते फसले.

राजवाड्यांनी जातिसंस्थेच्या उत्पत्तीची पारंपरिक संकरपद्धती खरी मानली आणि ती अस्तित्वात असलेल्या जातींना ते लागू करू लागले. त्याला त्यांनी ब्राह्मणांच्या पोटजातींचाही अपवाद केला नाही. महाराष्ट्रात अशी एकही महत्त्वाची जात शिल्लक राहिली नाही, की तिच्याबद्दल राजवाड्यांनी निंदाव्यंजक, भावना दुखावणारं, अधिक्षेप करणारं लेखन केलं नाही. त्यामुळं राजवाडे व त्यांची पोटजात एकीकडं व उर्वरित जाती दुसरीकडं अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण पुरतं बिघडून गेलं. ब्राह्मणेतर चळवळ टोकदार होण्यात राजवाडे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, विशेषतः स्त्रिया आणि शुद्र यांच्याविषयी लिहिताना राजवाड्यांची लेखणी खूपच घसरली इतकी की एरवी सत्त्वगुणाचे अधिक्‍य असलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनाही ‘राधामाधवविलासचम्पू’ या जयराम पिंडेकृत चम्पू काव्याला राजवाड्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेवर तुटून पडल्याशिवाय पर्याय उरला नाही. राजवाड्यांनी स्त्रियांवर केलेल्या शाब्दिक प्रहारांमुळं व्यथित झालेल्या शिंद्यांनी या गृहस्थाला आई असावी की नाही याचीच शंका येते असं विधान केलं!

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजवाड्यांच्या अनेक मतांमध्ये त्यांच्या आयुष्याच्या उत्तरकाळात बदल होत गेला; पण त्यांच्या जुन्याच मतांच्या आधारं ज्यांना हितसंबंधांचं राजकारण करायचं होतं, त्यांनी हे बदल अज्ञात ठेवण्याचंच धोरण पत्करलं. राजवाड्यांचं हे बदललेले रूप त्यांना परवडण्यासारखं नव्हतंच. या बदलांची चर्चा म्हणजेच अज्ञान राजवाडे ज्ञात करून घेणं.

राजवाडे प्राज्ञ आणि प्रतिभावान गृहस्थ होते. ऑगस्ट कोंत कुठली पद्धत वापरतात हे स्वतःच्याच बुद्धिबळावर ताडून मार्क्‍स एंगल्सच्याच जवळ जाणारी भौतिकवादी पद्धत त्यांनी विकसित केली. याच पद्धतीचा अवलंब करून त्यांनी भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासावर लेखमाला प्रसिद्ध करायला सुरवात केली. तोपर्यंत वैदिक धर्माचे, ब्राह्मणांचे आणि ब्राह्मण्यत्वाचे कट्टर अभिमानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजवाड्यांच्या या लेखनानं वैदिक पूर्वजांच्या व त्यांच्या नीतीमत्तेच्या कल्पनांना तडे जाऊ लागले. ज्यांची म्हणजे ऋषींच्या कुळांची, चौकशी करायची नसते तीच करू लागले व त्यातून अनेक गोत्रपुरुषांचा पंचनामा होऊ लागला. अस्वस्थ झालेल्या सनातन्यांनी राजवाड्यांची लेखमाला आपल्या ‘चित्रमय जगत’ या मासिकातून क्रमशः छापणाऱ्या चित्रशाळा छापखान्याचे मालक वासुकाका जोशी यांना छापखाना जाळून टाकण्याची धमकी दिली व लेखमालेचं प्रकाशन बंद पाडलं! भारतात मार्क्‍सवाद आणण्यासाठी ही लेखमाला उपयुक्त वाटल्यानेच कॉ. डांगे यांनी ती आपल्या ‘सोशॅलिस्ट’ मासिकातून छापायची तयारी केली. मात्र, त्यादरम्यान डांगे यांनाच तुरुंगात जावे लागल्यामुळं व थोड्याच दिवसांत राजवाडे यांचं निधन झाल्यानं सर्वच गोष्टी निकालात निघाल्या.

महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्‍वर तुकारामादी वारकरी संतांनी लोकांना निर्बल करून देश बुडवला या आपल्या पूर्वीच्या सिद्धांतात दुरुस्ती करण्याच्या मनोभूमिकेत राजवाडे येत होते. विशेषतः या संतांमुळे स्वधर्म आणि स्वभाषा यांचं रक्षण झालं हे त्यांना कळून चुकलं होतं. आजच्या काळातही त्यांचे विचार तारक ठरतील, हे पटल्यानंच त्यांनी ज्ञानेश्‍वरीतल्या नीतिकथा छापायला सुरवात केली होती.

