अशी बोलते माझी कविता

poems in saptaranga
poems in saptaranga

दगड 

खूप वेळ
मी एकटक पाहत होतो
एक फाटका माणूस 
भिंतीच्या दगडाशी 
तावातावानं बोलत होता...
मी ते ‘संभाषण’ 
कान देऊन ऐकत राहिलो

मला प्रश्‍न पडला, 
त्याचं त्या दगडाशी 
काही नातं असेल का ? 

मी त्या माणसाचाच 
विचार करत राहिलो
त्याचं ते संभाषण
ते हातवारे सुरूच होते...

त्या दगडातून 
काही प्रतिशब्द येत होते का?
कदाचित येतही असावेत ! 
आणि ते फक्त तोच ऐकू शकत असावा...

माझ्याकडं पाहत आणि हसत 
तो पुन्हा 
त्याच्या त्या ‘शून्य संभाषणा’त मग्न झाला

आणि इकडं 
त्याच्याविषयीच्या विचारांनी 
माझ्या मनाचा होत गेला दगड...
शून्यवत्‌ ! 

सुबोध पारगावकर, पुणे 
subodh.pargaonkar@gmail.

------

कर्दळ 

ज्या फांदीवर घरटे होते, त्या फांदीला मोहळ
उगा दिला रे आयुष्या तू असा मधाचा ओघळ

कळी मनावर घेतच नाही ऋतू कोणता हल्ली
तिच्या भोवती किती धरावी मी श्‍वासांची ओंजळ?

काट्यांभवती वावरलो मी फक्त फुलांच्यासाठी   
कुणी म्हणे पण : ‘खुळा भ्रमर हा मिठीत घेतो बाभळ’!

या जन्मातिल जगण्याचाही ऋतू पालथा गेला 
चला, निघावे रिती घेउनी आयुष्याची सागळ* ! 

चुकून रस्ता एक चांदणी करत असावी ये-जा
उगाच येते काय नभाला हल्ली हल्ली भोवळ!

झुळूक करते मलाच आता विझवायाची भाषा
कालच तर या मांडीवरती निजून गेले वादळ!

पुन्हा एकदा जन्म जाळण्या उठून आलो असतो...
तुझ्याहुनी पण उत्कट होती त्या मृत्यूची तळमळ!

चुकून परक्‍या क्षितिजावरती मावळतीला आलो
अन्‌ परतीच्या वाटेवरती सांजभयाची कर्दळ! 

(* जुन्या काळातलं एक भांडं)

धनंजय तांदळे, 
नगर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com