आणखी एक नोहा...

pravin tokekar
pravin tokekar

सप्तरंग 
वास्तविक असं वाटतं की ‘शिंडलर्स लिस्ट’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटावर काही लिहूच नये. इथं शब्द थिटे पडतात. माणुसकीची ही अनोखी कहाणी स्पीलबर्गनं पडद्यावर आणली त्याला पंचवीसेक वर्षं लोटली; पण हा चित्रपट कालातीत आहे. तो कधीही बघावा. बघून झाल्यावर मूकपणानं स्वत:त डोकावावं. 

येहोवाने नोह ह्यांस आज्ञापिलें : लौकरच मी जळप्रळय धाडिणार असून त्यायोगे सृष्टी नष्ट होईल. तू सत्वर एक नौका बांध व प्रत्येक प्रजातीच्या जोड्यांस एकत्रित घे. ज्याचे इमान शाबूत आहे, तोंचि प्रळयात जगेल, बाकी सारे नष्ट होईल. नौका बांधून वाट पहा. ज्या दिशी पेटत्या चुलीतून पाणी वर येऊ लागेल, त्या दिशी नौकेत जा...येहोवाच्या आज्ञेनुसार नोहाने आपल्या कुटुंबासमवेत एक नौका बांधिली, जी प्राणिमात्रें आणि इमानासह जळप्रळयांत तरली. एणें मनुष्यमात्र सृष्टीच्या विलयानंतरही तगून राहिला.
- जेनेसिस.
***
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली गोष्ट. नाझी वरवंट्यासमोर पोलंड केव्हाच पडलं होतं. विस्तुला नदीच्या काठावर वसलेलं क्रॅकोव हे यहुदीबहुल पोलिश गाव बघता बघता नाझी फौजांच्या दाढेखाली रगडलं गेलं. गेली ६०० वर्षं इथं यहुद्यांनी राज्य केलं. उत्तम धंदा, चोख व्यवहार साधत समृद्धी साधली. क्रॅकोवच्या हमरस्त्यावर उजळलेले तेलाचे नक्षीदार दिवे याची साक्ष देताहेत; पण क्रॅकोवच्या या वैभवाला काही आठवड्यांतच भराभरा तडे गेले. 
आता इतिहासानं एक जीवघेणी करवट घेतली आहे. क्रॅकोवच्या आयुष्यात गेली ६०० वर्षं कधी उगवलीच नव्हती, असं सांगणारा दिवस उगवला. ‘यहुद्यांनी आपापली भव्य घरं, मालमत्ता सोडून नव्या वस्त्यांमध्ये राहायला जावं. पुढील सूचना मिळेपर्यंत हालचाल करू नये,’ असा नाझी फतवा निघाला. नाझी एसएस सैनिकांनी घराघरातून चिवट यहुदी फटके देत हाकलून काढले. ज्यांनी थोडा प्रतिकार करायचा प्रयत्न केला, त्यांचे भर रस्त्यात मुडदे पडले. क्रॅकोवचं नशीब फिरलं होतं. 
