कौल! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

"ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हा एक अफलातून चित्रपट. 1957 मध्ये आलेल्या या चित्रपटात खरं तर चित्रपटच नाहीये! शहाण्णव मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात फक्‍त तीन मिनिटांचं बाह्य चित्रीकरण आहे. बाकी सर्व चित्रपट घडतो, तो एका खून खटल्यावर वितंडवाद घालणाऱ्या ज्युरींच्या दालनात. सतरा बाय चोवीस फुटाच्या एका दालनात साकारलेला हा चित्रपट लक्षात राहतो तो त्यातल्या चित्तवेधक कथाकथनासाठी. या चित्रपटात कथा आहे; पण कथानायक वगैरे नाही. खुनाची वर्णनं आहेत; पण व्हिलन वगैरे नाही. व्यक्‍तिरेखा आहेत; पण त्यांना नावंगावं वगैरे नाहीत. सगळा थरार उमटतो तो शब्दांत, मुद्राभिनयात आणि चर्चेत. गेल्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट अभिजात चित्रपटांपैकी एक गणला जाणाऱ्या या चित्रपटावर एक झोत.

शंभर अपराधी निर्दोष सुटले तरी चालतील; पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. न्यायदानाचं हे एक मूलभूत सूत्र. या सूत्रापर्यंत आपली न्यायव्यवस्था कधी आली असेल? कधी विचार केलाय? न्यायासनावर बसलेल्या गंभीर मुद्रेच्या न्यायमूर्तींकडं बघताना आपल्या हे ध्यानीमनीही नसतं, की आपण आत्ता या क्षणी किमान हजारेक वर्षांचा इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहोत, आणि या इतिहासाच्या आधीही न्यायदान होतंच होतं. त्याला व्यवस्थेचं रूपांतर आलं, ते गेल्या सहस्रकाच्या आरंभाला वगैरे. पहिला निवाडा कोणी केला असेल? कसा केला असेल?
प्राचीन काळी अग्निकाष्ठ भक्षणाच्या शिक्षा होत. आरोपीला अग्निपरीक्षा द्यावी लागायची. निर्दोषत्वाचा थेट संबंध पावित्र्याशी जोडला जायचा. पश्‍चिमेकडंही असल्याच न्यायपरीक्षा होत असत. प्राचीन इजिप्तमध्ये, सुमेरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात, आरोपीला उकळत्या तेलात हात घालून आतला दगड काढावा लागायचा. तीन दिवसांत त्या भाजलेल्या जखमा भरून येऊ लागल्या, तर देव आरोपीच्या बाजूनं आहे, असं समजून त्याला सोडलं जात असे. तेव्हाचा (ख्रिस्तपूर्व हजार-दीड हजार वर्षापूर्वी) हम्मुराबी नामक सम्राटानं त्या काळी न्यायदानाचे काही नियम घालून दिल्याचे शिलालेख आढळले आहेत.

अर्थात संस्कृतीचा प्रवाह असला अघोरी प्रथा-प्रचलनांचा राडारोडा वाहून नेत असतो. माणूस हळूहळू "सुसंस्कृत' होत गेला. मध्ययुगापर्यंत काही प्रमाणात हा क्रूर प्रथांचा कचरा वाहत आला, पुढं मात्र त्याला वेगळं वळण लागलं. शतकाशतकांचे टप्पे ओलांडत न्यायसंस्थाही निःस्पृह होत गेल्या. प्रारंभी टोळीप्रमुख, नंतर धर्मसत्ता किंवा राजसत्ता यांच्याकडं न्यायदानाचं कार्य आलटूनपालटून येत राहिलं; पण माणूस बुद्धीनं प्रगल्भ होत गेला, तसतशी ही जबाबदारी लोकनियुक्‍त न्यायासनाकडं आली. काही ठिकाणी तर लोकनियुक्‍त लोकप्रतिनिधींनीच हा लोकशाहीनं बहाल केलेला अधिकार बजावला. अजुनी काही राष्ट्रांमध्ये लोकांचे प्रतिनिधी निवाडा करतात. त्यांना "ज्युरीव्यवस्था' म्हटलं जातं.

