सुरुंग! (प्रवीण टोकेकर)

सुरुंग! (प्रवीण टोकेकर)

गेल्या वर्षीच हा चित्रपट आला होता. आला आणि येऊन गेला. त्याचं नाव ः माइन (Mine). सुरुंगावर पाय पडलेल्या माईक नावाच्या एका स्नायपरची ही कहाणी आहे. चित्रपटाचं फारसं कौतुक झालं नाही; किंबहुना बरीचशी टीकाच त्याच्या वाट्याला आली. मात्र माईकचा सुरुंगावर पाय पडतो, तिथपासूनचे पावणेदोन तास हा चित्रपट पाहताना आपण जी. ए. कुलकर्णी यांची एखादी कथा तर पाहत नाही ना, असा भास होत राहतो...चित्रपट संपल्यावर जाणवतं की अरे, हा युद्धपट वगैरे नव्हताच. हे तर चक्‍क आयुष्यावरचं अतिवास्तववादी विधान आहे!

वरून सूर्य आग ओकतोय. समोर अफाट वाळवंट पसरलेलं. उत्तर आफ्रिकेतल्या त्या वाळवंटातल्या टेकाडावर अमेरिकी नेमबाज सैनिक - माईक त्याचं नाव - लांब नळीची बंदूक ताणून कुणाची तरी वाट पाहतोय. कुणाची तरी म्हणजे लक्ष्याची. एक खूँखार दहशतवादी तिथं येणार आहे, अशी खबर आहे. त्याला टिपून परत यायचं, अशी कामगिरी माईकवर वरिष्ठांनी सोपवली आहे. अर्थात स्नायपर माईक एकटा नाही. सोबत त्याचा स्पॉटर टॉमीसुद्धा आहे. लक्ष्य ओळखून कधी गोळी झाडायची, त्याची खूण करणारा स्पॉटर आणि ट्रिगर ओढणारा स्नायपर यांची नेहमी एक जोडी असते सैन्यात. तसेच हे दोघं.

...वाळवंटातून येणारा मोटारींचा एक ताफा दिसू लागतो. दोघंही तय्यार होतात...पण हे काय? दुसऱ्या बाजूनं एखादं वऱ्हाड येतंय का? कुणाची तरी बेगम व्हायला निघालेली एक नवरीमुलगी दिसतेय. वऱ्हाड आहेच; पण सोबत सशस्त्र दहशतवाद्यांचं कवचही आहे. या लगीनगोंधळात माईकला गोळी चालवायची आहे. स्पॉटर रेडिओवरून वरिष्ठांना आदेश विचारतो. उत्तर येतं ः उडवा. या टार्गेटसाठी खूप मेहनत आणि महिने वाया गेलेले आहेत. आणखी एक-दोघं उडाले, तरी तमा बाळगायचं कारण नाही. उडवा.

पण स्नायपर हा सोल्जर असला तरी माणूसच आहे. नवऱ्यामुलीच्या कपाळाचं ममतेनं चुंबन घेणाऱ्या त्या दहशतवाद्याची आत्ता याक्षणी कवटी उडवायची? माईकचा हात थरथरतो. तेवढ्यात त्याच्या रायफलचं पोलाद चमकतं. दहशतवाद्यांना चाहूल लागते. गोळ्यांच्या वर्षावातच माईक आणि टॉमी पळ काढतात. मोहीम सपशेल फसते.

वाळूचं घोंघावत आलेलं वादळ माईकला आणि टॉमीला वाचवतं; पण त्यांचा रस्ताही चुकवतं. अफाट वाळवंटात ते दोघं उभे आहेत. अंगावर मरिन्सचा सगळा बोजड जामानिमा बाळगत. रेडिओ. औषधं. पाण्याची बाटली. बंदुकीच्या गोळ्या. दुर्बिण. जीपीएस. चाकू. नकाशे. जाडजूड बूट. हेल्मेट...बरंच काही. वावटळीमुळं त्यांना घ्यायला हेलिकॉप्टर येऊ शकत नाही. जीपसुद्धा अशक्‍य आहे. ‘तिथंच राहून वाट पाहा किंवा वाळवंट चालत ओलांडा,’ असं त्यांना रेडिओवरून सांगण्यात आलं आहे.
इतक्‍यात एका जुनाट पत्र्याची गंजकी पाटी वाऱ्यावर उडत माईकच्या पायाशी येते. ‘डेंजर ः पुढं सुरुंग आहे!’

