अंधारातचि दडले सारे... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

खरं तर परिस्थिती अशी आहे की "गॉडफादर' या चित्रपटाबद्दल काही लिहू-बोलू नये; पण अभिजात चित्रपटांचा धांडोळा घेताना "गॉडफादर'ला वळसा घालून पुढं जाणं शक्‍यही नाही. हा मैलाचा दगड न ओलांडता येणारा. या चित्रपटानं चित्रभाषेचं परिमाण बदललंच; पण विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या अधोविश्वाची परिभाषाही बदलली. हा चित्रपट आजही कुठंही लागला तर तो चुकवणं जिवावर येतं. "किती वेळा बघायचा गॉडफादर?' या प्रश्‍नाचं उत्तर "लागेल तेव्हा' असंच द्यावं लागतं!

"गॉडफादर' नावाचं गारुड बघायला आताशा थिएटर गाठावं लागत नाही. टीव्हीच्या डबड्यात तो मावणं तर अशक्‍यच आहे. मानवी अस्तित्वाची ती एक काळीकुट्ट बाजू आहे. ती बसल्या जागीसुद्धा "दिसू' शकते. आपल्याच ओळखीच्या एखाद्या व्यक्‍तिमत्त्वात दिसते. पुस्तकात भेटते. वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये, वृत्तवाहिन्यांच्या गुन्हेगारी वार्तांकनांमध्ये...अगदी कुठंही भेटते. इतकंच कशाला, खोलीच्या आढ्याशी हलणाऱ्या वेड्यावाकड्या आकारांमध्ये अचानक तो परिचित चेहरा दिसू लागतो. हा चेहरा असतो एका विदीर्ण म्हाताऱ्याचा. त्याच्या भाळावर चिंतातुर सुरकुत्यांचं जाळं आहे. ओठ काहीसे रडवे आहेत. नजरेत अपार दु:ख भरलेलं आहे...पण हा चेहरा फसवा आहे. म्हाताऱ्यानं आजवर कित्येक खून पचवले आहेत, या जाणिवेनं मन सावध होतं. हा चेहरा आहे गॉडफादरचा. डॉन व्हितो कोर्लिओनेचा.
उणीपुरी 48 वर्षं झाली तरी "गॉडफादर'चं गारुड काही कमी व्हायला तयार नाही. कधी कधी नवल वाटतं. या काल्पनिक व्यक्‍तिरेखेनं वास्तवातल्या आपल्या जगात किती मुजोरी केली आहे! आपला जन्म एका प्रतिभावान लेखकाच्या मेंदूत झाला आहे, याचं साधं भान या व्यक्‍तिरेखेला नाही. विख्यात अमेरिकी कादंबरीकार मारिओ पुझो यांच्या लेखणीतून साकारलेला हा डॉन अस्सलाहूनही अस्सल निघाला.

सत्तरीच्या दशकात या डॉननं जगातल्या साहित्याचं आणि एकंदरीतच कलाविश्वाचं क्षितिज व्यापलं होतं. बकाली नावाची चेटकीण जगभर आपले हात-पाय पसरत होती. व्हिएतनाममधला फसलेला डाव अमेरिकेच्या अंगलट आला होता आणि कोवळी पोरं त्या तिथल्या जंगलात मरून पडायला जात होती. गुन्हेगारीनं शहरी जीवन पोखरलं होतं. अमली पदार्थांचा शिरकाव होत होता. या काळात अमेरिकेच्या भावविश्वात तर खूपच उलथापालथ झाली. "मूल्यांची पडझड' वगैरे शब्दप्रयोग भलतेच बुळबुळीत वाटावेत इतकी. त्या तसल्या काळात "गॉडफादर' ही कादंबरी आली. आजमितीला या कादंबरीच्या कोट्यवधी प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत. कुठल्याही इंग्लिश बुकांच्या दुकानात गेलं, तर शेल्फावर विक्रीला हा "गॉडफादर' बसलेला असतोच. जे कादंबरीचं झालं तेच चित्रपटाचं. हा चित्रपट आजही कुठंही लागला तर तो चुकवणं जिवावर येतं. "किती वेळा बघायचा गॉडफादर?' या प्रश्‍नाचं उत्तर "लागेल तेव्हा' असंच द्यावं लागतं. याच्या पारायणाला लिमिट नाही. "गॉडफादर'च्या हिप्नॉटिझमचा बळी ठरलेली पिढी आता पन्नाशी-साठीच्या घरात आली आहे. मार्लन ब्रॅंडोनं साकारलेला डॉन व्हितो कोर्लिओने आठवला की ही पिढी सरसावून बसते. भिंतीवरच्या सावल्यांमध्ये डॉनचा चेहरा शोधणारी पिढी ती हीच.