यहुद्यांचे लोंढे मेंढरांप्रमाणे नव्या वस्त्यांकडं निघाले होते, तेव्हा उलट दिशेनं एक उंचापुरा गृहस्थ क्रॅकोवच्या हमरस्त्यांवर चालत निघाला होता. महागडा लाँग कोट, गिर्रेबाज हॅट, शानदार सदरा, त्याला मौल्यवान कफलिंक्‍स...हेर डिरेक्‍टोर ऑस्कर शिंडलर याला क्रॅकोवमध्ये कोण ओळखत नाही? तो मूळचा चेकोस्लोवाकियाचा. तो एक उद्योजक आहे. अर्थात जर्मन आहे. नुसताच जर्मन नव्हे, तर नाझी पार्टीचा सक्रिय सदस्य आहे. क्रॅकोवमध्ये स्वस्त मजूर मिळवून त्याला एनामलच्या भांड्यांचा कारखाना काढायचा आहे. नाझींची देशांतर्गत गुप्तचर संघटना ‘ॲबवेहर’चा तो माणूस असल्याचं बोललं जातं. म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनांची, विरोधकांच्या हालचालींची खबर एसएस सैनिकांना देणारा. म्हणजे हैवानच. त्याच्या डोळ्यात कावेबाजपणा चमकतो. त्याच्या दिलखुलास हास्यापाठीमागचं स्वार्थी मन लपत नाही. नाझी फौजांच्या अधिकाऱ्यांशी त्याचे दोस्तीचे संबंध आहेत. त्यांना वेळोवेळी दारू आणि बाया पुरवण्याचे उद्योग ऑस्कर शिंडलर मोठ्या उत्साहानं करतो. तोही ‘त्यातला’च आहे. सिगरेट, दारू आणि बाई...ओठांना हवीच! शिंडलरनं आजवर खूप उटपटांग धंदे करून पाहिले आहेत. सगळ्यात अपयश. पण युद्ध छेडल्यावर त्याला बरकतीची स्वप्नं पडू लागली आहेत.
कुठुन कुठून गाड्या भरभरून यहुदी माणसं येताहेत. नावनोंदणी होऊन त्यांची झोपडपट्टीवजा वस्त्यांमध्ये रवानगी होते आहे. ‘आपापल्या मौल्यवान वस्तू नीट वर्गीकरण करून नावानिशी जमा करा. सोबत काहीही घेऊ नका’ अशा सूचनांचा भडिमार होतोय. ‘युद्ध संपलं की आपली मालमत्ता हे सैनिक परत देणार आहेत,’ अशी एक भाबडी समजूतही पसरली आहे. मौल्यवान घड्याळं, पेंटिंग्ज, जडजवाहीर, जोडे, कपडे, भांडीकुंडी, मेणबत्त्यांची रत्नजडित तिकाटणी...क्रॅकोवच्या यहुदी घराघरातला ऐवज अनायास नाझींच्या हाती पडू लागला. 
शिंडलरच्या कारखान्याला मात्र टाळं लागलेलं नाही. लागणार कसं? तो तर नाझी पार्टीचाच माणूस आहे. शिंडलरचा एक अकाउंटंट आहे ः यिट्‌झॅक स्टर्न. अर्धटकल्या. चष्मिष्ट. अबोल आणि महाबेरकी. काळ्या बाजारातली गल्लीबोळ माहीत असलेला. तो यहुदी असला तरी त्याला तूर्त अभय मिळालं आहे. ‘समर्थाघरचं श्‍वान’च ते. आपल्या मालकाचे सगळे काळे-गोरे धंदे त्याच्या चोपड्यांमध्ये बंदिस्त आहेत. तो स्वत: कमालीचा एकनिष्ठ आहे. 
...एक दिवस नाझी अधिकाऱ्यांच्या घरी-ऑफिसांमध्ये भरभक्‍कम भेटवस्तू येऊन थडकल्या. मद्याची उंची बाटली, अत्तरं, बिस्किटं, चॉकलेटं, चीज, अगदी बायकांच्या लिपस्टिक्‍स आणि स्टॉकिंग्जसकट. हे गिफ्ट हॅम्पर भलतंच उंची होतं. युद्धकाळात तर बघायलाही मिळणार नाही असं. सोबत पत्र :
आदरणीय हेर कर्नल अमुक अमुक, आमच्या ‘डॉइश एमेलवारेनफाब्रिक’ या एनामेलवेअर भांडी बनवणाऱ्या कारखान्यात जागतिक दर्जाची उत्पादनं होत असून सैन्यासाठी ती अत्यंत उपयुक्‍त आहेत. या दर्जाची उत्पादनं अन्यत्र कुठंही बनत नसतील, हे मी आपणांला खात्रीनं सांगतो. ती कृपया वापरून बघावीत. देशकार्यामध्ये त्याचा उपयोग झाला तर ते खचितच आपणां उभयतांना आनंददायी असेल. सोबत एक छोटीशी भेटवस्तू पाठवत आहे. स्वीकार व्हावा. आपला, ऑस्कर शिंडलर.
