पाषाणाची घडवुनी मूर्ती... (प्रवीण टोकेकर)

पाषाणाची घडवुनी मूर्ती... (प्रवीण टोकेकर)

अनेक युगांपूर्वी सायप्रस देशात घडलेली ही कहाणी. चौदा दिवस आणि चौदा रात्री अखंड हातोडा-छिन्नी चालवत मूर्ती घडवणारा पिग्मॅलियन क्षणभर थांबला. त्यानं मूर्तीकडं पाहिलं. एक कमनीय संगमरवरी लावण्यवती त्याच्यासमोर उभी होती. तो तिच्या प्रेमातच पडला. ‘‘ओह, गॅलाटिया...’’ तो उद्‌गारला. गॅलाटिया म्हणजे दुधाप्रमाणे शुभ्र कांतीची. त्याचं लक्ष पार उडालं. त्याला कुठलीही जिवंत स्त्री आवडेनाशी झाली. तहान-भूक हरपून तो निर्जीव गॅलाटियाच्या सान्निध्यात दिवस कंठू लागला. अखेर एक दिवस तो प्रेमदेवता ॲफ्रोडिटीच्या मंदिरात गेला. फुलं अर्पण करून तो देवतेला म्हणाला ः ‘‘हे आशीर्वचनी, माझ्या शिल्पात प्राण फुंकून दे. तिजला जिवंत कर. तीच माझी प्रेयसी आहे.’’

...घरी येऊन त्यानं पुन्हा एकदा मूर्तीसमोर ठाण मांडिलं. अधीर होऊन त्यानं त्या संगमरवरी मूर्तीच्या ओठांवर ओठ टेकिले. तो चमकला. ओठांचा उष्ण स्पर्श आणि एक अननुभूत शहारा त्याच्या देहातून दौडत गेला. त्यानं पुन:पुन्हा तिचं चुंबन घेतलं. हरेक स्पर्शाबरोबर ती मूर्त प्राणमयी होत गेली. देवी ॲफ्रोडिटीनं त्याची प्रार्थना ऐकिली होती. पिग्मॅलियननंही आपलं वचन पाळलं. गॅलाटियाशी त्यानं रीतसर विवाह केला. त्यांना पाफोस आणि मेथमी ही दोन मुलं झाली... 

(प्राचीन ग्रीक कवी पुब्लियस ओविडिअस नासो ऊर्फ ओविड लिखित ‘मेटामॉर्फोसिस’ या महाकाव्यातल्या कहाणीचा गोषवारा. खिस्तपूर्व ४३ वं शतक).

* * *

शंभराहून अधिक वर्षं होऊन गेली; पण सर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’नं मानवी कलाविश्वावर घातलेली मोहिनी उतरणं अजून काही शक्‍य होत नाही. विविध रूपबंधांद्वारे ही कहाणी वारंवार रसिकांसमोर येतेच आहे. कधी ती नाटकातून आली, तर कधी संगीतिकेतून. नृत्यनाटिका, एकांकिका, रंगचित्रं, काव्य, चित्रपट, टीव्ही-मालिका, कहाण्या...किती तरी प्रकारे ही गोष्ट आजवर सांगितली गेली असेल, त्याला गणती नाही. आपल्याकडं पु. ल. देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’च्या स्वरूपात या गोष्टीचं सोनं करून ठेवलं आहे, हे ओघानं आलंच. 

रस्त्यावरची एक अनपढ, गॅंवार फुलवाली. विद्वत्तेच्या कैफात त्या फुलवालीचं सुसंस्कृत, शालीन स्त्रीमध्ये रूपांतर करण्याची पैज लावणाऱ्या आणि ती बऱ्याच अंशी जिंकणाऱ्या एका प्राध्यापकाची ही कहाणी. कहाणी म्हणायला प्राध्यापकाची; पण फुलवालीचीच जास्त आहे. मुख्य म्हणजे ती एक अलवार, सुंदर प्रेमकथा आहे. अभिजाताचं वरदान घेऊनच ती जन्माला आली आहे. सर बर्नार्ड शॉ यांनाही ही कहाणी एक नाटक बघूनच सुचली होती. ‘पिग्मॅलियन’ ही गोष्ट त्या काळातल्या प्रस्थापित लेखकांना कायम भुरळ घालत असे; पण त्याला ‘शॉ-स्पर्श’ मिळाल्यावर, अखंड शिळेतून जिवंत शिल्प निर्माण व्हावं, तसं काहीसं झालं.