न्यायदान हे फक्‍त मेहेरबान कोर्टाचं काम नाही, तर समाजातल्या विघातक प्रवृत्तींना ठिकाणावर आणण्याचं काम समाजातल्या सर्वसामान्य प्रतिनिधींच्या हातूनच घडावं, असा उदात्त विचार ज्युरीव्यवस्थेच्या उभारणीमागं आहे. समाजातील निवडक सदाचारी गृहस्थ आणि गृहिणी संपूर्ण केस ऐकून दोषी की निर्दोषी याचा निवाडा देतात, अशी ही व्यवस्था आहे. अर्थात त्यात काही त्रुटीही आहेत, हे ओघानं आलंच. भारतातही ब्रिटिश राजवटीत ज्युरीव्यवस्था होती. 1959 मध्ये नौदलाचा कॅप्टन कावस माणेकशा नानावटी यानं आपल्या पत्नीच्या प्रियकराचा गोळ्या घालून खून केला होता. सत्र न्यायालयात खटला उभा राहिला, तेव्हा ज्युरींनी कॅप्टन नानावटीला निर्दोष ठरवलं. त्यानंतर ही प्रथा आपल्याकडं बंद झाली. अमेरिकेत मात्र अजूनही ज्युरीव्यवस्था आहे.

नमनाला घडाभर तेल घालण्याचं कारण म्हणजे एक अफलातून चित्रपट आठवतो आहे. "ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हे त्याचं नाव. 1957 मध्ये आलेल्या या चित्रपटात खरं तर चित्रपटच नाहीये! शहाण्णव मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात फक्‍त तीन मिनिटांचं बाह्य चित्रीकरण आहे. बाकी सर्व चित्रपट घडतो, तो एका खून खटल्यावर वितंडवाद घालणाऱ्या ज्युरींच्या दालनात. सतरा बाय चोवीस फुटाच्या एका दालनात साकारलेला हा चित्रपट लक्षात राहतो तो त्यातल्या चित्तवेधक कथाकथनासाठी.
...या चित्रपटात कथा आहे; पण कथानायक वगैरे नाही. खुनाची वर्णनं आहेत; पण व्हिलन वगैरे नाही. व्यक्‍तिरेखा आहेत; पण त्यांना नावंगावं वगैरे नाहीत. सगळा थरार उमटतो तो शब्दांत, मुद्राभिनयात आणि चर्चेत. यात सिनेमॅटिक असं काय आहे, असं कुणी विचारलं तर उत्तर देता येणं कठीण. असं असलं, तरी हा चित्रपट गेल्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट अभिजात चित्रपटांपैकी एक गणला जातो. या चित्रपटाची पटकथा हा आजही जगभरातल्या चित्रपटशाळांमध्ये अभ्यासाचा विषय मानला जातो. चित्रपटशाळा सोडा, व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्येही "ट्‌वेल्व्ह अँग्री मेन'मधले दाखले आवर्जून दिले जातात. "क्रायसिस मॅनेजमेंट', "टीम हार्मनी', "डिसिजन मेकिंग', "कलेक्‍टिव विस्डम' असल्या बलदंड शब्दांबरोबरीनं या चित्रपटातली उदाहरणं दिली जातात तिथं.
"ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हा एक स्तिमित आणि स्तंभित करणारा सर्वस्पर्शी अनुभव आहे हे मात्र निश्‍चित.
* * *

गोष्ट म्हटली तर नगण्य आहे. एका रेल्वेलगतच्या झोपडपट्‌टीत झालेला खून. तोही एका स्थलांतरितानं केलेला. त्याचं एवढं काय? पण न्यायासनासमोर सारे समान असतात ना? मग त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे.
""सभ्य ज्युरीसदस्यहो, खटल्याच्या दोन्ही बाजू तुम्ही नीट ऐकल्या आहेत. साक्षीपुरावे बघितले आणि ऐकले आहेत. वादी आणि प्रतिवादींचा युक्‍तिवादही ऐकला आहे. आता निवाडा करण्याची वेळ आली आहे. सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून आपण निवाडा द्याल, अशी अपेक्षा आणि आशा आहे. कारण शंभर अपराधी सुटले तरी चालतील; पण एक निरपराध फासावर चढणार नाही, याची दक्षता आपण घ्यायची आहे. तेव्हा आपण सर्वांनी आता ज्युरींच्या दालनात जावं. एकमेकांमध्ये चर्चा करून निकाल न्यायालयासमोर सांगावा. आपला निकाल न्यायव्यवस्थेला मान्य असेल, कारण तो बंधनकारक आहे...''

