pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

पितृऋण (प्रवीण टोकेकर)

एखादी गोष्ट चांगली की वाईट हेही ठरवणं कठीण जातं. खरी की खोटी, हा सवाल तर दूरच राहिला. एखाद्या कहाणीतली पात्रं अस्सल वाटतात; पण संपूर्ण कहाणीच एक भ्रम वाटायला लागतो. अतिवास्तवाच्या पातळीचं काहीतरी सळसळत आजूबाजूनं जातं. पकडायला जावं तर हाती काहीच लागत नाही. सत्य घटनेवर आधारित  असलेला ‘इन द नेम ऑफ द फादर’ हा चित्रपट असाच अनुभव देतो. हा चित्रपट शहाण्या माणसानं सोडू नये. वेड्या माणसानं तर तो बघावाच!

In the name of whiskey
In the name of song
You didn’t look back
You didn’t belong

In the name of reason
In the name of hope
In the name of religion
In the name of dope

In the name of justice
In the name of fun
In the name of the father
In the name of the son...
दू  रवर नगारे वाजताहेत. ती अस्पष्ट धमधम धमधम गडद होत जाते. हा कुणाचा संदेश आहे की युद्धाचा घोष?...मेंदूला मुंग्या आणणाऱ्या तालातून नागमोडी वाट काढत एक डोंगराळ धून कानी येते. सलाइनच्या ड्रिपसारखी ती थेंबाथेंबानं मनात उतरते आहे. स्वरांची ती नागमोडी वळणं गारुड करतात. लय-तालाच्या नशील्या नादातूनच शब्द ठिबकतात. जणू कुणी अज्ञात जुगारी हातातली नाणी एकेक करून समोरच्या मेजावर सोडतो आहे...भेजा बुंग होत जातो. शब्दांना
बाप्तिस्म्याची मंत्रजागराची झिलई चढत जाते. डोळ्यांसमोर निळ्या-जांभळ्या रंगांची धूम्रवलयं उमटतात. सहस्रावधी धूम्रवलयांचा एकमेकांमध्ये विलय होतो आणि धुकं धुकं दाटतं...एक कहाणी उलगडू लागते.
एखादी गोष्ट चांगली की वाईट हेही ठरवणं कठीण जातं. खरी की खोटी, हा सवाल तर दूरच राहिला. कहाणीतली पात्रं अस्सल वाटतात; पण संपूर्ण कहाणीच एक भ्रम वाटायला लागतो. अतिवास्तवाच्या पातळीचं काहीतरी सळसळत आजूबाजूनं जातं. पकडायला जावं तर हाती काहीच लागत नाही. सन १९९३ मध्ये आलेल्या ‘इन द नेम ऑफ द फादर’ चित्रपटानं नेमका असाच अनुभव दिला. जबरदस्त कहाणी, बेजोड किरदार आणि भन्नाट संगीत असा मिलाफ असूनही थिएटराच्या खुर्चीतून रीत्या हातांनीच उठायला लागलं होतं. हा चित्रपट शहाण्या माणसानं सोडू नये. वेड्या माणसानं तर तो बघावाच.
* * *

घराचे टिनाचे पत्रे चोरून जुन्या बाजारात विकणं हा काही बरा धंदा म्हणता यायचा नाही; पण जेरी कॉनलॉनला तेवढंच जमत होतं. किडकिडीत शरीरयष्टीचा हा तरुण म्हणजे परेशान बापाची आलिशान औलाद. बाप ग्युसेप कॉनलॉन साधा कामगार होता. मवाळ स्वभावाचा. नाकासमोर चालणारा. जेरी याला भावंडंही बरीच. पोरगा हाताबुडी लागेल म्हणून बाप आस लावून बसलेला. आणि पोराचे हे धंदे.
तो काळ होता सत्तरीच्या दशकाचा. सुरवातीचा. उत्तर आयर्लंडमधला उठाव ऐन भरात होता. आयरिश रिपब्लिकन आर्मीच्या (आयआरए) हिंसक कारवायांनी कळस गाठला होता. जिथं बॅगपायपरचे सूर घुमावेत, तिथं बॉम्बस्फोटांचे आवाज दुमदुमू लागले होते. बेलफास्ट हे उत्तर आयर्लंडचं बिनीचं शहर दंग्यांनी पेटलेलं होतं. तिथं दिवसाढवळ्या ब्रिटिश युद्धगाडे फिरत. गोळीबाराचे आवाज ऐकू येत. मधूनच एखादा बॉम्ब फुटे. त्या तसल्या वातावरणात जेरी कॉनलॉन काय करत होता? तर घरांचे पत्रे उचकटत होता.

