रक्‍तामध्ये ओढ मातीची... (प्रवीण टोकेकर)

रक्‍तामध्ये ओढ मातीची... (प्रवीण टोकेकर)

वाऱ्यावर उडत गेलेलं रुईचं एखादं बीज दूरदेशी पडतं आणि तिथं रुजतंदेखील. अंकुरतं. फुलतं. फळतंही. अशाच एका तिथं रुजलेल्या-फुललेल्या बीजाची आणि नंतर हे बीज आपली मायदेशातली मुळं कशी शोधून काढतं त्याची थरारक कथा म्हणजे ‘लायन’ हा चित्रपट. सरू नावाच्या तरुणाच्या ‘अ लाँग वे होम’ या आत्मकहाणीवर बेतलेला हा चित्रपट एकदा जरूर पाहावा असा.

नियती माणसाच्या आयुष्यात कसले कसले खेळ करत असते. त्यातले बहुतेक जीवघेणे...काही भलतेच लाघवी. या खेळापासून कुणी सुटलं नाही. रिंगणाबाहेर चपला सांभाळत बसण्याची कुणाला परवानगी नसते. खेळलंच पाहिजे कम्पल्सरी. जो रिंगणाबाहेर गेला, तो गेलाच. एकदम बाद. जातिवंत खेळगड्याला मात्र ही नियती कुठं कुठं नेतं. यशाची टोकं, अपयशाच्या दऱ्या. नात्यागोत्यांची टोकं कुठल्या कुठं जुळतात. कधी तुटतात. रुईच्या बीजासारखं नियती कुठल्या कुठं वाहत नेते. एखाद्या क्षणी फट्‌टकन बोंड फुटतं आणि म्हाताऱ्या वाऱ्यावर उधळतात. नियती मनात म्हणते ः ‘म्हातारे, जा आता तरंगत...’

दूरदेशी, अनोळखी भूमीत जमलं तर रुजणं ही त्या बीजाची नियती. अर्थात उटीच्या ट्रिपला जाऊन फुलझाडांच्या बिया हौसेनं आणाव्यात आणि कुंडीत पेरल्यावर ढिम्म काही उगवू नये, हा अनुभव घेणारेसुद्धा कमी नाहीत; पण वाऱ्यावर उडत गेलेलं रुईचं एखादं बीज मात्र खरंच दूरदेशी पडतं आणि रुजतंदेखील. अंकुरतं. फुलतं. फळतं. खांडव्यानजीकच्या गावंढ्यात कसाबसा तग धरून राहिलेल्या सरू मुन्शी खान नावाच्या पोरट्याचं नशीब असंच सटवाईचा भन्नाट खेळ दाखवून गेलं. आपल्या गावाचं नावही त्याला धड सांगता येत नव्हतं. शाळा तर स्वप्नातसुद्धा दिसली नव्हती. रेल्वेच्या वाघिणींमधले किरकोळ दगडी कोळसे चोरणं, फुलपाखरांत रमणं, आईचा पदर धरून बंधाऱ्याच्या बांधकामावर दगडं उचलू लागणं, यापलीकडं त्याला जगच नव्हतं. त्यानं आपला बापसुद्धा कधी पाहिला नव्हता. आईचं नाव अम्मी असं सांगणारं हे अजाण पोर; पण नियतीच्या फटकाऱ्यानिशी थेट दुसऱ्या खंडात जाऊन पडलं...
पंचवीस वर्षांनी त्याच्या रक्‍तामधली मातीची ओढ सुफळ संपूर्ण झाली. त्यानं आपलं मूळ शोधून काढलं. विस्कटलेल्या बालपणाचे काही तुटक स्मरणधागे सोडले तर सरू मुन्शी खानकडं काहीही नव्हतं, तरीही तो परत मूळ गावी येऊन पोचला. त्याची ही थरारक कथा. सरूनं २०१२ मध्येच आपलं जगावेगळं आत्मचरित्र लिहून काढलं होतं. ‘ए लाँग वे होम’ नावाचं. त्या आत्मकहाणीवर बेतलेला ‘लायन’ हा चित्रपट गेल्या वर्षी आला. दोन्ही कलाकृतींनी रसिकांची जबरदस्त वाहवा मिळवली. नुकताच नेमेचि येणारा बालदिनही साजरा झाला. त्यानिमित्तानं सरूचं बालपण आठवलं इतकंच. एकदा तरी बघावाच असा हा चित्रपट आहे.
* * *

मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यातलं गणेशतलाई नावाचं गाव नकाशातही धड दिसत नाही. जेमतेम हजार-बाराशेची वस्ती असेल. तिथं कमला मुन्शी दारिद्य्राशी दोन हात करत कशीबशी जगत होती. दारिद्य्र आणि अडाणीपण हे सख्खे सवंगडी असतात. पदरी चार मुलं. मोठा गुड्‌डू, मधला सरू, धाकला कल्लू आणि शेंडेफळ शकीला. कमलाचा शोहर तिला तशीच सोडून परागंदा झाला होता. पोरांना शाळा शिकवणं तिला अशक्‍यच होतं. गाढवाच्या शेपटाला बांधलेल्या रिकाम्या डबड्यासारखी पोरं गावभर उंडारायची. आंघोळीचा पत्ता नाही. शेंबडाचे फुरके मारत हिंडायचं. कधी फुलपाखरामागं किंवा बहुतेकदा अन्नाच्या शोधात. गुड्‌डू कधी कधी रेल्वेच्या वाघिणींवर छोटा डल्ला मारून दगडी कोळसे ढापायचा. गावातल्या चहाच्या टपरीवाल्याला कोळसे देऊन कडछीभर दूध आणायचा. छोटा सरू त्याचा फाटका सदरा धरून मागं मागं फिरे. धाकटा कल्लू तेव्हा जेमतेम अम्मीच्या बोटाशी असायचा. शकीला तर तान्हीच. गुड्‌डूचं आपल्या धाकट्या भावावर प्रचंड प्रेम होतं. तो त्याला जपे. कमलानं सरूला तर गुड्‌डूकडंच सोपवलं होतं. नजीकच्या बंधाऱ्याच्या बांधकामावर ती मजुरीला जायची. पाच वर्षांचा सरूही कधी कधी तिथं दगडं गोळा करून अम्मीचा भार कमी करायचा तोकडा प्रयत्न करी. एक दिवस कोळसे विकताना शेजारच्या हलवायच्या दुकानात सरूनं जिलेब्या पाहिल्या.
‘‘गुड्‌डू, मेरे को भी होना जलेबी!’’ सरू म्हणाला.
‘‘बाद में ला दूँगा’’ गुड्‌डूनं समजूत काढली.
‘‘मेरे को दस जलेबी होना’’ सरू. ‘‘एक दिन मैं तुझे सौ जलेबी खिलाऊंगा’’ गुड्‌डू म्हणाला.
‘‘हजार जलेबियां? पाच हजार?’’ आठवतील तसे वाट्‌टेल ते आकडे सरू उच्चारत राहिला. जलेबी राहिली ती राहिलीच. ती कधी मिळालीच नाही.
...जवळचं रेल्वे स्टेशन बुऱ्हाणपूर होतं. तिथं रात्री जाऊन चार पैसे मिळतात का, हे गुड्‌डूला पाहायचं होतं. ‘मला सायकलपण उचलता येते,’ असे शक्‍तीचे पुरावे देत सरू त्याच्या मागं हट्‌ट करू लागला.ः ‘‘मैं भी आऊंगा!’’  शेवटी गुड्‌डूनं ‘हो-ना’ करता करता त्याला नेलं. रेल्वे स्टेशनातल्या भाऊगर्दीत हिंडता हिंडता सरू इतका दमला, की त्याला एकदम झोपच कोसळली. एका बाकावर त्यानं चक्‍क ताणून दिली.  ‘‘बघ, म्हणून मी तुला म्हणत होतो, येऊ नकोस म्हणून...’’ गुड्‌डू वैतागला. शेवटी ‘इथंच झोप...मी काहीतरी खायला घेऊन येतो’ असं सांगून गुड्‌डू गेला.
...जाग आली तेव्हा सरूच्या जगात सगळे अनोळखी चेहरे होते आणि गुड्‌डू कुठंही नव्हता. फलाटाला लागलेल्या गाडीत तो कंटाळून चढला. पुन्हा झोप कोसळली. तो गाढ झोपेत असताना गाडीनं स्टेशन सोडलं. सरूच्या इवल्याशा आयुष्यानं रूळ बदलले...
* * *

