बॅंक कशी लुटावी? (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

दोन वर्षांपूर्वी "गोइंग इन स्टाइल' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात तीन हीरो होते. तिघंही सत्तरीतले पेन्शनर. पेन्शनीतली बॅंकधार्जिणी दु:खं भोगून हवालदिल झालेले तीन म्हातारे पद्धतशीरपणे एक बॅंक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी. याच नावाचा, याच कहाणीचा चित्रपट सन 1979 मध्ये येऊन गेला होता. त्याचा हा रिमेक.

तुम्ही कधी बॅंक लुटली आहे का? नाही? ब ऽऽ रं...अहो, असं एकदम दचकू नका. सहज विचारलं. बॅंक लुटावी, किमानपक्षी एखादं एटीएम फोडायला हरकत नाही, असा हिंस्र विचार एखाद्या सामान्य माणसाच्या मनात येऊ शकतो, एवढंच आमचं म्हणणं.
"तुमच्या सहीत फरक आहे, पैसे मिळणार नाहीत,' असं कोरड्या आवाजात सांगणाऱ्या क्‍याशरचा गळा पिंजऱ्याच्या खिडकीतून हात घालून पकडावा असं मनात डोकावून जातं; पण आपण निमूटपणे सह्या गिरबटत बसतो. "एकदम येवढे पैसे काढता येणार नाहीत, आधी सांगून ठेवायचं होतं' असं सांगून फुटवणाऱ्या ब्यांक हपिसराला चार इरसाल शिव्या घालाव्यात असं वाटत राहतं; पण आपण इज्जतीत ओशाळा चेहरा करून परत येतो. घाईघाईत ब्यांकेत शिरावं तर शटर डाऊन करून "टाइम खतम हुआ' असं सांगणाऱ्या दरवाजावरच्या सुरक्षारक्षकाला चेपलीनं हाणावा, असंही वाटत असतं; पण आपण येड्यासारखे तिथंच उभे राहतो. नोटाबंदीच्या काळात तर अनेकांना एटीएम फोडावंसं वाटलं होतं. क्‍येवढ्या त्या रांगा. क्‍येवढा तो ताप...! आपलेच पैसे. आपलंच खातं. आपलीच बॅंक, पण कटकटी किती?

...निकड असते हो! पण करणार काय?
बॅंकांचं हे असंच असतं. नातीगोती काय, आपुलकी काय, हम आप की दुनिया समझते है काय...यांची जाहिरातीतली वाक्‍यं तर ऐकून घ्या नुसती. ऐन टायमाला आपलीच कॉलर धरायला कमी नाही करत या बॅंका. मग एक दिवस सामान्य खातेदार पेटून उठतो. मग काय होतं? काही नाही...एक सिनेमा होतो फक्‍त!
दोन वर्षांपूर्वी "गोइंग इन स्टाइल' नावाचा एक चित्रपट येऊन गेला होता. या चित्रपटात तीन हीरो होते. तिघंही सत्तरीतले पेन्शनर. पेन्शनीतली बॅंकधार्जिणी दु:खं भोगून हवालदिल झालेले तीन म्हातारे पद्धतशीरपणे एक बॅंक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी होती. याच नावाचा, याच कहाणीचा चित्रपट सन 1979 मध्ये येऊन गेला होता. त्याचा हा रिमेक. अर्थात 2017 पर्यंत चित्रपटाचं तंत्र बरंच पुढारलं होतं. त्यामुळं कथाकथनाचा बाज बदलला. बॅंकांचे व्यवहारही संगणकाधीन झाले होते. बॅंक लुटण्याचा "अंदाज'ही बदलला. नव्या चित्रपटातली स्टारकास्टही तगडी होती. एकदा तरी बघावाच असा हा मस्त, नर्मविनोदी चित्रपट आहे.
* * *

ही गोष्ट आहे जो हार्डिंग, विली डेव्हिस आणि आल्बर्ट गार्नर या तिघांची. तिघंही सत्तरी उलटलेले. पेन्शनीत गेलेले. अगदी सामान्य माणसं. ब्रुकलिन गावालगतच्या कारखान्यात त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले. तिथल्याच पेन्शन फंडातून दरमहा येणाऱ्या रकमेवर गुजराण सुरू आहे.
उदाहरणार्थ ः जो हार्डिंग, त्याची चंट नात ब्रुकलिन आणि मुलगी रॅचल यांच्यासोबत राहतो. रॅचलचा घटस्फोट झालाय. नवरा आउटलाइनला गेला. बऱ्याच कटकटीनंतर रॅचलनं त्याला बायबाय केलं. ती बापाकडं आली. टेम्पररी नर्सची कामं करून ती बिचारी घराला हातभार लावतेय. रिटायर्ड बाप याने की जो. तुटपुंज्या पेन्शनीतून तो अजूनही घराचे हप्ते भरतोय.

