शेवटी उरला एक... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

"योजिंबो', "अ फिस्टफुल ऑफ डॉलर्स' आणि "लास्ट मॅन स्टॅंडिंग'... तिन्ही चित्रपटांची गोष्ट तीच... पण सांगणारा बदलला की सांगण्याची पद्धतही बदलते. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकण्यात, पडद्यावर पाहण्यातही एक वेगळीच गंमत असते. "लास्ट मॅन स्टॅंडिग' पाहताना हीच अनुभूती येते. एका अद्भुत कलापूर्ण चित्रपटाची ही हॉलिवुडी आवृत्ती नव्वदच्या दशकात प्रदर्शित झाली. ती त्या वेळी फारशी गाजली नाही; पण लक्षात राहिली.

गोष्ट तीच असते. सांगणारा बदलतो. सांगणाऱ्याच्या मगदुरानुसार गोष्टीचा घाट बदलतो. कधी कधी तर संपूर्ण गोष्टच बदलते. कॅलिडोस्कोपमधल्या बांगड्यांच्या तुकड्यांचा दरवेळी नवा घाट दिसतो तसंच हे. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं पेश केलेली पाहणं तसं प्रेक्षकांना नवीन नाही. त्यातही गंमत असते. सिंड्रेलाची गोष्ट तर इतक्‍या वेळा आणि इतक्‍या वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली गेली आहे की बस्स. तसंच जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या "पिग्मॅलियन'चं.

नव्वदच्या दशकात आलेल्या "लास्ट मॅन स्टॅंडिंग' या चित्रपटाबद्दल असंच काहीसं म्हणता येईल. चित्रपट भरपूर गाजला असं नाही, त्याला पुरस्कारबिरस्कार मिळाले असंही काही नाही; पण तरीही तो लक्षात राहिला. कथाकथनाचे नियम पर्यावरण किंवा भूगोलानुसार कसे बदलतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. एखाद्या कलापूर्ण चित्रपटात जबरदस्त मसाला भरला की त्याचं जे काही होतं, ते या चित्रपटाचं अपरिहार्यपणे झालंच आहे; पण तरीही मूळ रसायन लपून राहत नसल्यानं अचानक एक चांगला अनुभव हाती लागून जातो. एका अद्भुत कलापूर्ण चित्रपटाची "लास्ट मॅन स्टॅंडिग' ही हॉलिवुडी आवृत्ती होती. मूळ चित्रपट तसा बराच जुना होता. सन 1961 मध्ये बनलेला. तोही जपानी भाषेत. जपानी पर्यावरणात. चित्रपटाचं नाव होतं ः योजिंबो. थोर प्रतिभावंत चित्रकर्मी अकिरा कुरोसावा यांच्या समर्थ दृष्टीतून साकारलेली ही कलाकृती रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. त्यांच्या कहाणीचं वेस्टर्नपटात रूपांतर करण्याची उबळ दिग्दर्शक वॉल्टर हिल याला आवरली नाही आणि "लास्ट मॅन स्टॅंडिंग' 1996 मध्ये निर्माण झाला. रसिकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल होतं.
विशेष म्हणजे, कुरोसावांच्या "योजिंबो'ची ही दुसरी इंग्लिश आवृती आहे. यापूर्वी 1964 मध्ये सर्जिओ लिओनीनं काढलेल्या "डॉलर त्रिधारे'तल्या "अ फिस्टफुल ऑफ डॉलर्स' हादेखील "योजिंबो'चाच स्पॅघेट्‌टी अवतार होता. "लास्ट मॅन स्टॅंडिंग' हा तिसरा आणि अखेरचा होता.
* * *

तो सन 1932 चा सुमार होता. मेक्‍सिकोच्या सरहद्दीवरचं जेरिको नावाचं एक आळसट गाव. उत्साह म्हणून कुठं नावाला नाही. सगळ्या चेहऱ्यांवर नुसती अवकळा. गावातला रस्ता गजबजलेला; पण तिथं वावरणारा हरेक चेहरा परेशान.
त्या काळात जगभर महामंदीची होरपळ सुरू होती. अमेरिकेत तर या चेटकिणीनं उच्छाद मांडलेला. टेक्‍सासमधल्या या गावात पैका देव होता. हलक्‍यासलक्‍या कारणांनी पिस्तुलं निघायची. गोळ्या सुटायच्या. पोलिसांच्या खतावणीत "वॉंटेड' असलेली मंडळी इथं सुखेनैव राहायची. बेधडक. गावगुंड आणि गुन्हेगारी टोळ्यांसाठी जेरिको हे पवित्र स्थळच होतं जणू. अमेरिकेत कुठूनही परागंदा झालेला गुन्हेगार इथं शोधावा. सापडेल!

