द ग्रेट आयडिया (राजीव तांबे)

द ग्रेट आयडिया (राजीव तांबे)

‘‘विशेष म्हणजे, ही आयडिया शाळेच्या त्या चार विशिष्ट तुकड्यांसाठी नव्हे, तर संपूर्ण शाळेसाठी असणार आहे. शाळेतली सगळी मुलं ती आयडिया साकारण्यात भाग घेणार आहेत. अत्यंत कमी खर्चात हे सगळं होणार आहे. यामध्ये विजेता म्हणून एखादा मुलगा किंवा मुलगी नसून आख्खा वर्ग असेल. या स्पर्धेमध्ये एकूण तीन प्रमुख विजेते असतील. कारण, यामध्ये असतील तीन वेगवेगळे परीक्षक...’’

आ  ज सगळे नेहाच्या घरी जमले होते. आज शंतनूचे बाबा, अन्वयचे बाबा आणि नेहाच्या बाबांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. आज हे तिघं मिळून सगळ्यांसाठी टकटकीत-टुकटुकीत खाणं करणार होते. थोड्याच वेळात पालवी, शंतनू, वेदांगी, पार्थ आणि अन्वय हजर झालेच.
आल्या आल्या सगळ्यांची भुणभुण सुरू झाली.
आधी मोठ्या माणसांना वाटलं, बहुधा खाऊ खाण्याची घाई झाली असल्यानं यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं दिसतंय; पण थोड्यात वेळात भुणभुणची गुणगुण आणि गुणगुणची घणघण सुरू झाली, तेव्हा मात्र नेहाची आई वैतागून म्हणाली ः ‘‘अरे, काय ते नीट सांगा ना. हा काय गुणगुणाट अन्‌ घणघणाट चाललाय?’’
एकदम शांतता पसरली.

सगळ्यांनी पालवीला पुढं ढकललं. पालवी म्हणाली ः ‘‘आमच्या शाळेत प्रत्येक इयत्तेच्या चार तुकड्या आहेत, हे तर तुम्हाला माहीत आहेच. आमच्या आधीच ठरलेल्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आम्ही फक्त नऊ मुलं निवडली. त्यामुळं खूप म्हणजे खूपच मुलं नाराज झाली. अनेक मुलांना आमच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा होता...’’
‘‘आता त्यांची समजूत कशी काढायची? आणि या सगळ्याच्या सगळ्या मुलांना संधी मिळेल असा कुठला कार्यक्रम १५ ऑगस्टला ठेवायचा हेच आम्हाला कळत नाहीए...’’ अन्वयला थांबवत शंतनू म्हणाला ः ‘‘आणि मुख्य म्हणजे, या आमच्या सगळ्या मित्रांना दुखवून फक्त आम्हीच कार्यक्रम करायचा, हेसुद्धा आम्हाला कसंसंच वाटतंय.’’
‘‘आता काय करावं...? आम्हाला काही सुचत नाहीए’’ वेदांगी म्हणाली.

‘‘सुचेल... नक्की सुचेल...’’ पार्थला थांबवत नेहा म्हणाली ः ‘‘पण कसं सुचेल? कुणाला सुचेल? ते तर सांग.’’
आई हसतच म्हणाली ः ‘‘सगळ्यांनी विचार केला तर सगळ्यांना मिळून काहीतरी एक गोष्ट नक्कीच सुचेल.’’
‘‘मग चला, खिडकीतून पाहात विचार करू या.’’
‘‘पेपर वाचत विचार करू या.’’
‘‘किचनमध्ये सरबत करताना विचार करू या.’’
‘‘भिंतीकडं पाहात विचार करू या.’’
‘‘शांत बसून विचार करू या.’’
स्वयंपाकघरातून हात पुसत येत नेहाचे बाबा म्हणाले ः ‘‘चला, प्रत्येकानं एकेक आयडिया सांगायचीच. ती आयडिया कितीपण खर्चिक असली, एकदम चिंटू-मिंटू असली, भन्नाट असली, काहीच्या काही असली किंवा अगदीच फडतूस असली तरी चालेल. मला खात्री आहे, या सगळ्यांच्या मिश्रणातूनच आपल्याला हवी असणारी ‘द ग्रेट आयडिया’ मिळणार आहे. आप सब का समय शुरू होता है, अब...’’