या कथावस्तूची रूपं अनेक. ‘माय फेअर लेडी’सारखं अजरामर संगीतनाटक जन्माला आलं. त्याच नावाचा अप्रतिम चित्रपटही आला. काही काळानं टप्प्याटप्प्यानं अनेक त्याच धाटणीचे चित्रपट आले. एका सडकछाप मवाल्याचं रूपांतर यशस्वी उद्योजकात करून दाखवणारा एडी मर्फीचा ‘ट्रेडिंग प्लेसेस’ (१९८३), पोशाखांच्या दुकानाच्या दर्शनी भागी ठेवल्या जाणाऱ्या कचकड्याच्या बाहुलीच्या प्रेमात पडणाऱ्या निर्मात्याची कहाणी सांगणारा ‘मॅनेक्‍विन’ (१९८७), एका हृदयभंग झालेल्या तरुणानं पैजेवर निर्माण केलेल्या कॉलेजक्‍वीनची कहाणी सांगणारा, ‘शी’ज्‌ गॉट ऑल दॅट’ (१९९९) किंवा संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेनिशी सतत विकसित होत जाणाऱ्या आपल्या ‘ऑपरेटिंग सिस्टिम’च्या प्रेमात पडणाऱ्या एका एकाकी तरुणाची कहाणी सांगणारा ‘हर’(२०१३)...असे कितीतरी चित्रपट सांगता येतील. यांपैकी ‘हर’ हा चित्रपट बराच वेगळ्या धाटणीचा आहे; पण त्यात ‘पिग्मॅलियन’चे अवशेष जागोजाग सापडतात. या प्रकारच्या चित्रपटांना हल्ली ‘निओ-पिग्मॅलियन चित्रपट’ असं लेबल लावलं जातं. ‘प्रेटी वूमन’ हा या सगळ्या चित्रपटांमधला यशस्वी आणि उजवा. ज्युलिया रॉबर्टसची फटाकडी भूमिका, रिचर्ड गेअरचा संयत अभिनय आणि सुंदर संगीत यांमुळं तुफान गाजलेल्या या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले. पिग्मॅलियनची मोडतोड केल्याबद्दल अभिजनांच्या शिव्याही खाल्ल्या, आणि गल्लाही मजबूत जमा केला. कधीही चुकवू नये, असा हा एव्हरग्रीन चित्रपट आहे.

* * *

एडवर्ड लुईस हे उद्योगक्षेत्रातलं मोठं नाव होतं. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेले मोठाले उद्योग किंमत पाडून उचलायचे आणि नंतर तुकड्यातुकड्यांनी विकून नफा कमवायचा, हा त्याचा किफायतशीर धंदा. बघायला गेलं तर हृदयहीन माणूस होता; पण हा बिझनेस आहे. इथं पैका हाच देव. इथं दया-माया नसते. एडवर्ड लुईसनं प्रचंड पैसा गाठीला मारला होता. 

लॉस एंजलिसच्या धनाढ्य वर्तुळात सहजपणे वावरत असताना एडवर्ड गोत्यात आला, त्याची ही गोष्ट.

हॉलिवूडच्या जवळपासच एका आलिशान हॉटेलात पार्टी होती. कुठल्या तरी स्पर्धक कंपनीच्या मालकानं दिलेली. तिथं जाणं भाग होतं. त्याचाच उद्योग एडवर्डला उचलायचा होता; पण त्या बिझनेस पार्टीला नटून-थटून यायला त्याच्या विद्यमान गर्लफ्रेंडनं चक्‍क नकार दिला. ‘मी तुझी आर्मकॅंडी आहे का?’ तिनं विचारलं. याचंही माथं भडकलं. ‘‘हो...मग?’’ हा म्हणाला. तिनं फोन आपटला. इथून सुरवात झाली...

