विलक्षण कोलाज (राजीव तांबे)

rajiv tambe
rajiv tambe

आई पार्थला समजावत म्हणाली ः ‘‘अरे पार्थू, आपण या मोकळ्या जागेत कोलाज करणार आहोत आणि तेही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे. तुम्ही सहाजण आहात. प्रत्येकानं कोलाज करण्याचे पाच प्रकार जरी शोधले, तरी आपल्याला वेगवेगळे ३० प्रकार मिळतील. ...तर करा सुरवात. पहिली १० मिनिटं एकेकट्यानं विचार करा; मग पुढची १० मिनिटं सगळ्यांनी मिळून विचार करा आणि मग सांगा तुमच्या ३० पेक्षा जास्त आयडिया.’’

आता घराघरात आणि सगळ्या परिसरात गणेशोत्सवाचं वारं घुमू लागलं होतं. गणपतीच्या सजावटीच्या नवनवीन कल्पना घेऊन अनेक दुकानं गल्लोगल्ली सुरू झाली होती. रंगीत दिव्यांच्या माळा, थर्मोकोल वापरून तयार केलेले वेगवेगळे देव्हारे, रथ, रांगोळ्यांची पुस्तकं, वेगवेगळ्या वासांच्या उदबत्त्या, कापूर, अनेक वासांचे धूप, खरीच वाटतील असली प्लास्टिकची फुलं आणि वेली, गणपतीसाठी वेगवेगळे मुकुट आणि अलंकार अशा अनेक गोष्टींनी ही दुकानं खचाखच भरलेली होती.

मुख्य म्हणजे वेगवेगळ्या सुबक-सुंदर-देखण्या गणेशमूर्तींनी अनेक दुकानं आणि मंडप सजले होते. अगदी सहा इंचांच्या गणेशमूर्तीपासून ते सहा फुटांच्या गणेशमूर्ती पाहताना डोळ्यांचं पारणं फिटायचं. सिंहासनावर बसलेला, चौरंगावर बसलेला, कमळात बसलेला, घोड्यावर बसलेला, उभा असलेला...अशा अनेक रूपांत गणपती पाहताना आनंद व्हायचा.

जाता-येता ही दुकानं मुलं पाहत आणि आपापसात त्याबाबत गप्पा मारत.
आज सगळे जण अन्वयच्या घरी जमले. आज किचनची जबाबदारी अन्वयचे बाबा, पालवीचे बाबा आणि नेहाचे बाबा यांनी आनंदानं स्वीकारली होती. शंतून, पालवी, नेहा, पार्थ आणि वेदांगी अन्वयच्या घरी आले; पण सगळ्यांच्या गप्पांचा विषय एकच व तो म्हणजे ‘गणपतीच्या मूर्ती आणि गणपतीचं डेकोरेशन’ आपण कसं करायचं?
गप्पा सुरू झाल्यावर पुन्हा एकदा ‘त्या दुकानां’तल्या सगळ्या गोष्टींची यादी मुलांनी एकमेकांना सांगितली.

ही यादी ऐकल्यावर पार्थनं विचारलं ः ‘‘पण म...आता आपण काय करायचं? आमच्या घरी तर गणपती असतो. मी तर आमच्यासाठी कमळात बसलेल्या गणपतीची एक छोटी मूर्ती आणि तिच्यासाठी मोराची थर्मोकोलची एक मस्त गाडीपण निवडून ठेवली आहे.’’