स्वत:शीच बोलल्यासारखा तो म्हणतो : ‘गेल्या ४० वर्षांत उत्तर आफ्रिकेच्या या भयाण वाळवंटात किमान आठ हजार युद्धं झाली आहेत. या काळात तब्बल तीन कोटी भुईसुरुंग इथं पेरले गेले आहेत...पाऊल जपून टाक रे, टॉमी.’
‘‘मि. विकिपीडिया, ही भंकस आहे, हे कळतंय का? इथले बेदुईन रहिवासी आपापली गावं सुरक्षित राहावीत म्हणून असल्या पाट्या लावतात, हे ठाऊकेय ना? या पाटीचा अर्थ इतकाच, की जवळच एखादं खेडं आहे. तिथं जाऊन आपण पलटणीशी संपर्क साधू. मला घरी जायचंय. बायकोची आठवण येत्येय, यार!’’ टॉमीची टकळी पुन्हा सुरू झाली. बडबडत, चालत दोघांची दमछाक झालेली असतानाच टॉमीच्या पायाखाली क्षीण आवाज येतो ः क्‍लिक...

पाठोपाठ चालणारा माईक त्याला ओरडून सांगणार, तेवढ्यात टॉमी पाऊल उचलतो. धडाम. एक वाळूचा अजस्र लोट उसळतो. थोड्या वेळानं दिसतो तो दोन्ही पाय गुडघ्याखाली साफ गमावलेला टॉमी. एक वाळूचा खड्डा, रक्‍त आणि...माईक त्याच्याकडं धाव घेतो. तेवढ्यात त्याच्याही पायाखाली आवाज येतो ः क्‍लिक...
स्टॅच्यू. एक पाऊल जरी उचललं तरी आता चिंधड्या उडणार. समोर आपला सोबती मरतोय. आपल्या पायाखाली सुरुंग जिवंत झाला आहे. ओह गॉड.
‘‘टॉमी, हादरून जाऊ नकोस. डोकं शांत ठेव. तुझ्या जाकिटाच्या खिशात मॉर्फिन आहे. ते स्वत:ला टोचून घे. वेदना कमी होतील. रेडिओ तुझ्याकडं आहे, हे विसरू नकोस. मी इथून हलू शकत नाहीए...’’ पण दोन्ही पाय गमावल्यानं खलास झालेल्या टॉमीनं कमरेचं पिस्तूल काढून स्वत:च्या डोक्‍यात गोळी झाडून एक विषय संपवला. माईकच्या डोळ्यांदेखत.
- माईक हादरून गेला होता. रेडिओ दूर पडलेला. समोर सोबत्याचं कलेवर. वर आग ओकणारा सूर्य. पायाखाली निर्दय वाळवंट आणि त्याहीपेक्षा क्रूर सुरुंग.
* * *