पत्रा चोरून पळत असताना एकदा त्यानं आयआरएच्या छुप्या अड्ड्यातच चुकून पाऊल घातलं. बंडखोरांनी त्याची गचांडी पकडली. बापानं रदबदली करून पोरगं सोडवून आणलं. ‘‘हे धंदे करण्यापेक्षा तू आपला लंडनला ॲनीआत्याकडं राहायला जा,’’ असं बापानं त्याला बजावलं. लंडनला जाणं पथ्यावरच पडलं असतं. तिथलं धमाल जगणं. गांजा, ड्रग्ज, सिगारेटी, दारू, पोरी. कोण इथं बेलफास्टमध्ये मरेल?
जेरी कॉनलॉन लंडनला पोचला; पण आत्याकडं गेलाच नाही. पॉल हिल नावाच्या दोस्ताबरोबर हिप्पी मित्रांच्या अड्ड्यावर गेला. पडीक घरं बळकावून तिथं घुसून राहणं, हा तेव्हा लंडनमधला एक आवडता उद्योग होता. त्यांना ‘स्क्‍वॅटर्स’ म्हणायचं. त्या स्क्‍वॅटर हिप्पींच्या टोळक्‍यात रमलेल्या जेरीनं पुन्हा भुरट्या चोऱ्या करायला सुरवात केली. त्याला काही महत्त्वाकांक्षा नव्हती. स्वप्नं नव्हती. अक्‍कल तर अजिबात नव्हती. जिम नावाच्या ब्रिटिश हिप्पी मित्रानं भांडण काढून जेरी आणि पॉल दोघांनाही घालवलं. मग दोस्ताबरोबर एका वेश्‍येचं घर फोडून जेरीनं काही रक्‍कम लंपास केली. दोघंही मजबूत दारू प्यायले. एका बागेत बाकड्यावर बसून चार्ली बुर्के नावाच्या बेघर म्हाताऱ्याबरोबर फालतू टाइमपास केला. तो बुर्के म्हातारा आयरिशच होता आणि बागेतच राहायचा. तिथल्या बाकड्यावर त्यानं ‘सीबी’ असं नावही कोरून ठेवलं होतं. म्हातारा मूर्ख होता; पण तोच जेरीचा पुढं तारणहार ठरला. जेरी कॉनलॉननं नवे कपडे, बूट दिवसभर मिरवले. उरलेल्या नोटा नाचवत तो बेलफास्टला घरी आला.
त्यानं घरात पाऊल ठेवण्याआधीच लंडनमधल्या गिल्डफोर्ड भागातल्या एका पबमध्ये भयानक बॉम्बस्फोट झाला. ब्रिटिश सैनिकांचं ते आवडतं मद्यगृह होतं. चार-पाच माणसं अस्मानात उडाली. हाहाकार माजला. पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यात स्क्‍वॅटर्स टोळक्‍यापैकी जिम नावाच्या हिप्पीनं जेरी कॉनलॉनचं नाव घेतलं. ब्रिटिश पोलिसांनी क्षणाचाही वेळ न दवडता जेरी कॉनलॉनला ‘पोत्यात’ घेतला. पोलिस ठाण्यात आणून चड्डी ओली होईस्तवर मार मार मारला. ‘बोल, का पेरलास बॉम्ब?’
सुरवातीला चढेल वागणाऱ्या जेरी कॉनलॉनचा लोळागोळा झाला होता. रडत भेकत तो सांगू लागला ः ‘‘मला काय माहीत बॉम्ब कुणी ठेवला ते? मी साधा चोर आहे हो!!’’
पोलिसांनी जाम ऐकलं नाही. उलट त्याची आत्या, त्याचा बाप, भावंडं सगळ्यांनाच कैद करून अडकवलं जाईल, असा दम भरला. नुसता दम नाही भरला, गरीब बिचारा जेरीचा बाप ऊर्फ ग्युसेप नावाचा देवमाणूस - ज्यानं कधी मुंगीदेखील मारली नाही - हकनाक कोठडीत डांबला गेला. पुरत्या टरकलेल्या जेरी कॉनलॉननं अखेर कबुलीनामा लिहून दिला. कोर्टात केस उभी राहिली. जेरी कॉनलॉन तीस वर्षांसाठी खडी फोडायला आत गेला. त्याच्या बापाला पंधरा वर्षांची सजा लागली. कॉनलॉन कुटुंबाची वाताहत झाली.
* * *