कृष्णवर्णीय विली डेव्हिसचंही तसंच. इंडियन बायको निवर्तल्यानंतर मुलगी माया आणि लाडकी नात कणिका यांच्यापासून दुरावलेला. त्यांच्याबरोबर "स्काइप'वर होणाऱ्या दूरस्थ भेटींवर बिचारा जगतो. नाही म्हणायला त्याच्या मनगटावर एक चिमुकलं घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या तबकडीत लहानग्या कणिकाचा फोटो आहे. विलीची एक किडनी कामातून गेलीये, असं डॉक्‍टर म्हणालेत. विली म्हणतो, एक गेली तर गेली, दुसरी तर आहे!...हे तो बोलत नाही, त्याची कडकी बोलतेय. विली आणि आल एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतात. आल तसा गुलछबू आणि सडाफटिंग आहे. फार विचारबिचार करत नाही. हाटेलात सॅक्‍सफोन वाजवून त्याचं भागतं. शिवाय, तो शिकवण्याही करतो. दारू, जेवण सुटलं की तो समाधानी असतो. फक्‍कड झोपा काढतो.

पिवळ्या पाकिटातली बॅंकेची नोटीस आली म्हणून जो हार्डिंग एक दिवस विल्यम्सबर्ग बॅंकेत गेला. ही कसली नोटीस आहे, असं त्याला विचारायचं होतं. व्यवस्थापकानं त्याला सांगितलं, "गेले दोन-तीन हप्ते थकलेत तुमचे म्हणून ही नोटीस; पण डोंट वरी. यलो नोटीस फार गंभीर नसते. काही काळानं तुम्हाला लाल पाकिटातून नोटीस येईल. मग मात्र घरावर जप्तीच...हे सगळे नियम आम्ही आधीच लिहून दिलेत तुम्हाला. हो नं?'
तुमच्या नानाची टांग! असं जो हार्डिंगला म्हणावंसं वाटत होतं. पण तेवढ्यात ते घडलं...
तीन-चार बुरखेधारी हवेत गोळ्या झाडत बॅंकेत घुसले.
""सभ्य स्त्री पुरुष हो, हालचाल करू नका. जमिनीवर लोळून मांजरासारखे हातपाय वर करून पडा. कुणीही कुठलंही बटण दाबायचं नाही. अलार्म वाजवायचा नाही. त्याचं काय आहे की गोळीबाराचा परिणाम चांगला नसतो कधीही...कळलं? आम्हाला थोडी रक्‍कम काढायची आहे बॅंकेतून. ती घेऊन आम्ही निघालो की नव्वद सेकंदांनंतर वाट्टेल ते करा...'' लुटारूंचा म्होरक्‍या ओरडत होता.
जोनं आपलं पाकीट काढून लुटारूला दिलं.
""नाही श्रीमान, तुमचे पैसे आम्हाला नकोत बरं! या बॅंका नतद्रष्ट आहेत. समाजाला लागलेली कीड आहे ही. सर्वसामान्यांना नागवणाऱ्या या बॅंकांच्या लेखी आपल्यासारखे लोक म्हणजे निव्वळ "खाते-क्रमांक'! यांना सरळ करणं आवश्‍यक आहे...'' म्होरक्‍या बहुधा कुठल्यातरी समाजवादी पार्टीचा शिकाऊ कार्यकर्ता असावा. आपण क्रांती करून ऱ्हायलो आहोत, अशा आविर्भावात त्यांनी बघता बघता तब्बल सोळा लाख डॉलर्स उचलले! व्यवस्थापकाची बोबडी वळली होती; पण म्होरक्‍यानं बंदूक रोखताच त्यानं पाटलोण ओली करत आपल्यापुरती शरणागती जाहीर केली.
...त्या तसल्या परिस्थितीतही असुरी आनंदानं जोला हसू फुटलं.
* * *