- माईकनं पाय उचलायचा नाहीए. उचलला की तो संपला.
बऱ्याच खटपटी लटपटी करून तो टॉमीचा रेडिओ जवळ ओढतो. बेस कॅम्पशी संपर्क साधतो.-मार्गो ४. मी क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहे. मला बाहेर काढा. ओव्हर.
एक्‍स्प्लेन युअर सिच्युएशन. ओव्हर.
सुरुंगावर पाय पडून मी स्पॉटर गमावला आहे. माझा पायसुद्धा सुरुंगावर पडला आहे. ओव्हर.
उत्तर सीमेवर चकमकी सुरू आहेत. दक्षिणेकडून धुळीची वादळं येताहेत. आपला कॉन्व्हॉय आणखी ५२ तास तरी तुझ्यापर्यंत पोचणं शक्‍य नाही. ओव्हर.
ओह गॉड. डू समथिंग. ओव्हर.
भुईसुरुंगांची स्फोटक्षमता पाच वर्षांनंतर पाच टक्‍के कमी होते. दहा वर्षांनी सात टक्‍के. त्यांचे स्फोट होतातच, असं नाही. त्यातून शूमन मॅनूव्हर ट्राय करून बघ. ओव्हर.
शूमन मॅनूव्हर? किस माय **!!. ओव्हर.
...शूमन मॅनूव्हर म्हणजे सुरुंगावरचा पाय तसाच ठेवून शेजारी हातानं एक खड्‌डा खणायचा. बुटातून पाय हळूच काढून घेऊन खड्ड्यात जमेल तितकं बुडायचं. जुनाट सुरुंगाचे सेन्सर थोडे लेट जागे होतात. तेवढ्या सेकंदात कदाचित जीव वाचतो; पण पाय नव्हे.
* * *

त्या ५२ तासांत माईकला सुरुंगावर उभं राहून असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं. बेभान वाळूच्या वावटळी. रणरणती उन्हं. तहान. एकाकीपणा. दूरवर तो कोण येतोय? कुणी स्थानिक रहिवासी असावा.
काळा कुळकुळीत. किडकिडा. टोपीवाला. विचित्र झगा. तो माणूस माईककडंच बघतोय. हे...हे...इकडे ये. डू यू अंडरस्टॅंड मी? मी सुरुंगावर उभा आहे. पाय उचलला की धडाम. व्हुश्‍श...
‘‘व्हुश्‍श..’’ तो माणूस म्हणाला.
‘‘तुला गंमत वाटतेय का?’’ माईक वैतागलाच. झिगझॅग तिरका तिरका चालत तो माणूस माईककडं येऊ लागला. याला सुरुंगाच्या जागा माहीत आहेत की काय? की यानंच पेरलेत? स्टॉप...स्टॉप. माईकनं त्याला पाणी मागितलं. काहीही न बोलता तो माणूस चक्‍क निघून गेला. नरकात जाईल लेकाचा.
थोड्या वेळानं एक चिमुरडी मुलगी झिगझॅग धावत आली. त्या बेदुईनचीच असावी. तिनं माईकला बाटलीभर पाणी दिलं. माईकनं खिशातली एक ‘जीआयजो’टाइप सैनिकासारखी बाहुली काढून तिला देऊन टाकली.
चहूबाजूंनी चालून येणाऱ्या वाळवंटातल्या काळोख्या रात्रीसाठी माईक सज्ज झाला. बिचारा माईक. एक पाय सुरुंगावर. दुसरा गुडघा टेकलेला.
...रात्रीच्या काळोखात माईकला लांडग्यांची गुरगुर ऐकू आली. टॉमीचं कलेवर फरफटलं गेल्याचे आवाज आले. अंदाजानं माईकनं गोळ्या झाडल्या; पण लांडगे बरेच असावेत. गोळ्यांमुळं ते माईकजवळ आले नाहीत. आज त्यांना टॉमीचं कलेवर मिळालं होतं. उद्या कदाचित...कदाचित माईकचाही नंबर असेल.
* * *