  आपण सगळ्यांचं एक नाटक बसवू या.
  अनेक मुलांना सामावून घेणारं पथनाट्य किंवा रिंगणनाट्य करता येईल.
  अं...अं सगळ्या मुलांना घेऊन सिनेमाही करता येईल.
  सगळ्यांची सहल काढायची.
  सगळ्या मुलांचं मिळून एक पुस्तक काढायचं.
  सगळ्या मुलांची ‘स्वातंत्र्यदिन’या विषयावर एक चित्रकला स्पर्धा घ्यायची.
  सगळ्या मुलांची ‘स्वातंत्र्यदिन’या विषयावर एक वादविवाद स्पर्धा घ्यायची.
  सगळ्या मुलांची ‘स्वातंत्र्यदिन’या विषयावर एक रांगोळी स्पर्धा घ्यायची.
  सगळ्या मुलांची ‘स्वातंत्र्यदिन’या विषयावर एक समूहगान स्पर्धा घ्यायची.
  सगळ्या मुलांची ‘स्वातंत्र्यदिन’च्या दिवशी एक मॅरेथॉन स्पर्धा घ्यायची.
  एका भल्यामोठ्या कागदावर म्हणजे आपल्या वर्गखोलीएवढ्या कागदावर सर्व मुलांना दोन दोन ओळी लिहायला सांगू या. तो कागद मैदानात ठेवू या.
  सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यदिनी मैदानात परेड करायची.
‘‘बास... बास. खूप झाल्या आयडिया. मी तुम्हा सगळ्यांच्या आयडिया एका कागदावर लिहून घेतल्या आहेत. आता त्या सगळ्या एकमेकींत मिसळून त्यातूनच एकदम नवीन आयडिया आपण शोधणार आहोत. कळलं?’’
पार्थ म्हणाला ः ‘‘काहीच नाही कळलं.’’
‘‘ओके. आता मी प्रत्येकाला एक किंवा दोन आयडिया देईन. त्यानं त्यातून एकच आयडिया तयार करायची. तयार होणारी आयडिया एकतर दोन्हींचं मिश्रण असेल किंवा सर्वस्वी नवीन असेल,’’ बाबांचं बोलणं संपताच सगळ्यांचा आपापसात गुणगुणाट आणि घटघणाट सुरू झाला.
आणि यातूनच मिळाली भन्नाट ‘द ग्रेट आयडिया’

