आभाळाचा डोळा (मौसम है क्‍लासिकाना)

pravin tokekar writes about Sky Eye
pravin tokekar writes about Sky Eye

दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे.

शहरगावात हमरस्त्यावरून फिरताना फुटपाथवर जुनी-नवी पुस्तकं मांडून बसलेले विक्रेते दिसतात. नजर उगीचच रेंगाळते. इंजिनिअरिंगच्या पुस्तकांपासून थेट ‘हाऊ टू विन अ बॉयफ्रेंड’पर्यंत विविध प्रकारची पुस्तकं. काही जुनी. काही नवी. चोऱ्यामाऱ्या करून छापलेली पायरेटेड पुस्तकंही तिथं सस्त्यात मांडलेली असतात. डॅन ब्राऊन, फ्रेडरिक फॉरसाइथ, लुडलम, बाल्डाची, जेफ्री आर्चर, मायकेल क्रायटन तिथं पाठीला पाठ लावून हारीनं उभे असतात. त्यातलं एखादं पुस्तक उचलावं. पाठीमागल्या पानावरचा मजकूर वाचावा. इंटरेस्टिंग वाटलं तर थोडीशी घासाघीस करून घरी न्यावं. रात्री जेवणानंतर मंद उजेडात छातीवर ठेवून पडल्या पडल्या त्या पुस्तकातल्या थरारात मन गुंतवावं. रात्र बरी जाते.
काही चित्रपटही असेच सापडतात. रद्दीच्या दुकानात शेक्‍सपीअर भेटावा तसे. मन स्तिमित होतं. बघता बघता जाणवतं ः ‘अरे, हा तर भन्नाट सिनेमा आहे. पावणेदोन तास मस्त गेलेच; शिवाय मनातही केवढा तरी उरला.’ 
‘आय इन द स्काय’ हा सिनेमा या पठडीतला. म्हटला तर थरारपट. म्हटली तर सत्यकथा. म्हटलं तर माणुसकीचं उत्कट कथानक. म्हटलं तर नैतिकतेची चर्चा करणारा प्रगल्भ परिसंवाद. तसा हा युद्धपट आहे, हे खरं; पण युद्धपट म्हणाल तर आख्ख्या चित्रपटात फक्‍त एकच बॉम्ब फुटतो, तोही शेवटच्या काही मिनिटांत! 
हरेक चांगल्या चित्रपटाला ‘ऑस्कर’ असतंच असं नाही; पण तरीही तो चित्रपट जाणकारांची दाद घेऊन गेलेला असतो. ‘आय इन द स्काय’ तसाच. 
* * *
इस्टले हे नैरोबीचं एक उपनगर. केनयात येऊन स्थायिक झालेल्या सोमालींचं ठाणं. आळसटलेलं गाव असलं तरी तिथं सैन्याचा वावर आहे. भर रस्त्यात बंदुकांच्या फैरी झडणं ही आम बात आहे.
तसल्या त्या वातावरणात आलिया मोअल्लिम ही जेमतेम १०-१२ वर्षांची मुलगी घराच्या आवारात एक मोठी रिंग घेऊन हुलाहूपचा खेळ एकटीच खेळते आहे. कट्‌टर मुस्लिम घर. मुलीच्या जातीनं असं खेळणंबिळणं बरं नाही; पण तरीही प्रेमळ बापानं तिला ती रिंग करून दिली आहे. घराच्या आवारात तरी पोर खेळेल बिचारी, एवढाच हेतू.
हीच आलिया -नकळत का होईना- दोन प्रचंड मोठ्या लष्करी महासत्तांना काही तास खेळवत ठेवणार आहे, याची आपल्याला कल्पना येत नाही. तिच्या दोन घरं पलीकडं, गल्लीच्या कोपऱ्यावर आणखी एक घर आहे. त्या घरात पुढचा अंक घडतो आहे.
तिथं अल्‌ शबाब या सोमाली दहशतवादी गटाचे काही म्होरके दडले आहेत. अल्‌ शबाब म्हणजे ओसामा बिन लादेनच्या अल्‌ कायदाचं सोमाली भावंड. नैरोबीतल्या एका ब्रिटिश गुप्तहेराचा खात्मा करून पुढल्या आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीला ते लागले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये एक बाई आहे. तिचं नाव सुसान हेलन डॅनफर्ड. अल्‌ हादी या दहशतवाद्याशी निकाह लावून तिनंही ‘जिहाद’मध्ये उडी घेतली आहे. तिचा शौहरसुद्धा दहशतवादीच आहे. दोघंही ‘वाँटेड’ आहेत. 