जेरी आणि जेरीचा बाप दोघंही एकाच तुरुंगात थालीपॉट घेऊन जेवणाच्या रांगेत उभे राहायचे. खांदे पाडलेला बावळट बाप समोर. त्याच्या मागं काडी चावत जेरी. काय हे जगणं. लाज आहे, लाज! बापानं एकदाच विचारलं होतं ः ‘‘तू बॉम्ब फोडलास? खरं सांग!’’
‘‘अरे नाही माझ्या बापसा, नाही!! मी कशाला या बॉम्बबिम्बच्या भानगडीत पडीन? मला त्यातलं काही कळतही नाही!’’ जेरी करवादून म्हणाला.
‘‘माझा तुझ्यावर विश्‍वास आहे पोरा!’’ बाप म्हणाला.
जेरीला बापाचा भयंकर तिटकारा यायचा. महाबावळट इसम आहे हा. जेव्हा चांगले वागलो, तेव्हा तोंडातून शब्द काढायचा नाही. चूक केली की दैत्यासारखा समोर हजर! याच्यापायी आपण चोर झालो. यानंच आपल्या जिंदगीची वाट लावली...
तुरुंगात नवा कैदी आला होता. जो मॅकअँड्य्रूज नावाचा. आयरिश होता. शिवाय दहशतवादीही. त्यानं आल्या आल्या जेरीच्या बापाला गाठून सांगितलं ः ‘‘सॉरी सर, बॉम्ब मी पेरला होता. जेरी आणि तुम्ही हकनाक अडकलात.’’
‘‘मग हे पोलिसांना जाऊन सांग!’’ ग्युसेप म्हणाला.
‘‘त्यांना सगळं माहीत आहे; पण अब्रूचं खोबरं होऊ नये म्हणून ते तुमच्यावरचा आरोप मागं घेणार नाहीत. मी कितीही ओरडलो तरी उपयोग नाही,’’ मॅकअँड्य्रूज म्हणाला.
निरपराध असूनही प्रभूनं मला ही शिक्षा का भोगायला लावली असावी, असा सवाल करतच ग्युसेप तुरुंगाच्या कोठडीत हूं की चूं न करता मरण पावला. त्याच सुमारास ‘फ्री कॉनलॉन्स...कॉनलॉन कुटुंबीयांना मुक्‍त करा’ अशा घोषणा देत लोक रस्त्यावर उतरू लागले होते. गॅरेथ पीअर्स नावाच्या एका वकिलीणबाईनं ग्युसेपची केस पुन्हा लढवायला घेतली होती; पण ग्युसेपच्या बचावाची तयारी करता करता तिच्या हाती अपघातानंच त्याच्या पोराची- जेरीची फाइल लागली, आणि सगळं पारडं फिरलं...
* * *

निम्मी सजा भोगून तुरुंगात पिकलेल्या जेरी कॉनलॉनची गोपनीय फाइल गॅरेथच्या हाती लागली नसती तर तोदेखील तुरुंगातच मेला असता. त्या फाइलवर लिहिलेलं होतं ः ‘बचाव पक्षाला कधीही दाखवू नये.’ गॅरेथनं पुन्हा केस उभी केली. पोलिस कमिशनरला कोर्टात फैलावर घेतलं. अखेर न्यायाधीशांनी जेरीला तत्काळ मुक्‍त करण्याचे आदेश दिले...
जेरी कोर्टात थांबला नाही. पोलिसांना ढकलून बाहेर पडत त्यानं मोकळा श्‍वास घेतला. तो जोरात ओरडला ः ‘‘मी जेरी कॉनलॉन...न केलेल्या गुन्ह्याची पंधरा वर्षं सजा भोगून मुक्‍त झालो आहे. माझा बाप ग्युसेप न केलेल्या गुन्ह्याखातर तुरुंगात मेला आहे; पण मुक्‍त झाला नाही. त्याला मुक्‍त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही...’’
* * *