"गॉडफादर' या कहाणीबद्दल आजवर लाखो पृष्ठं लिहून झाली आहेत. या कलाकृतीचे जगभर अनेक भले-बुरे अनुवाद झाले. चित्रपटांच्याही अनेक आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या. माफिया ही विषयवस्तू रुपेरी पडद्यासाठी एक बेस्ट फार्म्युला आहे, या गृहितकाचा खुंटा "गॉडफादर'नं हलवून बळकट केला होता; पण दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला आणि लेखक मारिओ पुझो यांनी पेश केलेली "गॉडफादर' त्रिधारा बाकीच्या माफियापटांना मागं सारून दशांगुळं वर उरते, ती त्यातल्या अत्युच्च कलात्मक मूल्यांमुळं. त्याचं पार्श्‍वसंगीत, अगदीच उपऱ्यासारखा दृश्‍य टिपणारा कॅमेरा, पडद्यावरच्या प्रसंगाचे गडद रंग संपूर्णत: प्रेक्षकाच्या मनात उतरवणारं संकलन...उगीच नाही, शतकातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट कायम शिरोभागी राहत आला आहे. स्टॅन्ली क्‍युब्रिक या अनवट प्रतिभावंताच्या मते तर, "गॉडफादर'सारखा चित्रपट पुन्हा कधीच निर्माण होणार नाहीए.
खरं तर परिस्थिती अशी आहे की "गॉडफादर'बद्दल काही लिहू-बोलू नये; पण अभिजात चित्रपटांचा धांडोळा घेताना "गॉडफादर'ला वळसा घालून पुढं जाणं शक्‍यही नाही. हा मैलाचा दगड न ओलांडता येणारा. या चित्रपटानं चित्रभाषेचं परिमाण बदललंच; पण विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या अधोविश्वाची परिभाषाही बदलली.
* * *

कहाणी घडली तेव्हा ते वर्ष होतं 1945. दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनच्या लगत एक "छोटी इटली' आहे. होती म्हणा हवं तर...तिथली ही गोष्ट.
...आज डॉन व्हितो कोर्लिओनेच्या पोरीचं लग्न आहे. त्याच्या फरसबंद घराच्या अंगणात इटालियन वऱ्हाड जमलंय. बॅंड जोशाजोशात वाजतोय, हौशेनौशे मस्त नाचून घेतायत. गंभीर चेहऱ्याचे काळे कोटवाले, हॅटवाले पाहुण्यांच्या सरबराईत राबताहेत. येणाऱ्या हरेक मोटारीचा नंबर टिपून ठेवला जातोय. कोटाच्या खिशात एक हात घालून हिंडणाऱ्या "पोरां'चा कडेकोट बंदोबस्त आहे.
डॉन व्हितो म्हणजे "गॉडफादर'. त्याची कोर्लिओने फॅमिली ही अमेरिकेतल्या अधोविश्वातली एक दमदार टोळी. लेबर युनियन, तेलाचा व्यापार, हॉटेलं, कॅसिनो, जुगाराचे अड्डे...अशा कितीतरी उद्योगांमध्ये कोर्लिओने फॅमिलीनं हात पसरले आहेत. कित्येक पोलिस अधिकारी, न्यायाधीश या डॉन व्हितोच्या कोटाच्या खिशात असतात असं म्हटलं जातं. डॉनचा शब्द खाली पडू दिला जात नाही. आज तर त्याच्या पोरीचं लग्न. या दिवशी त्याच्या दारी आलेला याचक रित्या हाती जाणार नाही. असं झालं तर डॉन व्हितोच्या इटालियन पुरुषार्थाच्या चिंध्या होतील, चिंध्या.
