दीपरागिणी नात्यांची, नवतेची! (प्रवीण दवणे)

pravin davane
pravin davane

नदी ज्याप्रमाणं रंग बदलताना वर्षानुरूप जाणवत राहावी, त्याप्रमाणं दिवाळीही आपलं अंतर्बाह्य रूप-रंग बदलताना जाणवत गेली. भुईसपाट झालेल्या चाळींनी इमारतीचा डौल धारण केला, नि त्या वेळची किशोरपिढी ‘ब्लॉक’ झाली. अंगणांची फरशी झाली, घंघाळाचा शॉवर! संदर्भ बदलले, पेहराव बदलला; पण दीपोत्सवाची ओढ कायमच राहिली. सकाळी सात ते रात्री नऊच्या पळधावीत ‘एखादं गोड घरात केलं तरी पुरे,’ अशी दिवाळी समजूतदार झाली. वस्तू- पदार्थ- सादरीकरण बदललं; पण जिव्हाळा दिवाळीनं कायम ठेवला. दिवाळीनं आपलं अघळपघळ रत्नजडित लफ्फेदारपण नव्या साजासह आटोपशीर केलं...

त्या काळी अथांग आकाशाची दिनदर्शिका माथ्यावर घेऊन मानव फिरत असेल, नि लुकलुकणाऱ्या ग्रह-ताऱ्यांच्या पावलांनीच तो भ्रमण करत असेल. निळं पाणी नि निळं आकाश यांच्या सोबतीनं जीवनाच्या शोधात निघालेल्या मानवाला अचानक ठिणगीचा साक्षात्कार झाला, तेव्हा त्याच्या डोळ्यांत उजळलेला तो पहिला दीपोत्सव! ना त्याची कुठं नोंद, ना पहिली अग्निशलाका कुणाला दिसली त्याचं स्मरण! मात्र, त्या एका प्रकाशबिंदूच्या आधारानं त्याच्या अनंत आशा उजळल्या. अकल्पित, अनपेक्षित संकटांवर स्वार होण्याची ऊर्जा या तेजःकणानंच मानवाला दिली आणि ‘आहे...जीवन पुढंही आहे...’ हा मंत्र त्याच्या स्पंदनात तेजाळला. जणू त्या क्षणी साऱ्या संवेदनशील सृष्टीनं मौनातूनच उद्‌घोष केला....‘तमाच्या तळाशी दिवे लागले!’

काळोख आणि प्रकाश नित्याचेच सहसोबती! त्यातला एक भेटला म्हणून थांबता येत नाही...दुसऱ्या क्षणी ‘मीही आहे’ म्हणत दुसरा भेटतो. दीपोत्सवाचाही लपंडाव कधी ‘हा’ कधी ‘तो’ म्हणत पाठशिवणीचा खेळ खेळतो.

आताचा तेजाची चाहूल देणारा हा क्षणही रंग-रूप बदलताना आपण पाहिला आहे. आधीचा तम दूर सारून पुन्हा नव्या आशेची पणती उजळण्याच्या मानवी ‘जिवटपणा’त दीपोत्सवाची मुळं आहेत.

परंपरेतून, लोककथांतून, पुराणातून, युगांचे नायक ठरलेल्या योद्‌ध्यांच्या विजयोत्सवाच्या क्षणी केलेल्या रोषणाईत दिवाळी उजळली असेल; पण पराभवातून, संकटांतून निसर्गतांडवातून पुन्हा धूळ झटकून जेव्हा एक विजिगीषू मन नव्यानं लढण्याची तलवार घेऊन उभं राहतं, तेव्हा त्या चैतन्याच्या अखंड स्रोतातून दीपावलीची पावलं प्रगटतात; म्हणूनच दीपोत्सव सर्वांचाच आहे! लगडलेल्या ऋतुरंगी फळात ज्याप्रमाणं तो आहे, त्याप्रमाणं ‘हे सामोरी सहर्ष आम्ही नव्या जिण्याच्या स्पर्शा,’ असं म्हणणाऱ्या निसर्गशक्तीच्या अविचल मुळांमध्येही आहे. समाजाचं अमरपण तिथं जाणवतं.