काही दिवसांतच जो आणि त्याच्या अन्य दोघा मित्रांना बॅंकेची ती कुप्रसिद्ध लाल नोटीस आली. ज्या कारखान्यात ते काम करत होते, तो कुणी तरी दुसऱ्यानंच खरेदी केल्यामुळं त्यांचा पेन्शन फंड निकालात निघाला होता. कर्जांची पुनर्रचना करण्याचे अधिकार शेवटी विल्यम्सबर्ग बॅंकेकडंच होते.
थोडक्‍यात तिघंही रस्त्यावर आले...एकाच वेळी. वय सत्तरीपार. नव्यानं रोजगार मिळणं अशक्‍य. पेन्शन इल्ले. दातावर मारायला हातात दमडा उरला नाही. काय करायचं? जोचं माथं भडकलं. विली आणि आलसुद्धा वैतागले होते. लेकिन आम आदमी करून करून काय करणार?
""मी बॅंक लुटायचं ठरवतोय!'' एकत्र जेवताना जो हार्डिंग शांतपणे म्हणाला.
""यू व्हॉट?'' विली चक्रावला.
"" बॅं-क-लु-टा-य-ला...तू येणार आहेस का बरोबर?'' जोनं नूडल काट्यावर गुंडाळत विचारलं.
""मी दरोडेखोर वाटलो का बे?'' विली भडकलाच.
""मीही नाहीए...पण माझे हक्‍काचे पैसे बॅंकवाले ढापत असतील तर माझा नाइलाज आहे...'' जो म्हणाला.
""तुझं डोकं फिरलंय...'' आल म्हणाला.
""आय ऍम सीरिअस...असं बघ, वी हॅव नथिंग टू लूज...बॅंक लुटायचीच. आपल्याला गरज आहे साधारण पाचेक लाख डॉलर्सची. तेवढेच लुटायचे. लूट यशस्वी झाली तर पुढचं आयुष्य सभ्य आणि शांतपणे व्यतीत करायचं...नीट प्लॅनिंग केलं तर बॅंक आरामात लुटता येते, हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंय...'' जो म्हणाला.
""एवढं सोपं आहे का ते? असं असतं तर...'' विलीनं मान हलवली.
""...फार तर काय होईल? तुरुंगात जाऊ, एवढंच ना...अरे, लूट फसली तर दोन टाइम जेवण हमखास मिळतं अशा ठिकाणी जायला काय हरकत आहे? अशी किती वर्षं उरलीत आपली? शिवाय तुरुंगात औषधोपचारसुद्धा फुकट होतील!'' जोनं बिनतोड युक्‍तिवाद केला.
विली त्याच्याकडं बघतच बसला.
* * *

""...आधीच माझी एक किडनी फेल आहे. लेकाचे उरलेल्या एका किडनीवर धड जगू देत नाहीत, तर मग दरोडा हाच एक मार्ग आहे...'' विलीनं आपला पत्ता टाकला. आल मात्र दोघांवर वैतागलेला होता; पण दोस्तांना साथ देणं त्याला भाग होतं.
दरोड्याची प्रॅक्‍टिस करणं गरजेचं आहे, हे जो आणि विलीला उमगलं. "व्हॅल्यू टाऊन' नावाच्या गावातल्या एकमेव सुपरस्टोरमधून काही वस्तू लांबवता तरी येतात का, हे त्यांना बघायचं होतं. आल ड्रायव्हिंगमध्ये तरबेज होता. त्याला घेऊन दोघंही सुपरस्टोरमध्ये गेले. पुढचा तमाशा सांगण्यात काही हशील नाही.
""तुमच्यासारखी जंटलमन माणसं असं करायला लागली तर कसं होणार? घरी कळवू का तुमच्या, अं? उमर बघून मी पोलिसात कम्प्लेंट देत नाही; पण पुन्हा असली उचलेगिरी करू नका, काका,'' असं स्टोरच्या सिक्‍युरिटी व्यवस्थापकानं ऐकवलं. कान पाडून ऐकून घेण्यापलीकडं काही इलाज नव्हता.
-मधल्या काळात आल गार्नरचं एका दिलफेक मैत्रिणीशी संधान जुळून उतारवयात त्याला नव्यानं "तरुण' होण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. असली मज्जा फुकट येत नाही. गर्लफ्रेंड आली की पाठोपाठ खर्चही आलाच; पण पैसा कुठून आणायचा? काचकूच करत तोही दरोड्यात सामील झाला.

