पक्षी जाय दिगंतरा... (प्रवीण टोकेकर)

पक्षी जाय दिगंतरा... (प्रवीण टोकेकर)

‘शॉशॅंक रिडिम्प्शन’ हा चित्रपट जरूर मिळवा. टॉरेंट किंवा अन्य संकेत स्थळांवर तो उपलब्धही आहे. टीव्हीवरही बऱ्याचदा लागतो. आवर्जून पाहा. खचलेल्या मनःस्थितीत तर नक्‍कीच पाहा. अडचणीच्या डोंगरांमधून वाट काढत असाल, तर हा चित्रपट तुमचं औषध आहे. दु:खाची श्‍वापदं चवताळून अंगावर येत असतानाच्या काळात वेळ काढून पाहा...सुखातही पाहाच!

काही चित्रपट असे असतात की कधीही पाहावेत. काही असे असतात की सुरवात अजिबात चुकवू नये. चुकली तर संपूर्ण चित्रपट पुन्हा पाहावा. काही चित्रपट आख्खेच्या आख्खे स्वत:च चुकवावेत! फुकट दाखवले तरी पाहू नयेत. काही चित्रपट एकट्यानं पाहावेत. काही दुकट्यानं...काहीही न बोलता, हातात हात घालून...

काही चित्रपटांना कुटुंबासकट जावं. दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला जावं, तसं आंघोळबिंघोळ करून नवे कपडे घालून जावं. मध्यंतरात जिने उतरून कौतुकानं सामोसे, आइस्क्रीम वगैरे आणावं. काही चित्रपटांना नुसतं कथानक पुरत नाही. थोडं काही तोंडीलावणं लागतंच.
काही सिनेमे दोस्तांच्या गॅंगला घाऊक निमंत्रण देतात. दोस्तलोक, आ जाओ. खूब हसेंगे. धमाल.
काही चित्रपटांना, घोरायला गादी मिळाली तर बरं होईल, असं वाटत राहातं. काही चित्रपट रात्रीचा शो बघू नयेत असे...तर काही फक्‍त मॅटिनीलाच जाऊन बसावेत असे. काही सिनेमे तंगड्या पसरून घरात टीव्हीवरच बघावेत असे. कुकरच्या शिट्या त्यात व्यत्यय आणत नाहीत.
चित्रपटांच्या अशा नाना परी.

...पण एखादाच चित्रपट आभाळाचंच दान देऊन जातो. अचानक ढग दाटून यावेत आणि बघता बघता वातावरण कुंद व्हावं, तसा. कळपाकळपानं येणारे ढगांचे हत्ती आभाळात घटकाभर झुंजावेत, पावसाची झिम्माडझड यावी आणि क्षणात ढगांची पांगापांग होऊन स्वच्छ निर्मळ ऊन्ह पडावं. सप्तरंगांनीसुद्धा ते अद्भुत दृश्‍य पाहून देहाची कमान टाकावी...असं काहीतरी गारुड असतं ते.
‘शॉशॅंक रिडिम्प्शन’ हे असंच एक गारुड आहे.

वास्तविक हा चित्रपट निर्माण होऊन उणीपुरी २३ वर्षं होऊन गेली आहेत; पण जगातल्या यच्चयावत सगळ्याच्या सगळ्या चित्रजाणकारांच्या मानसयादीत या चित्रपटाचं नाव अग्रस्थानी असतं. या चित्रपटानं तेव्हा फारसा गल्ला केला नाही; पण ‘शॉशॅंक’चं नाव घेतलं की भले भले कानाची पाळी पकडतात. हातभर जीभ बाहेर काढतात. काय आहे एवढं या चित्रपटात?
या चित्रपटात थरारक दृश्‍यं नाहीत. जबरदस्त ड्रामा नाही. खूनखराबा नाही. चित्तचक्षुचमत्कारिक कॅमेऱ्याच्या करामती नाहीत. मनाला रिझविणारं संगीत नाही. हाडा-मांसाच्या सामान्य माणसांची एक असामान्य कथा आहे.
* * *