आपल्या पार्टनरची, फिलिप स्टकीची भारी ‘लोटस एस्प्राइट’गाडी घेऊन एडवर्ड सरळ तिथून निघाला. उच्चभ्रू जोडप्यांनी रंगलेल्या पार्टीत आपण एकटेच सडेफटिंग फिरतो आहोत...हे बरं नाही दिसत. कुटुंबवत्सल, बायकोवर किंवा प्रेयसीवर नितांत, एकनिष्ठ प्रेम करणारा सद्‌गृहस्थ इथं इम्प्रेशन जमवतो. निदान तसं दिसण्याचा सगळ्यांचा प्रयत्न तरी असतो. एडवर्ड हा काहीसा बेधडकच माणूस होता; पण शेवटी धंद्यासाठी काहीही केलं पाहिजे, हाही त्याचा उसूल होताच. 

हॉलिवूड बुलेवार्डशी येईपर्यंत त्याच्या लक्षात आलं की तो रस्ता चुकला आहे. त्याचं मुक्‍कामाचं रिजंड बिव्हर्ली हॉटेल नेमकं कुठं राहिलं, ते त्याला कळेना. कोपऱ्यावरच्या अंधारात दोन-चार बायका उभ्या होत्या. त्यानं निरखून पाहिलं. ओह, हूकर्स...वेश्‍या आहेत त्या. धंद्याला उभ्या आहेत. बराच काळ बघून त्यानं शेवटी एकीला जवळ बोलावलं. 

‘‘हे स्वीटहार्ट, कसा आहेस?’’ मोटारीच्या खिडकीत एक रंगीत तोंड डोकावलं. ढांगुळी, अपरे कपडे घातलेली, चिक्‍कार भडक मेकप केलेली एक पोरगी उभी होती. गाडीची काच खाली करून ‘येतेस का?’ असं त्यानं विचारलं.

‘‘क्‍या करने का है?’’ तिनं तिचा रेट सांगितला. तो म्हणाला, ‘‘गाडीत बस.’’

‘‘मला... हॉटेलवर जायचंय. रस्ता माहीत नाही. तू चालव!’’ त्यानं शेवटी आपला हेतू सांगितला.

‘‘ओह, ड्रायव्हिंगचे पैसे आलक पडतील हां! तुला ही गाडी पन नाय चालवता येत?’’ ती म्हणाली.

‘‘नाव काय तुझं?’’ त्यानं विचारलं.

‘‘पायजेल त्या नावानं हाक मारा की! ’’ ती खिदळत म्हणाली. तिनं त्याचं नाव विचारलं.

‘‘मी एडवर्ड...’’ तो.

‘‘ भारी नाव आहे, शेठ! मला जाम आवडतं, येडवर्ड!’’ ती म्हणाली. थोड्याफार गप्पा झाल्या असतील- नसतील. हॉटेल आलं.

‘‘राहायचे किती घेशील?’’

‘‘ नाईटचे? पर्वडनार नाही शेठ तुम्हाला! तीनशे घेईन!’’

‘‘डन! चल आत...’’ त्यानं गाडी पार्क करून तिला थेट वरच्या मजल्यावरल्या आलिशान पेंटहाऊसमध्ये नेलं. विव्हियन वॉर्ड या धंदेवाल्या बाईनं हे जग कधीही पाहिलं नव्हतं. हा शेठ खुळा तरी दिसतोय किंवा विकृत, घाणेरडा तरी...वेळ आली तर बोंब ठोकून पळायचं, असा हिशेब करून ती थांबली. ‘बाकी काही करा, किस करायचं नाही, भलती भंकस चालणार नाही,’ असल्या अटी तिनं आधीच घालून टाकल्या.

...पण इथून पुढं आपलं आयुष्यच बदलणार आहे, हे तेव्हा त्या दोघांनाही ठाऊक नव्हतं.
* * *
सकाळी न्याहारीच्या वेळी एडवर्डनं निराळाच प्रस्ताव ठेवला.
‘‘आठवडाभर माझ्यासोबत राहशील? पैसे मिळतील...’’ तो म्हणाला.

‘‘येड लागलंय का? हितं कोण राहील? किती देणार?

‘‘किती घेणार?’’

‘‘दोन हजाराच्या खाली तर नाही येणार आपण!’’

‘‘डन...तीन देतो!’’

‘‘आयची बया, मी दोनमधी तयार झाली असती!’’

‘‘मी चारसुद्धा दिले असते!’’

