राजा बोले कैसा... (प्रवीण टोकेकर)

राजा बोले कैसा... (प्रवीण टोकेकर)

किंग जॉर्ज सहाव्याला एकाच वेळी दोन महायुद्धांना तोंड द्यावं लागलं. एक युरोपची भूमी भाजून काढत होतं. दुसरं त्याचा जीव. ‘किंग्ज स्पीच’ हा गाजलेला चित्रपट हा त्याच्या या दुहेरी लढ्यावरच आधारित आहे. या लढ्यात त्याला बारा हत्तींचं बळ देणारा होता त्याचा गुरू डॉ. लायनेल लोग...सन २०१० मध्ये आलेल्या ‘किंग्ज स्पीच’नं पुरस्कारांची लयलूट केली; पण त्याचा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे कुठल्याही सुजाण चित्ररसिकाची निःशब्द दाद हाच होय.

राजा वदला, ‘मला समजली शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा’
...कां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?
(गीतकार : मंगेश पाडगांवकर)

* * *
ज्या  ला आयुष्यात King या शब्दातला K सुद्धा कधीच उच्चारता आला नाही, अशा एका राजाची ही कहाणी आहे. ब्रिटिश साम्राज्याचा राजा किंग जॉर्ज (सहावा). वास्तविक त्याला कधीच राजा व्हायचं नव्हतं. आपण राजा होऊ, असं त्याला कधी वाटलंही नव्हतं. का वाटावं? किंग जॉर्जचा (द फिफ्थ) हा धाकटा मुलगा. थोरल्या डेव्हिडचा राज्याभिषेकही ठरून गेलेला. डेव्हिडनं किंग एडवर्ड (आठवे) व्हायचं आणि धाकट्यानं महालात राहून राजकुटुंबासहित तहहयात युवराजपद मिरवायचं, हे ठरलेलंच होतं...पण नियतीचं दानच असं पडलं की त्याला राजा व्हावंच लागलं. प्रजाजनांशी संवाद साधावा लागला. साम्राज्याची पताका मिरवावीच लागली. इतकंच नव्हे तर, महायुद्धासारख्या जागतिक आगडोंबात ब्रिटिश साम्राज्याच्या अक्षुण्ण सत्तेचं, लोकशाही तत्त्वांची पाठराखण करणाऱ्या एका चक्रवर्ती राजघराण्याचं प्रतीक बनावं लागलं. एरवी ते इतकं अवघड झालं नसतं; पण ड्यूक ऑफ यॉर्क, प्रिन्स आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्जसाठी ते कुठल्याही महायुद्धापेक्षा कमी आव्हानात्मक नव्हतं. तो अस्खलित तोतरा होता. त्याचा तोतरेपणा हा पुढं जागतिक टिंगलीचा विषय झाला.

तोतरा राजा, फेंगडी राणी (Stammering King and Bandy-legged Queen) हा हिटलरच्या फौजांमधला एक कुचेष्टेचा विषय होता. त्यांची नालस्ती करणारी मार्चिंग साँग्ज हिटलरच्या फौजा म्हणत असत. तोतरेपणाची टिंगल कोण करत नाही? आपल्याकडं तर रंगमंच किंवा रुपेरी पडद्यावरचं तोतरं पात्र हमखास टाळ्या-हशे वसूल करतं. आजही विनोदनिर्मितीसाठी तोतरेपणाचा ‘सस्ता हथकंडा’ वापरला जातोच. तोतरे बोल ऐकून हसू फुटतं हे खरंच; पण हा वाणीदोष ज्याच्या नशिबी येतो, त्याला मात्र खूप काही भोगावं लागतं. तोतरं बोलणाऱ्याला बोल बोल म्हणता घायाळ करणारा हा दोष आहे. आत्मविश्वासाच्या धज्जिया उडतात. साधी बाराखडीसुद्धा टोकदार खडीसारखी टोचून टोचून रक्‍त काढते. कुणाची साधी ख्यालीखुशालीची चौकशीही करणं मुश्‍किल होऊन जातं. कुठं भरभरून बोलायला जावं, तर घशाच्या तळालाच शब्दोच्चार अडून बसतात. जीभ बंड पुकारते. छाती-गळ्याचे स्नायू पिळवटून निघतात. हाताची बोटं थरथरू लागतात. प्राण डोळ्यात साकळतात. साधा शिळोप्याचा संवाद पहाडासारखा दुर्गम होऊन बसतो. किंग जॉर्ज सहाव्याला एकाच वेळी दोन महायुद्धांना तोंड द्यावं लागलं. एक युरोपची भूमी भाजून काढत होतं. दुसरं त्याचा जीव.

