प्रिय नरेंद्रजी, जय महाराष्ट्र! 

प्रकाश पाटील
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

(पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की मला जे काय सांगायचे आहे ते बाळासाहेबांना सांगेन. त्यावर बाळासाहेबांनी मोदींना असे पत्र लिहिले असते का ? की ठाकरी भाषेत समाचार घेतला असता हे वाचकांनी ठरवावे.) 
 

प्रिय नरेंद्रजी, 
जय महाराष्ट्र! 
काय चाललं! बरे आहात ना ! तुम्ही मुख्यमंत्री असताना या ना त्या कारणाने भेट होत असे. पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही मला विसरला की काय असे वाटत होते. पण नाही ! तुम्ही माझी आठवण काढलीत. खूप समाधान वाटलं. तुमचं आणि माझं नातंच तसं होतं. आजकालच्या पोरांना नाही कळत. जाऊ द्या ! शेवटी ती पोरच. प्रमोद, गोपीनाथ आहेत येथेच. होते खूपवेळा युतीवर चर्चा. आम्ही असताना किती भक्कम होती युती. काय छान दिवस होते. गेले ते दिन गेले हो ! वाजपेयींजी, अडवानीजीही खूप थकले असतील नाही का ? चालायचंच वय कोणाला सोडत का!

आमच्या काळात ही खूप ताणतणाव झाले पण प्रमोदमुळे ते निवळले. प्रमोद सारखा दुसरा नेता नाही का सध्या भाजपत. प्रमोदला करायला लागायची तारेवरची कसरत. पण माझ्या प्रेमाखातर तो रबर तुटेपर्यंत कधीच ताणत नव्हता. असो.

तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून माझ्या उद्धवशी तुमचे जमत नाही हे मला दिसत आहे. तुम्हीही त्याला सांभाळून घेत नाही असे दिसते. किमान माझा मुलगा म्हणून तरी समजून घ्यायचे. कधी बोलला असेल एखादा वेडा वाकडा शब्द. पण तो इतका वाईट नाही. माझ्यानंतर त्यानं शिवसेना उत्तम पद्धतीने सांभाळली. त्याच्या नेतृत्वावर उडालेले कावळे किती टीका करीत होते. लेकाच्याना माहीत नाही शेवटी ठाकरे घराण्याचा वारस आहे तो ! तुमच्या झंझावातात किंवा लाटबिट काही म्हणतात ना ! त्या लाटेत त्याने तुम्हाला जी टक्कर दिली ते पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्हाला उद्धवचं कौतुक करताना थोडा राग येईल. पण, माझ तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. 

नरेंद्रंजी, तुम्ही पंतप्रधान बनल्यापासून जे निर्णय घेत आहात त्याचा मला अभिमान नव्हे तर गर्व आहे. पण सगळे क्रेडिट तुम्हीच घेता हे बरोबर वाटत नाही. तुम्ही जर शिवसेनेच्या हातात हात घालून एकत्र आला तर कुणाच्या मायची बिशात आहे आपल्या वाटेला जाण्याची. उद्धवचा तुमच्यावर थोडा राग आहे. हे मलाही माहीत आहे. तुम्ही जर युती केली असती तर तुमच्याप्रमाणे त्याचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले असते की नाही ! माझ्या उद्धववर अविश्‍वास दाखवून तुम्ही थेट बारामतीकरांच्या गळ्यात हात घातला. हे बरं नाही केलं. उद्धवचं स्वप्न भंगल्यामुळे त्याने तुमच्यावर ठाकरी बाण सोडण्यास सुरवात केली हे खरे आहे. सध्या नोटामुळे तुम्ही अडचणीत आहात. विरोधकांबरोबरच उद्धवही तुम्हाला सोडत नाही हे ही कळले. त्याला थोडं विश्‍वासात घ्या. महाराष्ट्रात युती न करून चूक झाली. आता ती चूक मुंबईत तरी सुधारा. तुम्ही दोघ एकत्र आला तर मुंबईवर पुन्हा भगवा फडकणारच ! शिवाय नोटाप्रकरणी शिवसेना तुमच्या बाजूने रस्त्यावर उतरली तर हे विरोधक ... पाय लावून पळतील. विश्‍वास ठेवा. शेवटची गोष्ट मुद्दाम सांगतो. आम्ही ही आयुष्यभर राजकारण केलं ते मराठी माणसासाठी. गोरगरिबांसाठी. त्यांच्यासाठी झटलो, लढलो, संघर्ष केला. उद्धवलाही सामान्य लोकांचे आज जे नोटांमुळे हाल होताना दिसताहेत त्यामुळे तो ही पेटून उठला आहे. त्याला कसा शांत करायचा हे तुम्ही पहा. दोन युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत बघा पटतंय का?

आमच्या पक्षाचं शिष्टमंडळही तुम्हाला काल म्हणे भेटायला आले होते. त्यांना तुम्ही असे म्हणालात की मी थेट बाळासाहेबांशीच बोलेन. नरेंद्रजी, तुमच्या हातून न भूतो न भविष्यती असे महान कार्य होणार आहे. त्यामुळे मला काही सांगण्यासाठी इतक्‍यात प्रयत्न करू नका. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना!!.

- बाळ ठाकरे, शिवसेनाप्रमुख

Web Title: Prakash Patil writes about tensions between Shiv Sena and PM Modi's BJP