खिडकी...भूतकाळाशी जोडणारी

खिडकी...भूतकाळाशी जोडणारी

ही खिडकी नक्की कुठे असावी? पाटावर बसून जेवणारे, जमिनीवर बसून काम करणारे आजी-आजोबा असतील तर त्यांच्या डोळ्यांच्या पातळीवर या खिडक्‍या असतील तर ? छोट्या बाळालाही अशा खिडकीत उभं राहून अंगणातील खारुताई, दाणे टिपणारी चिऊ-काऊ आणि  डोलणारी फुलंपानं असा सारा नजारा दृष्टीस पडेल. मात्र अंगणातले सरपटणारे प्राणी किडा, मुंगी आत येणार नाहीत याची खबरदारी तिथं हवीच. आतील आणि बाहेरील तापमानाच्या फरकामुळे वायुवीजन सुरू होईल. या खिडकीत पाय ताणून निवांतपणे वाचनाची तंद्री लागू शकते. सध्याच्या पिढीला चॅटिंग करता येईल. फारच कंटाळा आला तर तिथेच ताणूनही देता येईल. अशी भिंतीबाहेर डोकावणारी खिडकी म्हणजेच ‘बे विंडो’.

जी फ्रेंच विंडोसारखी जमिनीपासून सहा इंच किंवा फुटावर सुरू होते. उंची तुम्हाला हवी तेवढी. खोलीला प्रमाणबद्ध असली की झालं. रुसलेल्या छोट्याला बसायला हा छानसा कोपरा, स्वतःचाच गुंग व्हायला भाग पाडणारा. पूर्वीच्या माजघरात अंधार असायचा. जगापासून अलिप्त होऊन अंतर्मुख करणारा तो अंधार. आता माजघर आणि तो अंधारही नाही. घरातील या उजेडाबद्दल पुढं बोलूच. आता खिडकी उघडली की दुसऱ्या घराची किंवा अपार्टमेंटची खिडकी/दरवाजा/बाल्कनी समोर असतेच. त्यामुळं पडदा ओढावा लागतोच. मग त्या खिडकीचा फायदा तो काय? बाहेर आकाशच नाही तर कुठलं अवकाशाचं नातं? म्हणून या खिडकीची जागा अशी निवडावी, की जी दोघांचंही खासगीपण जपू शकेल आणि अवकाशाचा नजाराही भेटेल.

टेकूवर आधारलेली खिडकी हा एक छानसा पर्याय आहे. मग तो टेकू मध्यभागी असेल किंवा कडेला. ३६० अंशात किंवा ९० अंशात फिरणारी ही खिडकी. चौकटीची आवश्‍यकताच नाही. पूर्णतः ‘फ्रेमलेस’. ही खिडकी वेगळ्या पद्धतीने निसर्गपूरक आणि स्वस्तातलीही. ही पूर्ण लाकडीही बनवलेली असू शकेल किंवा काचेची. ही खिडकी उभी असू शकते किंवा आडवी. आपल्याला हवा तेवढा उजेड आणि हवा आतमध्ये घ्यायची मुभा देणारी. या खिडकीला हव्या त्या कोनात फिरवून आपल्याला बाहेरचा हवा तेवढा ‘व्ह्यू’ मिळू शकतो. खासगीपण जपूनही. फतेहपूर सिक्रीला वाऱ्याच्या झोताला अडवून, वरून खाली प्रवास करायला लावून भिंतीच्या पायथ्याशी त्याला मोकळं केलंय. उष्णता हटवून थंड वाऱ्याची झुळूक या झरोक्‍यातून येत राहते. असे प्रयोग करण्याऐवजी एसी ऑन करणं सोपं. जागेच्या कमतरतेने सरकत्या खिडक्‍या आल्या. म्हणजे स्लायडिंगच्या. आडव्या असोत वा उभ्या. यातलं न्यून असं की, ती नेहमी अर्धीच उघडते. घरात भरपूर वारा घ्यायची भरपूर इच्छा असतानाही ते शल्य प्रत्येकवेळी जाणवत राहतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com