... न्यायमूर्तींच्या धीरगंभीर वक्‍तव्यानंतर ज्युरींचे सदस्य कोर्टातून उठले आणि लगतच्या ज्युरींच्या दालनात गेले. दाराला बाहेरून कडी घालण्यात आली. निकाल प्रक्रिया पूर्ण होईतोवर ज्युरींना आता बाहेर जाण्याची मुभा नाही.
बारा ज्युरींचा तो घोळका बंद दाराआड गेला, आणि जणू मानवी मनातलं काळंगोरं त्या एका दालनात धुक्‍यासारखं साकळलं. त्या धुक्‍यातून कौल बाहेर पडणार होता...त्याला सत्य मानणं बंधनकारक होतं.
* * *

खरं तर निकाल सोप्पा होता. न्यूयॉर्कमधल्या रेल्वेलायनीलगतच्या एका वस्तीत एक खून झाला. एका (बहुधा) स्पॅनिश मुलानं आपल्या वृद्ध बापाला भोसकून ठार मारलं होतं. त्याला काही साक्षीदारही होते. पुरावे पोराच्या विरोधात जाणारे होते. सगळं सूर्यप्रकाशासारखं ढळढळीत होतं.
पटापट चर्चेचा सोपस्कार पार पाडून मतदान घ्यायचं, आणि एकमतानं पोराला दोषी घोषित करून आपापल्या घरी जायचं, असं सगळ्याच ज्युरींच्या मनात येत होतं. संपूर्ण खटला ऐकून ऐकून आधीच बऱ्यापैकी बोअर झालेले हे लोक... झटक्‍यात निकाल लावून टाकावा असं त्यांना वाटणं स्वाभाविकच होतं. ज्युरी क्रमांक 8 चं मत काहीसं वेगळं होतं. कुणाला तरी फासावर चढवणार आहोत आपण, जरा नीट तपासून मगच काय तो निर्णय घेऊ या, असं त्याचं म्हणणं. काय चूक होतं त्यात?
* * *

ज्युरी क्रमांक 3 : ""आपण ही सगळी चर्चा मुळात का करतोय, हे समजत नाही. त्या पोराचं बापाशी भांडण झालेलं ऐकणारी दोन माणसं आहेत. त्या एका म्हाताऱ्यानं तर मृतदेह धाडकन खाली पडल्याचा आवाजही ऐकला. त्या बाईनं रेल्वेलायनीपलीकडून किंचाळीही मारली. गुन्ह्याचं हत्त्यार सापडलं आहे. आता काय बाकी आहे?''
ज्युरी क्र. 11 : ""मुळात खून केल्यानंतर माणूस पंधरा सेकंदात दारापाशी जाऊ शकतो का, हा प्रश्‍न आहे.''
ज्युरी क्र. 5 : ""तोही सुटलाय ना! आपण प्रयोग करून पाहिला की इथं!''
ज्युरी क्र. 8 : ""मी सांगतो काय झालं ते! म्हाताऱ्यानं पोराचं आणि त्याच्या बापाचं भांडण ऐकलं. काही तास उलटले. मग अंथरुणावर पडल्यापडल्या त्यानं धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला. एका बाईची किंचाळीही ऐकली. काही सेकंदांत त्याला दरवाजा उघडल्याचा आणि जिन्यावरून कुणीतरी पळत गेल्याचा भास झाला. त्यानं अर्थ लावला, की पोरानं बापाचा खात्मा करून पळ काढला. बरोबर ना? पण यात त्यानं खून केलाय, हे फक्‍त गृहीतक आहे...
ज्युरी क्र. 3 : ""गृहीतक? काय बोलताय तुम्ही? ही झोपडपट्‌टीतली पोरं काय भयानक असतात, तुम्हाला काय कल्पना? मी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलंय... तुमच्या भंपक कोवळ्या कल्पनांना तिथं स्थान नसतं मिस्टर! तो पोरगा लेकाचा फासावर गेलाच पाहिजे. नालायक जात! तुमच्या या शाब्दिक खेळात तो आपल्या हातातून निसटेल याचं तरी भान ठेवा!''
ज्युरी क्र. 8 : ""शाब्दिक खेळ? व्वा! तुम्हाला काय घाई झालीये, त्याचा जीव घेण्याची? तुम्ही जल्लाद आहात का?''
ज्युरी क्र. 3 : ""या पोरासाठी जल्लाद व्हायचीही तयारी आहे माझी! "गंदी नाली के कीडे' आहेत हे!!''
ज्युरी क्र. 8 : ""मला वाईट तुमचं वाटतंय... हा पोरगा तुम्हाला मरायला हवाय, हे तुम्ही ज्युरींच्या दालनात आलात तेव्हाच ठरवलं होतंत. ही तुमची प्रेरणा आहे साहेब! कुणाचा तरी जीव घेण्याची प्रेरणा निश्‍चितच भयंकर गोष्टीतून आली असणार. ही ऊर्मी तुमच्या व्यक्‍तित्वातच असावी. सॅडिस्ट...सॅडिस्ट आहात तुम्ही...''
ज्युरी क्र. 3 : (अंगावर धावून जात) ""होय, ** जीव घेईन मी तुझा ***!''
ज्युरी क्र. 8 : ""हे तुम्ही मनापासून नाही म्हणत आहात...बरोबर? त्या पोराचंही एवढंच चुकलं असलं तर?''
* * *

