आमचं 'रानमेवा अभियान' (पोपटराव पवार)

आमचं 'रानमेवा अभियान' (पोपटराव पवार)

हिवरेबाजारमध्ये झालेलं ग्रामपरिवर्तनाचं काम सुरू करण्यामागं माझी सर्वांत मोठी प्रेरणा होती, ते म्हणजे बालपणी पाहिलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीनं परिपूर्ण असं हिवरेबाजार. गावाच्या परिसरात पसरलेली विविध फळझाडं, फुलझाडं, वेली लोकांना आपल्या वाटायच्या. झऱ्यांना पाणी असायचं. जे आम्ही गुडघ्यावर बसून ओंजळीत घेऊन प्यायचो. मधमाशांची पोळं काढून मध खायचा आमचा आवडता छंद होता. जांभळं आलं, की हात मोडून गळ्यात घेतलेली मुलं दिसायची. कारण जांभळं काढताना हमखास कुणीतरी कमकुवत लाकडाच्या जांभळाच्या झाडावरून पडलेलं असायचं. बोराच्या सीझनमध्ये बोरं पाडताना दगड डोक्‍याला लागून डोकं फुटलेली मुलं तर प्रत्येक घरात असायची. हा रानमेवा हातात घेतल्यावर असं वाटायचं, की आत्ता रामदासस्वामींनी जर ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे,’ असं विचारलं, तर आमचा हात करवंद, बोरं, आवळं, पेरू आणि सगळा रानमेवा घेऊन नक्कीच वर गेला असता.

त्यानंतर १९७२ च्या भीषण दुष्काळानं सगळं चित्रच बदलून टाकलं. गावचं गावपण आणि ही सगळी समृद्धी निघून गेली. पुढं गावानं खूप साऱ्या समस्यांचा सामना केला. दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीच्या बिकट समस्या, दारूमुळं होणाऱ्या समस्या आणि वादविवाद या साऱ्यांच्या गोंधळात त्या वेळच्या शाळकरी मुलांच्या पिढीचा रानमेवा कुठंतरी हरवून गेला.

मी १९८९मध्ये सरपंच झालो, त्या वेळी माझ्या या बालपणीच्या समृद्ध गावाला डोळ्यासमोर ठेवूनच आजच्या रोल मॉडेल हिवरेबाजारची वाटचाल सुरू आहे. जलसंधारण, ग्रामस्वच्छता, सामाजिक परिवर्तन आणि नशामुक्ती या सगळ्यांसोबतच निसर्गसमृद्ध गाव पुन्हा बनविण्याची एक एक पायरी आम्ही चढत होते. १९९३-९४ मध्ये डोंगरात वनविभागाने लावलेली सुबाभूळ आणि ग्लिरिसिडिया ही दोनच झाडं सगळीकडं होती. या झाडांना फुलं आणि पर्यायानं फळंही येत नसल्यानं पक्षी आणि इतर वन्यजीवांचा वावर फार कमी होता. त्यामुळं सगळी जंगलं निर्जीव वाटायची. म्हणून सर्वप्रथम आम्ही चिंच, आंबा, सीताफळ, फणस, जांभूळ, कडूनिंब यांसारख्या अनेक झाडांची त्या जागी लागवड सुरू केली; पण डोंगरावर चरण्यासाठी येणाऱ्या शेळ्या आणि इतर जनावरांनी जवळपास सगळ्या झाडांची पानं आणि शेंडा खाऊन टाकला. लांबून झाडं विकत आणायची आणि जनावरांनी ती खाऊन टाकायची, असं अनेकदा झालं. आता झाडं जगवायची कशी, हे मोठं आव्हान आमच्यापुढं होतं. मग एक विचार पुढं आला, की ज्या मुलांसाठी, त्यांच्या रानमेव्यासाठी आपण हे करतोय, त्यांनाच सोबत घेऊन आपण काही तरी नवीन प्रयोग सुरू केला तर? याच विचारातून ‘रानमेवा अभियान’ ही संकल्पना पुढं आली. मराठी शाळा आणि नवीनच सुरू झालेली हायस्कूलची मुलं सोबत घेऊन शिक्षक आणि गावच्या पुढाकारानं आम्ही मुलांची रोपवाटिका सुरू केली. मुलंही खूप आनंदानं यात सहभागी झाली. वेगवेगळ्या सीझनची फळं खाल्यानंतर त्यांच्या बियांचं जतन करून मुलांनी शाळेतच त्याची रोपं तयार केली. यामध्ये सीताफळ, आंबा, पेरू, चिकू, चिंच, जांभूळ, शेवगा; तसंच अनेक फुलझाडं आणि वेलींचाही यात समावेश होता. मग ही तयार झालेली रोपं आधी डोंगरात लावली. आता आपल्याच मुलांनी लावलेली ही झाडं जगवण्यासाठी लोकही जनावरांना चरण्यासाठी नेताना झाडांना काही होणार नाही, याची काळजी घेऊ लागले. या झाडांची निगा राखण्याची जबाबदारीही गटागटानं मुलांवर सोपवली गेली. उन्हाळ्यात हंड्यानं पाणी वाहून महिलांनी ही झाडं जगवली. नंतर ‘घर तिथं परसबाग’ हा उपक्रमसुद्धा सुरू करून शाळेतल्या प्रत्येक मुलाला एकएक झाडाचं रोप देऊन घरी वाढवायला दिलं आणि जो विद्यार्थी या झाडाची उत्तमरित्या वाढ करेल, त्याला ‘बालवृक्षमित्र’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेमुळं मुलं आणखी उत्साहानं या स्पर्धेत सहभागी झाली. आज याचंच फलीत म्हणजे गावातल्या प्रत्येक घरासमोर किमान पाच तरी फळांची आणि फुलांची झाडं आपल्याला पाहायला मिळतील. माझ्यासाठी ही सगळ्यांत मोठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे, की आज गावांतली मुलं फळा-फुलांनी बहरलेलं जिवंत गाव अनुभवत आहेत.