‘‘तू पाय उचल!’’ मोडक्‍या तोडक्‍या इंग्लिशमध्ये तो बेदुईन माणूस म्हणाला. याला वेडबीड लागलंय का? मरेन ना मी लेका.
‘‘मी पाय उचलला. स्वतंत्र झालो. तूसुद्धा उचल,’’ तो पुन्हा म्हणाला. हॅड! मूर्ख लेकाचा.
‘‘अरे, माणसानं पाय उचलायचा असतो वेळीच. नाही उचलला तर प्रॉब्लेम! ‘कुणीतरी येईल...मला वाचवेल,’ या आशेत अडकलायस तू. असं कुणी येत नसतं. आपणच उचलायचा असतो पाय...आणि कशावरून तुझ्या पायाखाली सुरुंग असेल, अं? साधा टिनाचा डबाही असू शकेल. उगीच उभा राहशील टिनाच्या डब्यावर जगाच्या अंतापर्यंत! हाहा!! उचल पाय!!’’
‘‘तुला लेका, इथले सुरुंग माहीत आहेत म्हणून तू तिरका तिरका चालतोस.’’ माईक म्हणाला.
‘‘छे. मला कुठले माहीत असायला? मी आपला असाच चान्स घेत चालतो. मनाचं समाधान, बाकी काही नाही! काहीतरी हुकवल्याचं समाधान असतंच ना?’’ तो म्हणाला.
‘‘एकतर तू मूर्ख आहेस किंवा चालू आहेस,’’ माईक सटकला होता.
‘‘अरे, माझाही पाय सुरुंगात गेला होता. हा बघ, लाकडी लावलाय. माझी मुलगीसुद्धा सुरुंगाच्या स्फोटात गेली. ती आता येणार नाही. काहीही झालं तरी पाय उचलावाच लागतोय तुला मित्रा!’’ तो पुन्हा म्हणाला.
त्या बेदुईन माणसाच्या अर्धवट बडबडीनं माईकच्या डोक्‍याला मुंग्या आल्या होत्या. तहानेनं जीव फाटून गेलेला. भुकेच्या भावना तर बधीर झालेल्या. त्याला वेगवेगळे भ्रम व्हायला लागले.
...आईला उठता-बसता हाणणारा एक नालायक बाप होता. सतत दुर्मुखलेली, आजारी आई होती. ही परिस्थिती कधी सुधारलीच नाही. आपण काय केलं? काहीच नाही. ना बापाला रोखण्यासाठी पाय उचलला, ना आईला सावरण्यासाठी. शेवटी या सगळ्यापासून सुटका करून घेण्यासाठीच आपण सैन्यात दाखल झालो. पळ काढला आपण. आयुष्यात पराभूत झालेला नेभळट सोल्जर.
....जेनीचंही तसंच. तिचं प्रेम कळत होतं; पण तिला प्रपोज करायला जीभच रेटली नाही कधी. ‘माझं तुझ्यावर आभाळाएवढं प्रेम आहे,’ हे असं गुडघ्यावर बसून म्हणायला काय झालं होतं? जास्तीत जास्त काय झालं असतं? ती ‘नाही’ म्हणाली असती; पण तिथंही काढलाच पळ. शेपूटघालू सोल्जर माईक. तुमच्या नेमबाजीच्या बैलाला...

...हॅट! साला काहीच धड होत नाही आपल्या आयुष्यात. ज्याला म्हणून हात लावायला जावं, ती वस्तू बघता बघता विरघळत जाते. आयुष्य नासल्यासारखं होतं. बापावर एकदा तरी हात उचलायला हवा होता. आईलासुद्धा कित्ती वर्षांनी भेटलो? तेही ती कॅन्सरनं मरणपंथाला लागली तेव्हा. तेव्हाही...
जेनी, मला खरंच माफ कर. तुला सांभाळण्याचं धैर्य माझ्यात नाही. त्या वाळवंटात घरं उभी राहिली. भिंती उभ्या राहिल्या. विरून गेल्या. आपली माणसं इथं भेटायला आली. चार गोष्टी बोलून गेली. हात लावायला जावं, तोवर विरघळून गेली...क्षितिजावर तर बाप अजूनही सुटाबुटात हिंडताना दिसतोय. तो बघ. तो न्यायला आलाय तुला माईक.
‘‘हे बडी, जागा हो, जागा हो!’’ टॉमी चक्‍क उठून बसला होता.
‘‘तू मेला होतास ना?’’
‘‘मरेगा मेरा दुश्‍मन. कॉन्व्हॉय पास होतोय. तुझ्याकडची फ्लेअर उडव आभाळात लौकर’’ टॉमी म्हणाला...
-माईक भानावर आला. सॅक दूरवर पडलेली. ओह गॉड, कधी होणार सुटका?
अखेर त्यानं निर्णय घेतला. पाय उचलायचा. उचलावाच लागणार. नाहीतर सुटका नाही.
- माईकनं पाय उचलला? मग काय झालं?
* * *