पारडं फिरू लागलंय, हे दिसू लागलं. पूर्वग्रह, संभ्रम, गोंधळ, गुळमुळ आणि मग ठाम मत... अशा चक्रातून जात ज्युरी वाद घालत होते. अखेर ज्युरी क्रमांक 8 नंच युक्‍तिवाद करताकरता अखेर नांगी टाकली. पोरगं दोषी असावं, असं त्यालाच वाटू लागलं. ""आपण मतदान घेऊ; पण मी मत नाही टाकत... कारण माझं मतच निश्‍चित नाही,'' असा शहाणा प्रस्ताव त्यानं ठेवला. एव्हाना आणखी काही जणांना पोरगं निर्दोष असावं असं वाटू लागलं होतं. झालं, ज्युरीत मतभेद वाढले. आवाज चढले. चर्चेचं रूप वैयक्‍तिक हेवेदावे, अहंकारांत बदलू लागलं.
गुन्हेगारही माणूसच असतो आणि त्याला न्याय देणारीही शेवटी माणसंच असतात. त्यांचे काही रागलोभ असतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या मानसिकतेत आणि न्यायबुद्धीवरही पडत असतं.
ज्युरीमंडळात बारा घरचे बारा जण होते. प्रत्येकाची पार्श्‍वभूमी वेगळी. भूतकाळ वेगळा. जगण्याची प्रतही वेगळी. साहजिकच विचार करण्याची पद्धतही वेगळी होती. अशा बारा जणांना एकाच मतावर येणं कठीण होतंच. तसंच घडत होतं त्या ज्युरींच्या दालनात. जणू काही मानवी मनोव्यापाराचा काळाकरडा ढग त्या दालनात तरंगत होता. मधूनच खोलीच्या तावदानावर आदळणारी पावसाची झड नाट्यमयता आणखीनच गडद करत होती.
काय झालं त्या पोराचं? गुन्हा शाबित? की सुटला मोकळा?
न्यायदान ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. कायद्याच्या बुकातल्या कुठल्यातरी पानात नोंदलेल्या कलमावर बोट ठेवलं, की ती संपत नसते. तिथं दुसरं काहीतरी असावं लागतं. त्याचं नाव विवेकबुद्धी. शहाणपण... या शहाणपणाला भलाईची जोड असेल, तरच तो न्याय "न्याय' ठरतो.
पुढं काय घडलं, ते पडद्यावर बघून झाल्यावर बुचकळ्यात पडायला होतं. प्रश्‍न पडतो ः असा असतो न्याय?
* * *