आजची स्थिती त्याहून वेगळी नाही. प्रश्‍नांच्या चक्रव्यूहात अभिमन्यू झालेल्या वास्तवालाही त्यातून बाहेर पडण्याची सततची आस आहे. त्यातच प्रकाश आहे. निसर्गनिर्मित- मानवी प्रवृत्ती निर्मित अडचणींचा डोंगर समोर आहे. दृश्‍य-अदृश्‍य सत्तासारीपटाचा मन दुभंगून टाकणारा खेळ आहे...तरीही माऊलींचं पसायदान गाभाऱ्यातून साद घालत आहे. कुठल्यातरी अनाम क्षणी ‘सत्त्वाचा उदयोऽस्तु करत’ची  ललकारी घुमवणारा नवा युवक हा सारा तम उजळून टाकणार आहे. या एका ध्यासावर सारी मनं विसंबून आहेत; त्या ध्यासात सुवास आहे! प्रकाश आहे!

अधुऱ्या स्वप्नांना आकाश
चाळीतल्या, वाड्यांतल्या दहा बाय बाराच्या अपुऱ्या जागेत, अधुऱ्या स्वप्नांना आकाश देणारी दिवाळी आमच्या पिढीनं पाहिली. एका फुलबाजीला स्पर्श करून प्रत्येक शेजाऱ्याची फुलबाजी झडताना, आपली मिटत जाताना समोरच्या हातातली फुलबाजी बरसते, तेव्हा आनंदाची रुजवात होताना विस्तारणाऱ्या मनात दिवाळी जाणवली. हाडं गोठवणाऱ्या थंडीत अंगणातल्याच चौथऱ्यावर घंघाळ आणून सर्वसाक्षी झालेली ती अभ्यंगस्नानं! आधी थंडीनं आणि मग उष्ण पाण्यानं केलेलं ‘ओय ओय’ अनाराचं झाड बहरताना विरून जाई. दोन दिवस आधीपासून घमघमणाऱ्या भाजणीच्या वासाला आता चेहरा आलेला असे आणि सारणाच्या पिठीनं कानवल्याची चंद्रकोर होऊन रसवंतीत प्रवेश केलेला असे!

फराळाला केवळ हातच भिडत नसत, तर भरल्या डब्यांना पायही फुटत आणि विणकाम केलेल्या हिरव्या-पांढऱ्या फुलांच्या रुमालाखालून चकल्या, शंकरपाळ्यांना गती येई. ‘एकटं करून, एकटं खाणं’ ही ‘परमसुखाची’ कल्पनाच तोवर आलेली नव्हती. चाळीवर कुठंही ‘को-ऑपरेटिव्ह’ असं लिहिलेलं नव्हतं; कारण ते मनांत- जनांत- फराळ पानांत वसत असे. आसपास कुठं चिरविरहाचा ओरखडा उमटलेलं व्यथित घर असेल, तर त्या घराचं तोंड गोड करण्यासाठी प्रत्येक घर सौहार्दतेनं अधीर असे. त्यासाठी ‘प्रकल्प’ राबवण्याचा रिवाज नसे. त्या घराच्या स्मितरेषेतच आपल्या घराचा उत्सव असण्याची भावना वसे. ‘ते माझे- मी त्यांचा’ हा ओघ दीपावलीच्या साक्षीनं आपोआप वाहू लागे.

दिवाळीच्या प्रत्येक सौंदर्यविभ्रमात आपल्या स्पर्शाचा वाटा असावा, असं आतून वाटण्याचे ते क्षण असत. आकाशकंदील घरातच आकाराला येई. काडी-काडी जुळवताना निर्माण होणाऱ्या सुंदरतेतून नक्कीच लालित्याची बीजं पेरली गेली असतील. स्वतः चापटून- चोपटून- सारवून केलेल्या अंगणात निराकार ठिपक्‍यांना येणारे, थक्क करणारे आकार, सहजीवनाचं संजीवन कुठल्या व्याख्यानाविना देऊन गेलेच असतील. कुठल्याही पूर्वसूचनेविना घरात थडकणारी ‘फराळाला आलोय’ म्हणणारी हृदय-नाती ‘मैत्र जीवा’चे गुंफून गेली असतील.

...तशात मुक्तद्वार ग्रंथालयातून कधीही आणि कितीही वेळ रुचीबरोबर अभिरुचीचा फराळ देणारे ते दिवाळी अंक! दिवाळी अंक ही दीपावलीची एक सौष्ठवपर्ण तजेलदार पाकळीच असण्याचं मनगुज दिवाळीनंच माझ्या पिढीला सांगितलं. पुढं हृदयस्थ झालेले अनेक लेखक आणि कवी दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिकांतून आधी पाहिले. उजव्या बाजूला चिवड्याची बशी. त्यातले तळलेले खरपूस शेंगदाणे आणि डाव्या हातात खुमासदार मजकुराचा दिवाळी अंक, ही त्यावेळच्या घराची आनंदाची आणि सुखाची कल्पना होती.