‘किंग्ज स्पीच’ हा गाजलेला चित्रपट हा त्याच्या या दुहेरी लढ्यावरच आधारित आहे. या लढ्यात त्याला बारा हत्तींचं बळ देणारा होता त्याचा गुरू डॉ. लायनेल लोग...हे नातं गुरू-शिष्याचं आहे की दोन मित्रांचं? बाप-लेकाचं की राजा-प्रजाजनाचं? तुम्हीच ठरवा. वाणीदोष असलेल्या कुणीही हा चित्रपट बघावाच; पण बोलघेवड्यांनी तर आवर्जून बघावा. शब्दांची उधळपट्टी करणाऱ्या नॉर्मलांच्या जगात तोतरेपणा अनेकदा बावळटपणा ठरतो; पण हा दृष्टिकोन बाळगणं, हाच मुळी एक बावळटपणा आहे, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. सन २०१० मध्ये आलेल्या ‘किंग्ज स्पीच’नं पुरस्कारांची लयलूट केली; पण त्याचा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे कुठल्याही सुजाण चित्ररसिकाची निःशब्द दाद हाच होय.
* * *

ते वर्ष होतं सन १९२५. लंडनमधल्या भव्य विम्बली स्टेडियममध्ये ब्रिटिश साम्राज्याचं एक प्रदर्शन सुरू होतं, त्याचा समारोप समारंभ होता. जगभरातल्या तब्बल ५८ ब्रिटिश वसाहतींनी या प्रदर्शनात भाग घेतला होता. खुद्द राजे किंग जॉर्ज प्रकृतिअस्वास्थ्यामुळं येऊ शकले नाहीत; पण ‘त्यांचा संदेश घेऊन धाकटे युवराज ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स जॉर्ज यांनी वाचून दाखवावा,’ अशी राजाज्ञा झाली. युवराज जॉर्ज याच्या दृष्टीनं हे दुहेरी संकट होतं. अवघ्या स्टेडियममध्ये रॉयल फजिती होण्याचा प्रसंग होता. शिवाय, तेव्हा रेडिओ नावाचं एक ‘भिक्‍कारडं’ यंत्र येऊन स्थिरावलं होतं आणि बीबीसीचा दबदबा वाढत होता. त्या रेडिओवर या भाषणाचं थेट प्रक्षेपण होणार होतं, म्हणजे फक्‍त स्टेडियमच नव्हे, तर अवघं साम्राज्य राजपुत्राची फटफजिती ऐकणार होतं. तसंच घडलं. पंचप्राण कंठाशी आणून राजपुत्रानं आपल्या सम्राट पित्याचा संदेश वाचून दाखवला. लोक डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसत राहिले.

