पावसाळ्यातल्या धम्माली (राजीव तांबे)

पावसाळ्यातल्या धम्माली (राजीव तांबे)

बाबा म्हणाले ः ‘‘टेबलवर सहा फोटो ठेवलेले आहेत. हे फोटो पावसाळ्याशी संबंधित आहेत. प्रत्येक फोटोला एक क्रमांक दिलेला आहे आणि त्या क्रमांकाच्या चिठ्ठ्या बाऊलमध्ये आहेत. प्रत्येकानं एक चिठ्ठी घ्यायची आणि मग त्या चिठ्ठीच्या क्रमांकाचा फोटो घ्यायचा. तो फोटो काळजीपूर्वक पाहायचा आणि तो पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतात? तुम्हाला काय वाटतं? किंवा काय सुचवावंसं वाटतं?...याविषयी फक्त पाच ओळी लिहायच्या आहेत किंवा पाच मिनिटं बोलायचं आहे. विचार करण्यासाठी वेळ मिळणार आहे फक्त बारा मिनिटं. तो आपला समय शुरू होता है अब.’’

सकाळपासून पावसाचा ताशा वाजत होता. चांगलाच पाऊस लागला होता. घरातून कुठं बाहेर जावं, असं वाटत नव्हतं. खिडकीत बसून मस्तपैकी पाऊस पाहावा, असं वाटत होतं.
आज सगळे पालवीकडं जमणार होते. बाबा म्हणाले ः ‘‘इतक्‍या पावसात मुलं कुठली येणार? लोळत पडली असतील घरी..’’
आई म्हणाली ः ‘‘काहीतरीच बोलू नका. या मुलांना भलताच उत्साह! पावसाचा झनझनाट सुरू झाला, की या मुलांच्या अंगात विजा कडाडू लागतात. बघा, पाच मिनिटांत सगळे येतात की नाही?’’
आणि खरोखरच दोन मिनिटांतच सगळे जमले. काही पूर्ण भिजलेले, तर काही अर्धवट सुकलेले. टॉवेलला डोकं खसाखसा घासत शंतनूनं बोलण्यासाठी तोंड उघडलं, तोच आई म्हणाली ः ‘‘आज सगळ्यांसाठी गरमागरम भजी आहेत बरं का? कारण..’’
‘‘कारण.. काय? पावसाचा गजबजाट आणि भजींचा घमघमाट हे सॉलिड काँबिनेशन आहेच मुळी..’’ वेदांगीनं असं म्हणताच पार्थ म्हणाला ः ‘‘पावसाची पुरपूर आणि खाताना कुरकूर.’’

अन्वय म्हणाला ः ‘‘भजी करण्याचं एक कारण असंही असेल, की आजचा खेळ आणि भजी यांचा काहीतरी संबंध असणार!’’
टॉवेल बाजूला ठेवत शंतनू म्हणाला ः ‘‘भजी करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, मुलांना कांद्याच्या, बटाट्याच्या, भेंडीच्या, पालकाच्या, मेथीच्या, मुगाच्या आणि सिमला मिरचीच्या चविष्ट कुरकुरीत भजी मनसोक्त खायला मिळाव्यात. चला...आणा भजी...उगाच चांगल्या कामाला उशीर नको.’’
आई हसतच आतून भजींच्या बशा घेऊन आली. बाबा म्हणाले ः ‘‘आता आपण जो खेळ खेळणार आहोत, त्याच्याशी म्हटलं तर भजींचा संबंध आहे आणि म्हटलं तर नाही. म्हणजे तुम्ही कसं पाहता त्याच्यावर ते अवलंबून आहे..’’
‘‘मी भजींकडं पाहत असल्यानं, माझा भजींशी जवळचा संबंध आहे ना?’’ असं पार्थनं विचारताच सगळेच खुदखुदले.
खाऊ दणकवून झाल्यावर ढेकरा देत अन्वय, वेदांगी, पार्थ, नेहा आणि शंतनू सगळे गोल बसले. पालवी एक काचेचा बाऊल घेऊन आली. त्यात चिठ्या होत्या.
‘‘आता हे काय? कागदी पेढे की कागद बर्फी?’’
शंतनूला शांत करत बाबा म्हणाले ः ‘‘आता खेळ समजून घ्या. तिथं टेबलवर सहा फोटो ठेवलेले आहेत. हे सगळे फोटो पावसाळ्याशी संबंधित आहेत. म्हणजे निरनिराळ्या वर्तमानपत्रांत छापून आलेले हे फोटो आहेत. त्या प्रत्येक फोटोला एक क्रमांक दिलेला आहे आणि त्या क्रमांकाच्या चिठ्ठ्या या बाऊलमध्ये आहेत. प्रत्येकानं एक चिठ्ठी घ्यायची आणि मग त्या चिठ्ठीच्या क्रमांकाचा फोटो घ्यायचा..’’
‘‘मला माहीत आहे...माहीत आहे...पुढं काय करायचं ते..’’