गोष्ट आहे १९४७ मधली. आपल्या बदफैली बायकोचा आणि तिच्या प्रियकराचा खून करून अँड्य्रू ड्रुफेन नावाचा बॅंकर ‘शॉशॅंक’च्या भयानक कारागृहात शिक्षा भोगायला आला आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो निरपराध आहे. त्याला गुन्ह्यात अडकवलं गेलंय. वेल, सगळेच कैदी असं सांगत असतात. ‘शॉशॅंक’ हा अमेरिकेतल्या मेन राज्यातला एक बदनाम तुरुंग. एकदम फायनल जागा. इथून थेट जमिनीतच जायचं. मेन राज्याच्या कायद्यात फाशीची तरतूदच नसल्यानं खुनी गुन्हेगारांना इथं जन्मठेपच भोगावी लागते. अँड्य्रूला तर दोन जन्मठेपा भोगायच्या आहेत. तुरुंगामागल्या ओसाड दफनभूमीत त्याची हाडं खत होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्थात तिथं, त्या तुरुंगात हे असले भविष्य हरवलेले कैदीच जास्त. उदाहरणार्थ ः हा एलिस बॉइड रेडिंग ऊर्फ रेड हा कृष्णवर्णीय कैदी गेली ३० वर्षं इथं आहे. त्याला तीन जन्मठेपा भोगायच्या असल्यानं तुरुंगाच्या दगडी चिऱ्यांसारखाच तो एक. पन्नाशी उलटलेला रेड तुरुंगातला नामचीन प्रस्थ आहे. सिगारेटी, दाढीचं ब्लेड, पत्त्यांचा कॅट अशा मौल्यवान चीजवस्तू उपलब्ध करून देणारा फिक्‍सर. रेडनंही खून केलाय. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यानं बायकोलाच ढगात धाडलं. तिच्या मोटारीचा ब्रेक ढिला करून ठेवला. आता बॅंकेत निघालेल्या बायकोनं नेमकं तेव्हाच गाडीत शेजारीण आणि तिच्या मुलीला लिफ्ट दिली, यात बिचाऱ्या रेडचा काय दोष? तिघीही गेल्या ना वर! ...सारांश, तिहेरी खुनाच्या केसमध्ये रेड शॉशॅंकच्या दगडी भिंतींमध्ये तहहयात खितपत पडला आहे.

असाच एक ब्रुक हॅटलन. तुरुंगाच्या बंडल लायब्ररीत गेली हजारो वर्षं पुस्तकांवरची धूळ झटकतोय म्हातारा. त्याला कुणीही मायेचं उरलेलं नाही...म्हाताऱ्याला धड चालताही येत नाही संधिवातामुळं. याचं आयुष्यच गेलं या शॉशॅंकमध्ये. विरंगुळा म्हणून त्यानं चक्‍क एक कावळा पाळलाय...
सडसडीत, बाभळीच्या काठीसारखा अँड्य्रू आणि रेड यांची लगेचच दोस्ती जमली. अँड्य्रूच्या नजरेत काहीतरी विशेष चमक आहे, हे रेडनं ओळखलंय. रेड त्याला तुरुंगजीवनाची गीताच सांगतो ः ‘‘दीज वॉल्स आर फनी...या भिंतींचा आधी तिरस्कार वाटतो. मग त्या आपल्याशा वाटतात. शेवटी शेवटी तर जगण्याचा आधारच बनतात. तस्मात्‌ बाळ अँडी, भिंतींशी दोस्ती कर...’’