ओढ कायमच
...नदी ज्याप्रमाणं रंग बदलताना वर्षानुरूप जाणवत राहावी, त्याप्रमाणं दिवाळीही आपलं अंतर्बाह्य रूप-रंग बदलताना जाणवत गेली. भुईसपाट झालेल्या चाळींनी इमारतीचा डौल धारण केला, नि त्या वेळची किशोरपिढी ‘ब्लॉक’ झाली. पालकपिढीची पावलं चाळीच्या आठवणी मनात जपत लिफ्टनं सातव्या मजल्यावर आली. दिवाळीलाही मग लिफ्टनं मजले गाठावे लागले. अंगणांची फरशी झाली, घंघाळाचा शॉवर! चाळीतले आम्ही जेवढ्या वयाचे होतो, तेवढी आता आमची मुलं झाली. आमच्या मनातली दिवाळी स्मरणरंजनाच्या ‘लॉकर’मध्ये ठेवून त्यांना नव्या रंगरूपातली दिवाळी देऊ लागलो. संदर्भ बदलले, पेहराव बदलला; पण दीपोत्सवाची ओढ कायमच राहिली. स्नेहाचे- नात्यांचे संकेत बदलले. मोठ्या प्रशस्त घरांतले व्यवहार मात्र आटोपशीर झाले. नव्याशी जुळवून घेताना आजी-आजोबा पिढीची थोडी दमछाक झालीच; पण काळ सर्वांना जमवून घेतोच. सकाळी सात ते रात्री नऊच्या पळधावीत ‘एखादं गोड घरात केलं तरी पुरे,’ अशी दिवाळी समजूतदार झाली.

‘तुमच्या घरची चकली एकदम खुसखुशीत; जिभेवर टाकली, की विरघळते,’ या वाक्‍यांचा जागी, ‘कुठून आणली हो चकली? ‘श्रद्धा’मधून ना? वाटलंच!’ हा विरघळून टाकणारा पर्याय आला; पण दाद देण्याची ओढ कायम राहिली. फराळाचे ‘डबे’ हा प्रकार डब्यात बंद झाला आणि भेटीदाखल सुका मेव्याचं ‘पॅकेट’ हे ‘वर्षभर उपयोगी पडेल’ या ओलसर भावनेनं दिलं जाऊ लागलं. वस्तू- पदार्थ- सादरीकरण बदललं; पण जिव्हाळा दिवाळीनं कायम ठेवला. नऊवारीची सहावारी झाली. पुढं प्रवासाला सलवार- कमीज सोयीचं झालं; पण प्रवास होतच राहिला. दिवाळीनं आपलं अघळपघळ रत्नजडित लफ्फेदारपण नव्या साजासह आटोपशीर केलं. सणांची हीच गंमत वाटते. ते रूप-रंग बदलतात; पण आपलं अस्तित्व शतकं ओलांडल्यावरही कायम ठेवतात.

सळसळणारा आशावाद
सळसळत्या तरुण मनांना एका विलक्षण उत्साहाने गुंफणारी दिवाळी मी गेली काही वर्षं अनुभवतो आहे. शहर कुठलंही असो, घरातली सोळा ते बावीस वर्षांची मुलं देखण्या पोशाखांत सुगंधित होऊन दिवाळीच्या पहाटेला बाहेर निघतातच. केवढा आशावाद दिसतो त्यांच्या डोळ्यांत! भूतकाळाचं ओझं झुगारून, भविष्याची काळजी बाजूला ठेवून मूर्तिमंत वर्तमान दरवळताना जाणवतो. ठाण्याच्या राम-मारुती रोडवर, पुण्याच्या लक्ष्मी रोडवर किंवा डोंबिवलीच्या गोखले रोडवर अशा तरुणगर्दीत वावरताना वाटतं ः ‘एवढं मनमोकळेपण, संवादातली उत्फुल्लता, नात्यातलं निखळ मैत्र हे सारं या दिवाळीनंच तर जोडलं.’ काही हरवलं असेल; पण काही गवसलंही आहे. कडबोळ्यांची जागा बटाटेवड्यानं घेतली असेल; पण एकत्र खाद्योत्सव करण्याची जिंदादिली कायम आहे! पंढरीची वारी ज्याप्रमाणं कुठल्याही निमंत्रणाविना, शतकानुशतकं घाटवळणानं टाळ-चिपळ्यांच्या तालात सुरू असते; तशी मला ही ‘प्रकाशाची वारी’ वाटते. भले घरात नसतील भेटत; पण शहरातल्या उनाड चौकांत वयानं कॅलेंडर झुगारून मनं एकत्र येतात आणि शुभेच्छांची हस्तांदोलनं दीपोत्सवी होतात!