***
शिंडलरच्या कारखान्याला सैन्याचीच चिक्‍कार कंत्राटं मिळायला लागली. उत्पादनाचा वेगही वाढवावा लागला. त्याच्या हातात पैसा खेळायला लागला. शिंडलरच्या मेजवान्या गाजत होत्या. गाणी-बजावणी, नाच, बाया, दारूचा महापूर...
यहुदी लोक मजूर म्हणून स्वस्त होते. मजुरीचा खर्च जवळजवळ नाहीच. (त्या काळी यहुदी मजुरांचा पगार थेट राइशमध्ये जमा होई). सैन्य अधिकाऱ्यांना पटवून शिंडलरनं यहुदी लोकांना कारखान्यात लावून घ्यायचा सपाटा लावला. त्याचा अकाउंटंट नावं सुचवायचा. त्या यहुद्याला ठेवून घेतलं जायचं. इथंच राहा. इथंच खा-प्या. इथंच काम करा. बाकीच्या यहुद्यांचं काय होत होतं, हे शिंडलरला माहीत होतंच. एसएस गार्डस घराघरात घुसून मुडदे पाडत होते, लूटमार सुरू होती. म्हाताऱ्यांना तर भर रस्त्यात, बर्फात गोळ्या घातल्या जात. लहान मुलं गायब होत. तरणेताठे तेवढे छळछावणीत जात. तरण्या बाया ठेवून घेतल्या जात.
शिंडलरचा अकाउंटंट नवनवी यहुदी माणसं घेऊन येई. शिंडलर त्यांना ठेवून घेई. ‘तू लेका एक दिवस मला लटकवणार आहेस’ असं वर ऐकवी. स्टर्न काही बोलत नसे. ‘पाऊणशे वयाची माणसं तुला काय करायची आहेत कारखान्यात?’ असं नाझी अधिकारी शिंडलरला छेडत; पण ‘तो चांगला कास्टिंग एक्‍स्पर्ट म्हातारा आहे’ अशी थातुरमातुर कारणं शिंडलर द्यायचा. मात्र, त्याच्या आमिषांपुढं नाझी अधिकारी हतबल होते.
...एक दिवस एक बाई त्याच्याकडं आली. तिच्या आई-बापांना आऊसविट्‌झच्या छळछावणीत पाठवतायत. ‘त्यांना आश्रय द्या’ असा तिचा आग्रह होता. शिंडलर भडकला. ‘‘मला सापळ्यात अडकवतेस, भवाने...चालती हो इथून. माझा कारखाना म्हणजे धर्मादाय आश्रम वाटला काय? फूट!!’’
...पण त्यानं तिच्या आई-बापांना नाझींच्या तावडीतून सोडवून आणलं आणि कारखान्यान ठेवलं. एव्हाना त्याच्या कारखान्यात १७०० ‘कामगार’ भरती झाले होते. बनिया वृत्तीच्या शिंडलरच्या आयुष्याचा हेतू नकळत बदलून गेला होता...
***
शिंडलरची बायको एमिली दूर एका गावात राहायची. आठवड्यातून एकदा क्रॅकोवला यायची. दरवेळी नवी बाई आपल्या नवऱ्याकडं मोलकरीण म्हणून कामाला असते. तिच्या डोक्‍यात तिडीक जायची; पण बोलणार कुणाकडं? एका संध्याकाळी शिंडलरनं तिला एका महागड्या हॉटेलात नेलं.
‘‘मी यशस्वी होतोय, एमिली...अखेर यश मिळालं. इतके धंदे केले पण...काहीतरी मिसिंग होतं. तू बघशील, ऑस्कर शिंडलर हे नाव यापुढं लोक आदरानं घेतील. .
‘‘तिकडं गावी तुझ्याबद्दल लोक हेच बोलताहेत.’’
‘‘काय बोलतायत?’’
‘‘हेच...की ऑस्करनं नशीब काढलं. टक्‍के-टोणपे खात शेवटी तो सुधारला.’’