* * *
अँडीला जिऑलॉजीत रस आहे. दगड-मातीचा पोत त्याला अचूक कळतो. त्याला छंदच आहे - दगड गोळा करायचे, त्यांना घासून-पुसून छान आकार द्यायचा. अँडी कलाकार आहे लेकाचा. अँडी मुळात बॅंकर असल्यानं त्याला आकडेशास्त्रातही गती आहे. दोनेक महिन्यांतच अँडीनं रेडकडं मागणी नोंदवली : एखादी छिन्नी मिळाली तर काम सोपं होईल माझं. रेडनं त्याला छिन्नी मिळवून दिली.  
तुरुंगाचा मुख्य पहारेकरी बायरन हॅडली हा शुद्ध जनावर असल्यानं त्याच्या वाट्याला कुणीही जाऊ नये. अँडीच्या समोरच त्यानं एका कैद्याला मरेस्तोवर मारलं होतं. हॅडलीला मिळालेल्या वडिलार्जित इस्टेटीचा मोठा वाटा करापोटी जाणार म्हणून तो खंतावलाय. अँडीनं त्याला सांगितलं की, ‘बायकोला वन टाइम गिफ्ट दिलीये इस्टेट’ असं लेखी कळव महसूल खात्याला. टॅक्‍स लागणार नाही.’’ हॅडली खूश झाला. मग अँडी कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचा टॅक्‍स कन्सल्टंटच झाला. इतका की तुरुंगाचा वॉर्डन सॅम्युअल नॉर्टननं त्याची उपयुक्‍तता ओळखून अँडीला लायब्ररीतच एक टेबल टाकून दिलं. इथं बसून हिशेब करत बस. अर्थात त्यात त्याचा एक कुटिल हेतू होताच.
एकदा तुरुंगात चित्रपट बघत असताना अँडीनं रेडकडं भलतीच मागणी केली. ‘रिटा हेवर्थचं पोस्टर मिळेल का?’

* * *
एवढ्यात एक भयानक बातमी आली. लायब्ररीमधल्या ब्रूक्‍सला मुक्‍त करायचं सरकारनं ठरवलं आहे. ब्रूक्‍स हादरला. या वयात जाणार कुठं? पण त्याला जावंच लागतं. मात्र, ब्रूक्‍स त्याच्या गावी पोचलाच नाही. मधल्याच एका गावातल्या लॉजमध्ये त्यानं आत्महत्या केली. गळफास लावून घेण्याआधी त्यानं दोन गोष्टी आवर्जून केल्या. एक पत्र लिहिलं ः ‘‘डिअर रेड, तुरुंगात आलो तेव्हा मोटारीचं चित्र पाहिलं होतं. सुटलो, तेव्हा रस्त्यांत त्या इतक्‍या सुळसुळताहेत की भीती वाटते. जगाला कसली घाई सुटली आहे? माहीत नाही. आपल्याला काहीच माहीत नाही, हे कळून हादरलो आहे...’’
मरण्यापूर्वी लॉजमधल्या तुळईवर त्यानं चाकूनं कोरून ठेवलं- ब्रूक्‍स वॉज हिअर.

* * *
स्टेट सेनेटला अँडी दर आठवड्याला एक पत्र लिहायला लागला. शॉशॅंकची लायब्ररी चांगली करण्यासाठी थोडं अनुदान द्यावं. सहा वर्षांच्या अथक पत्रव्यवहारानंतर सेनेटनं अखेर २०० डॉलर्सचा चेक पाठवला आहे. सोबत कळवलंय : ‘कृपया अधिक पत्रव्यवहार करू नये.’ अँडी आता आठवड्याला एक सोडून दोन पत्र पाठवू लागला. एक नंबरचा चिवट आहे! तरीही अँडीला तो आवडला आहे. काही नवी पुस्तकं लायब्ररीला मिळाली आहेत. कॉमिक्‍स. मासिकं. परिकथा. कादंबऱ्या. एखाददुसरी गाण्याची रेकॉर्डसुद्धा.

अँडीला त्या रद्दीत रत्न गवसलं आहे. मोझार्टचा प्रसिद्ध ऑपेरा ‘मॅरेज ऑफ फिगारो’ची सुरावट. अँडीनं मग सरळ पहारेकऱ्याला शौचालयात कोंडलं. वॉर्डनच्या हपिसाला आतून कडी घालून सार्वजनिक उद्‌घोषणा यंत्रणेद्वारे आख्ख्या तुरुंगाला मोझार्ट ऐकवला. मोझार्टच्या सुरावटी ऐकताना शॉशॅंकच्या भिंतींनाही अदृश्‍य तडे गेले. मुर्दाडांच्या जगात भलतेच अंकुर फुटले होते...