गेल्या वर्षीच हा चित्रपट आला होता. आला आणि येऊन गेला. त्याचं नाव ः माइन (Mine).
सुरुंगावर पाय पडलेल्या माइक नावाच्या एका स्नायपरची ही कहाणी आहे. चित्रपटाचं फारसं कौतुक झालं नाही. किंबहुना, बरीचशी टीकाच त्याच्या वाट्याला आली; पण माईकचा सुरुंगावर पाय पडतो, तिथपासूनचे पावणे दोन तास हा चित्रपट पाहताना आपण जी. ए. कुलकर्णी यांची एखादी कथा तर पाहत नाही ना, असा भास होत राहतो. माइन म्हणजे सुरुंग की ‘माइन’ म्हणजे ‘माझं’?
चित्रपट संपल्यावर जाणवतं की अरे, हा युद्धपट वगैरे नव्हताच. हे तर चक्‍क आयुष्यावरचं अतिवास्तववादी विधान आहे. बघता बघता चित्रपट फिलॉसॉफिकल कधी होतो कळतच नाही. आर्नी हॅमर नावाच्या तरण्याबांड अभिनेत्यानं एकट्यानं हा चित्रपट वाळवंटातून तारून नेला आहे. इतर ज्या व्यक्‍तिरेखा आहेत, त्यांतला स्पॉटर टॉमी लक्षात राहतो. बेदुईनची भूमिकासुद्धा विलक्षण आहे. विल्यम शेक्‍सपीअरच्या ‘किंग लिअर’मध्ये एक ‘फूल’ आहे. वरकरणी गमत्या; पण आतून सखोल. त्याच टाईपचा हा बेदुईन आहे. या चित्रपटात नायक दोन. एक अर्नी हॅमर आणि दुसरा कॅमेरामन सर्गेइ विलानोवा क्‍लॉडिन! उत्तर आफ्रिकेतलं वाळवंट आणि माईकची हॅल्युसिनेशन्स त्यानं अशी काही टिपली आहेत की जब्बाब नही. अर्थात या चित्रपटाचं शूटिंग झालं कॅनरी बेटांवरच्या वाळवंटात.

अँद्रिया बोनिनीचं पार्श्‍वसंगीत कमालीचं प्रभावी आहे. फॅबिओ रेझिनेरो आणि फॅबिओ गुआग्लिओनी या जोडगोळीनं हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शितही केला आहे.
अर्थात या चित्रपटात अनेक दुबळ्या बाजूही आहेत. उदाहरणार्थ ः सुरुंगावरच्या सैनिकाची दिलेरी दिसण्याऐवजी तो तिथं घरगुती भांडणं, आजारपणं, नैराश्‍य असल्या तद्दन सामान्य गोष्टींशीच झगडताना दिसायला लागतो. ‘या असल्याच गोष्टी दाखवायच्या तर त्या बिचाऱ्याला युद्धभूमीवर सुरुंगावर उभं करण्यात काय पॉइंट होता? हे म्हणजे वाघाचं चित्र दाखवून उंदीर पुढं करण्यासारखं झालं...’ अशी टीका या चित्रपटावर झाली. साधारणत: अशाच काहीशा कथानकावर डॅनिस टॅनोविकनं २००२ मध्ये ‘नो मॅन्स लॅंड’ केला होता. त्याला ऑस्कर मिळालं होतं. ‘माइन’ त्याच्या जवळपाससुद्धा जात नाही; पण हा तांत्रिकदृष्ट्या नक्‍कीच सरस ठरला आहे.
बॉक्‍स ऑफिसवरही हा सुरुंग पुरेशा जोरकसपणानं फुटला नाही. तरीही त्याची मध्यवर्ती कल्पना स्तिमित करणारी आहे, हे कुणीही मान्य करेल. लक्षात राहणारा सिनेमा आहे, हे नक्‍की. तो सुरुंगाच्या पिनेचा आवाज बरेच दिवस स्मरणात राहतो. अदृष्टाची चाहूल लागताना मनात येतो तसा : क्‍लिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com