गाडी भरधाव चालली होती. वेगानं मागं पडणारे दिवं...रिकामे फलाट...लांबवर चमकणारे वस्त्यांचे दिवे...दार उघडल्यावर भस्सकन येणारं वारं...ही गाडी कुठं चालली आहे? माहीत नाही. कधी थांबणार? माहीत नाही...
...गाडीनं शेवटी आपलं गाव गाठलं. एका प्रचंड मोठ्या महानगरानं अजस्त्र ‘आ’ वासून सरूला गिळून टाकलं. या गावाचं नाव सरूला ठाऊक नव्हतं; पण जगासाठी ते ‘हावडा स्टेशन’ होतं. कोलकाता. दोनेक आठवडे उकिरडे उपसत, मंदिरात पोटपूजा करत, फाटक्‍या-तुटक्‍या अवस्थेतला सरू कोलकत्यात हिंडला. भुयारी मार्गात झोपला. रेल्वेरूळाशी काही हुडकत असताना त्याला नूर भेटली. नूर ही गोड बोलणारी तरुण बाई होती. तिनं प्रेमानं त्याची विचारपूस केली. त्याला आपल्या घरी घेऊन गेली. न्हाऊ-माखू घातलं. भरपेट खायला दिलं. वर ‘गोल्ड स्पॉट’ची एक बाटलीही फ्रिजमधून काढून दिली. ‘‘उद्या सकाळी रामा येईल. तो चांगला माणूस आहे. तो तुला आई शोधून देईल हं!’’ असं सांगून तिनं त्याला घरीच झोपवलं. सकाळी रामा समोर आला. त्यानं सरूचे हात-पाय तपासले. कुठलंही व्यंग्य नाही ना, हे बघितलं. सरूला डोळा मारून ‘करेक्‍ट पोरगं आहे’ असं सांगितलं. बालमन निरागस असतं; पण देवाची करणी अशी की त्या निरागसतेत एक अगम्य सावधपणही त्यानं दिलेलं असतं. या दोघांचा हेतू काही बरा नाही, हे त्या पाच वर्षांच्या पोराला जाणवलं बहुधा. त्यानं तिथून तत्काळ धूम ठोकली.

...हॉटेलासमोर आशाळभूतपणे उभ्या असलेल्या सरूला एका तरुणानं पाहिलं. उकिरड्यात गावलेला खरा खरा चमचा ओंजळीतल्या खोट्या खोट्या सुपात बुडवून सरू भूक भागवत होता. त्या तरुणाला गंमत वाटली. त्यानं चौकशी केली आणि सरळ त्याला पोलिस ठाण्यात नेलं. तिथून थेट सरकारी अनाथालयात. सरूच्या आईचं नाव अम्मी होतं. बापाचं नाव? मालूम नही. गावाचं नाव? गणस्तले. गाव कुठं आहे? माहीत नाही. बंगाली येतं? नाही. हिंदी? हां. भूक लगी है? हां हां.
सरू आता अनाथ म्हणून सरकारदरबारी नोंदणीकृत झाला. अनाथालयात त्याला मिसेस सूद भेटल्या.  ‘सरू सापडल्याची पेपरात फोटोसकट जाहिरात दिली; पण कुणाचाच रिस्पॉन्स नाही’ म्हणून त्या खट्‌टू झाल्या होत्या. त्यांनी सरूला सांगितलं ः ‘‘हे बघ, जॉन आणि स्यू ब्रिअर्ली म्हणून एक ऑस्ट्रेलियन फॅमिली आहे. ते तुला दत्तक घेताहेत. तुला ऑस्ट्रेलिया माहीत आहे का?’’ सरूनं अर्थातच नकारार्थी मान हलवली.
‘‘चांगली माणसं आहेत. तुला सांभाळतील. ठीक आहे?’’ मिसेस सूद म्हणाल्या. ठरल्याप्रमाणे ब्रिअर्ली दाम्पत्य आलं. गोड दिसणाऱ्या सरूला जवळ घेतलं. काही दिवसांतच नवा टीशर्ट आणि चड्‌डी घालून सरू थेट ऑस्ट्रेलियाला गेला. नियतीनं पुन्हा एकदा त्याच्या जीवनगाडीचे रूळ बदलले.
नवा पत्ता : होबार्ट. टास्मानिया. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडचं भलंमोठं बेट.
* * *