‘‘विशेष म्हणजे ही आयडिया शाळेच्या फक्त त्या चार तुकड्यांसाठी नाही तर संपूर्ण शाळेसाठी असणार आहे. शाळेतली सगळी मुलं ती आयडिया साकारण्यात भाग घेणार आहेत. अत्यंत कमी खर्चात हे सगळं होणार आहे. यामध्ये विजेता म्हणून एखादा मुलगा किंवा मुलगी नसून आख्खा वर्ग असेल. या स्पर्धेमध्ये एकूण तीन प्रमुख विजेते असतील. कारण, यामध्ये असतील तीन वेगवेगळे परीक्षक. पहिले परीक्षक कलेक्‍टरसाहेब. दुसरे परीक्षक दुसऱ्या शाळेतली मुलं. तिसरे परीक्षक जमलेले गावकरी आणि मुख्य म्हणजे तिन्ही परीक्षक हे ‘गुप्त मतदान’ पद्धतीनं मतदान करतील. तिन्ही विजेत्या वर्गांना स्वातंत्र्यदिनी कलेक्‍टरसाहेबांकडून बक्षिसंही मिळतील...’’
‘‘अगं आई, हे सगळं कळलं गं. पण आम्ही करायचं काय तेच नाही कळलं.’’
‘‘अगं, मी सांगितलंच नाही अजून तर कळणार कसं?’’ हे ऐकताच सगळे हसमसून हसले.
‘‘...तर ऐका आयडिया. प्रत्येक वर्गानं एक वॉलपेपर म्हणजे भित्तिपत्रिका तयार करायची. या वॉलपेपरवर ः
  त्या त्या वर्गातल्या मुला-मुलींचे लेख असतील.
  कथा-कविता असतील.
  आपल्या लहानपणीच्या गमतीशीर आठवण असतील.
  कथा-कवितांसाठी मुलांनीच काढलेली चित्र असतील.
  चित्र काढताना, स्प्रे पेंटिंग, जलरंग, पेन्सिल, चारकोल, ऑईलपेंट, कोलाज अशा विविध माध्यमांचा विचार केलेला असेल.
  व्यंग्यचित्रं असतील.
  निबंध असतील.
  विनोदी चुटके असतील.
  विज्ञानाचा सोपा प्रयोग असेल.
  सृष्टीतल्या अजब अजब गोष्टी असतील.
  भविष्याचा वेध घेणारी विज्ञानाची भाकितं असतील.
  कूटप्रश्‍न असतील.
  वेगवेगळ्या भाषांमधली कोडी असतील.
  प्रत्येक वर्गानं आपापला वॉलपेपर वेगळ्या पद्धतीनं सजवायचा आहे.
  आवश्‍यकता वाटल्यास आपल्या वॉलपेपरला एखादं नाव द्यायचं आहे.
  प्रत्येक वर्गानं आपल्या वॉलपेपरसाठी एक लोगो तयार करायचा आहे.
  वॉल पेपरवरचा मजकूर एखादी मध्यवर्ती संकल्पना घेऊनही तयार करता येईल.
उदाहरणार्थ ः ‘तेल’ ही जर संकल्पना घेतली तर तेलबियांपासून मिळणारं तेल...समुद्रातून मिळणारं तेल...वाळवंटात मिळणारं तेल...वेगवेगळ्या वाहनांसाठी वापरलं जाणारं वेगवेगळ्या व्हिस्कॉसिटीचं (म्हणजे घट्ट, पातळ, प्रवाही, अर्धप्रवाही, चिकट इत्यादी) तेल...यांची रंजक माहिती, त्यांची चित्रं आणि भलतंच तेल भलत्याच ठिकाणी वापरलं तर होणारे घोळ या सगळ्या माहितीचा वापर करून वॉलपेपरचा मजकूर तयार करता येईल. असे खूप विषय मिळू शकतील.
आता सगळ्यांच्याच डोक्‍यातून कल्पनांची कारंजी उसळू लागली.
‘‘प्रत्येक वर्गाला एक मोठा ड्रॉइंग पेपर द्यायचा. हाच त्यांचा वॉलपेपर.’’
‘‘प्रत्येक वर्गानं आपापला वॉलपेपर वर्गाच्या बाहेरच्या भिंतीवर लावायचा.’’
‘‘हां, स्वातंत्र्यदिनी कलेक्‍टरसाहेब, दुसऱ्या शाळेतली मुलं आणि गावकरी सगळ्या शाळेत फिरतील. सगळे वॉलपेपर पाहतील, वाचतील आणि समजून घेऊन त्यातूनच बक्षीसपात्र वॉलपेपर निवडतील.’’
‘‘पण ते ‘गुप्त मतदान’ पद्धतीनं कसं काय निवडतील?’’
‘‘आणि समजा, दोन्ही परीक्षकांनी एकाच वर्गाचा वॉलपेपर जर निवडला तर काय करायचं?’’
‘‘तशी मला एक आयडिया आत्ता आत्ता सुचते आहे...’’
‘‘म...सांग ना लवकर...’’
‘‘प्रत्येक वॉलपेपरच्या खाली तीन वेगवेगळ्या रंगांची छोटी खोकी ठेवायची. उदाहरणार्थ ः कलेक्‍टरसाहेबांचा रंग पांढरा, मुलांचा रंग निळा आणि गावकऱ्यांचा रंग पिवळा असं ठरवू या..’’

‘‘मला थोडी भर घालायची आहे. कलेक्‍टरसाहेब दुसऱ्या शाळेतले दहा शिक्षक निवडतील आणि त्यांच्या गटात एकूण ११ जण असतील. याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळांमधली ११ मुलं आणि गावातल्या सहा महिला आणि पाच पुरुष मिळून ११ जणांचा गट असेल.’’
‘‘व्वा, फार छान. समजा ११ जणांचा निळा गट वॉलपेपर पाहतो आहे...त्यांनी तो पाहिल्यानंतर आपापसात चर्चा करायची आहे. काय आवडलं, काय विशेष आवडलं आणि काय खटकलं याबाबत एकमेकांशी बोलायचं आहे. त्यानंतर प्रत्येकानं आपापल्या चिठ्ठीवर दहापैकी मार्क देऊन ती चिठ्ठी निळ्या खोक्‍यात टाकायची आहे. त्यानंतर दुसरा गट तिथं येईल.’’
‘‘तीन खोकी ठेवायची काहीच गरज नाही. हे म्हणजे ते न्यूटनच्या मांजरीसारखं झालं. त्यानं मांजरीला आत येण्यासाठी दरवाज्याला खाली मोठं छिद्र पाडलं होतं आणि तिच्या पिलांसाठी चार लहान छिद्रं पाडली होती. खरं म्हणजे मांजरापाठोपाठच पिलंसुद्धा आत आली असतीच की. आता ही गोष्ट खरी आहे की नाही, हे मला नेमकं माहीत नाही; पण मी कुठेशी ऐकलीय ती..’’
‘‘अहो न्यूटन, तीन खोकी नाही घ्यायची तर मग त्याऐवजी काय करायचं ते तरी सांगा.’’
‘‘तीन वेगवेगळ्या रंगांचे कागद जर घेतले, तर एकच खोकं घेऊन चालेल ना? आणि कुठल्या गटानं किती मार्क दिलेत तेही समजेल.’’
‘‘शाबास न्यूटन!’’
‘‘मला एक प्रश्‍न पडलाय...या १० मार्कांची विभागणी कशी करायची?’’
‘‘हं, ते सांगायचं राहिलंच. १० च मार्क ठेवले पाहिजेत असं काही नाही. किती मार्क ठेवायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. मी फक्त हे उदाहरणादाखल सांगितलं.’’
‘‘अं, म्हणजे वेगवेगळ्या भागाकरता मार्क ठेवता येतील...’’
‘‘म्हणजे उदाहरणार्थ...?’’
  वॉलपेपरमधल्या साहित्याचा गुणात्मक दर्जा.
  समर्पक चित्र.
  नेमकं भाष्य करणारं व्यंग्यचित्र.
  चित्र आणि रंगलेपन.
  एकंदर मांडणी.
  वॉलपेपरच्या मांडणीत सोडलेली ‘व्हाइट स्पेस’ म्हणजे मोकळी जागा.
  लेखांचा, कवितांचा आशय लक्षात घेऊन केलेलं सुलेखन.
  वॉलपेपरचा लोगो.
  साहित्यात, मांडणीत, सजावटीत किंवा चित्रात जाणीवपूर्वक केलेला एखादा वेगळा प्रयोग.
  कल्पक सजावट.