...अंगणात ब्रास बॅंड वाजत होता, तेव्हा घरातल्या आपल्या खास खोलीत अंत्यविधीतज्ज्ञ अमेरिगो बोनासेरा गुडघ्यावर बसून डॉन व्हितोसमोर गिडगिडत होता. त्याच्या पोरीला काही गुंडांनी भर रस्त्यात विटंबिलं; पण शिक्षा काय झाली? कोर्टानं त्यांची सक्‍तमजुरी चक्‍क पुढं ढकलून त्यांना मोकळं सोडलं. हा काय न्याय झाला, गॉडफादर? डॉन व्हितोनं त्याला आश्‍वासन दिलं; पण निष्ठेची विष्ठा करू नकोस, असंही बजावलं.

अमेरिकेत इटालियन माफियानं हात-पाय पसरलेत. इथं मॅनहॅटन भागात डॉन कोर्लिओनेचं राज्य आहे. एमिलिओ बार्झिनी, फिलिप टाटाग्लिया, ओटिलिओ क्‍युनिओ आणि ब्राझी यांच्या उरलेल्या चार फॅमिलीज्‌. या पाच फॅमिलीज्‌ म्हणजे अमेरिकेचं अंडरवर्ल्ड. पैकी टाटाग्लिया आणि कोर्लिओने यांच्या फॅमिलीतून विस्तव जात नाही.
डॉन व्हितोला तीन मुलगे आणि एक मुलगी. थोरला सांतिनो ऊर्फ सनी, मधला मायकेल ऊर्फ माइकी, धाकटा फ्रिडो. तिघंही सळसळत्या रक्‍ताचे तरुण होते. मोठा सांतिनो तर बापानंतर डॉनच्या खुर्चीतच बसणार होता. मधला मायकेल मात्र लष्करी शिक्षण घेऊन युद्धावर गेलेला आणि आता परत आलेला. फॅमिलीच्या धंद्यात त्याला काहीच स्थान नव्हतं. धाकटा फ्रिडो डोक्‍यानं थोडा कमीच होता. मुलगी कोनी बरीच "उद्योगी.' तिनंच गटवलेल्या कार्लोशी तिचं आज लग्न लावून देण्यात येत होतं.
-मायकेल मांडवात आला तो त्याची प्रेयसी के एडम्सबरोबरच. "माझा बाप अंडरवर्ल्ड डॉन असला तरी स्वभावानं प्रेमळ आहे. मुख्य म्हणजे मी स्वत: त्याच्या काळ्या धंद्यात नाही,' हे त्यानं के हिला सांगून टाकलं होतं. विख्यात गायक-नट जॉनी फॉंतेन त्या मांडवात नाचताना-गाताना बघून के चक्रावलीच. "माझे वडील जॉनीचे गॉडफादर आहेत. त्याचं करिअर त्यांनीच घडवलंय,' असा खुलासा माइकनं केला. जॉनीचं करिअर हल्ली उतरणीला लागलं होतं. रोल मिळत नव्हते. दारू आणि पोरींमध्ये बुडालेल्या जॉनी फॉंतेनची जादू कमी झाली होती. हॉलिवूडच्या एका निर्मात्यानं तर त्याला चक्‍क रोल नाकारला होता. त्यामुळं जॉनी रडत रडत गॉडफादरकडं आला होता.
""पुरुषासारखा पुरुष तू...मुळूमुळू रडतोस काय असा? हॉलिवूडच्या त्या बायलटांमध्ये राहून तुझं असं झालंय! चांगलं खा-पी. तब्येत सांभाळ...तो निर्माता आठवड्याभरात तुझ्या दारात येईल, बघ!'' डॉन व्हितोनं त्याला बापासारखं खडसावलं.