राजपुत्र जॉर्जचा हा दोष नक्‍की जाईल, यासाठी धडपडत होती त्याची पत्नी हर हायनेस प्रिन्सेस एलिझाबेथ. हिनं आपल्या पतीचं बोलणं सुधारावं म्हणून चिक्‍कार धडपड केली. अगदी एखाद्या आईनं मुलासाठी करावी तशी. राजघराण्यातल्या माणसाला पब्लिक स्पीकिंग येणं आवश्‍यकच आहे, असं तिचं म्हणणं होतं. त्यासाठी तिनं मोठमोठे वाणीतज्ज्ञ नेमले होते; पण तिरसट, बुजऱ्या स्वभावाचा राजपुत्र सगळे प्रयत्न हाणून पाडत राहिला. तोंडात बर्फाचे खडे ठेवून उतारे म्हणणं, धूम्रपान करणं हे त्या काळी वाणीदोषावरचे उपचार मानले जायचे. धूम्रपानामुळं घशाच्या स्नायूंना आराम पडतो, त्यामुळं बोलणं सुकर होतं, असा एक भन्नाट समज त्या काळी होता. अर्थात तो सपशेल चुकीचा होता; पण त्यामुळं हा तोतरा युवराज फार लौकर धूम्रपान करायला लागला आणि अखेर पुढं वयाच्या ५६ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगानंच वारला. हर हायनेस एलिझाबेथला एक दिवस डॉ. लायनेल लोग नावाच्या एका ऑस्ट्रेलियन स्पीच थेरपिस्टबद्दल समजलं. युवराजाला कसंबसं राजी करून ती त्याला डॉ. लोग यांच्या हार्ले स्ट्रीटवरच्या क्‍लिनिक-कम-घरी घेऊन गेली. तिथून पुढं गुरू-शिष्याचं एक अफलातून नातं तयार झालं.
* * *

कुणीतरी जॉन्सन दाम्पत्य दारात आलेलं बघून डॉक्‍टर लायनेल थोडे नाराजच झाले होते. अशा अवेळी येतात का? पण जोडपं फार आग्रही होतं. विशेषत: त्या बाई. माझ्या नवऱ्याला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, अशी जुजबी तक्रार तिनं सांगितली. त्याचा दर्जा आणि कामाचं स्वरूप लक्षात घेता बोलण्यावाचून पर्याय नसल्यानं वाणीदोष घालवणं गरजेचं असल्याचं तिचं म्हणणं. पाठीमागं तिचा उंचापुरा पती उभा होता. नजरेत अनिच्छा आणि तुच्छता. स्थानापन्न झाल्या झाल्या युवराजानं थेट आपण कोण आहोत, हे सांगून टाकलं. सीधी बात, नो बकवास. डॉक्‍टरांनी आपल्या अटीही सांगून टाकल्या : ‘माझा किल्ला, माझे नियम. तुम्ही मला लायनेल म्हणू शकता. मीही तुम्हाला एकेरीत हाक मारेन. एकाच पातळीवर आल्यावर सगळं सोपं होईल. कबूल?’
‘‘ आपण एक...एक...एकाच प...पातळीवर अस...तो तर मी इ...इ...इथं नसतो. कॉल मी ‘हिज हायनेस’...अँड ‘सर’ आफ्टर दॅट!’’ युवराज फाडकन म्हणाला.
‘‘मी तुम्हाला बर्टी म्हणेन!’’ डॉक्‍टर शांतपणे म्हणाले.
‘‘ते माझं घरचं नाव आहे...’’ युवराजानं निषेध नोंदवला.
‘‘फाइन देन...आणि हो, प्लीज डोंट स्मोक!’’ खिशातून लांबसडक सोन्याची सिगारेट-केस काढणाऱ्या युवराजाला थांबवत डॉक्‍टर म्हणाले. ‘‘त्यानं फायदा होतो, असं मला अनेक स्पीच थेरपिस्टांनी सांगितलंय...’’ बर्टी आश्‍चर्यचकित झाला.
‘‘मूर्ख आहेत ते’’ डॉक्‍टर.
‘‘कमॉन...त्यांना नाइटहूड वगैरे मिळालाय!’’
‘‘दॅट मेक्‍स इट ऑफिशियल देन...’’ डॉक्‍टरांनी त्यांची वासलात लावली.
...बर्टीनं फार सहकार्य वगैरे केलं नाही. शेवटी डॉक्‍टर लोग यांनी त्याच्या हातात एक चोपडं दिलं. उतारा वाचून दाखवायला सांगितला. ‘‘टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्‍वेश्‍चन...’’ वाचूनच बर्टीला घाम फुटला. ‘नॉन्सेन्स, हे काही आपल्याला जमणार नाही. सॉरी आणि थॅंक यू’ असं म्हणत तो वळणार इतक्‍यात डॉक्‍टर म्हणाले, ‘‘अंहं, माझं अजून संपलेलं नाही. हे जमेल तसं वाच. माझ्याकडं हे सिल्वरटोन नावाचं नवं अमेरिकन यंत्र आलंय. याच्यावर आवाज रेकॉर्ड होतो. आपण तुझं बोलणं प्लेटवर घेऊ. हा हेडफोन कानाला लाव.’’
‘‘तुम्ही मला गाणं ऐकवताय?’’ हेडफोनमध्ये ऐकून बर्टी वैतागला. गाण्याच्या कल्लोळातच त्यानं कसंबसं ते शेक्‍सपीअरचं अवघड स्वगत वाचलं आणि ‘होपलेस’ असं पुटपुटत तो निघालाच. निघण्यापूर्वी डॉक्‍टरांनी त्याच्या हाती ती रेकॉर्डप्लेट ठेवली. ‘स्मरणचिन्ह म्हणून जपून ठेव’ असं सांगायला ते विसरले नाहीत.
* * *