या भयंकर गुन्ह्याबद्दल अँडीला दोन आठवड्यांची अंधारकोठडी देण्यात आली; पण बाहेर आल्यावर अँडी रेडला म्हणाला ः ‘‘माझा आजवरचा सर्वोत्तम वेळ तिथं गेलाय. मोझार्ट माझ्यासोबत होता...’’
रेडला हे आवडलेलं नाही. त्यानं अँडीला सुनावलं ः ‘‘पोरा, तुझ्यापेक्षा काही पावसाळे जास्त बघितलेत मी. आशावाद ही आपल्यासारख्यांसाठी डेंजरस गोष्ट आहे. ती फालतूमध्ये रुजवू नकोस इथं. आशा धड मरू देणार नाही, ‘शॉशॅंक’ जगू देणार नाही. आशावादाची चैन इथं परवडणारी नाही!’’
अँडी ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये. त्याच्या डोळ्यात केशराच्या बागा डोलू लागल्या आहेत...
* * *
वॉर्डन सॅम्युअल नॉर्टनचे कैदी म्हणजे चीप लेबर आहेत. सरकारी कामांची कंत्राटं बेनामी मिळवून या कैद्यांना कामाला लावून तो बख्खळ पैसा ओढतोय. हा पैसा रिचवायला त्याच्याकडे अँड्य्रू ड्रुफेन नावाचा बुद्धिमान बॅंकर आहे. अँडीनं सारी बुद्धी पणाला लावून कुण्या रॅंडॉफ्ल स्टिव्हन्स नावाचं बनावट खातं उघडून नॉर्टनला रिचवून दिला आहे; पण तेवढ्यात तुरुंगात नव्यानं आलेला टॉमी नावाचा भुरटा चोर बातमी आणतो की अँडीनं खून केलेलेच नाहीत. ते ज्यानं केले त्याला मी भेटलो आहे, मागल्या तुरुंगात. अँडीनं नॉर्टनला गळ घातली- ‘नव्यानं खटला उभा करू द्या साहेब. माझी सुटका होईल.’ पण अँडीसारखी सोन्याचं अंड देणारी कोंबडी नॉर्टनला जाऊ द्यायची नाही.
त्याच रात्री तुरुंगातून पळून जाताना टॉमीला पहारेकऱ्यानं गोळी घातली. अँडी तिथंच राहिला.

* * *
एक दिवस अँडी स्वत:शीच बोलल्यासारखा रेडला म्हणाला ः ‘‘रेड, मी खरंच माझ्या बायकोला मारलं नाही; पण माझ्या स्वभावामुळं ती दूर गेली आणि तिनं व्यभिचार केला. माझं तिच्यावर प्रेम होतं. बक्‍सटनला तू गेला आहेस? तिथं एका शेतात अफाट ओक वृक्ष उभा आहे. त्या वृक्षाखाली मी बायकोसोबत पहिला शृंगार केला होता. तू कधी सुटलास तर तिथं जा. तिथं दगडांचा एक गडगा आहे. एक दगड तुला वेगळा दिसेल. तिथल्या आसमंताशी पूर्णत: विसंगत. त्या दगडाखाली तुला काही मिळेल. ते घे...मला पॅरोलवर सुटता आलं तर मी मेक्‍सिकोतल्या ‘झिहुआंतानेओ’ला जाईन. निळाशार प्रशांत समुद्र. एक बोट घेईन. मासे मारीन. एखादं चिटकुलं हॉटेल टाकीन. शांत जगीन...’’
‘‘हे असले विचार सोडून दे अँडी. आपण इथून कुठंही जाणार नाहीओत.’’
‘‘रेड, जगण्यात बिझी राहायचं की मरण्यात हे ज्याचं त्यानं ठरवायच असतं...’’ एवढं बोलून अँडी गेला.
...एक-दोन दिवसांनी त्यानं जाडसर दोर मित्रांकडून मागून नेला. हे लक्षण ठीक नव्हतं.