...तिच्या अंगावरचे कपडे सभ्य नव्हते. महागडे तर अजिबातच नव्हते. चांगले कपडे आणि मेकपचं सामान वगैरे घेण्यासाठी त्यानं तिला वेगळे पैसे देऊ केले आणि भपकेबाज दुकानांमध्ये पिटाळलं. तिथं विव्हियनचा अवतार बघून कुणीही ढुंकून बघितलं नाही. हिरमुसलेली विव्हियन परत हॉटेलवर आली, तेव्हा तिथला मॅनेजर बार्नी थॉम्प्सन तिला स्पष्ट शब्दांत म्हणाला ः ‘‘हे बघ, या हॉटेलमध्ये तुझ्यासारखीला आम्ही प्रवेश देत नाही. मि. एडवर्ड लुईस हे आमचे मौल्यवान पाहुणे आहेत. त्यांच्या आग्रहाला मान देतोय; पण तुला इथं काही शिष्टाचार शिकून घ्यायला हवेत. भाषा बदलायला हवी.’’

‘‘म्हंजे?’’

‘‘उदाहरणार्थ, ‘माझी फाटली’ असं म्हणायचं नाही, ‘मी घाबरले’ असं म्हणायचं! ठीक आहे? काटे-चमचे कसे ठेवायचे, टुवाल कसा वापरायचा हे मी तुला शिकवीन!’’ बार्नीनं स्वत:हून तिच्या प्रशिक्षणाचं काम हाती घेतलं.

...खोलीत परतल्यावर बाथटबमध्ये शिरलेली विव्हियन ‘तीन हज्जार’ असं स्वत:शीच ओरडत कितीतरी वेळ खदाखदा हसत डुंबत होती. दुसऱ्या दिवशी त्याच भपकेबाज दुकानात एडवर्ड स्वत: तिला घेऊन गेला. ‘ती जेवढी सुंदर आहे, तितकं सुंदर तुमच्याकडं काही आहे का?’ अशी दुकानदाराकडं सुरवात करून त्यानं हजारो डॉलर्सचे कपडे तिच्यासाठी विकत घेतले. 

विव्हियन हुशार होती. भराभर शिकत गेली. श्रीमंतांच्या अनेक गोष्टींचं तिला हसू

यायचं. तिच्या मनात आलं, ही माणसं खरं बोलत नाहीत. आपल्या माणसालाही फसवू शकतात. पैशासाठी काय वाट्टेल ते करतील...वगैरे. एडवर्डलाही तिचं बोलणं पटायचं. ही पोरगी धंदेवाली असली तरी  खऱ्या बाण्याची आहे, हे त्याला एव्हाना दिसलंच होतं. दोघांच्याही अगदी ‘खऱ्या खऱ्या’ गप्पा होत. त्यात बेगडीपणा नव्हता. ‘‘लहानपणी मला नेहमी वाटायचं का मी संकटात पडणार...मग एक राजबिंडा राजपुत्र सफेत्त घोड्यावर बसून येणार. मला वाचिवणार! राणीसारखं ठिवणार...पण कसलं काय! रस्त्यावर आले ना!’’ कडवटपणे हसत एकदा ती म्हणाली.

...त्यानं तिला पोलोचा सामना बघायला नेलं. हॅटबिट घालून ही बया तिथं तोऱ्यात सुसंस्कृत वगैरे बोलली. पार्ट्यांमध्येही ती नेमस्तपणे बोलून चांगलं इम्प्रेशन पाडायची. इतकं की एडवर्डचा पार्टनर फिलिप स्टकी तिचा दिवाणा झाला. ही नवी ‘कन्या’ एडवर्डनं कुठं गटवली असेल? त्याला प्रश्‍न पडला.

‘‘एडी, जरा जपून...मला तर ती कॉर्पोरेट स्पाय वाटतेय. खासगी गुप्तहेर टाइप!’’ फिलिपनं सावध केलं.

‘‘वेडा आहेस...’’ असं म्हणत एडवर्डनं ती कुठं भेटली ते सांगितलं. फिलिपला घाम

फुटायचा बाकी होता. त्याची विव्हियनशी बोलायची भाषाच बदलली. भडकलेल्या विव्हियननं एडवर्डला बोल लावले. ‘गेला उडत तुझा तीन हजारांचा करार’ असंही सुनावलं. एडीनं हे लचांड उगीच मागं लावून घेतलं म्हणून फिलिप वैतागला होता; पण करणार काय? दिल लगा गधी पे तो परी भी क्‍या चीज है?