दरम्यान, दुसरं एक राजकीय नाट्य बर्टीच्या आयुष्यात रंगत होतं. किंग जॉर्ज पाचवे यांची प्रकृती बिघडत गेली. सिंहासनाभिषिक्‍त युवराज डेव्हिड हा वॉलिस सिम्प्सन नावाच्या एका अमेरिकी घटस्फोटितेच्या प्रेमात पडून पुरता पागल झाला होता. चर्च ऑफ इंग्लंड, राजघराणं आणि ब्रिटिश घटना या तिन्हींच्या विरोधात जाणारं हे प्रेम होतं. तो राजा होण्यास अपात्र ठरला. सिंहासनाची धुरा आपोआपच बर्टीकडं येणार होती. बर्टीच्या पोटात गोळा आला.

...इथं घरी मुलांना गोष्ट सांगताना फे फे उडते. बायकोशी धड प्रेमानं चार गोष्टी सरळ बोलता येत नाहीत. सम्राट म्हणून निभवायची कर्तव्यं कशी पार पाडणार? बर्टीनं सहज म्हणून डॉक्‍टर लोग यांनी दिलेली रेकॉर्डप्लेट लावून बघितली. आश्‍चर्य! शेक्‍सपीअरचं ते तालेवार इंग्लिशमधलं स्वगत बर्टीनं अस्खलितपणे म्हटलं होतं. कानाशी गाण्याचा गोंगाट असताना! हा काय चमत्कार? ‘‘कुठलंही मूल जन्मत: तोतरं नसतं. तूसुद्धा नाहीस, बर्टी. काहीतरी मानसिक कारण असतं त्यापाठीमागं. ते शोधून काढलं की तोतरेपण जातं कायमचं. तुला आठवतंय, तू कधीपासून तोतरायला लागलास?’’ डॉक्‍टरांनी चौकशी आरंभली. नाइलाजानं बर्टी पुन्हा एकदा त्यांच्यासमोर जाऊन बसला होता.

