झाडबुके म्हणाला...

झाडबुके म्हणाला...

अंधारयुग काही शतकांचेच असावे लागते असे काही नाही. ते काही दशकांचे वा काही महिन्यांचेही असू शकते. एकदा तर्काचा दुष्काळ पडला, म्हणजे विवेक, नीतिमत्ता, सद्‌भावना, बुद्धिमत्ता सगळ्यांचीच पातळी घसरते. भारतीय लोकांची जनुके जशी शतकानुशतके अन्नाच्या दुष्काळाला अनुकूल आहेत, तशी ती बौद्धिक दुष्काळालाही अनुकूल आहेत, असा तर्क कुणी काढत नाही. कारण असा तर्क काढण्यासाठी मुळात तर्काचा सुकाळ असावा लागतो.

झाडबुके म्हणाला
सत्य बाजूला ठेवून पोपटपंची करणारे कोट्यवधी जीव तयार झाले, तरी एका विशिष्ट काळानंतर त्यांचे बोलणे त्यांनाच खटकायला लागते. खोटे जिंकत राहिले, तरी ते सतत बोलण्यासाठी करावी लागणारी बौद्धिक मेहनत ही कालांतराने खोटे बोलणाऱ्याला दमवून टाकते. आपल्याकडे अशी खोटे बोलून रिकामी झालेली किती तरी खोकी आहेत. अंधारयुगात अनेक लोक या रिकाम्या खोक्‍यांचे अर्थ पुनःपुन्हा उलगडून सांगतात आणि नंतर रिकामे खोके बनून अगोदरच्या खोक्‍यांशेजारी जाऊन बसतात. आपला देश हा मृतविचारधारांच्या थडग्यांचे नंदनवन आहे.

झाडबुके म्हणाला
आज जगभर संगणकीय क्रांती झालीये आणि तरी गुगल ट्रान्स्लेटरमध्ये मराठीतले काही इंग्रजीत ट्रान्स्लेट करायला जावे, तर पोस्टमॉडर्निस्टांनाही लाजवतील अशी वाक्‍ये समोर येतात. संगणक विचार करू शकत नाही; पण शिकू शकतो. भारतीय भाषा शिकणे मात्र अजूनही संगणकाला जमले नाही. या भाषांच्या जननी संस्कृत आणि तमीळ या देवाच्याच भाषा असाव्यात, असा सिद्धांत पुनरुज्जीवनवाद्यांनी मान्य करण्यास हरकत नाही; पण मग पुनरुज्जीवनवाद्यांनाही पोस्टमॉडर्निझम स्वीकारावा लागेल. धर्मग्रंथात आहे तेवढी ॲब्सर्डिटी आपल्याला हजारो वर्षे पुरतीये, त्यात आणखी काही ॲब्सर्ड करायचे झाल्यास पुनरुज्जीवनवाद्यांचा मेंदू चारपट मोठा करावा लागेल.

झाडबुके म्हणाला
मेंदू मोठा असला म्हणजे तो प्राणी हुशारच असायला हवा असे नाही. निएंडरथलाचा मेंदू आपल्यापेक्षा मोठा होता म्हणून त्याने बौद्धिक क्रांती केली नाही, की शस्त्रांचा शोध लावला नाही. निएंडरथलचा उरलेला कुठला तरी ‘जीन’ आपल्या देशांतल्या लोकांमध्ये सापडत असावा, कारण आपल्याकडे मोफत इंटरनेट देऊ केले, तर लोक लगेचच टोरेंट वापरून सलमान खानचे पिक्‍चर डाउनलोड करायला लागतात. एक टीबीच्या हार्डडिस्कमध्ये सलमान खानचे एक हजार चित्रपट बसतात. उद्या आपल्याला कुणी दहा टीबीची हार्डडिस्क देऊ केली, तर लोक तिच्यात सलमान खानचे दहा हजार चित्रपट बसतात, असाच हिशेब करतील.

झाडबुके म्हणाला
जगात सर्वांत जास्त वायरसेस असलेले संगणक आणि मोबाईल फोन्स आपल्या देशात आहेत आणि आपण कॅशफ्री इकॉनॉमीसाठी प्रयत्न करतोय. इकॉनॉमी कॅशफ्री करण्याआगोदर मोबाईल व्हायरसफ्री व्हायला हवेत, असा विचार कुणी करताना दिसत नाही. आपल्याकडे संजीवनी वनस्पती कुठे असलीच तर एव्हाना तिचे भूछत्र होऊन त्यावर शंभर किड्यांनी घर बनविलेले असेल. हवेच्या प्रदूषणात आपला देश असाही क्रमांक एकचा देश बनतोच आहे; पण संगणकीय प्रदूषणात तो अगोदरच जगज्जेता ठरला आहे.

दिवाळीत न उडालेल्या फटाक्‍यात परत वाती टाकण्याच्या उद्योगाला प्रोत्साहन देणे हे ‘क्रिएटिव्ह’ आहे असे काही मूठभर लोक ओरडून सांगतायेत. त्यांना खऱ्या ‘क्रिएटिव्हिटी’चे अर्थ समजून सांगायची ‘क्रिएटिव्हिटी’ मात्र अद्याप कुणाकडे आलेली नाहीय. 
   झाडबुके म्हणाला..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com