विस्तीर्ण ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीपासून टास्मानिया हे राज्य बासच्या सामुद्रधुनीनं तुटलेलं आहे. डरवंट नदी इथं समुद्रात घुसते. नदीच्या दोबाजूंना टास्मानिया वसलेलं आहे. जॉन आणि स्यूचं तिथं सुंदर घर होतं. हवेशीर. एवढ्या मोठ्या खोलीत अम्मी, मी, गुड्‌डू, बब्बू, शकीलासकट आणखी पन्नास मुलं राहू शकली असती. समोर प्रचंड पाणी होतं. पुढं वाळूचा किनारा. सरूनं ब्रिअर्ली दाम्पत्याला लळा लावला. छान, स्वतंत्र खोली. खायला-प्यायला रेलचेल. वाळूत क्रिकेट खेळायचं. शाळेत जायचं. सरू भराभर इंग्लिश बोलायला शिकला. त्याचा हेलसुद्धा शुद्ध टास्मानियाचा झाला. नवे मित्र-मैत्रिणी मिळाल्या. आयुष्य बदललं. भूतकाळ पार मागं पडला. हिंदी भाषाही जवळपास लुप्त झाली. सरू ब्रिअर्ली आता अगदी शंभर टक्के टास्मानियाचा झाला. सरूला एकटं वाटू नये म्हणून ब्रिअर्ली जोडप्यानं मनतोष नावाचा आणखी एक भारतीय मुलगा दत्तक घेतला. अबोल होता, चिडकाही. राग आला की तो बेभान व्हायचा. सरू त्याच्याशी अंतर राखूनच वागला. असे बरेच उन्हाळे, हिवाळे गेले. सरू तरुण झाला. हॉटेल-मॅनेजमेंट शिकण्यासाठी त्यानं मेलबर्न गाठलं. तिथं त्याला ल्युसी भेटली. एकदा एका भारतीय मित्राकडं घरगुती पार्टी होती. पाच-पंधरा तरुणांनी एकत्र येऊन बिअर वगैरे पीत धुडगूस घालायचा प्लॅन होता. सोबत भारतीय जेवण होतंच. तिथं सरूनं जिलेबी बघितली. तो चमकला. त्यानं वास घेऊन पाहिला. दात रुतवून चवही घेतली.  मनाच्या खोल तळात गाडलं गेलेलं काहीतरी हलकेच वर येत होतं. तळ ढवळून निघाला. काही अस्पष्ट स्मरणं, गंध आलटून-पालटून आले, मावळले. जिलेबी आपण कधी खाल्लीच नाही. मग आत्ता असं का वाटलं? कोलकत्याच्या काही फुटकळ, तुटक आठवणी त्याला होत्या. आपण दत्तक आलोय, हेही माहीत होतं; पण मग हे गुड्‌डूचं नाव का आठवतंय? अम्मीचं? ही आपली मुळं आठवताहेत का? तसं असेल तर आपण समूळ उखडले जाऊन इथं नीट रुजलोच नाही की काय? सरू पार हादरला. पाठीशी येऊन उभ्या राहिलेल्या ल्युसीला तो एकदम म्हणाला ः ‘‘ल्यूस, मी दत्तक आलेलो नाही...मी हरवलोय. आय ॲम लॉस्ट.’’
* * *