राजवाडे यांना मानणारे लोक राजकारणात साधारणापणे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या मृत्यूनंतर या अनुयायांना महात्मा गांधीजींचं नेतृत्व स्वीकारणं जड जाऊ लागलं. त्यामागचं एक कारण, गांधीजी आपल्यापेक्षा खालच्या जातीचे आहेत हे सुद्धा होतं. राजवाडे ‘पूर्वी’चेच राहिले असते तर त्यांनीही याच लोकांबरोबर जाऊन गांधीजींच्या नेतृत्वाला विरोध केला असता. परंतु, बदललेल्या राजवाड्यांनी गांधीजींची बाजू घेऊन त्यांच्या नेतृत्वाचा जोरदार पुरस्कार व प्रचार करण्यास प्रारंभ केला. राजवाड्यांमधील हा बदल राजवाडे सांप्रदायिकांनी पुढं येऊ दिला नाही. ते गांधींना विरोध करीत राहिले.
आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला विठ्ठलराव शिंद्यांनी लक्ष्य केलं ते राजवाड्यांचं स्त्रियांबद्दलचं अनुदार मत.

राजवाड्यांचं हे मत बदलल्याचा प्रत्यक्ष पुरावा राजवाड्यांच्या थेट लिखाणातून उपलब्ध होत नाही. तथापि, या शक्‍यतेचं अनुमान करण्यास जागा आहे. ती जागा ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या दोन कादंबऱ्यांतून उपलब्ध होते, त्या कादंबऱ्या म्हणजे ‘गोंडवनातील प्रियंवदा’ आणि ‘ब्राह्मणकन्या’. केतकरांच्या या कादंबऱ्या ज्या नायकावर उभ्या आहेत तो वैजनाथशास्त्री धुळेकर हे पात्र राजवाड्यांवरून बेतलेलं आहे. स्वतः केतकरांना राजवाड्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी जवळीक लाभली होती. व त्यांची मतंही जवळून ज्ञात झाली होती.
‘गोंडवनातील प्रियंवदा’ या पहिल्याच कादंबरीतील इतिहास संशोधक धुळेकर कोकणस्थ ब्राह्मणांचे कैवारी आहेत. ही एकमेव जातच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन त्याचं भलं करू शकेल, असं त्यांचं मत होतं.

‘ब्राह्मणकन्या’ कादंबरीत मात्र या नायकाचं पूर्णपणानं परिवर्तन होऊन तो जाती आणि लिंगभेद नाकारू लागतो. इतकंच काय परंतु कुमारी आणि विधवा स्त्रियांना एकत्र करून पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देऊ लागतो. वेगळी राज्यघटनाच बनवून ठेवतो की जिच्यात स्त्रियांना बरोबरीचे, कदाचित थोडं वरचं स्थान असेल. आता मुद्दा एवढाच शिल्लक राहतो की वास्तवातल्या राजवाडे नावाच्या व्यक्तीच्या मतांमध्ये खरोखर तसा बदल झाला होता का? तो झाला असेल तर राजवाडे हे महाराष्ट्रातले दुसरे स्त्रीवादी विचारवंत ठरतील. पहिले अर्थातच महात्मा फुले.

खरोखरीच्या म्हणजे वास्तव सृष्टीतील राजवाड्यांच्या मतांमध्ये एवढं आग्रमूल परिवर्तन झालं नसेल तर कादंबरीच्या अद्‌भूत सृष्टीत ते कादंबरीकार केतकर यांनी सर्जनशील स्वातंत्र्याच्या अधिकार वापरून घडवून आणलं असं म्हणावं लागेल.
त्यामुळं राजवाडे पूर्णपणे बदलले होते असं म्हणता येणार नाही; परंतु मग दुसरे स्त्रीवादी विचारवंत होण्याचं श्रेय केतकरांकडं जाईल.
तिसऱ्याबद्दल वाद व्हायचं कारण नाही. त्यांचं नाव कॉ. शरद पाटील. योगायोगाची गोष्ट म्हणजे राजवाड्यांच्या संशोधनाचे कठोर टीकाकार असलेल्या शरद पाटलांना राजवाड्यांच्या योगदानाबद्दल अबोध आदर होता. आणि पुणं सोडून राजवाड्यांनी ज्या गावाचा आश्रय घेतला त्या गावचे म्हणजे धुळ्याचेच ते रहिवासी होते.

कॉ. पाटील हे एका अर्थाने धुळेकर शास्त्रीच होते असे म्हणायला हरकत नसावी. केतकरी कादंबरीतील धुळेकर शास्त्री काल्पनिक असेलही, ती राजवाड्यांची प्रतिमा नसलेही पण हा दुसरा धुळेकरशास्त्री, व्याकरणाचा महापंडित खरोखरच धुळ्याच्याच वास्तव सृष्टीचा भाग होता व स्त्रियांचा खरा कैवारीही होता. डांगे म्हणतात त्याप्रमाणे राजवाडे मार्क्‍सवादाकडं निघाले होते. पाटील तिथं पोचून त्याच्याही पलीकडं जाऊ पाहत होते. याला इतिहासातील काव्यन्याय म्हणायचं का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com