छत्रपती, तुमचे बलिदान कदापी व्यर्थ जाणार नाही !

सोमवार, 28 ऑगस्ट 2017

हरियाणात आज तणाव असला तरी एक ना एक दिवस राम रहीमच्या मुसक्‍या या आवळण्याची गरज होती. एका बलाढ्य शक्तीविरोधात लढलेल्या चार लढवय्यांपैकी एकाची म्हणजेच पत्रकार छत्रपती यांची हत्या झाली. मात्र सत्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावणाऱ्या एका पत्रकाराचे बलिदान कदापी वाया जाणार नाही.

ज्यांच्यापुढे भले भले लोटांगण घालतात. त्यांच्याविरोधात 'ब्र' जरी काढला तर उद्ध्वस्त होण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. असे सर्वत्र भयावह वातावरण असताना वाघाच्या जबड्यात हात घालण्याचे ज्यांनी काम केले. ती वाघाच्या काळजाची माणसं म्हणजे दिवंगत पत्रकार राम चंदेर छत्रपती, अन्यायग्रस्त दोन साध्वी आणि "सीबीआय'चे कणखर अधिकारी सतीश डागर. 

या चौकडीने जर हिम्मत दाखविली नसती, तर आज गुरमीत राम रहीम तुरूंगात गेलाच नसता ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुठलाही बाबा, बुआ, अध्यात्मिक गुरू, कुविख्यात गुंड किंवा वजनदार पुढारी असो. त्यांच्याशी वैरत्व घेणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. अशा बलाढ्या माणसांविरोधात लढताना किती किम्मत मोजावी लागते याची असंख्य उदाहरणे देता येतील. आज हरियानात राम रहीम प्रकरणावरून तेथील सरकारच अडचणीत आले आहे. राम रहीम याला अटक झाल्याने तेथे उसळलेल्या दंगलीत तीसहून अधिक लोक हिंसाचारात ठार झाले आहेत. राज्यात प्रचंड तणाव आहे. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी तेथे लष्कराला पाचारण करावे लागले. या सर्व घटना पाहता राम रहीमच्या कोणी आणि का मुसक्‍या आवळल्या? हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वपक्षिय नेते ज्याच्यापुढे मान खाली घालून उभे राहतात त्या एका शक्तीशाली ताकदीविरोधात फक्त चारजण लढले. संघर्ष केला. प्रसंगी प्राणही द्यावे लागले. ही शक्ती या चौघात आली कोठून? 

पंधरा वर्षापूर्वी राम रहीम यांच्या आश्रमातील एका पीडित मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण 'पूरा सच' या वृत्तपत्राचे संपादक असलेले राम चंदेर छत्रपती यांनी बाहेर काढले होते. राम रहीम यांच्याविरोधात अशाप्रकारे बाहेर काढणारे छत्रपती हे पहिले. राम रहीम यांच्या आश्रमात महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे पत्र तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठविण्यात आले. या पत्रातील मजकूर ज्या कोणाच्या वाचणात आला असेल त्याचे मन सुन्न झाल्याशिवाय राहाणार नाही. वास्तविक पंतप्रधानाना पत्र मिळाल्यानंतर पत्रकार छत्रपतीनी या प्रकरणाला वाचा फोडली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पत्रकार छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर ते वीस दिवस जिवंत होते. मात्र तत्कालिन चौटाला सरकारने त्यांचा साधा जवाबही घेतला नाही. राम रहीमचे लोक इतक्‍यावरच थांबले नाहीत. ज्या मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. तिच्या भावाचीही हत्या केली. 

पत्रकार छत्रपतींचा मुलाने आपल्या वडीलांचा खून स्वत:च्या डोळ्याने पाहिला. ते ही वडिलांसारखे शूर होते. लढवय्ये होते. शांत न बसता त्यांनी हे प्रकरण पुन्हा न्यायालयात नेले. राम रहीमच्या सांगण्यावरून झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. पुढे "सीबीआय' चौकशीचे आदेश सरकारला द्यावे लागले. त्यावेळचे "सीबीआय' चे "डीएसपी' सतीश डागर होते. त्यांनी अत्याचार झालेल्या महिलांना आधार दिला. पुरावे गोळा करण्यास सुरवात केली. ज्या दुसऱ्या एका महिलेवर अत्याचार झाला होता. तिच्या सासरकडचे लोक राम रहीमचे समर्थक होते. या महिलेने राम रहीम विरोधात साक्ष दिली तेव्हा त्या महिलेला सासरच्या मंडळीनी हाकलून दिले. मात्र डागर यांनी या दोघींना वेळोवेळी मदत केली. मानसिक आधार दिला. 

पुढे 2003 मध्ये डागर यांनी अन्यायग्रस्त महिलांचे जवाब घेतले. केस मजबूत केली. हे सर्व करीत असताना त्यांनाही त्रास सहन करावा लागला. "सीबीआय' न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर राम रहीम विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला गेला. पुढे पत्रकार छत्रपती यांच्या मुलानेही अन्यायाविरोधातील लढाई लढली. राम रहीमचा बुरखा टराटरा त्याला फाडायचा होता. लैंगिक शोषणाविरोधात "सीबीआय'ने भक्कम पुरावे गोळा केल्यानंतर "सीबीआय' न्यायालयाने राम रहीम याला अटक करण्याचे आदेश काल दिले आणि जे काही व्हायचे ते झाले. राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला. त्याच्या भक्ताने जाळपोळ केली. पोलिसांनी हिंसक जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केला. 

हरियाणात आज तणाव असला तरी एक ना एक दिवस राम रहीमच्या मुसक्‍या या आवळण्याची गरज होती. एका बलाढ्य शक्तीविरोधात लढलेल्या चार लढवय्यांपैकी एकाची म्हणजेच पत्रकार छत्रपती यांची हत्या झाली. मात्र सत्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावणाऱ्या एका पत्रकाराचे बलिदान कदापी वाया जाणार नाही. हे तितकेच खरे. जे चारजण राम रहीमच्या अत्याचाराविरोधात लढले त्यांच्या शौर्याला सलाम !