""आठवडाभरात शूटिंग सुरू होईल त्या सिनेमाचं...उशीर झालाय, गॉडफादर'' मुसमुसत जॉनी म्हणाला.
""तो रोल तुलाच मिळेल. मी त्याला अशी ऑफर देईन की ती त्याला नाकारता येणारच नाही...'' खर्जातल्या आवाजात डॉन व्हितोनं ठामपणे सांगितलं. त्याचा आवाज पिस्तुलाच्या नळीसारखा थंडगार होता.
* * *

तसंच घडलं. डॉन व्हितोच्या सांगण्यावरून फॅमिलीचा वकील टॉम हेगन हॉलिवूडला पोचला. हेगनचं रक्‍त सिसिलियन नाही; पण तरीही बालपणापासून डॉन व्हितोनं त्याला पाळलंय. त्याला शिकवून वकील केलंय. टॉम हेगननं "वूल्ट्‌झ इंटरनॅशनल'चा मालक-निर्माता जॅक वुल्ट्‌झ याला भेटून डॉनची इच्छा सांगितली. "जॉनीला रोल मिळाला तर तुझ्या स्टुडिओतली युनियनची कटकट कायमची मिटवू,' अशी ऑफर दिली. वुल्ट्‌झनं त्याला साफ उडवून लावलं. वुल्ट्‌झच्या खार्टुम नावाच्या सहा लाख डॉलर्स किमतीच्या शर्यतीच्या घोड्याचं मुंडकं त्याच रात्री त्याच्या बिछान्यात सापडलं...निर्मात्यानं तातडीनं जॉनी फॉंतेनला बोलावून रोल देऊन टाकला.
प्रेमात पडलेल्या मायकेलला या गोष्टींमध्ये खरंच काही स्वारस्य नव्हतं. गुन्हेगारीचा वारसा आपण चालवायचा नाही, हे त्यानं पक्‍कं ठरवलं होतं. फॅमिलीनंही त्याला रोखलं नाही. उलट थोरला भाऊ सांतिनो त्याला म्हणे ः ""माइकी, तू चांगलं करिअर कर...इथं राहशील तर बिघडशील. आमचं काय, आम्ही काय नाही शिकलो! आम्ही हेच करणार!''
निर्दय काळजाचा लुका ब्रासी, डॉनच्या चरणी अभिन्न निष्ठा वाहिलेला टेशिओ, पडेल ते काम चुटकीसरशी करणारा लठ्ठ्या क्‍लेमेंझा...अशा निष्ठावंतांच्या जोरावर डॉन व्हितोनं इथवर मजल मारली होती. आपला वारसदार सांतिनोला हाताशी घेऊन डॉन व्हितोनं त्याला धडे द्यायला सुरवात केलीच होती.
सोलोझ्झो नावाचा एक ड्रगमाफिया एक दिवस डॉन व्हितोच्या दारी आला. अमेरिकेत अमली पदार्थ आणण्याची संपूर्ण व्यवस्था त्याच्याकडं होती. फक्‍त डॉन व्हितोनं सरकारदरबारी असलेली पुण्याई सोलोझोसाठीही वापरावी. कोर्ट, पोलिस सांभाळून घ्यावेत. घरबसल्या तीस टक्‍के भागी देण्याची सोलोझोची तयारी होती. "ड्रग्जची घाण नको' असं सांगून डॉननं त्याला निरोप दिला. सांतिनोच्या मते या धंद्यात चिक्‍कार पैसा असल्यानं विचार करायला हरकत नव्हती. सोलोझोनं बाप-लेकांमधला हा सूक्ष्म भेद टिपला.
त्यानंतर काही दिवसांनी रस्त्यावर गाडी थांबवून फळं घेत असताना डॉन व्हितो कोर्लिओनेवर अज्ञात मारेकऱ्यांनी पिस्तुलाच्या पाच गोळ्या झाडल्या. निमिषार्धात गॉडफादर डॉन व्हितो रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता.
