आले सांगलीचे आंबेवाले?

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide

दादा कोंडके यांचे "आली मुंबईची केळेवाली' हे गाणे एकेकाळी खूप प्रसिद्ध होते. सांगलीची द्राक्षे आज प्रसिद्ध असली तरी या द्राक्षानाही आंबे मागे टाकतील. भविष्यात "आले सांगलीचे आंबेवाले' असे गाणे जर कोणी जर लिहिले तर ते ही नक्कीच प्रसिद्ध होऊ शकते. "माझ्या आंब्याचा रंगच न्यारा, ज्यांन खालंय त्याला विचारा' असा दावा केला जावू शकतो. 

"नाशिकची द्राक्षे, घोलवडचे चिकू आणि वसईची सुकेळी ' एकेकाळी प्रसिद्ध होती. नाशिकच्या द्राक्षांना मागे टाकत सांगलीच्या सिडलेस चमनने देशाचीच नव्हे तर जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. येथे एकेकाळी हळदीची बाजारपेठही प्रसिद्ध होती. आज ती ही राहिली नाही. कदाचित द्राक्षाची जागा आंबाही घेऊ शकतो. सांगलीच्या आंब्याला उच्चांकी मागणी येऊ शकते. 

थोर शास्त्रज्ञ संभाजीराव भिडे यांनी केलेल्या संशोधनाने देशाला नव्हे तर जगाला आश्‍चर्य वाटले असेल. त्यांच्या शेतातील विशिष्ठ आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होते. (मुलगी नव्हे). भिडे हे प्रखर देशभक्त आणि हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना देशाची मनीध्यानी चिंता लागून राहिलेली दिसते. हिंदूंची संख्या कमी होत असल्याची भीती केवळ भिडेंनाच नव्हे तर परिवारालाही आहे. 

एका मुलीवर किंवा मुलावर थांबणारी हजारो नव्हे लाखो जोडपी महाराष्ट्रात असतील. अफाट लोकसंख्येचे परिणाम कुटुंबावरच नव्हे तर देशावरही कसे होतात हे आपण पाहत असतो. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही छोटे कुटुंब ठेवण्याचा सल्ला दिला होता. बाबासाहेबांप्रमाणेच समाजप्रबोधनाच्या चळवळी येथे वर्षोनुवर्षे सुरू आहेत. नरेंद्र दाभोलकरांनी तर अंधश्रद्धेला विशेषत: बहुजन समाजाने मूठमाती द्यावी यासाठी आपला जीवच पणाला लावला. याच मातीत शाहू, फुले आंबेडकरांसारख्या महान मानवांनी लोकांना खडबडून जागे केले. अंधरूढीपरंपरा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकारासाठी ही मंडळी नेहमीच कार्यरत राहिली. मात्र आजकालच्या भिडेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने आंबा खाल्याने पूत्रप्राप्ती होते असे विधान करणे आश्‍चर्यकारकच नव्हे निषेधार्ह आहे. 

शाहू, फुले, आंबेडकरांसह आगरकरांच्या महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. वंशाला दिवाच हवा असे म्हणणारे महाभागही कमी नाहीत. मुलगाच हवा अशी अपेक्षा करणाऱ्या मंडळींना भिडे सारखे नेते साथ देतात हे यावरून स्पष्ट होते. आपण काय बोलतो याचे भानही त्यांना राहिले नाही. ज्या मुलींचा गर्भाशयातच गळा घोटला जातो. मुलासाठी अनेकदा गर्भपात केला जातो. महिलेच्या आरोग्याची जेथे पर्वाही केली जात नाही तेथे पुत्र प्राप्ती करा. आंबे खा ! असा अंधश्रद्ध सल्ला देणे हा खरे सामाजिक गुन्हा आहे. पण, प्रसिद्धी ज्यांच्या डोक्‍यात गेली आहे त्यांना कोण सांगणार ? 

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होते या भिडे यांच्या विधानाची सोशल मीडियावर चिरफाड करण्यात आली. त्यांची यथेच्छ टर उडविण्यात आली. गमतीशीर पोस्टही होत्या. 

कोरेगावभीमा दंगलीनंतर भिडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रकाश आंबेडकरांनी या दंगलीमागे एकबोटे-भिडे असल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर मीडियाने नको इतके भिडेंना उचलून धरले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांना क्‍लिनचीट दिल्याने ते आता मोकाट सुटले आहेत. आपण काहीही बोललो. हातात तलवारी घेण्याची प्रक्षोभक भाषा केली तरी कोणी आपले काहीच करू शकत नाही, या भ्रमात बहुधा भिडे असावेत. त्यांना हिंदुराष्ट्राची खूप चिंता असल्याने अधिक हिंदू मुले जन्माला यावीत असे वाटते. किती मुलांना जन्माला घालायचे किंवा मुलांना जन्मालाच न घालता एखादे अनाथमुल दत्तक घ्यायचे हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असतो. मात्र प्रबोधन करण्याऐवजी समजगैरसमज पसरविण्यात अर्थ तो काय ? 

"हम दो, हमारे दो'बाबत सरकार जनजागृती करीत आहे. मुलांप्रमाणे मुली कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. देशाच्या पंतप्रधानांपासून ते लढाऊ वैमानिक म्हणून मुली उत्तम कामगिरी पार पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलींच्या कर्तृत्वाला सलाम करीत असताना असले अंधश्रद्ध विचाराची पेरणी का केली जात आहे? या पेरणीतून सकस धान्य उत्पादन होण्याऐवजी विष पेरले जात आहे हे बहुजन समाजातील तरुणांनी खरे तर लक्षात घ्यायला हवे. असो. 

दादा कोंडके यांचे "आली मुंबईची केळेवाली' हे गाणे एकेकाली खूप प्रसिद्ध होते. सांगलीची द्राक्षे आज प्रसिद्ध असली तरी या द्राक्षानांही आंबे मागे टाकतील असे वाटते. येथे उद्या आंब्याचे विशिष्ठ मळे फुलू शकतात. याच आंब्यावर जर कोणी "आले सांगलीचे आंबेवाले' गाणे लिहिले तर ते प्रसिद्ध होऊ शकते." माझ्या आंब्याचा रंगच न्यारा, ज्यांन खालंय त्याला विचार' असाही दावा केला जावू शकतो. कोणी सांगावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com