अन्वयची आई म्हणाली ः ‘‘आज तेच तर तुम्हाला सांगायचं आहे. आपण गणपतीची पूजा आणि सजावट ही पर्यावरणपूरक करणार आहोत. आपण कुठंही प्लास्टिक, थर्मोकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि परदेशी बनावटीच्या गोष्टींचा अजिबात उपयोग करणार नाही...’’
‘‘म...म...माझी मोराची गाडी..? तिचं काय करायचं?’’ पार्थला समजावत शंतनू म्हणाला ः ‘‘अरे, ती तुझी मोराची गाडी त्या दुकानात पार्किंग करून ठेवलीय बरं. डोंट वरी, मजा कर घरी,’’ हे ऐकताच सगळेच ठसठसून ठसाठस हसले.
वेदांगीनं भीत भीत विचारलं ः ‘‘पण समजा मातीची मूर्ती आम्हाला नाहीच मिळाली तर काय करायचं?’’
‘‘सांगा बरं, काय करता येईल?’’
‘‘गणपतीचं सुंदर चित्र काढायचं...’’ हे ऐकताच सगळे म्हणाले ः ‘‘शाबास पार्थ.’’
‘‘ही कल्पना एकदमच मस्त आहे; पण सगळ्यांनाच काही सुंदर चित्रं काढता येईलच असं नाही. त्यासाठी काहीतरी आयडिया करावी लागेल...’’
‘‘त्याचीपण तयारी केली आहे...’’
‘‘अँ...? म्हणजे कशाची?’’
आईनं आपल्या हातातला कागद दाखवला. एका मोठ्या कोऱ्या कागदावर गणपतीचं सुंदर चित्र होतं; पण हे चित्र रंगीत नव्हतं तर गणपतीच्या चित्राची ती फक्त आउटलाईन होती. याला ‘लाइन ड्रॉइंग’ म्हणतात. मात्र, बारीकसारीक तपशील त्यात नव्हते.
‘‘आता लक्ष देऊन ऐका. आपण हा गणपती रंगवणार नाही, म्हणजे नेहमीप्रमाणे जलरंगानं किंवा क्रेयॉन खडूनं रंगवणार नाही....’’ आईला थांबवत पालवीनं विचारलं ः ‘‘म...म...कशानं रंगवायचा?’’
‘‘रंगवायचा नाही तर मस्त रंगीत करायचं. कळलं?’’
पार्थ केविलवाणा चेहरा करत म्हणाला ः ‘‘आई, मला काहीसुद्धा कळलं नाही हं. अगं, न रंगवता ‘मस्त रंगीत करायचं’ म्हणजे न धावता बसल्याबसल्याच भराभर पुढं जायचं असंच झालं ना गं?’’ आता मात्र सगळेच ठकठकाठक ठुकठकाक हसले.
आई पार्थला समजावत म्हणाली ः ‘‘अरे पार्थू, आपण या मोकळ्या जागेत कोलाज करणार आहोत आणि तेही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे. तुम्ही सहाजण आहात. प्रत्येकानं कोलाज करण्याचे जरी पाच प्रकार शोधले, तरी आपल्याला वेगवेगळे ३० प्रकार मिळतील.’’

‘‘आणि शोधता शोधता आम्हाला ३० पेक्षा नक्कीच जास्त मिळतील.’’
‘‘हो तर! कारण ‘शोधत नाही म्हणून मिळत नाही’ अशी एक चिनी म्हण आहेच! आम्ही शोधणार आणि आम्हाला मिळणार.’’
‘‘शाबास मुलांनो. ...तर करा सुरवात. पहिली १० मिनिटं एकेकट्यानं विचार करा; मग पुढची १० मिनिटं सगळ्यांनी मिळून विचार करा आणि मग सांगा तुमच्या ३० पेक्षा जास्त आयडिया,’’ आईचं बोलणं संपताच किचनमधून अन्वय आणि पालवीचे बाबा हातात खाऊच्या बश्‍या घेऊन आले.
खाऊ खाऊन मुलं कामाला लागली.
थोड्याच वेळात गल्लाकिल्ला करत मुलं म्हणाली ः ‘‘झाली आमची यादी. सांगू का...?’
‘‘सांगा. पण सांगताना जरा सविस्तर सांगा म्हणजे आम्हाला पण नीट कळेल,’’ स्वयंपाकघरातूनच नेहाचे बाबा म्हणाले.