* * *

डॉनचं नशीब बलवत्तर होतं. तो वाचला. मधला मुलगा माइक आपल्या प्रेयसीसोबत सिनेमा बघायला गेला होता. गोळीबाराची बातमी त्यानं मध्यरात्रीच्या स्थानिक वृत्तपत्रात वाचली. तो इस्पितळात पोचला. तिथं बंदोबस्ताला कुणीही नव्हतं. ना पोलिस ना कोर्लिओने फॅमिलीची पोरं. असं कसं? त्याला संशय आला. दहा मिनिटांपूर्वी पोलिसांनीच त्यांना इस्पितळाबाहेर काढलंय, असं नर्स म्हणाली. माइकनं तिच्या मदतीनं डॉनची खाट दुसऱ्या खोलीत हलवली. तो वाट पाहत राहिला.
त्याचा संशय खरा ठरला. पाच गोळ्या खाऊनही जिवंत राहिलेला डॉन कोर्लिओने नंतर महागात पडला असता. त्याला खतम करण्यासाठी कट रचला गेला होता. त्यात पोलिस अधिकारी मॅक्‍लस्कीही सहभागी होता. संधी हुकवल्याबद्दल भडकून मॅक्‍लस्कीनं माइकच्या कानफटात मारली. त्याचा गाल सुजवला, ती सूज पुढं अनेक महिने राहिली.
...त्या कानफटीतील तडाख्यानं मायकेल कोर्लिओने नावाची अधोविश्वातली आणखी एक दंतकथा जन्माला आली.
***

डॉन व्हितो इस्पितळात बरा होत होता, तेव्हाच सोलोझोनं निरोप पाठवला : "तुमचा सल्लागार वकील टॉम हेगन माझ्या ताब्यात आहे. गडबड करू नका.' सोलोझो नाही म्हटलं तरी आता टरकला होता. "सांतिनोशी साटंलोटं घडवून आण, झालं-गेलं विसरून धंद्याला लागू, असा प्रस्ताव कोर्लिओने फॅमिलीकडे पोचव,' असं त्यानं टॉमला सांगितलं. मायकेलशी वाटाघाटी घडवून आणायची अटही त्यानं घातली. "बिचाऱ्या माइकीला यात कशाला ओढायचं? अंडरवर्ल्डमधल्या युद्धाचा त्याला गंधदेखील नाही,' असं सांतिनो ऊर्फ सनीचं म्हणणं होतं; पण माइक तयार झाला.
ब्रूकलिनमधल्या लुइस नावाच्या इटालियन रेस्तरांमध्ये भेट ठरली. माइक एकटा...सोलोझो आणि मॅक्‍लस्की. तिघंच.
""हे बघ माइक, मी बिझनेसमन आहे. तुझ्या वडिलांवरचा हल्ला हा पर्सनल नाही...'' सोलोझो म्हणाला.
""पुन्हा माझ्या वडिलांवर असा हल्ला होणार नाही, याची काय हमी आहे?'' माइकनं विचारलं.
""अरे, इथं मीच बळी ठरलोय...मी कुठून हमी देऊ? पण मला धंदा सोडून कशातही रस नाही, यावर विश्वास ठेव!'' सोलोझोनं मखलाशी केली. गप्पांच्या मध्येच माइक उठून स्वच्छतागृहात गेला. परत आल्यावर त्यानं शांतपणे सोलोझो आणि मॅक्‍लस्कीच्या मस्तकात एकेक गोळी घातली.
...एका घनघोर युद्धाला तोंड फुटलं होतं.
***

-माइक फरार होऊन इटलीला गेला. तिथं काही महिने राहिला. तिथं त्याला भेटली अपोलोनिया. गोड-गोजिऱ्या अपोलोनियानं त्याला अक्षरश: भुरळ घातली. इटालियन रीतीभातींनुसार त्यानं तिच्या वडिलांकडे जाऊन मुलीचा हात मागितला. वऱ्हाड-वाजंत्रीनिशी त्यांचं झोकात लग्न झालं. अपोलोनिया म्हणजे मूर्तिमंत जीवनासक्‍ती होती. तिला हिंडाय-फिरायचं होतं. ड्रायव्हिंग शिकायचं होतं.