-मेक्‍सिकोच्या सरहद्दीला लागून असलेल्या जेरिकोतून अमली पदार्थांची तस्करी चालायची. महामंदीच्या काळातही हा रोकड धंदा बराच तेजीत होता म्हणून गुन्हेगारांचा इथं वावर होता. स्थानिकांच्या चेहऱ्यावर तशी अवकळा होती म्हणून दिवसाकाठी एकदोनदा बंदुकीचे बार गावात कुठं ना कुठं घुमत असत. अर्थात स्थानिक पोलिस ठाणं हा एक विनोदच होता.

जेरिकोत दोन गुन्हेगारी टोळ्यांची सत्ता चाले. सत्तेसाठी एकमेकांची डोकी फोडणं हा दैनंदिन कार्यक्रम होता. फ्रेडो स्ट्रोझी हा इटालियन टोळीचा प्रमुख होता, तर मि. डॉयल म्हणून एक माफियांचा म्होरक्‍या आयरिश गुन्हेगारांची टोळी चालवायचा. जेरिकोचा ताबा, म्हणजेच तस्करीचं नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही टोळ्यांमध्ये हमेशा संघर्ष होत असे.

अशा अवकळेच्या हवेत जॉन स्मिथ त्याच्या डबड्या मोटारीतून गावात आला...
का आला, असं विचारू नका. त्याला ना आगा, ना पीछा. अत्यंत दिशाहीन, नीतिशून्य आयुष्य घालवणाऱ्या माणसाला "तू इथं का?' हे विचारण्यात काय हशील आहे? थोबाड लपवण्यासाठी आला असेल. चार पैसे उकळण्यासाठी आला असेल. काहीही कारण असेल. आश्‍चर्य म्हणजे आपल्याला अक्‍कल नाही, हे त्यालाही माहीत होतं.
आल्या आल्या मांजर आडवं जावं, तशी एक घटना घडली. गावातल्या मुख्य सडकेवर त्याची फोर्ड मोटार उभी असताना त्याला एक पोरगी आडवी गेली. स्मिथचं मन चळलं. बोंबलाच्या जुडग्यात हा केवडा आला कुठून? भांगेत ही तुळस कुठून उगवली बरं? पाखरू तर बाजिंदं दिसतंय...त्याच्या नजरेत एक वाह्यात छटा तरळून गेली. तिचं नाव फेलिना होतं.

आयरिश टोळीचा प्रमुख मि. डॉयल याच्या पुठ्ठ्यातली ही पोरगी होती. माफिया टोळीच्या प्रमुखाची छावी एकटी कशी हिंडेल? आसपास टोळीतले गुंड होतेच. त्यात एक फिन होता. आपल्या बॉसच्या आयटमला कुणीतरी अगांतूक न्याहाळतोय, हे काही त्याला सहन झालं नाही. हा डॉयलचा एकदम इमानी कुत्ता होता. त्यानं सरळ पंगा घेतला. स्मिथला चार गोष्टी सुनावून त्याच्या गाडीची पुढची काच खळ्ळकन फोडली. टायर्स फाडले. म्हणाला ः "जा, आता ***! ते तिकडं शेरीफचं ऑफिस आहे. जा, आणि कर कम्प्लेंट!''

स्मिथ शांत राहिला; पण शेरीफकडं गेलाच. शेरीफ गाल्ट आणि त्याचा डेप्युटी बॉब दोघांनाही प्रकरण कळलं होतं; पण ते गप्पच राहिले. स्मिथची तक्रार नोंदवून घेणं सोडाच, त्यांनी त्याला सल्ला दिला : ""शहाणा असशील तर इथून नीघ. गाडी दुरुस्त झाली की मिळेलच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी बंदूक बाळग!''
जॉन स्मिथचं डोकंच भणकलं. च्यामारी, ही काय मोगलाई आहे! रस्त्यालगत जो मंडेचा गुत्ता होता. जॉननं आत शिरून टकाटक दोन पेग ढकलले आणि आपल्याकडल्या दोन बंदुका घेऊन तो सरळ समोरच असलेल्या आयरिश टोळीच्या अड्ड्यात घुसला.
""बाबा रे, आपला काही तुझ्याशी पंगा नाही. उगाच खालीपिली भानगड नको. माझ्या गाडीच्या दुरुस्तीचे पैसे देऊन टाक. विसरून जाऊ!'' जॉन स्मिथनं इज्जतीत प्रस्ताव ठेवला. आता फिननं ऐकायला पाहिजे की नको? पण त्यानं पिस्तूल काढलं. मग काय, पुढच्या क्षणाला फिनच्या छाताडात स्मिथचं पिस्तूल रिकामं झालं. त्याची बॉडी थेट रस्त्यावर आली! खेळ खल्लास.
...खेळ खल्लास वगैरे काय नाय... इथूनच सगळा गेम सुरू झाला ना राव.
* * *

