नक्षलवादी चळवळींबाबत अभ्यासपूर्ण ऊहापोह

book review
book review

लोकशाहीत विविध चळवळींना महत्त्व दिलं जातं. समतेसाठी विविध समाजगटांकडून अनेक प्रकारच्या चळवळी आणि आंदोलनं केली जातात. या चळवळी आणि आंदोलनं लोकशाहीला पूरक आणि विकास करणाऱ्या असाव्या लागतात; मात्र जेव्हा एखादी चळवळ लोकशाहीसमोरच आव्हान उभी करते आणि राष्ट्रीय एकात्मतेलाच तडा देते, तेव्हा मात्र अशा चळवळीचा गांभीर्याने विचार करावा लागतो आणि ती कशी संपुष्टात येईल याविषयीचे मार्ग शोधावे लागतात. या संदर्भात नक्षलवादी चळवळीवरचं प्रा. डॉ. कल्पना कदम-बेद्रे यांचं "नक्षलवादी चळवळ आणि पोलिस प्रशासन-ऑपरेशन विजयकुमार' हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. या पुस्तकातल्या आठ प्रकरणांत या चळवळीचा इतिहास आणि विस्तार, तत्त्वज्ञान, भारतातलं या चळवळीचं स्वरूप, चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पोलिस यंत्रणा, नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्‍यातल्या नक्षलवादी चळवळीचा प्रमुख विजयकुमारचा धुमाकूळ आणि ही चळवळ थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यासंबंधीची सविस्तर आणि अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
लेखिकेनं एकूणच नक्षलवाद या विषयाचा ऊहापोह विविध अंगांनी केला आहे. भारतात नक्षलवाद का निर्माण झाला आणि फोफावला याची कारणमीमांसा पुस्तकात करण्यात आहे. या चळवळीच्या स्वरूपावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्‍सवादी लेनिनवादी) मते, सशस्त्र क्रांतीच्या मार्गानंच सत्तांतर होऊ शकतं. यातूनच पुढं माओवादी आणि नंतर नक्षलवादी चळवळ निर्माण झाली. याच चळवळीनं गेल्या 15-20 वर्षांत संबंध देशात धुमाकूळ घातला आहे. आदिवासी, गरीब, दलित, शोषित शेतकरी या चळवळीचे आधारस्तंभ असल्यामुळं साहजिकच लढण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या आणि अतिशय गुप्त प्रकारच्या संघटना या चळवळीत निर्माण केल्या जातात. याची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. या चळवळीचं एक तंत्र आहे. तिचा लेखिका मुद्दाम उल्लेख करते. हे तंत्र म्हणजे शत्रू बेसावध असतो, तेव्हा त्याच्यावर हल्ला करायचा आणि शत्रू आक्रमक बनतो तेव्हा माघार घ्यायची. याच तंत्राचा वापर करून नक्षलवाद्यांनी आजपर्यंत अनेक पोलिस अधिकारी, सरकारी कर्मचारी, राजकीय नेते आणि आदिवासी, शेतकऱ्यांच्या हत्या केलेल्या आहेत.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतही या चळवळीनं आपलं बस्तान बसवलं आहे. आंध्र प्रदेशच्या सीमेवरच्या किनवट भागात विजयकुमारच्या रूपानं या चळवळीचा प्रवेश आणि विस्तार कसा झाला याचीही अतिशय विस्तारानं या पुस्तकात माहिती देण्यात आलेली आहे. किनवट आणि माहूर हा आदिवासी आणि डोंगराळ भाग. या भागात गौड आदिवासींची संख्या जास्त आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही (तेंदू पानं, लाकूड) ठेकेदार आदिवासींची लूट करत असत. यातूनच विजयकुमारनं आदिवासींचा विश्‍वास संपादन केला. श्रीमंतांच्या शेतावरच्या धान्याची लूट करणं आणि ती गरिबांना वाटणं, खंडणी गोळा करणं, बस, गोठा, तेंदू पानांची खळी जाळणं, निवडणुकांवर बहिष्कार अशा गोष्टी तो करत असे आणि आदिवासींना आपला "मसिहा' वाटत असे. तो अतिशय चाणाक्ष आणि धूर्त होता. त्याचा कुणावरही विश्‍वास नव्हता. त्यानं नागरिक आणि पोलिस दलात प्रचंड दहशत निर्माण केली होती; पण त्या भागातल्या देवराव भुसारे या चांगल्या माणसाची हत्या केल्यामुळं त्याच्याविषयीची सहानुभूती संपली आणि त्याच्या मित्राचंच साह्य घेऊन पोलिसांनी त्याला संपवलं.

माओवादी आणि नक्षलवादी चळवळीवर उपाय काय, हा खरा प्रश्‍न आहे. पोलिस दलाला सामर्थ्यवान बनवणं हा एक मुख्य मुद्दा पुस्तकात मांडण्यात आला आहेच; मात्र लेखिका तेवढ्यावरच न थांबता आणखीही कारणमीमांसा करते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाबरोबरच लेखिका यासंबंधातल्या विकासाचा प्रश्‍नांचीही चर्चा करते आणि विविध उपाययोजनाही सुचवते. जमिनींच्या फेरवाटपाचा कार्यक्रम हाती घेणं; जंगल, जमीन आणि पाणी आदी नैसर्गिक साधनसंपत्ती पुन्हा आदिवासींच्या स्वाधीन करून नक्षलवादी चळवळीचा पायाच कमकुवत करणं; दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणाऱ्या योजना हाती घेणं; जंगलात रस्ते, पूल, उद्योगधंदे उभारणीच्या कामांसंदर्भात साकल्यानं विचार करणं; नक्षलवाद्यांकडून राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळणारी मदत थांबवणं; प्रचंड विषमतेमुळं असंतोष निर्माण होत असल्यानं ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणं इत्यादी अनेक मूलगामी उपाययोजनांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

या पुस्तकात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामध्ये राज्यात गेलेले बळी, नक्षलवाद्यांच्या अटकांचे तपशील, नक्षलवाद्यांनी केलेली अपहरणं, आत्मसमर्पण इत्यादी संबंधीची अधिकृत आकडेवारी देण्यात आली आहे. केवळ संदर्भग्रंथांचा वापर न करता नक्षलवाद्यांशी संबंधित विविध भागांत जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून पुस्तक लिहिल्यामुळं हे लिखाण अधिक वास्तववादी स्वरूपाचं झालं आहे.

पुस्तकाचं नाव : नक्षलवादी चळवळ आणि पोलिस प्रशासन : ऑपरेशन विजयकुमार
लेखिका : डॉ. कल्पना कदम-बेद्रे
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन, पुणे (9922224686)
पृष्ठं : 166/ मूल्य : 200 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com