जोचा माजी जावई मर्फी याच्या वळखीचा एक अंडरवर्ल्ड ड्रगवाला होता. जीझस नावाचा. जोनं विली आणि आलसह तिथं फेरा टाकला. प्रथमदर्शनी ते एक पाळीव प्राणी मिळणारं दुकान होतं. कुत्री, मांजरं, रंगीत मासे असलं काहीबाही; पण "जीझस ः द दुकानदार' आत्रंगी होता. जोनं स्वच्छ शब्दांत त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला.
""हे पाहा मिस्टर, आम्हाला बॅंक लुटायची आहे. तुमचं ज्ञान आणि आमची मेहनत रंग लाएगी. आमच्या लुटीतले दहा टक्‍के तुम्हाला देऊ. बोला कसं करता?''
"" खुळ्या डोसक्‍याच्या...बॅंक लुटायची तर मीच लुटीन की. धा टक्‍के कशाला, शंभर हिश्‍शांनी लुटीन. तुम्हा म्हाताऱ्याकोताऱ्यांचं काम हाय का ह्ये? गुमान घरी जाऊन झोपा. टीव्ही बघा, पत्ते खेळा...नसत्या लफड्यात कशाला पडता राव!'' जीझस कनवाळूपणाने म्हणाला. धोका पत्करून शंभर टक्‍के मिळवण्यापेक्षा दहा टक्‍के घरबसल्या मिळवणं हा जगातला सर्वात शहाणपणाचा व्यवहार कसा आहे ते जोनं त्याला पटवून दिलं. तो कबूल झाला. मग सुरू झाला ट्रेनिंगचा सिलसिला.
बंदूक कशी चालवावी? गोळ्या कशा भराव्या? मोटार कुठली वापरावी? वेशांतर कसं करावं? मुखवटे कुठले वापरावेत? या सगळ्याचा क्‍लास जीझससरांनी घेतला. तीन मिनिटांत बॅंकेत शिरून बंदूक दाखवून नोटा बॅगेत भरून परत बाहेर येणं कसं गरजेचं आहे, हे त्यानं तीनतीनदा सांगितलं.
""कुठली बॅंक फोडायची म्हणता?'' जीझसनं विचारलं.
""विल्यम्सबर्ग सेव्हिंग्ज बॅंक!'' जोनं उत्तर दिलं.
""बोंबला! म्हणजे बॅंकलुटीचा पहिलाच नियम मोडीत निघाला! स्वत:ची बॅंक कधीही लुटू नये, काकालोक!''
...पण काकालोक पेटले होते. त्यांनी प्रॅक्‍टिस केली. घड्याळात टायमर लावून जाऊन आले. परत आले तेव्हा पंधरा-वीस मिनिटं होऊन गेली होती. "एवढ्या वेळात तुम्ही पोलिसांच्या पिंजऱ्याच्या गाडीत असाल', जीझसनं बजावलं.
""काकालोक, आणखी एक...स्ट्रॉंग ऍलिबाय पाह्यजेल...म्हंजे दरोड्याच्या टायमाला तुम्ही दुसऱ्याच कुठं तरी होता, हे कारण पुराव्यानिशी देता आलं पाहिजे. नाहीतर फुकट लटकाल!'' जीझसनं बजावलं.
...पण जोचं डोकं घोड्यापुढं धावत होतं. त्यांच्या वस्तीचा कार्निव्हल आठवड्याभरात येऊन ठेपला होता. कार्निव्हल म्हणजे छोटीशी जत्राच. तिथं आपण तिघांनीही कार्यकर्ते म्हणून घुसायचं, असं त्यानं ठरवलं.
...नवा टी शर्ट. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. चक्री पाळणा. भूतबंगला. जादूचे प्रयोग, फुगे, सार्वजनिक फिरती शौचालयं...या नेपथ्याचा आपल्याला फायदा होईल, हे विली डेव्हिसलाही पटलं.
...दरोड्याचा दिवस मुक्रर झाला.
* * *

बंदुकी खऱ्या असाव्यात; पण गोळ्या खऱ्या नकोत, असं सर्व नवोदित दरोडेखोरांचं मत पडलं. कशाला उगीच...कुणीतरी हकनाक जखमी वगैरे व्हायचं. फार रक्‍कम गोळा करत बसायचं नाही. आवश्‍यक तेवढी जमली की गायब व्हायचं, असं ठरलं.
...कार्निव्हलमध्ये तिघांनीही योग्य वेळी वेशांतरं केली. जो हार्डिंगनं फ्रॅंक सिनात्राचा, विली डेव्हिसनं डीन मार्टिंनचा आणि आल गार्नरनं सॅमी डेव्हिसचा (ज्युनिअर) मुखवटा चढवला. यांना "रॅट पॅक' म्हणतात. सन 1961 मध्ये आलेल्या "ओशन इलेव्हन' या गाजलेल्या लूट-चित्रपटात हे त्रिकूट होतं.
...अखेर तो क्षण आला.
* * *

