गांधीजींच्या हातात पिस्तूल असते तर! 

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi

महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी. आपण सर्वजण क्षणभर विचार करू या ! "जर गांधीजींच्या हातात पिस्तूल असते तर !' जर त्यांनी सशस्त्र क्रांतीचे शंख फुंकले असते तर काय झाले असते. भारत हा दुसरा पाकिस्तान बनला असता का? येथे वीस वर्षे तरी लोकशाही टिकली असती का? प्रत्येक ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले असते? 

महात्मा गांधीजी म्हणायचे, "जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्‍य वाटले. पण नेहमी शेवटी त्यांचा पराभव झाला आहे.अशी अनेक ध्येये आहेत. ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन.'' 

गांधीजींचे हे तत्त्वज्ञान आजच्या काळात नव्हे तर रामायण-महाभारताच्या काळात उपयोगी पडले असते. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या झाली. त्याला आता 69 वर्षे पूर्ण होत आहे. गांधीजींची हत्या केल्याने त्यांचे विचार पुसले जातील असा काही मंडळींचा समज होता. परंतु भारतच नव्हे तर जगभरात गांधीजी या तीन शब्दांची आठवण दररोज कुठे तरी होत असते. जगात जेथे जेथे सूर्याची किरणे पोचतात तेथे तेथे ही तीन शब्द पोचतात. इतकी शक्ती गांधींजीमध्ये आहे. जे गांधीजींचे तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही. गांधी-आंबेडकर यांच्यात अनेक मुद्यावर मतभेद होते. हे जगजाहीर आहे. पण या दोन विभूतींनी देशासाठी दिलेले योगदान कदापी विसरता येणार नाही. मला तर अनेक वेळा प्रश्‍न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहाशे वर्षांपूर्वीचा. तरीही लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत जय शिवाजी हे नाव कसे निघते. तसेच बापू आणि बाबासाहेबांचेही का निघते. या तिघांप्रमाणेच इतरही आदरणीय नेते आहेत पण हीच माणसे का महान वाटतात.

आज गांधीजींच्या विचाराला कितीही विरोध करा. गांधीजी बरोबर नथुरामला जोडण्याचा कितीही प्रयत्न करा नथूरामला हिरो करण्याचे कितीही ठरवा. पण, गांधी नावाचा एक अहिसेंचा पुजारी नेहमीच तुमच्या आडवा येत राहणार आहे. तुम्हाला वाटत असेल, की एक दोन नाटके लिहून ,त्यांची टिंगलटवाळी करून त्यांचे विचार पुसले जातील तर ते कदापी शक्‍य होणार नाही. तरुणाईच्या मस्तकात पेरायचं असेल तर सकस बी पेरा. विष काय पेरता. गांधीजींवर बोलणे आणि टीका करणे सध्याच्या जगात सोपे आहे. हिंमत असेल तर बाबासाहेबांविरोधात "ब्र' तरी काढून दाखवा. पण, नाही. तशी हिंमत करू शकत नाही तुम्ही. जे कॉंग्रेसवाले उठताबसता गांधीजींचे नाव घेतात त्या नेबळटांमध्ये लढण्याचे आणि संघर्ष करण्याचे त्राणच उरले नाही. त्यांना फक्त गांधीजी हे नाव सत्तेसाठी हवे असते.

गांधीजी म्हणायचे की अहिंसेचे पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्‍यक आहे आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्‍य नाही. जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्‍यक नाही.. तुम्ही अन्यायाविरोधात लढू नका असे गांधीजींनी केव्हा म्हटले होते. पण, लढायचे कोणी? 

महिना दोन महिन्यापूर्वी "डॉन' दैनिकामध्ये गांधीजींवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख आज गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आठवला. या लेखाचे शीर्षक होते. "असा क्षणभर विचार करा, गांधीजींच्या हातात पिस्तूल असते तर !'' हा लेख सुंदरच होता. मात्र, शीर्षकावरून असे वाटते की गांधीजी आणि बाबासाहेबांनी हिंसेचे समर्थन करून सशस्त्र क्रांतीचे शंख फुंकले असते तर काय झाले असते या देशाचे..भारत हा दुसरा पाकिस्तान बनला असता का ? येथे वीस वर्षे तरी लोकशाही टिकली असती का ? माती सतत रक्ताने भिजलेली दिसली असती का ? प्रत्येक ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले असते का ? असे एकनाअनेक प्रश्‍न माझ्या मनाला स्पर्श करून गेले.. 

अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा उभारून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदानही दिले. त्यांचे हे बलिदान कदापी व्यर्थ जाणार नाही. शेवटी प्रत्येक विचाराला जशी एक बाजू असते तसा विरोधही असतोच. गांधीजींनाही विरोध झाला. पण, विचाराची लढाई विचाराने लढली गेली नाही. तर एक पिस्तूल चालवून विचार संपविण्याचा प्रयत्न झाला. पण, त्यांचे विचार संपले नाहीत. संपणार नाहीत. जे गांधीजींचे ते बाबासाहेबांचे. जर बाबासाहेबांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला असता तर काय झाले असते या देशाचे? त्यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र आपल्या बांधवांना दिला. किती मोठे विचार होते या माणसांचे. स्वतंत्र भारताची घटना किती आदर्शवत बनविली. आज स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारने आणि गेली. पण लोकशाही टिकली. अनेक जातिधर्माचे लोक देशात गुण्यागोविंदाने नांदताहेत याचे श्रेय गांधीजी, आंबेडकरांबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील थोर मंडळींना जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com