...पण आलिया मोअल्लिम मज्जेत खेळते आहे. 
अवकाशात घिरट्या घालणारे अमेरिकेचे आणि ब्रिटनचे हेर उपग्रह त्या घराकडं आपल्या दुर्बिणी आणि कॅमेरे वळवतात. दोन हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असा ‘ड्रोन’ इस्टले गावाच्या वर ६० हजार फुटांवर उडू लागतो. बटण दाबताच ती ५० सेकंदांत लक्ष्यावर जाऊन आदळतील. किस्सा खतम. 
कर्नल कॅथरिन पॉवेल ही पन्नाशी उलटलेली कणखर ब्रिटिश लष्करी अधिकारी. ब्रिटनमध्ये हर्टफोर्डशरच्या लष्करी ठाण्यातून तिचं काम चालतं. ड्रोनचं नियंत्रण दूर नेवाडामधल्या अमेरिकी ठाण्यात पायलट स्टीव्ह वॉट्‌स करतो आहे. स्फोट झाल्यानंतर बळी गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम दूरवर पर्ल हार्बरचं एक युनिट तत्काळ करत असतं. हे सगळं उपग्रहाद्वारे लाइव्ह चाललेलं आहे. ‘कोब्रा’ हे ब्रिटन, अमेरिका आणि अन्य काही देशांनी स्थापन केलेलं एक स्वतंत्र युनिट आहे. त्यासाठी अब्जावधी डॉलर खर्ची पडताहेत. इलाज नाही. ‘वॉर ऑन टेरर’चा हा एक भाग आहे. दहशतवाद्यांना हुडकून त्यांच्यावर नजर ठेवायची. संधी पाहून त्यांना उडवायचं हे यांचं काम आहे. 
काही गुप्तहेर जमिनीवरूनही त्या घरावर लक्ष ठेवून आहेत. त्यातला एक केनियन आहे. तो रिमोट कंट्रोलनं एक इलेक्‍ट्रॉनिक पक्षी आणि एक भुंगा हाताळतो आहे. या पक्ष्याच्या पोटात चिमुकला कॅमेरा बसवलेला आहे. पक्षी त्या घराच्या भिंतीवरच बसवलेला आहे. एक इलेक्‍ट्रॉनिक भुंगा रिमोट कंट्रोलद्वारे चक्‍क दहशतवाद्यांच्या घरातल्या खोलीत घुसवला जातोय. तुळईवर बसून सारं काही टिपतो आहे.
या सगळ्याची सूत्रं कॅथरिनकडं आहेत. ती आणि तिचं युनिट हे ‘आभाळाचा डोळा’ झालं आहे. तो डोळा रोखला आहे जमिनीवरच्या गनिमावर. कोब्रा युनिटचे प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल फ्रॅंक बेन्सन. कॅथरिनचे बॉस. कर्नल बेन्सन हा चिक्‍कार उन्हाळे-पावसाळे पाहिलेला लष्करी माणूस आहे. त्याला दोन युद्ध लढावी लागतात. प्रशासनात बसलेल्या बड्या प्रस्थांशी आणि दुसरं म्हणजे जमिनीवरचं. दहशतवाद्यांशी. 