स्मरणातल्या त्या तुरळक स्मरणचौकटी सरूला मुळासकट हलवून गेल्या. एक रेल्वे स्टेशन...त्याच्या जवळची ती पाण्याची प्रचंड टाकी... गुड्‌डूचा धूसर चेहरा. अम्मीच्या हाताचा खरखरीत स्पर्श...तिचं ते ‘अच्चा बच्चा, अच्चा बच्चा’ असं म्हणणं...जलेबीचा वास...ते डोंगर...फुलपाखरं...रेल्वे इंजिनाची भयानक शिट्‌टी...एखादं भक्‍कम झाड वाऱ्यानं मुळासकट हलावं, त्याची मुळं ढिली होऊन जावीत, तसं त्याला झालं. पाच वर्षांच्या इवलाल्या आठवणी. गेल्या वीस वर्षांत त्यातलं कितीतरी कायमचं पुसून गेलं असावं.

‘‘जॉन आणि स्यू किती चांगले आहेत. तुझ्यावर अलोट प्रेम करणारे ते आई-बाप आहेत. सख्ख्यापेक्षा जास्त करतात तुझं. कशाला तुला तुझं गाव शोधायचंय?’’ ल्युसीनं त्याची समजूत काढली. ‘‘तुला काही कळतंय का, ल्यूस? मी बेपत्ता झाल्यावर अम्मी आणि गुड्‌डूचं काय झालं असेल? माझ्या मनातून ते कधीच गेले नाहीत, असा याचा अर्थ आहे. त्यांना शोधल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही...’’ सरू म्हणाला.

...आपल्या जाणिवेतले भौगोलिक संदर्भ वापरून सरूनं ‘गुगल अर्थ’वर आपल्या मूळ गावाचा शोध घ्यावा, असं काही मित्रांनी सुचवलं. सरूला त्या उद्योगानं झपाटलं. कोलकत्याला पोचायला रेल्वेनं दोन दिवस लागतात, असं ठिकाण कुठलं असेल? जिथं हिंदीच बोललं जातं, असा प्रांत कुठला? पाण्याची टाकी असलेलं रेल्वे स्टेशन कुठं दिसेल? यी प्रत्येक प्रश्‍नाला शेकडो उत्तरं होती. सरूनं हाती आलेली नोकरी सोडली. ल्यूसीलाही हिडीसफिडीस केलं. आपले दत्तक आई-बाप असलेले जॉन आणि स्यू ब्रिअर्ली यांनाही दु:ख दिलं. मेलबर्नला तो एकटा भुतासारखा राहू लागला. सदोदित आपलं गुगल अर्थचे नकाशे तपासत बसायचे. एक दिवस ‘गुगल अर्थ’च्या उपग्रहांनी टिपलेली लाखो छायाचित्रं शोधताना त्याला परिचित वाटणारे डोंगर दिसले. एक बंधारा दिसला. मग रेल्वेचं स्टेशन आणि ती पाण्याची टाकी. ठिपक्‍यासारखी दिसणारी वस्ती त्याला आपली वाटायला लागली. त्यानं ठिपका मोठा केला. वस्ती दिसू लागली. गल्ली-बोळ अस्पष्ट दिसू लागले. त्या गल्ली-बोळातून त्याचं मन लहानग्या सरूसारखं बेफाम धावायला लागलं. गावाचं नाव दिसलं. ‘गणेशतलाई.’ ...धावत जाऊन सरूनं ल्यूसीचं दार ठोठावलं. म्हणाला ः ‘‘ल्यूस, मला माझं घर सापडलं!’’
* * *