खासगी जेट विमानातून एडवर्डनं तिला सॅन फ्रॅन्सिस्कोला ‘ला त्राविएस्ता’ हा गाजलेला ऑपेरा बघायला नेलं. ऑपेरा हा तर अभिजनांचा खास प्रांत. तिथं विव्हियनसारखी बाई उपरीच; पण तिथं ‘‘नंतर विसरीन म्हणून आधीच सांगून ठेवते हं...आजची संध्याकाळ खूप चांगली गेली माझी!’’ ऑपेरागृहात पोचण्यापूर्वीच तिनं मॅनर्स पूर्ण करून ठेवले! ऑपेरात एका धनवंत शेठच्या प्रेमात पडलेल्या वारांगनेची शोकान्तिका पेश करण्यात आली होती. ती बघताना तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. सुरावटींनी तिला घायाळ केलं. रस्त्याच्या कडेला निब्बर झालेल्या मनात अजूनही एक हळवा कोपरा ओला आहे, हे तिचं तिलाच कळलं. एडवर्डलाही कळून चुकलं होतं, की या बाईनं स्वत:लाच नव्हे तर आपल्यालाही बदलून टाकलं आहे.

* * *

‘किस करायचं नाही’ असं सांगणाऱ्या विव्हियननं त्या रात्री स्वत:हून एडवर्डचं चुंबन घेतलं. आयुष्यात पहिल्यांदा ती प्रेमात पडली होती आणि यात लपवण्यासारखं काय होतं? एडवर्ड गप्प राहिला.

‘‘तुला एखादा छानसा फ्लॅट घेऊन देतो. तिथं भेटत जाऊ आपण नंतरही!’’ तो म्हणाला. तिला उत्तर मिळून गेलं होतं. ती ‘नको’ म्हणाली.

‘‘आविष्य त्या राजपुत्राच्या ष्टोरीसारखं नसतंय, शेठ! मी आहे थितं बरी आहे...’’ ती म्हणाली.

एडवर्डनं पैशाच्या मागं लागणं सोडलं. त्याला आता चांगला माणूस व्हायची इच्छा निर्माण झाली होती. त्याचा निर्णय फिलिपला पटला नाही. त्या भिक्‍कारड्या पोरीच्या नादाला लागून लेकाचा खुळावलाय, असं त्याला वाटलं. तो भडकला. हॉटेलातल्या खोलीत घुसून तो विव्हियनला नाही नाही ते बोलला. तिच्यावर जबरदस्तीही केली. तेवढ्यात परतलेल्या एडवर्डनं त्याच्या दोन-चार कानसुलात लावून त्याला खोलीबाहेर हाकलून दिलं. रडणाऱ्या विव्हियनला त्यानं ‘थांब ना’ असं सांगूनही काही उपयोग झाला नाही. बॅग उचलून रडतच ती निघून गेली...

पुढं काय झालं? एडवर्डनं तिला पुन्हा गळ घातली? की हे एका आठवड्याचं स्वप्न ठरलं? विव्हियन पुन्हा त्या रस्त्यावर जाऊन उभी राहिली? की राजपुत्र खरंच सफेत्त घोड्यावरून तिला घ्यायला आला? हे सगळं पडद्यावर पाहणं ग्रेट आहे.

वास्तविक ही स्टोरी लिहिली होती जे. एफ. लॉटन नावाच्या पटकथालेखकानं. तेव्हा त्या स्टोरीचं नाव होतं-