...दुर्दैव असं आहे की दहशतवाद्यांना जिवंत पकडायचं की ठार मारायचं? क्षेपणास्त्रानं उडवायचं की सैन्य घुसवायचं? किती माणसं मेली तर चालतील? मेलेली माणसं ‘आपली’ किती? ‘त्यांची’ किती? क्षेपणास्त्र कधी उडवायचं? या सगळ्या प्रश्‍नांचे निर्णय लष्कराला कधीच घेता येत नाहीत. ते वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून कॉफीत बिस्किटं बुडवून गहन चर्चा करणारे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी घेत असतात. उदाहरणार्थ : एक बॉम्ब फेकून दहशतवादी उडवायचा आहे. नाही उडवला त्याला, तर तो आपली पाच-पन्नास माणसं मारणार आहे. हीच संधी आहे त्याला खतम करायची. करायचं का तसं? पण हा सवाल लष्करी अधिकाऱ्यानं त्याच्या वरिष्ठाला आधी विचारायचा. वरिष्ठानं त्याच्या वरिष्ठाला. त्यानं थेट मंत्र्याला गाठायचं. मंत्र्याचं समजा, तेव्हा पोट साफ बिघडलेलं असेल आणि तो शौचालयात बसला असेल तर? तर लष्करानं त्याचं ‘होईपर्यंत’ थांबायचं असतं. मग बाहेर आल्यावर तो विचारतो, की बॉम्ब फेकल्यावर किती टक्‍के मनुष्यहानी होईल? ४५ टक्‍के की ६५? ६५ असेल तर नो... नो बॉम्ब. ओके? ४५ टक्‍केच असेल तर चान्स घ्यायला हरकत नाही; पण त्यापेक्षा आपण आपल्या ऍटर्नी जनरल जनरलचा आणि मानवी हक्‍क आयोगाचा सल्ला घेतला तर? व्हॉट से?

हे असं सगळं चाललेलं आहे.
* * *
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. समोरच्या टीव्हीवर इस्टलेमधलं दृश्‍य थेट दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे. मंत्रिमहोदय आणि ऍटर्नी जनरल स्वत: ऑपरेशन बघणार आहेत. अगदी आलियाच्या रिंग खेळण्यापासून ते दहशतवाद्यांच्या तयारीपर्यंत.

कॅप्चर ऑर किल? हा खरा सवाल आहे. 
हेलफायर क्षेपणास्त्र डागणं अवघड नाही. पुढले असंख्य दहशतवादी हल्ले इथंच रोखता येतील; पण क्षेपणास्त्र कधीच एक किंवा दोन माणसं मारत नाही. पाच-पन्नास मरणार. चालेल?
शिवाय मरणारे दहशतवादी ब्रिटिश आहेत. ब्रिटनमधल्या मानवी हक्‍क आयोगानं विषय ताणला तर? अमेरिकेत विरोधकांनी आंदोलनं केली तर? पुढल्या निवडणुकीतली मतं धोक्‍यात येतात राव. शेवटी राजकीय करिअरचा सवाल आहे. मुख्य म्हणजे निरपराध माणसांना मारण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? 

 पान १५ वरून
चर्चा. गुऱ्हाळ. टोलवाटोलवी. राजकारण. या गदारोळात दहशतवादाचा राक्षस शांतपणे कलेवरं गिळत चालला आहे. हे कसलं वॉर ऑन टेरर?
ओके. कोलॅटरल डॅमेज एस्टिमेट काय आहे? नुकसानीचा अंदाज? ४५ टक्‍के असेल तर आंतरराष्ट्रीय करारानुसार अंमलबजावणी करायला हरकत नाही. चला, दाबा बटण...
* * *
चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच इस्टलेमध्ये वेगळं नाट्य घडतंय. रिंग घेऊन खेळणारी आलिया मोअल्लिम आईनं करून दिलेल्या पावरोट्या घेऊन विकायला निघाली आहे. ती पाहा, ती निघालीच. भराभरा जातेय... आभाळाचा डोळा टिपतोय तिला. हे काय? दहशतवाद्यांच्या घराशीच रस्त्यावर टेबल टाकून ती बसलीसुद्धा. ओह गॉड. अरे, कुणीतरी तिच्या पावरोट्या घ्या. तिला मोकळं करा. बिचारी फुकट मरेल क्षेपणास्त्राच्या स्फोटात.
आलिया गिऱ्हाईकाची वाट पाहतेय.
आभाळातल्या ‘ड्रोन’चं नेवाडातून नियंत्रण करणारा पायलट स्टिव्ह वॉट्‌स कळवळतो. आपण बटण दाबून या पोरीचा प्राण घ्यायचा? क्षेपणास्त्राच्या माऱ्यानं ही जखमी होईल की...
नव्यानं मनुष्यहानीचा अंदाज घेतला जातो. होय, बहुतेक ती मरेल.
लष्कराचं फर्मान सुटतं. ॲबॉर्ट. तिथं असलेल्या आपल्या एजंटला पाठवा. तिच्या पावरोट्या विकत घेऊन टाका. इलेक्‍ट्रॉनिक भुंगा आणि पक्ष्याचं रिमोट कंट्रोलनं नियंत्रण करणारा एजंट हातातलं यंत्र टाकून आलियाच्या टेबलाकडं धावतो. तिच्या सगळ्या रोट्या विकत घेतो.