प्रख्यात पटकथाकार आणि लेखक रेजिनाल्ड रोज यांनी 1954 मध्ये "स्टुडिओ वन'साठी एका टीव्हीनाट्याची संहिता लिहून काढली. तीच ही "ट्‌वेल्व्ह अँग्री मेन'. वास्तविक त्यांनी हे नाटक, "नाटक' या रूपबंधातच लिहिलं होतं. ज्युरी दालनाचं एकमेव नेपथ्य. व्यक्‍तिरेखांनाही नावंबिवं नाहीत, नाटक म्हणून तुलनेनं सोपा प्रयोग होता; पण प्रत्यक्षात ते दूरचित्रवाणी नाट्य म्हणून आधी प्रचंड गाजलं. मग त्याचे नाटकासारखे प्रयोगही चिक्‍कार झाले. 1957 मध्ये त्याचा चित्रपट आल्यानंतर तर "ट्‌वेल्व अँग्री मेन' ही क्रांतिकारक कलाकृती असल्याचा साक्षात्कार बुद्धिजीवींना झाला. या नाटकाचे वेगवेगळ्या रूपबंधात, भाषांत, देशांत इतके प्रयोग आणि खेळ झाले, की अशी सर्वव्यापी कलाकृती क्‍वचितच सापडावी. भारतातही जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषेत हे नाटक आपापल्या देशी आणि भाषिक रंगांनिशी अवतरलं आहे. हिंदीत 1983 मध्ये आलेला "एक रुका हुआ फैसला' हा चित्रपटही चांगलाच चर्चिला गेला होता. मराठीतही हे नाटक झालेलं आहे. एका बंदिस्त खोलीत घडणारं, कुण्या अज्ञाताचा मृत्यू मुक्रर करण्यात निर्माण झालेलं हे नाटक माणसाच्या समूहजीवनाचं एक आरस्पानी दर्शन आहे. समूह म्हणून आपलं मत कसं तयार होतं किंवा बिघडतं, याचा मानसशास्त्रीय धडा आहे. हे नाटक अभ्यासकांनी अभ्यासावंच; पण तुम्हा-आम्हा रसिकांनीही पचवण्याचा यत्न करावा. त्यातून शिकण्याजोग्या अनेक जागा सापडतात. गंमत म्हणजे हा चित्रपट जितक्‍या वेळा बघाल, तितक्‍या वेळा काही ना काही नवं सापडत जातं. आधी न कळलेला संदर्भ आपल्याला आणखीनच समृद्ध करून जातो. "ट्‌वेल्व्ह अँग्री मेन'ची चेष्टाही झाली. त्याचं फिरकीनाट्यंही आली, लोक त्यालाही भरपूर हसले. स्त्रीमुक्‍तीच्या एका गटानं तर "ट्‌वेल्व अँग्री वूमन' हे नाटक बसवून त्यात सगळी स्त्री पात्रं घेऊन वचपा काढला. बंगालीत झालेल्या नाटकात तर महिला ज्युरींच्या व्यक्‍तिरेखा नव्यानं निर्माण करण्यात आल्या. शिवाय एका वॉटर कूलरची भूमिकाही एका स्त्रीनं त्यात केली आहे... असे अनेक नवनवे प्रयोग या चित्रपटाबद्‌दल झाले आहेत.

विख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेते हेन्‍री फोंडा यांनी मोठ्या आत्मीयतेनं हा छोटेखानी बजेटचा चित्रपट केला. दिग्दर्शक सिडनी ल्युमेट यांनी चित्रपटातल्या सर्व अभिनेत्यांना (त्यात हेन्‍री फोंडा द ग्रेटही आले!) दोन आठवडे तालमी करायला लावल्या. 365 स्वतंत्र टेक्‍समध्ये चित्रपट चित्रित करून टाकला. आज या चित्रपटातले सगळे ज्युरीज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. खुद्द लेखक रेजिनाल्ड रोज 2002 मध्ये निवर्तले.

"तमाम सबुतो-बयानात को मद्देनजर रखते हुए' ज्युरी मेंबरान कुठला इन्साफ करतात, हे चित्रपटाच्या अखेरीला तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही आपोआप विचार करू लागता ः ""या आरोपीला दोषी ठरवायचं की निर्दोष? क्‍या किया जाय?'' असं घडलं तर खुशाल समजा, चित्रपटानं त्याचा कौल बरोब्बर देऊन टाकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com