पार्थला थांबवत बाबा म्हणाले ः ‘‘पार्थू, थांब जरा. माझं बोलणं पूर्ण होऊ दे. तर, तुम्ही तुम्हाला मिळालेला फोटो काळजीपूर्वक पाहायचा आणि तो फोटो पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतात? तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्हाला काय सुचवावंसं वाटतं?...याविषयी तुम्ही फक्त पाच ओळी लिहायच्या आहेत किंवा पाच मिनिटे बोलायचं आहे. अर्थातच तुम्हा प्रत्येकांचे फोटो वेगवेगळे आहेत. याबाबत विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे फक्त बारा मिनिटं. तो आपला समय शुरू होता है अब.’’
सगळ्यांनी पटापट चिठ्ठ्या घेतल्या. आपापल्या क्रमांकाचे फोटो घेतले. सोबत वही-पेन घेऊन मुलं घरातच वेगवेगळ्या ठिकाणी बसली.
बाबांनी खूप काळजीपूर्वक फोटो निवडले होते. ते सहा फोटो थोडक्‍यात या प्रकारचे होते ः
  भरून आलेलं आणि जणू काही ढगांमुळं ओथंबलेलं आभाळ. काळसर आणि काळ्याकुट्ट ढगाळ आकाशात चकाकणारी वीज. धूसर वातावरण. रस्त्याच्या कडेला चहावाल्याकडं झालेली गर्दी.
  तुडुंब भरलेल्या विहिरीत पोहणारी मुलं. विहिरीत उड्या मारणारी मुलं. विहिरीच्या काठावर उभं राहून आत डोकावून पाहणारी मुलं.
  कानटोपी घातलेले आजोबा एका हातात मोठी छत्री घेऊन आणि दुसऱ्या हातानं रेनकोट घातलेल्या मुलाला ओढत घेऊन चालले आहेत.
  रस्त्यावर पाणी तुंबलं आहे. वाहनं अडकली आहेत. मुलं पावसात भिजत पाण्यात मस्ती करत आहेत. मोठी माणसं दुकानाच्या वळचणीला उभी आहेत.
  लहान-मोठ्या रंगबिरंगी छत्र्यांनी रस्ता भरला आहे.
  हिरवेगार डोंगर. झरे. डोंगरातून कोसळणारे धबधबे आणि इंद्रधनुष्य.
मुलं लिहिताना स्वतःशीच हसत होती. पुटपुटत होती. बारा मिनिटं संपली तेव्हा अन्वय, नेहा आणि वेदांगीनं विचारलं ः ‘‘आणखी पाच मिनिटं मिळतील का?’’ बाबांनी ‘हो’ म्हणताच सारे खूश झाले.
बाबांनी हलकेच टाळ्या वाजवताच सगळे आपापले फोटो आणि वह्या घेऊन एकत्र आले. एकत्र येताच सगळ्यांनी एकमेकांचे फोटो पाहायला सुरवात केली. इतरांनी त्यांच्या फोटोविषयी काय-काय लिहिलं असेल, याची उत्सुकताही प्रत्येकाच्या मनात जागी झाली.

पार्थ आधीच हात वर करत म्हणाला, ‘‘मी वाचणार... मी.’’ मग पार्थनं आपल्या जवळचा क्रमांक दोनचा फोटो सर्वांना दाखवला. पार्थनं बोलायला सुरवात केली; पण तो भलताच उत्तेजित झाला होता ः ‘‘म.. म.. मला पोहता येत नाही. मला पाण्याची भीती पण वाटते. आपण पाण्यात पडलो, तर बुडूनच जाऊ असं वाटतं. त्यामुळं ही काठावर उभी असणारी मुलं माझ्यासारखीच आहेत; पण या विहिरीत तर माझ्यापेक्षासुद्धा लहान मुलं पोहत आहेत. पाण्यात मस्ती करत आहेत. आता मला वाटतंय...मला वाटतंय की... या पावसाळ्यात मी पण पोहायला शिकणार. मी नाही पाण्याला घाबरणार. मला पोहायचंच आहे. आणि...आणि...त्या काठावर उभ्या असणाऱ्या एका तरी मुलाला मी पोहायला शिकवणार. मी...मी या वर्षी पोहणारच.’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पार्थ तर भांबावून गेला. फोटो पाहतापाहता आणि फोटोबाबत विचार करताकरता तो फोटोत इतका मिसळून गेला, की नकळत आपण बदललो आहोत, हेच त्याला कळलं नाही. फोटो पाहताना तो फोटोतून नवं काही शिकण्याची ऊर्मी घेत होता.