सरूनं खांडव्यात राहणाऱ्या फेसबुक्‍यांचे काही ग्रुप्स शोधले. त्याला तिथून आणखी काही माहिती मिळाली. तो तडक निघून भारतात आला. मुंबईत उतरला. तिथून खांडव्यात. गणेशतलाईत आल्यावर त्याला पत्ता विचारावा लागलाच नाही. तो तडक आपल्या घराच्या दारात येऊन उभा राहिला...तब्बल पंचवीस वर्षांनी. घराच्या भिंती पडल्या होत्या. आत कुणीतरी बकऱ्या बांधल्या होत्या. सरूच्या काळजाचं पाणी झालं. एका सुशिक्षित दिसणाऱ्या माणसाला त्यानं भरल्या डोळ्यांनी आणि जड हातांनी आपलाच बालपणीचा फोटो दाखवला (जो कोलकात्यात पेपरातल्या जाहिरातीसाठी काढला होता). गुड्‌डू, अम्मीची चौकशी केली. त्या माणसानं काहीही न बोलता त्याला खूण केली. वस्तीच्या दुसऱ्या टोकाशी हमरस्त्यावर एक वयस्कर बाई त्याच्याकडं गोंधळून पाहत येताना त्याला दिसली. हा चेहरा आपण कधीच विसरू शकलो नाही...
‘‘ अम्मीऽऽ...’’ असं म्हणत तो आवेगानं तिच्या कुशीत शिरला. कमला मुन्शीचं गुडघ्याएवढं पोर आता सहा फुटी झालं होतं आणि तिच्या डोक्‍यावरचे केस पांढरे झाले होते. डोळ्यांबरोबर हात-पायसुद्धा थकलेले होते. तिच्या अश्रूंचा बांध पार फुटला. पंचवीस वर्षांनी पोरगं परत आलं. खरंच का परत आलं? गुड्‌डू काय करतो? गुड्‌डू त्याच रात्री गेला. ‘खायला घेऊन येतो’ असं सांगून गेलेल्या गुड्‌डूचा मृतदेह बुऱ्हाणपूर स्टेशनालगत सापडला...कुणीतरी मोडकी-तोडकी माहिती दिली. सरू त्याच्या आईची भाषा विसरला होता आणि आईला त्याची भाषा समजत नव्हती.
...आज ना उद्या तू परत येशील, या खात्रीनं तुझ्या अम्मीनं गावसुद्धा कधी सोडलं नाही. खूप शोधलं आम्ही तुला...पण नाहीच सापडलास... शेजारच्या गावातल्या दर्ग्यात तुझी अम्मी दर जुम्म्याला जाऊन तुझ्यासाठी प्रार्थना करत असे. पच्चीस साल बाद खुदा ने उस की सुन ली...कुणीतरी पुन्हा म्हणालं. ‘‘मेरा शेरू...’’ थरथरत्या हातानं अम्मीनं त्याच्या खुरट्या गालावर मायेनं हात फिरवला, तेव्हा त्याच्या ध्यानात आलं ः आपण सरूसुद्धा नाहीच्चोत. आपण शेरू आहोत, शेरू. शेरू मुन्शी खान. ...मुळं घट्‌ट असलेलं झाड वादळं पचवतं. कटून पडलं तर पुन्हा पानोळा धारण करतं. मुळं मात्र घट्‌ट हवीत. जमिनीत रुतलेली.
* * *

सरू ब्रिअर्ली आता छत्तीसेक वर्षांचा आहे. कसला तरी बिझनेस करतो. टास्मानियातच राहतो. अम्मीला त्यानं बऱ्याचदा म्हटलं, ‘चल, तिथं माझ्याकडं राहा...’ पण ती म्हणाली, ‘माझं खत आता गणेशतलाईतच होऊ दे. तू राहा तिथंच. कशाला इथं येतोस?’  सरूनं आपल्या ऑस्ट्रेलियन आई-वडिलांना अंतर दिलं नाही. ‘माझी मूळ आई सापडली, याचा अर्थ तू माझी आई नाहीस, असा नाही होत. तुझं स्थान अढळ आहे आणि राहील,’ असं त्यानं तिला सांगितलं. स्यू आणि जॉनसुद्धा कमला मुन्शीला येऊन भेटले. सरूनं अम्मीला आता एक घर घेऊन दिलंय. पैसे पाठवणं सुरू केलंय. शिवाय, कल्लू आता एका कारखान्यात व्यवस्थापक आहे. शकीला एका शाळेत शिकवते. एकंदर बरं चाललं आहे. सरू अधूनमधून चक्‍कर टाकतो. हवं नको बघतो. स्काइप कॉलवर आख्खं कुटुंब त्याच्याशी गप्पा मारतं.
* * *