‘‘ यश आणि अपयश यांच्यामध्ये काहीतरी असतं, हनी,’’ सिगारेटचा एक निर्मम झुरका घेत शिंडलर म्हणाला, ‘‘अपयशाचं रूपांतर यशात होण्यासाठी एक गोष्ट नितांत गरजेची असते. ती मिसिंग होती..’’
‘‘कुठली? दैव?’’
‘‘अंहं...युद्ध!’’
***
हेर हॉप्टस्टर्मफ्यूरर लेफ्टनंट कर्नल ॲमोन गोथ क्रॅकोवच्या छावणीत बदलून आला, तोवर आऊसविट्‌झची छावणी कार्यान्वित झालेली होती. क्रॅकोवच्या यहुद्यांबद्दल कमालीची तिडीक घेऊनच गोथ येऊन थडकला. छावणीच्या मधोमध त्याचा बंगला होता. त्याच्या सज्जात बसून तो दूरवर काम करणाऱ्या यहुदी कामगारांना नेम धरून उडवायचा. कामचुकार लेकाचे! हेलन हिर्श नावाची एक तरुण यहुदी पोरगी त्यानं घरकामाला आणून ठेवली होती. छंद म्हणून तो तिला फोडून काढत असे. याच हेलेनला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी शिंडलरला त्याच्या आयुष्याची मिळकत पणाला लावावी लागली. 
गोथला शिंडलरनं चांगलंच खिशात टाकलं होतं; पण इतक्‍यात बर्लिनहून गोथला संदेश आला की क्रॅकोव आणि प्लास्झोच्या छावण्या बंद करून मारलेल्या यहुद्यांना तिथंच पुरावं किंवा जाळावं. बाकी उर्वरितांना आऊसविट्‌झला हलवावं. एसएस गार्डसनी घोषणा केली की छावणी हलवण्यात येतेय. तरुण माणसं-बायांनी रेल्वेगाडीशी जमावं. त्यांना घेऊन सुरक्षित कामाच्या ठिकाणी नेण्यात येईल. 

लहान मुलं सोबत घेऊ नयेत. छावणीतली लहान मुलं मिळेल त्या खबदाडीत लपली. काही तर चक्‍क ड्रेनेजमध्ये. तिथंही गिचमिडच होती...
शिंडलरनं हिकमतीनं आपली माणसं सोडवली. हिकमतीनं म्हणजे गोथला प्रत्येक माणसामागं लाच खिलवून. तरीही दुर्दैवानं बायका आणि लहान मुलांनी भरलेली एक रेल्वेगाडी आऊसविट्‌झला पोचलीच; पण धावत-पळत शिंडलर तिथं जाऊन थडकला आणि गॅस चेंबरच्या दारापासून त्यानं त्यांना वाचवलं. विषारी गॅसऐवजी कैद्यांना आंघोळीचं पाणी मिळालं. नाझींवर दबाव वाढत होता. युद्धाचं पारडं कललं होतं. ‘मी कारखाना सुडेटन प्रांतात हलवतो’ असं टुमणं शिंडलरनं नाझी अधिकाऱ्यांकडं लावलं. त्याला रुकार मिळाला. तिथं तुलनेनं कमी धोका होता. त्याच्या कारखान्यात यहुद्यांच्या प्रार्थना गुपचूप चालत. हेर शिंडलरच्या वाढदिवसाला तर एक साधासा केक त्याला प्रेझेंट करण्यात आला. तिथं शिंडलरनं एका ज्यू मुलीची पापी घेतल्यानं नाझी अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला चौकशीला सामोरं जावं लागलं.