खराखुरा जेरी कॉनलॉन नुकताच निवर्तला. त्यानं आत्मचरित्र लिहिलं होतं. नाव ः प्रूव्हड्‌ इनोसंट...त्याचंच पडद्यावरचं स्वरूप म्हणजे हा चित्रपट. साध्या भुरट्या चोराची ही कहाणी जगभर कायद्याच्या हतबलतेचं प्रतीक मानली गेली. या खटल्यात ब्रिटिश न्यायव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.जगद्विख्यात नटसम्राट सर डॅनियल डे लुईस यांनी जेरी कॉनलॉनची मध्यवर्ती भूमिका इतकी टेरिफिक केली आहे की नि:शब्द व्हायला होतं. या बेजोड कलाकारानं जवळपास पन्नासेक वर्षांच्या कारकीर्दीत जेमतेम १५-२० चित्रपट केले असतील; पण दरवेळी भूमिकेसाठी त्यानं कमालीचं रक्‍त आटवलं. जेरी कॉनलॉनसारखा निरपराध माणूस ‘होय, मी बॉम्ब पेरला’ असं खोटं कसं लिहून देतो? नेमका किती छळ झाला की खोटा कबुलीनामा माणूस लिहून देऊ शकतो, हे पडताळून बघण्यासाठी डॅनियल डे लुईस स्वत: कोठडीत उपाशीतापाशी राहिला. आठ दिवस एकही क्षण झोपला नाही. शरीरा-मनाची पूर्ण पडझड झाल्यावर त्याला हवी ती मानसिकता तपासून पाहता आली. मगच तो कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. कुणालाही मुलाखतीबिलाखती न देणारा, प्रमोशनसाठी टीव्ही चॅनल्सवर कधीही न फिरकणारा हा अभ्यासू नट नुकताच निवृत्त झाला. सन १९८९ मध्ये त्यानं रंगभूमीवर साकारलेला ‘हॅम्लेट’ आजही जगभरातल्या जाणकार नाट्यरसिकांच्या लक्षात आहे.  ‘इन द नेम ऑफ द फादर’ चे दिग्दर्शक जिमी शेरिडन हेही एक अद्भुत रसायन आहे. डॅनियल डे लुईससारखा विस्तव तेच पेलू शकतात, असं म्हटलं जायचं. त्यांनी त्याला ‘माय लेफ्ट फूट’ या चित्रपटात एका सेरेब्रल पाल्सी असलेल्या तरुणाची भूमिका दिली होती. ती अभिनयाची आजही मोजपट्‌टी मानली जाते. ‘इन द नेम ऑफ द फादर’ला सन १९९३ ची सात ऑस्कर नामांकनं होती. मिळालं एकही नाही. या चित्रपटाचं भन्नाट संगीत हे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाची शीर्षकधून आणि गाणं विख्यात गायक बोनो आणि गॅविन फ्रायडे या दोघांनी लिहिलं आणि म्हटलं आहे. आयरिश ध्वनिसंगीताचा इतका अफाट उपयोग क्‍वचितच बघायला मिळतो. खऱ्याखुऱ्या जेरी कॉनलॉनच्या कहाणीत भरपूर बदल करून पडद्यावरची कहाणी पेश करण्यात आली. त्यावर यथेच्छ टीकाही झाली. सिनेमॅटिक लिबर्टीलाही काही लिमिट असतं, असं टीकाकारांचं म्हणणं. ते खरंच आहे.
‘इन द नेम ऑफ द फादर’ बघितल्यानंतर सहजपणानं एक सवाल मनात येतो ः आपल्या देशात असे किती जेरी कॉनलॉन असतील? किती निरपराध ग्युसेप तुरुंगात मेले असतील? उत्तर सापडत नाही. मग डोक्‍यात अनामिक नगाऱ्यांची धमधम धमधम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com