एका अजनबी माणसानं डॉयलचा राइट हॅंड सस्त्यात उडवला, ही खबर जेरिकोत पसरायला वेळ लागला नाही. इटालियन बॉस फ्रेडो स्ट्रोझी तर बेहद्द खूश झाला. असला दिलेर गडी आपल्या पुठ्ठ्यात पाह्यजेल...त्यानं सरळ स्मिथला बोलावून जॉबच ऑफर केला. आपल्याकडं राहा. ऐश कर. आपलंच हॉटेल आहे. तिथं जेव. फुकट...काय?
स्मिथ होता सडाफटिंग. त्याला काय, बरंच झालं; पण नेमकं तिथंही नको तेच घडलं!
स्ट्रोझीच्या अड्ड्यावर त्याला ल्युसी भेटली. ल्युसी स्ट्रोझीचं प्रेमपात्र होतं. स्मिथनं तिला बोल बोल म्हणता घोळात घेतलं. आता स्मिथसारख्या बारा पिंपळावरल्या मुंज्यांना नीतिमत्ता कशाशी खातात हे कुठनं कळायला? पुन्हा त्यांची दुनियाच गुन्हेगारांची. तिथं कुठले आलेत यम-नियम? थोडं खणून पाहायचं, माती मऊ लागली तर कोपरानंही काम भागतं...
जेरिकोत जॉन स्मिथचं बस्तान जवळजवळ बसलंच होतं. आडून आडून तो माहिती गोळा करतच होता. स्ट्रोझीकडं काम करताना त्याला इतर ज्ञान प्राप्त झालं ते असं : एक, डॉयलचा राइट हॅंड फिन नव्हताच. तो साधा शार्पशूटर होता. हिकी नावाचा एक गुंड डॉयलचा उजवा हात असून तो खरा टेरर आहे. आणि दोन, स्ट्रोझी तद्दनन बिनडोक आहे.

स्ट्रोझीचा चुलतभाऊ होता. जॉर्जिओ नावाचा. त्याच्याशीही स्मिथचा विनाकारण पंगा झाला. जॉर्जिओला त्याचा मस्तवालपणा आवडला नाही. टोळीतल्या नव्या मेम्बरानं औकातीत राहावं, अशी त्याची धारणा होती. एकंदरीत स्मिथचा जीव त्या टोळीत रमेना.
सडकेवर गुत्ता चालवणारा जो मंडे हा त्याचा एकमेव दोस्त होता. वेळ मिळाला की अधूनमधून जो याच्याकडं जाऊन तो दारू ढकलत बसे. थोडा टाइमपास करी.
...त्याच रात्री वांडा नावाच्या एका वेश्‍येसोबत मजा लुटत असताना जॉन स्मिथवर घातक हल्ला झाला. वांडाला हाताशी धरून आयरिश टोळीनं हा सापळा रचला होता. चपळ स्मिथनं दोन्ही मारेकरी लोळवले. वांडाला हाकलून दिलं. तिथून तो निघाला आणि शेरीफ गाल्टनं त्याला हातकड्याच घातल्या.
* * *

एक अजनबी, इतिहास-भूगोल नसलेला इसम किती उत्पात घडवून आणू शकतो? स्मिथ हा त्याचा एक नमुना होता. स्ट्रोझीनं त्याला एका दूरवरच्या घरात बोलावून डॉयलचा तस्करीचा माल लुटण्याची कामगिरी दिली. स्मिथ तयार झाला. मेक्‍सिकन सरहद्दीवर गस्तीला असलेल्या रामिरेझ नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला पटवून स्मिथनं डॉयलची टोळी सफा केली, माल लंपास केला आणि डॉयलचे ट्रक स्ट्रोझीनं लुटल्याची टिपदेखील त्यानंच शेरीफला दिली. असं त्यानं का केलं असावं?
जॉन स्मिथ हा एकांडा माणूस आहे. वेळ आली की तो काही कुणाच्या बापाचा नसतो. ना निष्ठा, ना मैत्री. अत्यंत तत्त्वहीन माणूस. वेळप्रसंगी तो डॉयलचीही कामगिरी करून देईल. नोटांची चवड फेकेल, त्याच्या दारात हा हजर...तसंच घडलं.
डॉयलनं एक गेमप्लान गेला. स्ट्रोझीला सहज उडवू शकतो, असा माणूस जॉन स्मिथच आहे. त्यालाच सुपारी दिली तर? असा त्याचा डाव होता. स्मिथनं त्याला उडवून लावलं. डॉयलचा उजवा हात हिकी भडकलाच. बंदुका निघाल्या. हिकीनं त्याला दमात घेतलं.
""मि. डॉयलला कुणी नाही म्हणायचं नसतं...पोरा!'' हिकी म्हणाला.
""छॅ!! त्या तुमच्या डॉयलला काही पहिलं नाव आहे की नाही?'' स्मिथ कुरकुरला.
इथून जॉन स्मिथच्या आयुष्याचा डबल ढोलका झाला. इथूनही वाजतोय, तिथूनही...शाई लावा फक्‍त!
* * *