*** 
नाझींचा पाडाव होत होता. हिटलरच्या फौजा जीव खाऊन पळू लागल्या. यहुदी बंदिवान सुटू लागले. छळ-छावण्यांचं अस्तित्व नष्ट होऊ लागलं. छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या. शिंडलरच्या कारखान्यातल्या कामगारांनी जल्लोष केला; पण त्या क्षणापासून यहुदी स्वतंत्र होते. मात्र, त्यांचा तारणहार ऑस्कर शिंडलर हा नाझी पार्टीचा सदस्य असल्यानं अटकेस पात्र ठरला होता. आपल्या १२०० कामगारांना वाचवण्याच्या खटपटीत त्याचा सगळा पैसा-अडका खर्च झाला होता. कफल्लक अवस्थेतच कामगारांचा निरोप घेऊन मध्यरात्रीच्या अंधारात तो पळाला. शिंडलरचं पुढलं आयुृष्य हे एक परावलंबी आयुष्य होतं. अर्जेंटिनात काही काळ घालवल्यावर त्यानं नादारी घोषित केली. फ्रॅंकफर्टला एका खोलीत तो राहत असे. काही धंदे त्यानं करून पाहिले; पण साफ कोसळले. मग त्यानं वाचवलेल्या यहुद्यांनीच त्याला जवळपास पोसलं. ‘जो एक जीव वाचवतो, तो विश्व वाचवतो’ हे ‘तालमुड’मधलं (यहुद्यांचा पवित्र ग्रंथ) वाक्‍य कोरलेली एक अंगठी त्याच्याजवळ राहिली. त्याच्या कामगारांनीच त्याला ती दिली होती. मरणानंतर इस्राईल सरकारनं अत्यंत आदरानं जेरुसलेमच्या पवित्र भूमीत त्याचं दफन केलं.
सात लाख यहुद्यांचे बळी घेणाऱ्या नाझी पार्टीचा एक सदस्य, बाईलबाज, दारूबाज, स्वार्थी, अप्पलपोटा उद्योजक ऊर्फ ऑस्कर शिंडलर एक देवदूत म्हणून अजरामर झाला.
***
वास्तविक असं वाटतं की ‘शिंडलर्स लिस्ट’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटावर काही लिहूच नये. इथं शब्द थिटे पडतात. माणुसकीची ही अनोखी कहाणी स्पीलबर्गनं पडद्यावर आणली त्याला पंचवीसेक वर्षं लोटली; पण हा चित्रपट कालातीत आहे. तो कधीही बघावा. बघून झाल्यावर मूकपणानं स्वत:त डोकावावं. थॉमस केनीली नावाच्या एका लेखकानं १९८२ मध्ये ‘शिंडलर्स आर्क’ ही जीवनगाथा लिहून काढली. त्याला मॅन बुकर पुरस्कारही मिळाला होता. (‘ॲमेझॉन’ व अन्य काही ग्रंथस्थळी उपलब्ध आहे.) त्यावर चित्रपट बनवण्याचं बरीच वर्षं स्पीलबर्गच्या मनात होतं; पण धीर होत नव्हता. खरंतर ऑस्कर शिंडलरची ही खरीखुरी कहाणी स्पीलबर्गला पडद्यावर आणायचीच नव्हती. त्या काळात तो ‘ज्युरासिक पार्क’ची जुळवाजुळव करत होता. त्यानं प्रसिद्ध दिग्दर्शक रोमान पोलान्स्कीला गळ घातली; पण खुद्द पोलान्स्की स्वत: वयाची आठ वर्षं छळछावणीतच वाढलेला. ‘माझ्याच्यानं हे प्रकरण झेपणार नाही,’ असं स्वच्छ शब्दात त्यानं सांगून टाकलं. अखेर स्पीलबर्गनं स्वत:च मैदानात उतरायचं ठरवलं.
संपूर्ण चित्रपट कृष्ण-धवल रंगात आहे. ‘‘माझ्या कल्पनेनुसार रंग म्हणजे जीवन...मला मृत्यूचं अस्तित्व दाखवायचं होतं. म्हणून...’’ असं स्पीलबर्गनं त्याचं रास्त समर्थन केलं आहे. शिवाय, त्यामुळं या चित्रपटाला आपापत: एक कालातीतताही आली आहे. या चित्रपटानं देदीप्यमान यश मिळवलं. अर्धा डझन ऑस्कर मिळवले; पण या यशाचं स्पीलबर्गनं एकदाही सेलिब्रेशन केलं नाही; किंबहुना या चित्रपटातून त्याला मिळालेला प्रत्येक पैसा महायुद्धातल्या बळींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वाटण्यात आला.  