‘‘असं खूप काही सांगता येईल..’’
‘‘नको, नको. हे १० मुद्दे म्हणजे १०० मार्क झाले!’’
‘‘हां...पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली...’’
‘‘आँ... आता काय...?’’
‘‘या ‘द ग्रेट आयडिये’त तुम्ही कुठलेही ग्रेट फरक करावेत. म्हणजे परिस्थितीनुसार, मुलांनुसार तुमच्या कल्पकतेनं त्यात एकतर भर घालावी किंवा काही कमी करावं...तेव्हाच ती आयडिया ग्रेट होईल...’’
‘‘हे काय बोललात ते कळलंच नाही...’’
‘‘अं, थोडक्‍यात सांगायचं तर, तुम्ही तुमची कल्पकता वापरून बदल करण्याचं स्वातंत्र्य घ्यायचं. उदाहरणार्थ ः वॉलपेपर चौकोनीच असला पाहिजे असं काही नाही. तर तो गोल, पंचकोनी किंवा लंबगोलही असू शकेल. वॉलपेपरच्या मदतीला तुम्ही ऑडिओ क्‍लिप्स किंवा व्हिडिओंचाही वापर करू शकता. तो एकाच वेळी मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये असू शकतो आणि विशेष म्हणजे, त्याला मार्क कसे द्यायचे आणि कशाकशाला द्यायचे हेही तुम्हीच ठरवा. लक्षात ठेवा, आता आपण तयार केला आहे तो कच्चा आराखडा आहे.’’
‘‘म्हणजे...जेव्हा या ‘द ग्रेट आयडिये’मध्ये आमच्या कल्पकतेची भर पडेल तेव्हाच ती ‘द ग्रेटेस्ट आयडिया’ होईल आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असेल!’’
‘‘एकदम सही!!’’
सगळेच ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’

  • पालकांसाठी गृहपाठ ः
  •   आपल्या मनातले विचार किंवा दाटून आलेल्या भावना सगळ्याच मुलांना मुद्देसूदपणे लिहिता येत नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण, प्रत्येक मुलाची व्यक्त होण्याची भाषा वेगवेगळी असते, ती आपण ओळखली पाहिजे आणि त्यातूनच त्याला व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे.
  •   काही मुलं चित्रातून, काही मुलं कवितेतून, तर काही मुलं अगदी व्यंग्यचित्रातूनही स्वतःच्या मनातली खळबळ सांगू इच्छित असतात, तर काही मुलांना खूप काही सांगायचं असतं; पण ते कसं सांगावं, हेच कळत नसतं. अशा वेळी घाई न करता मुलांना वेळेचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य द्यायला हवं.
  •   वॉलपेपरवरची मांडणी एखाद्‌वेळेस तुमच्या मनासारखी झाली नाही तरी शांत राहा. मुलं लेखनातून वेगळा विचार मांडण्याचा किंवा मांडणीतून वेगळा आकृतिबंध शोधण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना कृपया रोखू नका; किंबहुना ‘त्यांचं वेगळेपण’ त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा मोठेपणा दाखवा.
  •   ‘जे पालक मुलांच्या कल्पकतेवर विश्‍वास ठेवतात, तेच पालक मुलांसोबत मोठे होतात’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com