पुढे घडलं ते गॅंगवॉर होतं. भयानक गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी जेरिको हादरलं. अमेरिकेतल्या सुरक्षा दलांचं लक्ष तिकडं जाणं साहजिक होतं. दिवसागणिक मुडदे पडत होते आणि या वादळाचा केंद्रबिंदू होता जॉन स्मिथ नावाचा एक दाखलेबाज गुन्हेगार...याचा शेवट काय झाला? ठरल्याप्रमाणेच झाला. डॉयलची गॅंग संपली. स्ट्रोझीची टोळी समूळ उखडली गेली. जेरिको शांत झालं.
...अणि हे सगळं एका जॉन स्मिथमुळं घडलं. कसं? ते पडद्यावर बघावं.
* * *
"लास्ट मॅन स्टॅंडिंग' हा टिपिकल वेस्टर्नपटाच्या पठडीतला चित्रपट आहे. थेट क्‍लिंट इस्टवुड छापाचा; पण आपल्याला इथं काऊबॉयच्या वेशात दिसतो तो सुपरसितारा ब्रुस विलिस. चित्रपटात घोडेबिडे नाहीत; पण गोळीबार अगदी तस्साच आहे. धूळभरल्या आसमंतातली दृश्‍यही तश्‍शीच आहेत. ब्रुस विलिस त्या दृश्‍यांमध्ये आश्‍चर्यकारकरीत्या भिनून गेला आहे.

"डायहार्ड' चित्रपटमालिकेमुळं घराघरात पोचलेला हा दिलेर, रांगडा गडी जगभरातल्या
स्टंटपट-दिवाण्यांना बेहद्द आवडला होता. नव्वदचं दशक तर ब्रुस विलिसचंच होतं, असं म्हटलं तरी चालेल. अकिरा कुरोसावा यांच्या "योजिंबो'चं वेस्टर्नपटात रूपांतर करण्याच्या दिग्दर्शक वॉल्टर हिल यांच्या उद्योगाला खुद्द कुरोसावांचंच पाठबळ होतं. त्यांचा "योजिंबो' जपानी होता. एका एकांड्या बहकलेल्या सामुराईची कहाणी सांगणारा. तो चित्रपट प्रचंड गाजलाही होता. तेच कथानक वॉल्टर हिलनं थेट मेक्‍सिकोच्या सरहद्दीवर आणून ठेवलं.

गंमत म्हणजे "योजिंबो' हा जपानी चित्रपट एका वेस्टर्न इंग्लिश कादंबरीवर आधारितच होता. ती काही कुरोसावांच्या कल्पक मेंदूतून आलेली कहाणी नव्हती. डॅशियल हॅम्मेटनामक कुण्या लेखकानं सन 1927 मध्ये "रेड हार्वेस्ट' नावाची एक कथा लिहून ठेवली होती, ती कुरोसावांनी उचलली होती.

त्याचं पश्‍चिमीकरण करताना वॉल्टर हिलनं थेट ब्रुस विलिसची निवड केली. त्याचं ते बेधडक वागणं, गालातल्या गालातलं निर्भय हसणं जॉन स्मिथच्या व्यक्‍तिरेखेला अगदी साजेसं होतं. विलिसनं भूमिकेसाठी होकार दिला; पण म्हणाला ः ""हे म्हणजे बॅंडवाल्याला "मोझार्ट वाजवून दाखव', असं सांगण्यापैकी होतं...पण ठीक आहे, मोझार्ट तर मोझार्ट!''

साहजिकच चित्रपट साफ पडला. समीक्षकांनीही टीकेच्या फैरी झाडून चित्रपटाची चाळण केली. कुरोसावा हळहळले. त्यांच्या दृष्टीनं प्रयोग फसला होता. इतकंच. खरं तर सर्जिओ लिओनीनं केलेल्या "अ फिस्टफुल ऑफ डॉलर्स'नं चांगला धंदा केला होता. अर्थात साठच्या दशकात तसल्या वेस्टर्नपटांना खास असा प्रेक्षक होता. "लास्ट मॅन स्टॅंडिंग' तंत्रदृष्ट्या सरस असूनही चालला नाही. चालायचंच.
...गोष्ट तीच होती. सांगणारा बदलला आणि चित्रच बदललं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com