सगळं नीट झालं असतं. बॅंकवाल्यांनी चांगलं सहकार्य केलं. नुकताच एका लुटीचा अनुभव असल्यानं कॅशियर लोकांनी उत्साहानं पैशांची पुडकी यांच्या बॅगेत टाकली. व्यवस्थापक सवयीनं पाठीवर मांजरागत आडवा पडला. सुरक्षारक्षकानंही फार त्रास घेतला नाही. डीन मार्टिनचा मुखवटा घालून बॅंकभर हिंडणाऱ्या विली डेव्हिसला मात्र ऐनवेळी गुदमरायला झालं आणि घोटाळा झाला...
विली भोवळ येऊन पडला. बॅंकेत पैसे काढायला आलेल्या एका महिलेच्या तीन-चार वर्षांच्या चौकस मुलीनं त्याच्याजवळ जाऊन चौकशी केली. त्या निरागस सुरामुळं तर विली डेव्हिस गहिवरलाच. त्याला त्याच्या नातीची आठवण झाली. त्या चिमुरडीनं त्याच्या मुखवट्यालाच हात घातला. निम्मा-अधिक काढलाच. तेवढ्यात आल गार्नरनं सिच्युएशन बघून त्याला उचललं. वेळ न दवडता पळ काढला. तिघंही भराभरा पैशाच्या बॅगांसकट गाडीत बसले.
पुढं काय झालं? बॅंकदरोडा त्यांना पचला? त्या पोरीनं साक्ष काय दिली? पोलिसांचा ससेमिरा कसा लागला? हे सगळं पडद्यावर बघणं धम्माल आहे.
* * *

सर मायकेल केन, मॉर्गन फ्रीमन आणि ऍलन आर्किन या तिघा वृद्ध सिताऱ्यांनी या चित्रपटात जे धमाल रंग भरले आहेत, त्याला तोड नाही. त्यांचा सहज वावरच मजा आणतो. चित्रपट खळखळून हसवणारा नाहीए. नर्मविनोदाची प्रसन्न पखरण मात्र चौकटीचौकटीत आहे. बॅंकांच्या आहारी गेलेल्या वर्तमान शहरी जिंदगानीची वाताहत ही कहाणी छान अधोरेखित करते.
बहुतेक दरोड्यांच्या स्टोऱ्यांमध्ये दरोडा फसतो किंवा किमान दरोडेखोरांना अटकबिटक होऊन "कानून के हाथ लंबे होते है' टाइप मेसेज मिळतो. इथं स्टोरी थोडी हट के आहे. एडवर्ड कॅनन नावाच्या एका लेखकानं ही गोष्ट फार पूर्वी लिहिली होती. मार्टिन ब्रेस्ट या ख्यातनाम चित्रकर्मीनं त्यावर 1979 मध्ये पहिल्यांदा "गोइंग इन स्टाइल' केला. त्यात जॉर्ज बर्न्स, आर्ट कॅनरी आणि ली स्ट्रासबर्ग या तेव्हाच्या गाजलेल्या आणि वृद्ध अभिनेत्यांनी मस्त भूमिका केल्या होत्या. तो चित्रपट खूप गाजला होता.
सन 2015 च्या सुमारास वॉर्नर ब्रदर्सच्या व्यवस्थापनाला याचा रिमेक करावासा वाटला. थिओडोर मेल्फीच्या "स्मार्ट' पटकथेवर झॅक ब्राफ या तरुण दिग्दर्शकानं काम सुरू केलं. सर मायकेल केन, मॉर्गन फ्रीमन आणि ऍलन आर्किन हे तर एकेकाळचे ऑस्कर नामवंत. शिवाय, तपास-अधिकाऱ्याच्या भूमिकेत मॅट डिलन आणि आल गार्नरच्या मैत्रिणीची मसालेदार भूमिका करणारी ऍन मार्गरेट...अशी तगडी मंडळी या नव्या रिमेकमध्ये एकत्र आली.

असं असूनही "रिमेक कसा असू नये' याचा वस्तुपाठ म्हणून समीक्षकांनी "गोइंग इन स्टाइल'कडं बोट दाखवलं. पिक्‍चरही खूप चालला असंही नाही. अनेकांना तो बोअरदेखील वाटला. काहीही असलं तरी बसल्या बैठकीला हा चित्रपट उत्तम मनोरंजन करतो, यात तर काही शंका नाही. "बूढा होगा तेरा बाप'
हाच संदेश खेळकर पद्धतीनं देणारा हा चित्रपट कधीही बघावा असा आहे. एकंदरीत, बॅंकेतलं हे विड्रॉवल बरंच सुसह्य आहे. हा चित्रपट बघून झाल्यावर यदाकदाचित बॅंकेत जाणं झालं तर नकळत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडं उगाचच आपली नजर जाते आणि कॅशियरकडे बघून हसू फुटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com