...पण आलिया नव्या पावरोट्यांची चळत टेबलावर मांडते! 
बलाढ्य महासत्ता आपापल्या कपाळांना हात लावतात. वाट बघण्यापलीकडं हाती काही उरत नाही.
अशा वेळी कॅथरिन पॉवेल कठोर निर्णय घेते. काळजावर दगड ठेवून. मग काय होतं? हा क्‍लायमॅक्‍स सांगण्यात अर्थ नाही. तो पडद्यावर पाहावा आणि दोन-चार दिवस अस्वस्थ राहावं, हे उत्तम.
* * *
हेलन मिरेन ही एक ग्रेट अभिनेत्री आहे. तिचा ‘हंड्रेड फूट जर्नी’ तर मस्तच. त्याबद्दल पुढं कधीतरी; पण या हेलन मिरेननं कर्नल कॅथरिन पॉवेल जी काही रंगवली आहे, त्याला तोड नाही. ब्रिटननं तिला ‘डेम’ हा किताब दिला आहे. ‘द क्‍वीन’मध्ये तिनं राणी एलिझाबेथचा रोल असा काही केला होता, की खुद्द राणीनं तिला पॅलेसमध्ये जेवायला बोलावलं. हेलन मिरेन म्हणाली : ‘सॉरी, हर हायनेस... मी चित्रीकरणात व्यग्र आहे!’ ‘क्‍वीन’साठी तिला ऑस्करही मिळालं. ‘आय इन द स्काय’मध्ये तिचा अमेरिकी बॉस जनरल बेन्सन याची भूमिका सर ॲलन रिकमन यांनी केली आहे. त्यांना आपण एरवी हॅरी पॉटर मालिकेतला प्रोफेसर स्नेप म्हणून ओळखतो. ‘आय इन द स्काय’ सहा आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेत चित्रित झाला. रिलीज होण्याआधीच रिकमन यांचं स्वादुपिंडाच्या कॅन्सरनं निधन झालं होतं. हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ॲलन रिकमन यांचा आवाज हा अवघ्या हॉलिवूडचा ठेवा मानला जायचा. विशेष म्हणजे शेक्‍सपीरिअन रंगभूमीवर ‘अँटनी अँड क्‍लिओपात्रा’ हे नाटक रिकमन आणि हेलन मिरेन ही दोघंच करत असत.
दक्षिण आफ्रिकी दिग्दर्शक गॅविन हूड याच्या हातात गाय हिबर्ट या ब्रिटिश पटकथाकारानं लिहिलेली ही कथा आली आणि तो खुळावला; पण हा चित्रपट शूट करणार कुठं? मोगादिशुपासून किसमायोपर्यंत सोमालिया पेटलेलं. केनयातही तीच परिस्थिती. शेवटी दक्षिण आफ्रिकेतच गॅविननं ठाण मांडलं आणि सहा आठवड्यांत सिनेमा पुरा केला. 
‘आय इन द स्काय’ हा वर्तमानातल्या दहशतवादविरोधी युद्धाचा पट उलगडून दाखवणारा आहे. जमिनीवरचं वास्तव, त्यावर मात करण्यासाठी वेठीला धरलेलं तंत्रज्ञान, राजकारणाचा चिखल आणि सगळ्यात महत्त्वाचा नैतिकतेचा सवाल... या सगळ्याची प्रगल्भ चर्चा हा चित्रपट करतो. तरीही तो कुठंही कंटाळवाणा होत नाही. सगळ्यात शेवटी जनरल बेन्सन दुखऱ्या आवाजात एक सत्य सांगतो. ते कुठल्याही जगातल्या राज्यकर्त्यांनी ध्यानी ठेवावं. सर्जिकल स्ट्राइकचा गाजावाजा करणाऱ्यांनी तर तोंडपाठच करावं. जनरल बेन्सन म्हणतात ः ‘‘युद्धाची नेमकी किंमत काय असते, हे कुठल्याही सैनिकाला तरी शिकवायला जाऊ नका... नेव्हर टेल अ सोल्जर दॅट ही ऑर शी डज नॉट नो द कॉस्ट ऑफ वॉर!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com