  • बाप्पाला जास्वंदीची लाल फुलं आवडतात म्हणून जास्वंदीच्या पाकळ्यांचं कोलाज.
  •   बाप्पाला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे मोदक. मी वेगवेगळ्या रंगांतली लहान-मोठ्या मोदकांची चित्रं काढून कोलाज करणार आहे. पीतांबरासाठी छोटे छोटे पिवळे मोदक, तर गळ्यातली माळ वेगळ्या रंगांच्या मोदकात.
  •   कोलाज करण्यासाठी मी धान्यांचा वापर रंग म्हणून करणार आहे. म्हणजे तांदूळ, मूग, मटकी, हरभरे, राजमा, गहू अशी धान्यं चिकटवणार आहे.
  •   बाप्पाला आणखी आवडणारी गोष्ट म्हणजे दूर्वा. मी मस्त हिरव्यागार दूर्वा घेऊन कोलाज करीन.
  •   गणपती ही विद्येची देवता आहे म्हणून पेन्सिलीची सालं वापरूनही कोलाज करता येईल.
  •   वेगवेगळ्या रंगांत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ‘गणपती बाप्पा मोरया’ असं लिहून मी सुलेखनाचं कोलाज करणार आहे.
  •   माझ्या आईला विणकामाची आवड आहे. आमच्याकडं विविध रंगांचे रेशमी दोरे आहेत. मी या रेशमी दोऱ्यांचा उपयोग करून कोलाज करीन.
  •   मी लहानपणापासून जपून ठेवलेल्या रंगीत रेशमी रिबिनी माझ्याकडं आहेत. या रिबिनींचा वापर करून मस्त कोलाज होईल.
  •  कोलाजसाठी मी रंग वापरणार आहे; पण रंगवण्यासाठी नव्हे, तर ठसेकामासाठी. घरातल्या सगळ्यांच्या बोटांचे रंगीत ठसे घेऊनच मी कोलाज करणार आहे.
  •  लहान-मोठे रंगीत ठिपके काढून मी कोलाज करणार आहे.
  •  जुना टूथब्रश घेऊन तुषारकाम केलं तर कापूस रंगवता येतो. असा रंगीत कापूस वापरून मी कोलाज करीन.
  •  माझ्या आजोबांचं शिवणकामाचं दुकान होतं, नंतर ते बंद झालं; पण त्यामुळं आमच्याकडं एका मोठ्या डब्यात लहान-मोठी, निरनिराळ्या रंगांची असंख्य बटणं आहेत. काही अगदी लहान, तर काही फार मोठीसुद्धा. कोलाजसाठी मी या बटणांचाच वापर करीन.
  •  माझ्याकडं रंगीबेरंगी कागदी नळ्या म्हणजे स्ट्रॉ आहेत. त्यांचे वेगवेगळ्या लांबीचे बारीक तुकडे कापायचे, ते चिकटवून फार सुंदर कोलाज करता येतं. मी केलंपण आहे. मी तसंच करणार.
  •  माझ्याकडं लाल, निळी, काळी आणि केशरी रंगाची शाई आहे. तीन प्रकारची कटनिबही आहेत. मी निरनिराळ्या रंगांत आणि आकारांत फक्त ॐ लिहिणार आहे. खूपच छान दिसतं ते.
  •  मी तुळशीची पानं वापरणार आहे. हिरवी पानं आणि कृष्णतुळशीची काळसर हिरवी पानं.
  •  मी जरा वेगळीच मजा करणार आहे. मी कोलाजसाठी फक्त उपवासाचे पदार्थ वापरणार आहे. भगर, पांढरंशुभ्र खोबरं, लखलखीत साबूदाणे, रताळ्याच्या साली, कच्चे शेंगदाणे, शेंगदाण्याचं कूट, उंदीरमामांसाठी चहापावडर, बटाट्याच्या कच्च्या पापडाचा चुरा, पिवळाधमक गूळ आणि मदतीला तिखट-मीठ-जिरे आहेतच की.
  •  मी लहानपणापासून खूप रंगीत पिसं जमवली आहेत. या पिसांना छान आकार देऊन मी मस्त मखमली बाप्पा बनवीन.
  •  मी कोलाजसाठी फक्त ड्रायफ्रूटच वापरणार आहे. सुकं अंजीर, पिस्ते, बदाम, काजू, आक्रोड, बेदाणे, मनुका आणि खारका वापरणार.
  •  उंदीरमामा करण्यासाठी पिस्त्याची सालं रंगवून त्यांना छोट्या काजूची शेपटी लावता येईलच.
  •  गेल्या वर्षी आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. येताना मी अगदी बारीक बारीक; पण चमकदार रंगीबेरंगी शिंपले आणले आहेत. अभ्रकाचे तुकडेही आहेत. मी शिंपल्यांचं कोलाज करीन.
  •  मी कोलाज करण्यासाठी फक्त मसाल्याचेच पदार्थ वापरणार आहे. लवंग, काळी आणि पांढरी मिरी, दालचिनी, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, मसाला वेलची, नागकेशर आणि कढीलिंबाची पानं वापरून मी कोलाज करणार.
  •  आपण शाळेत फळ्यावर वापरतो ते रंगीत खडू मी वापरणार आहे; पण रंगवण्यासाठी नव्हे. मी या रंगीत खडूंची पावडर करणार आहे. ही पावडर वापरून, तर काही वेळा पावडर एकमेकींत मिसळून मी कोलाज करणार आहे.
  •  पालक, गाजर, बीट, मुळा, माती, जांभळं, हळद वापरून नैसर्गिक रंगांतच मी रंगवणार आहे.
  •  आमच्याकडं निळी, पांढरी आणि गुलाबी अशा तीन रंगांच्या साबणपावडरी आहेत. त्या एकमेकींत मिसळून आणखी नवीन रंग तयार होतात. मी रंगीत साबणपावडरी वापरून कोलाज करणार आहे.
  •  मी बाप्पा फक्त काळ्या-पांढऱ्या रंगातच दाखवणार आहे. त्यासाठी मी पांढरे आणि काळे तीळ वापरणार आहे.
  •  माझ्याकडं काचेच्या रंगीत बांगड्यांचे जमवलेले तुकडे आहेत. सुटीत मी बाबांसोबत हे काचांचे तुकडे वापरून काचापाणी खेळते. रंगीत काचांचे इतके सुंदर, नक्षीदार तुकडे आता पाहायलाही मिळत नाहीत. मी हेच काचांचे तुकडे वापरून कोलाज करणार.
  •  रांगोळी आणि रांगोळीचे रंग वापरून कोलाज करता येईल.
  •  वेगवेगळ्या फळांची सालं वापरून तर फारच सुंदर कोलाज होईल. लालसर, सफरचंद, रसरसीत केशरी संत्री, हिरवी मोसंबी, चॉकलेटी चिकू, पिवळंधमक लिंबू, हिरवी आणि पिवळी केळी, लाल भोपळ्याची पिवळसर केशरी साल...कित्तीतरी हवे तेवढे ताजे टवटवीत रंग असल्यावर बाप्पा खूश झालाच पाहिजे.
  •  माझ्या ताईकडं तर कपाळावर लावायच्या टिकल्यांची १०० पाकिटं तरी आहेतच. अनेक रंगांच्या, गोल, लंबगोल, चौकोनी, उभ्या रेषा, त्रिकोणी, लाल गोलात केशरी गोल, निळ्या चौकोनात लाल गोल, जांभळ्या गोलात चकाकणारा खडा...असल्या विविध आकारांच्या आणि प्रकारांच्या टिकल्या आहेत त्या. कोलाज करण्यासाठी आणखी काय पाहिजे?* रंगीत रेशमी कापडांचे तुकडे घेऊन बाप्पाला सजवणं म्हणजे कोलाजच की! मी बाप्पासाठी मखरसुद्धा रेशमाचंच करणार आहे.
  •  आमच्याकडं एवढ्यातच सुतारकाम झालं. त्या वेळी मी लाकडाचा भुसा जमा करून ठेवला; पण आता मात्र हा लाकडाचा भुसा रंगवून त्यापासून मी कोलाज करीन.
  •  मी मात्र कोलाजसाठी फक्त बियाच वापरायचं ठरवलं आहे. कलिंगड, लाल भोपळा, दुधी भोपळा, काकडी, सफरचंद, संत्री, डाळिंब, पेरू. अगदी फळबागेतलाच बाप्पा होणार माझा.
  •  मला पूर्वी जगातल्या वेगवेगळ्या देशांची पोस्टाची तिकिटं जमवण्याचा छंद होता. अशी खूप तिकिटं आहेत माझ्याकडं. मी तर दोन प्रकारे कोलाज करणार आहे. एक फक्त भारतीय टपालतिकिटं वापरून, तर दुसरं फक्त विदेशी टपालतिकिटं वापरून. एकदम सही दिसेल हे.