सरू ब्रिअर्लीची ही जगावेगळी आत्मकहाणी ‘पेंग्विन’नं २०१३ मध्ये प्रकाशित केली. जगभरच्या वाचकांनी तिचं भरघोस स्वागत केलं. वरपांगी ती एक टिपिकल इंग्लिश कहाणी आहे. उत्तम पद्धतीनं सांगितलेली. चलाख संपादनाचे नमुने देणारी. आधुनिक कथाकथनाच्या अतिरेकानंही त्याचा आशय मेलेला नाही. कहाणी वाचकापर्यंत अचूक पोचते. त्यातलं अतिनाट्य काही ठिकाणी खटकतं हे खरं; पण तेवढे खडे दूर सारले तर पुस्तक टॉप आहे.  सरू म्हणजे शेरू. शेरू म्हणजे सिंह. सिंह म्हणजे लायन...म्हणून चित्रपटाचं नाव ‘लायन.’

‘स्लम डॉग मिलियनर’मध्ये जमाल मलिकच्या भूमिकेत भेटलेला देव पटेल इथं आपल्यासमोर सरू म्हणून येतो. समंजस अभिनय केला आहे त्यानं. त्याच्याहीपेक्षा आपली विकेट काढतो तो लहानपणचा सरू म्हणजे आपला सन्नी पवार! या पोरानं जी काही कमाल केली आहे, त्याला खरोखर अवघ्या तारांगणात तोड नाही. सन्नी पवार हे गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यातलं आकर्षण ठरलं होतं. सुटाबुटातला हा चिमुकला अभिनयात मात्र सगळ्यांचा बाप निघाला. सरूच्या आईची सुरेख भूमिका निकोल किडमननं केली आहे. सन्नी पवार आणि तिचं चांगलंच मेतकूट जमलं होतं. नवाजुद्दीन सिद्दिकीचाही एक छोटा रोल आहे ‘लायन’मध्ये. ‘लायन’ला एक तरी ऑस्कर मिळणार, अशी प्रचंड बोलवा होती; पण ‘ला ला लॅंड’ आणि ‘मून लाइट’च्या जबरदस्त साठमारीत ‘लायन’ मागं राहिला. गार्थ डेव्हिस या दिग्दर्शकानं सरू ब्रिअर्लीची आत्मकहाणी वाचून त्याचा चित्रपट करायचं ठरवलं. गणेशतलाईचं किंवा कोलकात्याचं जीवन त्यानं फार टिपिकल पद्धतीनं टिपलं आहे. फॉरेनरांना ज्याचं अप्रूप किंवा घृणा वाटते, त्या सगळ्या गोष्टी इथं आवर्जून आहेत. भारत म्हटलं की हे उकिरडे, घाण, बुजबुजाट, दारिद्य्र, मूल्यांचा ऱ्हास हे सगळं पाठोपाठ पॅकेजमध्ये येतंच. ‘लायन’ त्याला अपवाद नाही. गार्थ डेव्हिसनं इथं पेश केलेलं अतिनाट्य मात्र शुद्ध भारतीय आहे आणि त्याला टास्मानियन तडकासुद्धा अगदी तस्साच आहे. या देशात किमान अकरा लाख बेघर पोरं सडकांवर राहतात. किमान पंधरा लाखांहून अधिक अनाथ आहेत. यातल्या कितीकांमध्ये सरू सापडतील; पण त्यातल्या हरेकाला आपली मुळं बोलावत नाहीत. सरू ब्रिअर्लीनं ते वेदनादायी आमंत्रण स्वीकारलं, तेव्हा त्याची अजरामर कथा झाली, एवढंच.

...अतिदूर टास्मानियातल्या कोपऱ्यात आता एक रुईचं झाड फुललं आहे. त्याची मुळं मात्र सारा समुद्र पार करून खांडव्याजवळच्या गणेशतलाईत रुजली आहेत. म्हटलं ना, नियती माणसाच्या आयुष्यात कसले कसले खेळ दाखवत असते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com