‘‘इतका भयानक चित्रपट निर्माण करून लोकांना अस्वस्थ करण्याऐवजी होलोकॉस्टची कामं करणाऱ्या एनजीओला देणगी का देत नाहीस?’’ असा सवाल त्याला नंतर त्याच्याच एका तंत्रज्ञानं रडत रडत केला होता. तेव्हा स्पीलबर्गनं उत्तर दिलं नव्हतं. संगीतकार जॉन विल्यम्स यांची ‘शिंडलर्स लिस्ट’ची खास सुरावट हा अभिजात पश्‍चिमी संगीतातला ठेवा बनली आहे. ती वाजवण्यासाठी विख्यात व्हायोलिनवादक इट्‌झॅक पेर्लमन यांना पाचारण करण्यात आलं. पेर्लमन स्वत: ज्यू आहेत. चित्रपटाची काही दृश्‍यं बघून ते इतके हादरून गेले की डोळे पुसत म्हणाले : ‘‘या चित्रपटासाठी तुला खरंतर माझ्यापेक्षा चांगल्या संगीतकाराची गरज आहे.’’ त्यावर स्पीलबर्ग शांतपणे म्हणाला ः ‘‘खरंय, पण ते आता हयात कुठं आहेत?’’

शिंडलरच्या प्रमुख भूमिकेत लियॅम नीसन हा उंचापुरा अभिनेता आहे. त्याच्या कामगिरीला दाद तरी कशी द्यावी? वाटतं की कुठं यदाकदाचित भेटलाच, तर नुसतेच त्याचे दोन्ही हात हातात घेऊन मिनिटभर उभं राहावं. बस्स. त्याचा अबोल अकाउंटंट आहे आपला ‘गांधी’ फेम बेन किंग्जली. यहुद्याचा चिवटपणा आणि मालकाविषयी असलेली निष्ठा याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे त्याची अफलातून भूमिका. लेफ्टनंट कर्नल ॲमोन गोथची अमानवी भूमिका राल्फ फिएन्सनं केली आहे. त्याच्या नजरेतच एक विकृत लैंगिकता आहे. हे तिघंही शेक्‍सपीरिअन रंगभूमी गाजवलेले नट आहेत. ‘शिंडलर्स लिस्ट’ची जातकुळीही आपलं नातं थेट शेक्‍सपीअरच्या विकारविलसितांशी आहे, असं चौकटीचौकटीतून सांगते.

खराखुरा शिंडलर हा काही देवमाणूस नव्हता. तसा चित्रपटातही तो दाखवण्यात आलेला नाही; पण ‘माणुसकी की अमानुष धंदा’ यात त्यानं पहिली निवड केली. सर्व तमोगुणांचं आगर असूनही तो देवदूतच ठरला. त्याच्या आयुष्यातली शेवटची काही वर्षं तर देणग्या आणि मदतीवर त्याला काढावी लागली. मरताना त्याच्याकडं फुटकी कवडी नव्हती; पण त्याच्या जेरुसलेममधल्या थडग्यावरचं वाक्‍य त्याला पुण्यात्मा ठरवतं.- ‘जो एक जीव वाचवतो, तो विश्‍व वाचवतो.’ जगात आजमितीस सहा हजार यहुदी ‘शिंडलर्स ज्यूज्‌’ म्हणून ओळखले जातात. ही कुटुंबं पुन्हा स्थिर-स्थावर झालेली आहेत. शिंडलर हा त्यांच्यात चक्‍क पूजला जातो. प्रलयात नौका लोटणारा नोहा आणि महायुद्धाच्या वणव्यात असहाय्यांना तारून नेणारा शिंडलर यांच्यात त्यांना फारसा फरक करता येत नाही. फरक इतकाच की नोहा पुराणात होता, शिंडलर त्यांच्या आयुष्यात एक होडी घेऊनच आला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com