‘‘ मी असाच आहे....प...पहिल्यापासून. त...तुम्हाला आता काय माझ्या खासगी गोष्टी सांगू का? गेलं च्यायला सगळं ***...मरू दे ते बोलणं च्या***...मला बर्टी का म्हणता तुम्ही?’’ बर्टीचं पित्त अचानक खवळलं.
‘‘गुड...शिव्या देताना तू अडखळत नाहीस अजिबात हे लक्षात आलंय का तुझ्या?’’ डॉक्‍टर लोग किंचित हसून म्हणाले.
‘‘मी संतापी आहे. माझ्या अनेक अवगुणांपैकी एक...काय म्हणणं आहे?’’ असं गुरकावत शेवटी बर्टी नरमला. त्यानं आपली करुणकथा डॉक्‍टरांना ऐकवली. लहानपणी त्याचे लाडकोड झालेच नाहीत. सगळे लाड डेव्हिडचे. दाई चिमटे काढायची. गुडघे एकमेकांवर आपटण्याचा शारीरिक दोष होता, त्यामुळं त्याला बालपणीच चिमटे लावून चालावं लागायचं. ते अघोरी होतं. जन्मत: तो डावखुरा होता, म्हणून वडिलांनी जोर-जबरदस्तीनं त्याला उजव्या हातानं कामं करायला भाग पाडलं. थोरला डेव्हिड कायम त्याला ‘ब...ब...ब...बर्टी’ असं चिडवायचा. असल्या भयंकर बालपणाचा परिणाम म्हणून तो अडखळू लागला होता.

‘‘मी सांगतो तसा सराव कर...सगळं ठीक होईल!’’ डॉक्‍टरांनी दिलासा दिला. पण गुरू-शिष्याचं हे नातं कायम तुटक राहिलं. शिष्याचा गुरूवर विश्‍वास नव्हता. गुरू तर सामान्य प्रजाजन होता. अंतर राहणारच. २० जानेवारी १९३६ मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांचं देहावसान झालं. पुढं किंग एडवर्ड (आठवा) झालेल्या प्रिन्स ऑफ वेल्स डेव्हिड यालाही सिंहासन सोडावं लागलंच. अडखळत्या शब्दांनिशी आणि पावलांनिशी बर्टीनं मे १९३७ मध्ये वेस्टमिन्स्टर ॲबेत राजशपथ घेतली आणि तो किंग जॉर्ज (सहावा) झाला. ब्रिटिश साम्राज्याचा राजदंड त्यांनी समारंभपूर्वक स्वीकारला, तेव्हा शाही कक्षात डॉ. लोग सपत्नीक बसले होते. तेव्हाच आर्चबिशप ऑफ कॅंटरबरींना शोध लागला की डॉ. लायनेल लोग हे डॉक्‍टर नाहीतच मुळी. हा तर एक दुय्यम दर्जाचा अभिनेता आहे. नाटकाबिटकात कामं करणारा. त्या बातमीनं किंग जॉर्ज (आता सहावे) ऊर्फ बर्टी प्रचंड दुखावला. हा विश्‍वासघात होता; पण त्या सुमारास जागतिक नकाशावर वेगळ्याच राजकीय हालचालीही सुरू झालेल्या होत्या.
* * *

‘‘पण मी पदवी मिळवून डॉक्‍टर झालोय, असं कधी म्हटलं होतं? मी एक स्पीच थेरपिस्ट आहे. युद्धात बॉम्बस्फोटात वाचा गमावलेल्यांना उपचार देणारा मी एक तज्ज्ञ आहे, हे तर खरं आहे!’’ डॉ. लोग यांनी स्पष्टीकरण दिलं. कडाक्‍याचं भांडण होऊन दोघंही वेगळे झाले.

तोवर ब्रिटिश पंतप्रधान बाल्डविन जाऊन चेम्बरलेन आले होते. युद्धाचे ढग जमत असताना विन्स्टन चर्चिल यांचा उदय होत होता. पोलंडमधून बिनशर्त माघार घेण्याबाबत हिटलरला निर्वाणीचा इशारा देऊन ब्रिटन अखेर युद्धात उतरलं.
तेव्हा पुन्हा एकदा रेडिओवरून ब्रिटिश साम्राज्याला राजाचं ओघवतं भाषण ऐकू आलं. त्या भाषणात योद्‌ध्याचा जोम होता. राजाचा संयम होता. आणि ते थेट प्रक्षेपित होत असताना राजा किंग जॉर्ज (सहावे) यांच्या समोर डॉ. लायनेल लोग नावाचा एक बोगस डॉक्‍टर मार्गदर्शन करत होता.
ब...ब...ब...बर्टीचं एका संपूर्ण सम्राटात रूपांतर करण्याचा चमत्कार डॉक्‍टर लोग यांनीच करून दाखवला होता.
* * *