परदेशातल्या मुशाफिरीत एक तरुण अभियंत्याला गप्पांमध्ये मी मनातला प्रश्‍न विचारला ः ‘‘काय रे, मायदेशाहून इतका दूर तू; सणावारी घरची आठवण येतच असेल; इथं तर दिवाळी- भाऊबीज यांचा मागमूस नाही; मग अशावेळी...?’’
माझ्या कुतूहलानं तो युवक थोडा थबकला. वाटलं, की पटकन्‌ मनाच्या पंखावरून डोंबिवलीतल्या विष्णुनगरातल्या घरात पोचला. तो प्रवास त्याच्या चेहऱ्याचा भावरंग बदलताना मी टिपला. स्वरांतून डोकावणारा एक आषाढमेघ त्यानं दृष्टी वळवून टिपला. मग म्हणाला ः ‘‘सर, भारतात होतो तेव्हा खरंच सणांची एवढी शक्ती नाही हो जाणवली! काही वर्षं दिवाळीला घरी जाऊ शकलो नाही. ताई ओवाळायची! मी ओवाळणी द्यायचो- बाबांनीच मला आधी दिलेली ती त्यांची कमाई. आज इथं पुष्कळ कमावतो; पण घरातली दिवाळी ‘वेबकॅम’मधून ‘बघताना’ वाटतं ः केवढं मिस करतोय! गेल्या वर्षी ताईनंही तिथं ‘वेबकॅम’पुढं ओवाळणीचं ताम्हण धरलं. ताईचे भरलेले डोळे खूप सांगून गेले; मी इथूनच पाकीट दिल्यासारखं केलं? म्हटलं...येईन तेव्हा...’
प्रदेश- सरहद्दी बदलल्या; पण नात्याचा देश ‘हृदय’च राहिला.

ऊर्जेची किनार
मनातले पाझर कायम ठेवले, तरच माणूसपण टिकणार आहे, नि ‘व्हेरी प्रॅक्‍टिकल’ होत जाणाऱ्या बाजारयुगात ही अनमोल जिव्हाळी जागता ठेवण्याचं काम दिवाळी करते. नात्यातून चिरंतन उजळत जाणारा जिव्हाळ्याचा हा दीपोत्सव हे या भारतीय मनाचं बलस्थान आहे.
एकेकाळी पाषाणयुगात ठिणगीच्या पहिल्या ऊर्जेनं जीवनाची ज्योत माणसानं जागवली. ती त्याची कुठलाही उपचार नसलेली दिवाळी होती. काळोखाच्या समुद्रात त्याला ऊर्जेची एक किनार सापडली होती.
आता विज्ञानाच्या पथावर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स पंखावरून झेपावत येणाऱ्या नव्या प्रकाशात माणूसपणाचं उत्कट संवेदन हरवू नये म्हणून प्रयत्न करण्याचं नवं आव्हान वर्तमानातल्या दिवाळीसमोर आहे. समाज म्हणजे तुटलेल्या आणि तुटततुटत जाणाऱ्या मनांचं स्वयम्‌केंद्रित बेट होऊ नये, म्हणून प्रत्येकात लपलेल्या दिवाळीनं पुढं सरसावायचं आहे. अभिव्यक्ती आजची असो; पण तेजातलं चैतन्य परंपरेनं दिलेले आहे. भाऊबीजेला भाऊरायाची वाट पाहत रेंगाळणारी बहीण जोपर्यंत इथं आहे....तोपर्यंत दीपावली उजळतच रहाणार आहे!
जिव्हाळ्याच्या नात्याची दीपरागिणी दरवळतच राहणार आहे!

  • संदर्भ बदलले, पेहराव बदलला; पण दीपोत्सवाची ओढ कायमच राहिली.
  • पंढरीची वारी ज्याप्रमाणं कुठल्याही निमंत्रणाविना, शतकानुशतकं घाटवळणानं टाळ-चिपळ्यांच्या तालात सुरू असते, तशी दिवाळी ही ‘प्रकाशाची वारी’ वाटते.
  • कडबोळ्यांची जागा बटाटेवड्यानं घेतली असेल; पण एकत्र खाद्योत्सव करण्याची जिंदादिली कायम आहे!
  • आधीचा तम दूर सारून पुन्हा नव्या आशेची पणती उजळण्याच्या मानवी ‘जिवटपणा’त दीपोत्सवाची मुळं आहेत.
  • सणांची गंमत असते. ते रूप-रंग बदलतात; पण आपलं अस्तित्व शतकं ओलांडल्यावरही कायम ठेवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com