* * *
सकाळी पाहिलं तर अँडी कोठडीत नव्हता. त्याच्या कोठडीत रॅकेल वेल्शचं पोस्टर आणि काही दगड सोडले तर काहीही नव्हतं. वॉर्डन नॉर्टननं आकाश-पाताळ एक केलं. रॅकेल वेल्शच्या पोस्टरवर त्यानं दगड फेकून मारला. कागद फाटून एक भुयार समोर उघडं झालं.
गेली दोन दशकं अँडी इथं भुयार खोदत होता...
भुयारातून थेट तुरुंगाच्या ड्रेनेजमध्ये. त्या गुवा-मुताच्या लगद्यातून जवळपास अर्धा मैल सरपटत ओढ्यात पडलेला अँड्य्रू ड्रुफेन हा जगातला सर्वात स्वच्छ माणूस होऊन बाहेर निघाला होता.
पुढं कालांतरानं रेडलाही पॅरोल मिळाला. रेडनं बक्‍सटनचं शेत गाठलं. गडग्यात त्याला त्या चमकदार दगडाखाली एक पत्र आणि काही डॉलर्स ठेवलेले मिळाले. रेडनंसुद्धा मेक्‍सिकोचा किनारा गाठला.
...मुक्‍ती कुणी देत नसतं. ती आपल्यालाच मिळवायची असते.

* * *
टिम रॉबिन्स या उंचाड्या नटानं अँडी अफलातून रंगवलाच; पण त्याहीपेक्षा दाद घेऊन गेला तो रेड झालेला मॉर्गन फ्रीमन. टिम रॉबिन्सनं या चित्रपटाचं एका वाक्‍यात सार्थ समीक्षण केलंय : दोन पुरुषांमधली ही अलैंगिक प्रेमकहाणी आहे.
रॅंक डॅराबाँट या दिग्दर्शकानं तयार केलेली ही पटकथा आजही जगभरातल्या अनेक फिल्म इन्स्टिट्यूट्‌समध्ये शिकवली जाते. स्टिफन किंग हे इंग्लिशमधले गाजलेले कादंबरीकार. त्यांचीच एक १९८२ मध्ये लिहिलेली एक चिमुकली कादंबरिका होती : रिटा हॅवर्थ अँड शॉशॅंक रिडिम्प्शन...त्याच कादंबरिकेचं हे चित्ररूप.

गंमत म्हणजे या चित्रपटाला कसलंही ऑस्कर मिळालं नाही. तरीही ते एक अजरामर चित्रलेणं ठरलं. टिम रॉबिन्सचा रोल खरं तर टॉम हॅंक्‍सकडं जाणार होता; पण तो तेव्हा ‘फॉरेस्ट गम्प’च्या शूटिंगमध्ये बिझी होता. हा चित्रपट तेव्हा गल्लाही धड खेचू शकला नाही. नंतर मात्र त्यानं इतिहास घडवला. मॉर्गन फ्रीमनच्या मते हा त्याच्या संपूर्ण करिअरमधला सगळ्यात चांगला रोल होता. पैसा मिळवला नसला तरीही दिग्दर्शक डॅरामाँटही खट्टू झाला नाही, किंबहुना या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांनाच ‘शॉशॅंक’बद्दल सार्थ अभिमान आहे. इतकंच काय, म्हातारी रॅकेल वेल्शसुद्धा ‘मीसुद्धा त्या सिनेमात महत्त्वाचा रोल केलाय बरं का!’ असं एके ठिकाणी म्हणाली. चित्रपटात तिचं फक्‍त पोस्टर आहे!

...हा चित्रपट मिळवा. टॉरेंट किंवा अन्य स्थळांवर तो उपलब्धही आहे. टीव्हीवरही बऱ्याचदा लागतो. आवर्जून पाहा. खचलेल्या मनस्थितीत तर नक्‍कीच पाहा. अडचणीच्या डोंगरांमधून वाट काढत असाल, तर हा चित्रपट तुमचं औषध आहे. दु:खाची श्‍वापदं चवताळून अंगावर येत असतानाच्या काळात वेळ काढून पाहा...सुखातही पाहाच! मनाचं मळभ दूर होऊन तिथं स्वच्छ पिवळंधम्म ऊन पडेल. इंद्रधनूचे सप्तरंग कमान टाकून हसून म्हणतील : ‘‘काय...बरं आहे ना?’’ तुम्ही डोळे पुसत ‘‘हो’’ म्हणाल. गॅरेंटी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com