इकडं न्यूयॉर्कमध्ये भयानक रक्‍तपात सुरूच होता. माफिया टोळ्यांमधलं युद्ध हातघाईला आलं होतं. कॉजवेलगतच्या टोल नाक्‍यावर सांतिनोवर गोळ्यांची बरसात झाली. तो तिथल्या तिथं मेला. कोर्लिओने फॅमिलीचं अस्तित्व आता पणाला लागलं. खुद्द डॉन व्हितो वार्धक्‍य आणि गोळीबारानंतर आलेल्या आजारपणांमुळे थकला होता. थोरला सांतिनोही गेला. धाकला फ्रिडो डोक्‍यानं थोडा कमी होताच. लुका ब्रासीसारखा खंदा मारेकरी सोलोझोचा बळी ठरला होता. खुनाखुनीचा हा सिलसिला लवकरच इटलीत येऊन थडकणार, याचा अंदाज बांधायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. इटलीतलं गाव माइकनं सोडावं आणि सुरक्षित जागा गाठावी असं ठरलं.
-माइक तर नव्यानवेल्या संसारात रमलेला. पोराबाळांची स्वप्नं बघत त्याचं आयुष्य अपोलोनियासोबत शांतपणे चाललं होतं. अपोलोनिया तर स्वप्नं बघण्यात एक्‍स्पर्ट होती. सोळा-सतरा वर्षांची कुठली मुलगी तशी नसते?
""ड्रायव्हिंग राहू दे...आधी इंग्लिश बोलायला शिक...'' माइक म्हणाला.
""मला येतं...संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे...घे, आलं की!'' ती म्हणाली.
...माइक खोलीत तयार होत होता. घराच्या अंगणात अपोलोनिया ड्रायव्हिंगच्या इराद्यानं मोटारीत शिरली. किल्ली फिरवताच त्या गाडीत प्रचंड स्फोट झाला. उरले ते आगीच्या लपेटीतले मोटारीचे अवशेष. अपोलोनियाचा नवपरिणित देह तिथं उरलाच नव्हता.
* * *
वार्धक्‍यानं वाकलेल्या डॉन व्हितोला आता हे युद्ध संपवायचं होतं. नको तो सूडाचा प्रवास. परतलेल्या माइकनं नकळत फॅमिलीची सूत्रं हातात घेतली होती. सोलोझोला गोळ्या घालणारा माइकच होता, ही बातमी डॉन व्हितोसाठी थोडीशी दु:खदच होती. एक चांगला पोरगा हकनाक गुन्हेगारीत ओढला गेला होता.
न्यूयॉर्कमध्ये आल्यावर जवळपास वर्षभरानंतर माइक, आपल्या जुन्या प्रेयसीला, के ऍडम्सला भेटला. तिच्याशी त्याचं पुन्हा सूत जुळलं.
""सांतिनोला उडवण्यात टाटाग्लिया फॅमिली नव्हती, माइक...तो बार्झिनी होता...'' डॉन व्हितो म्हणाला.
"" माहितीये मला...'' शांतपणे माइक म्हणाला.
""आता बार्झिनी तहाची बोलणी करेल तुझ्याशी...आपल्याच एखाद्या विश्‍वासातल्या "भाई'ला तो मध्ये घालेल...आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बोलणी घडवून आणेल. तिथंच तुझा गेम करेल...'' डॉननं त्याचा सल्ला दिला. माइक काही बोलला नाही.
""लक्षात ठेव...बार्झिनीचा निरोप आणणारा कुणीही असू दे. तो खरा फितूर आहे, असं समज!'' डॉन व्हितोचा हा सल्ला अखेरचा होता.
त्यानंतर काही दिवसांनी नातवाबरोबर घराच्या परसदारी खेळत असताना म्हातारा डॉन व्हितो कोर्लिओने टोमॅटोच्या वाफ्यात मरून पडला. एक पर्व संपलं.
...डॉन मायकेल कोर्लिओने नावाचं एक नवं पर्व सुरू झालं होतं.
(उत्तरार्ध : पुढील अंकी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com