हा चित्रपट पाहताना (आणि त्याबद्दल लिहिताना) अनेकदा पटकन शब्द सुचत नाहीत. आपण एक रॉयल कहाणी पाहत नसून आपल्याच ओळखीचं काहीतरी तपासतो आहोत, असं वाटत राहतं. चाचरत बोलणाऱ्या बर्टीबद्दल उमाळा दाटून येतो. डॉक्‍टर लोग यांच्या शांतवृत्तीला सलाम ठोकावासा वाटतो. बऱ्याच गैरसमजांची पडझड होते. कॉलिन फर्थ या बेजोड ब्रिटिश अभिनेत्यानं बर्टीच्या भूमिकेत कमाल केली आहे. हा चित्रपट लिहिला डेव्हिड सैडलर यांनी. ते स्वत: तोतरे आहेत. कथेचं संशोधन त्यांनी केलं; पण क्‍वीनमदर हर हायनेस एलिझाबेथ (बर्टीची पत्नी) यांनी ‘मी निवर्तल्यानंतरच काय ते करा’ असं फर्मावलं. त्यांचं २००२ मध्ये निधन झाल्यावर सैडलर पुन्हा कामाला लागले. आधी त्यांनी नाट्यसंहिता लिहिली आणि इंग्लंडमध्येच एका गावात तिचं छोटंसं वाचन केलं. दिग्दर्शक टॉम हूपरची आई तिथं कर्मधर्मसंयोगानं हजर होती. तिनं पोराला फोन करून ‘तुझा पुढचा सिनेमा ठरला’ असं कळवून टाकलं. जेफरी रश या आणखी एका अफलातून अभिनेत्यानं डॉ. लोग साकारला. हेलन बोनहॅम कार्टर हर हायनेस एलिझाबेथ झाली, तर थोरल्या डेव्हिडची भूमिका सुप्रसिद्ध अशा गाय पीअर्सनं केली. हर हायनेस एलिझाबेथ यांचं आपल्या पतीशी असलेलं नातं किती राजस होतं, हेही या चित्रपटानं सुंदर टिपलं आहे. सैडलर यांना लिहिलेल्या शाही पत्रात त्यांनी एक वाक्‍य असं लिहिलंय : ‘त्या आठवणी फार वेदनादायी आहेत आणि अजूनही त्या मनाला जखमा देतात. त्या माझ्यासोबतच या जगातून जाऊ देत!’ क्‍वीनमदरनं अर्थातच सैडलर यांना सहकार्य केलं नाही.
तरीही या चित्रपटाला चार ऑस्कर पुरस्कार मिळाले. गोल्डन ग्लोबदेखील. चित्रपटानं गल्ला गोळा केलाच; पण रसिकांची जबरदस्त दाद मिळवली. इतकंच नव्हे तर, निर्मात्यांना एक दिवस बकिंगहॅम पॅलेसमधून कौतुकाचं एक पत्र आलं आणि भोजनाचं निमंत्रणही!
किंग जॉर्ज (सहावे) हे भारताचे अखेरचे सम्राट. ‘भो पंचम जॉर्ज भूप धन्य धन्य’नंतरचे. राष्ट्रकुलाचे पहिले प्रमुख; पण त्यांना  King या शब्दातला K कधीच धड उच्चारता आला नाही, तसाच Weapon या शब्दातला W सुद्धा.
मात्र, त्यानं काही बिघडलं नाही. डॉ. लोग यांना त्यांनी न अडखळता स्वच्छ शब्दात सांगून टाकलं होतं : ‘‘ते शब्द मी हल्ली मुद्दामच चुकवतो. भाषण माझंच आहे, हे हिटलरला कसं कळणार?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com