‘३०००’.  अमेरिकी उद्योगक्षेत्रात रस्त्यावरच्या ‘धंद्या’सारखेच व्यवहार चालतात, असा कडवट संदेश देणारी ही गोष्ट होती. भाषा तडकभडक. व्यक्‍तिरेखाही तशाच. उदाहरणार्थ ः विव्हियनचं कॅरेक्‍टर कोकेनच्या आहारी गेलेलं त्यात दाखवलं होतं. डिस्नीलॅंडला जाण्यासाठी पैसे मिळवण्याची संधी म्हणून विव्हियन हा एस्कॉर्टगिरीचा प्रस्ताव स्वीकारते. त्यात आठवडाभर ड्रग्ज घेता येणार नाहीत, अशी महत्त्वाची अट त्या कहाणीत होती. गडद रंगाचा हा चित्रपट बिलकूल नर्मविनोदी प्रेमकथेसारखा नव्हता; पण ‘कथानकात बदल करून त्याला प्रेमकथा म्हणून पेश केलं, तर निर्मितीसाठी वाट्टेल तेवढे पैसे देऊ,’ असा प्रस्ताव दिग्दर्शक गॅरी मार्शल यांच्यापुढं ‘डिस्नी’ कंपनीनं ठेवला. गोष्ट बदलली आणि आपोआप तिची रूपांतर ‘पिग्मॅलियन’च्या अवतारात झालं. 

‘पिग्मॅलियन’ हे नाटक सर्वथा अभिजनांसाठीच निर्माण झालेलं होतं. ‘माय फेअर लेडी’देखील उच्च अभिरुचीचं द्योतक म्हणूनच मानलं गेलं. ‘प्रेटी वूमन’ संपूर्णतया सामान्य प्रेक्षकांसाठी होता. शिवाय, ज्युलिया रॉबर्टसनं विव्हियनच्या व्यक्‍तिरेखेत अशी काही जान भरली की अनेकांनी नाकं मुरडून नाकारलेला हा चित्रपट अभिजात चित्रपटांच्या रांगेत जाऊन पोचला. ज्युलिया रॉबर्टसला त्या वर्षीचं ‘गोल्डन ग्लोब’ मिळालं. रिचर्ड गेअर हा तर नव्वदीच्या प्रारंभाला जगभरातल्या तरुणींचा लाडका बनून गेला होता. तत्पूर्वी, आठ-दहा वर्षांपूर्वी १९८२ मध्ये ‘ॲन ऑफिसर अँड जंटलमन’ या नितांतसुंदर प्रेमपटात त्यानं आपली जादू दाखवलीच होती. ‘प्रेटी वूमन’ हा तर त्याला चाळिशीत मिळालेला चित्रपट; पण त्यानं साकारलेला एडवर्ड लुईस भलताच राजस वाटला.

दिग्दर्शक गॅरी मार्शल यांनी दोन पथ्यं पाळली. संवाद अतिशय चटकदार, बऱ्यापैकी

सडकछाप आणि विनोदी ठेवले. संगीत मात्र शुद्ध अभिजात वापरलं. विख्यात गीतकार, संगीतकार आणि गायक रॉय ऑर्बिसनचं साठीच्या दशकात गाजलेलं ‘ओह, प्रेटी वूमन...’ हे गाणं मार्शल यांनी शीर्षकगीत म्हणून निवडलं आणि चित्रपटाचं नाव ‘प्रेटी वूमन’ असंच तत्काळ जाहीरही करून टाकलं. सन १९८८ मध्ये ऑर्बिसन वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी अकाली गेला. त्याला ही श्रद्धांजलीही होती. १९६४ मध्ये तो आपल्या स्टुडिओत गाणं कम्पोज करत बसलेला असताना क्‍लॉडेट नावाची त्याची मैत्रीण आली आणि मी ‘नॅशव्हिलला जातेय’ असं ती म्हणाली. त्यावर ऑर्बिसननं तिला विचारलं, ‘‘बरं; पण पैसे आहेत का तुझ्याकडं?’’ त्यावर गोड हसून तिनं उत्तर दिलं ः ‘‘ अ प्रेटी वूमन नेव्हर नीड्‌स एनी मनी...चिकण्या बाईला पैशाची गरज भासत नाही!’’ त्याच्यानंतर पाऊण तासात ऑर्बिसनचं गाणं तयार झालं होतं. ते आजही जगभर गाजतंय. 

...एक संगमरवरी ओबडधोबड दगड असतो. कसबी संगतराश म्हणजेच शिल्पकाराला त्यातली मूर्ती दिसत राहते. त्या मूर्तीला चिकटलेले पाषाणाचे अनावश्‍यक तुकडे तो छिन्नीनं बाजूला काढतो. आपल्या समोर येते एक नितळ, आरस्पानी मूर्ती...तिच्यात जान फुंकण्यासाठी मात्र पिग्मॅलियनच जन्मावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com