‘‘अरे बास...बास आता. मला वाटतं, तुम्ही सांगता सांगता नक्कीच ३० पेक्षा जास्त प्रकार सांगितलेत, असंच वाटतंय मला.’’

‘‘पण आम्हाला आणखी सुचतंय. आता आमचा ‘आयडिया जनरेटर’ फुल स्पीडमध्ये आहे. आणखी १० आयडिया तरी सांगतो..’’ असं नेहा म्हणत असतानाच किचनमधून चुर्र चुर्र असे आवाज येऊ लागले. बटाटेवडे तळल्याचा खमंग वास दरवळू लागला

आणि शंतनू दोन्ही हात वर करत म्हणाला ः ‘‘बास...बास... आता मला पोटात कोलाज करण्याची वेळ झाली आहे. त्यासाठी १० च काय १०० आयडिया सांगितल्यात तरी चालेल; पण आता ‘पोट-कोलाज’ लगेच सुरू होऊ दे.’’

सगळे गुरगुरून हसत आनंदानं म्हणाले ः ‘‘खरंय...खरंय! ‘उगाच चांगल्या कोलाजला उशीर नको’ अशी एक म्हण आहेच की!’’

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   ‘मुलांची कुठलीच मदत न घेता यातले किंवा यापेक्षा वेगळे दोन कोलाज तुम्ही करा’ बस्स, एवढाच तुमच्यासाठी गृहपाठ.
  •   ‘मुलांशिवाय काम करताना शिकत शिकत चुकाल, तर मुलांसोबत काम करताना चुकत चुकत शिकाल’ ही प्राचीन चिनी म्हण नेहमीच लक्षात ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com