दरवर्षी या रोपवाटिकेत एक हजाराच्या वर रोपं तयार केली जातात आणि ती गावात; तसंच गावाबाहेरही लावली आणि पाठवली जातात. आमची ही हरितसेना फक्त एवढ्यावरच थांबली नाही. वारीला जाणाऱ्या लोकांसोबत या जतन केलेल्या बियांचे बीजगोळे बनवून ते महाराष्ट्रात पसरवण्याचा उपक्रमही सुरू झाला आहे. आता आम्ही या अभियानाअंतर्गत विविध भौगोलिक परिस्थितीत, नैसर्गिक परिवर्तनात आणि सामाजिक समस्यांमध्ये तग धरणारी कुठली झाडं लावावीत, या गोष्टींवर काम करत आहोत. गावामध्ये आजपर्यंत लावलेली सगळी झाडं आम्ही याचं नियोजनानं लावली आहेत. उदाहरणार्थ, शाळेच्या आवारात काटेरी आणि फळांची झाडं आम्ही लावली नाहीत. काट्यांमुळं मुलांमध्ये एक नकारात्मकता आणि फळझाडांमुळं भांडण होतात, असं अनुभवास आलं. मग आम्ही शाळेच्या आवारात फक्त फुलझाडं आणि सावली देणारी झाडंच लावली. ज्यामुळं मुलं फुलांसारखी टवटवीत आणि सावली देणाऱ्या झाडासारखी परोपकारी बनावीत. याचबरोबर नदीचा काठ, रस्ता, बांध, खडक, पाणथळ जागा असेल तर कुठली झाडं लावावीत, गावात मोकाट जनावरांचं प्रमाण जास्त असेल, तर कुठली झाडं लावावीत, या गोष्टींचा अभ्यास आणि विचार करूनच मुलांनी रोपवाटिका तयार केली. 

सहा वर्षांपूर्वी गावामध्ये आणखी एक नवीन संकल्पना जन्माला आली. आपली शेतीव्यवस्था, समाज आणि वनांचं नातं, बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांवर आधारलेलं आहे. त्यामुळं आम्ही डोंगरात गिरीमहाराज यांच्या समाधीजवळ हे राशी-नक्षत्र उद्यान तयार केले. त्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या रोपवाटिकांतून वेगवेगळ्या राशी आणि नक्षत्रांची झाडं भागवून आम्ही त्यांची लागवड केली आणि यशस्वीरित्या त्यांना जगवलंही आहे.

आज आमच्या हरितसेनेला सतरा वर्षं पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून तीन ते चार लाखांच्या वर झाडं आम्ही गावात लावली आहेत किंवा गावात येणाऱ्या पाहुण्यांसोबत राज्यभरात पोचवली आहेत. आताची पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी या अभियानातून शाश्‍वत असा रानमेवा मिळेलच; पण या माध्यमातून मुलांमध्ये गाव आणि निसर्गाविषयी प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला, हे आमचं आणि या ‘रानमेवा अभियाना’चं सर्वांत मोठं यश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com