पार्थची पाठ थोपटत बाबा म्हणाले ः ‘‘शाबास पार्थ. तू खरंच हुशार मुलगा आहेस आणि मला खात्री आहे- आता तू ठरवलं आहेस म्हणजे या वर्षी तू नक्कीच पोहायला शिकशील. यासाठी आम्ही सर्व तुझ्या मदतीला आहोतच.’’
वेदांगीकडं क्रमांक तीनचा फोटो होता. वेदांगी हसतच म्हणाली ः ‘‘खरं तर या फोटोतलं हे लहान मूल म्हणजे बहुधा मीच आहे. मस्त पाऊस पडत असताना मला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही. मला आजोबाच शाळेत घेऊन जायचे; पण आजोबा कडक शिस्तीचे होते. पावसात शाळेत जाताना रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक डबक्‍यात पचाक्कन्‌ पाय बुडवायला मला खूप आवडायचं. दुकानांच्या किंवा घरांच्या छपरावरून पडणाऱ्या पागोळ्यांच्या खाली तासन्‌तास उभं राहायला आवडायचं आणि मुख्य म्हणजे रेनकोट न घालता छत्री घेऊन, छत्री गोल-गोल फिरवत इतरांच्या अंगावर पाणी उडवायला आणि मग स्वतः भिजायला तर मला खूप म्हणजे खूपच आवडायचं. इतकंच काय, कोसळणाऱ्या पावसात डोळे बंद करून आणि डोकं वर करून पाऊसपाणी पिणं म्हणजे लई भारी. हे चित्रातलं मूल पण माझ्यासारखंच असणार, म्हणून ते कडक आजोबा त्याला ओढत घेऊन चालले आहेत...पण एकदा तरी त्या आजोबांनी त्या मुलाचा हात सोडला पाहिजे आणि त्या मुलाला काय करायचं आहे ते करू दिलं पाहिजे, असं मला वाटतंय.’’

सगळ्या मुलांना एकच कल्ला केला ः ‘‘आम्ही पण असेच...आम्ही पण असेच! पाऊस म्हणजे धम्माल. मज्जा आणि डबक्‍यात पचाक-पचाक!’’
आता सगळ्यांनाच ‘आपल्या पावसाळ्यातल्या धम्माली’ सांगायची घाई झाली. ‘मी अस्सं केलं, मी तस्सं केलं,’ असं जो-तो सांगू लागला. सांगतासांगता ते एकमेकांना टाळ्या देऊ लागले.
या सगळ्यांना कसंबसं शांत करत बाबा एकदम चिडून जोरात ओरडून म्हणाले ः ‘‘मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे..’’
बाबांना चिडलेलं पाहताच सगळे दचकून गप्प बसले. आता सगळे भीतभीत बाबांकडं पाहू लागले.
‘‘तुम्हाला काय वाटतं, लहानपणी तुम्ही कसे होतात? तर मग नीट ऐका...मीसुद्धा लहानपणी तसाच होतो...अगदी तुमच्यासारखाच..’’ असं म्हणत बाबा ठॉठो हसू लागले. बाबांनी केलेली गंमत मुलांना कळली. मुलंसुद्धा ठसाठूस हसू लागली.
तेव्हा स्वयंपाकघरातून आई हातात खाऊच्या बशा घेऊन येत म्हणाली ः ‘‘मी बाबांच्या मताशी अजिबात सहमत नाही.’’
सगळेच ओरडले ः ‘‘का.. का?’’
‘‘कारण ते अर्धसत्य आहे!’’
‘‘म्हणजे...हे काय?’’
‘‘म्हणजे बाबा फक्त लहानपणीच तुमच्यासारखे होते असं नव्हे, तर ते त्यांच्या लहानपणापासून तसेच आहेत. तुम्हा मुलांत मूल होऊन मिसळणारे...म्हणून तर तुम्हा ‘सर्व मुलांसाठी’ मी खास ‘पालक पकोडे’ आणले आहेत.’’
अजून अन्वय, पालवी, नेहा आणि शंतनू यांना वाचायचं होतं. खूप काही सांगायचं होतं; पण पालक पकोडे आणि पाऊस पकोडे यात इतका वेळ गेला, की पुढच्या रविवारी ही ‘पावसाळी धम्माली’ पूर्ण करायचीच, असं ठरलं.
गंमत म्हणजे बाहेरचा पाऊस थांबला, तरी घरात गप्पांचा पाऊस कोसळतच होता आणि लहानपणीच्या आठवणींच्या विजा लखलखत होत्या.
(क्रमशः)

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   मुलं चित्र पाहात असताना त्या चित्रातल्या भावभावना, प्रसंग आणि ताणतणाव हे ते आपल्या जीवनातल्या घटनांशी जोडू पाहत असतात. त्यावेळी त्यांना रोखू नका.
  •   चित्राविषयी बोलताना मुलं नकळत आतून मोकळी होत असतात. अशा वेळी त्यांना रोखलं किंवा त्यांच्या बोलण्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला, तर मुलं धसकतात आणि त्यांचे विचार खुरटतात.
  •   काही वेळा मुलं स्वतःला चित्रात शोधतात, तेव्हा हा त्यांचा मोठेपणा आहे, हे लक्षात घ्या. अशा वेळी ‘चित्राविषयी बोल. स्वतःचंच सांगू नकोस’ असं कदापी बोलू नका. अशामुळं मुलं तुमच्यापासून दुरावतील.
  •   ‘सहृदय पालकच मुलांना मोकळेपणाने बोलण्याची मोकळीक देतात’ ही चिनी म्हण कायम लक्षात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com