अभ्यासाचं टॉनिक (राजीव तांबे)

अभ्यासाचं टॉनिक (राजीव तांबे)

मुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘ही विषयांची गंमतही छान आहे. यासंदर्भात मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. मुलांना गणिताची भाषा, विज्ञानाचा इतिहास, भूगोलातलं विज्ञान ओळखायला प्रेरित केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला त्याचं ‘अभ्यासाचं टॉनिक’ घेण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे, तरच तो सर्व विषयांच्या भाषा आणि सर्व विषयातलं विज्ञान सहजी समजून घेईल.’’

हा  रविवार अन्वयच्या घरी ठरला होता. प्रत्येकानं येताना काही ना काही गोष्टी आणायच्या आणि त्यापासून सगळ्या बाबालोकांनी एकदम यम्मी डिश बनवायची, असं ठरलं होतं.

वेदांगी, पार्थ, पालवी, नेहा आणि शंतनू वेळेवरच आले. येताना सोबत आणलेल्या पिशव्या त्यांनी स्वयंपाकघरात ठेवल्या आणि मुलं बाहेरच्या खोलीत येऊन बसली.
अन्वयची आई म्हणाली ः ‘‘आज मी तुम्हां सगळ्यांना बदलून टाकणार आहे, म्हणजे तुम्ही जे आता नाही, ते तुम्ही आता होणार आहात...!’’
हे ऐकताच पार्थ घाबरून ओरडला ः ‘‘नको...नको...असला अदलाबदलीचा खेळ नकोच. कारण, मग मी घरी परत गेलो तर माझी आई मला ओळखणारच नाही ना? मग मी कुठं जायचं...?’’
सगळेच धसफसून हसले.
आई म्हणाली ः ‘‘अरे पार्थू, फक्त खेळापुरती अदलाबदल रे. हं, तर आता नीट ऐका. या समोरच्या भांड्यात मी १० चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. प्रत्येकानं एक चिठ्ठी घ्यायची. आपली चिठ्ठी इतर कुणाला दाखवायची नाही. कुणाशी बोलायचंही नाही. काही मदत हवी असेल तर माझ्याशी बोलायचं...’’
‘‘अगं पण, त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं असणार आहे, ते तरी सांग.’’
‘‘सांगते... सांगते. त्या चिठ्ठीत एका व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे. उदाहरणार्थ ः त्या चिठ्ठीवर जर लिहिलेलं असेल ‘बागेतला माळी’ तर तुम्ही बागेतला माळी आहात असं समजायचं. बागेतला माळी असल्यानं तुम्हाला बाग कशी असावी असं वाटतंय? किंवा तुम्हाला काय अडचणी असू शकतात? बागेतला माळी म्हणून तुम्हाला बागेत येणाऱ्या लोकांना काही सांगायचं आहे का? या आणि अशा स्वरूपाच्या प्रश्‍नांच्या आधारे तुम्ही फक्त पाच मिनिटं बोलायचं आहे. थोडक्‍यात, तुम्ही बागेतला माळी या भूमिकेत शिरायचं आहे. आता एकेकानं चिठ्ठ्या घ्या आणि लागा कामाला. विचार करण्यासाठी तुम्हाला २० मिनिटं मिळणार आहेत. तर घ्या चिठ्ठी आणि करा गट्टी.’’
सगळ्यांनी चिठ्ठ्या घेतल्या. मग सगळे जण घरातच वेगवेगळ्या ठिकाणी बसून विचार करू लागले. आपण काय बोलायचं याची प्रॅक्‍टिस मनातल्या मनात करू लागले.
थोड्याच वेळात सगळे सज्ज झाले.
बाबा म्हणाले ः ‘‘आधी चटपटीत चुटूकपुटूक आणि खुसखुशीत खुसुकफुसूक खाऊन घ्या. मग अदलाबदली खेळायला सुरवात करा.’’
आई म्हणाली ः ‘‘तुम्ही आता कोण कोण आहात, ते सांगा बरं.’’
शास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, लेखक, शेतकरी, मुख्याध्यापक आणि पालक असे ते सगळे होते.
गणितज्ज्ञ म्हणाले ः ‘‘मी आधी बोलतो.’’
आणि ते बोलू लागले ः ‘‘व्वा! गणित किती छान आहे. गणितात किती मजा आहे, असं घरातले पालक आणि शाळेतले शिक्षक कधीच का बरं म्हणत नाहीत? त्यामुळं बिचाऱ्या मुलांना गणिताची भीती वाटते.’’
पालक म्हणाले ः ‘‘कसं म्हणणार? आम्हीसुद्धा ही वाक्‍यं आमच्या लहानपणी ऐकली नाहीत. आम्हालाही अजून गणिताची तशी भीती आहेच हो.’’
मुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘तुमचं म्हणणं खरं आहे. मला वाटतं, आम्ही जर मुलांना गणितातली गंमत दाखवली, तर गणिताची भीती दूर पळून जाईल.’’
पालक म्हणाले ः ‘‘आम्हालाही दाखवा गणिताची गंमत. आम्हालाही शिकवा मुलांसोबत खेळता येतील असे गणिताचे खेळ. म्हणजे खेळ खेळता खेळता आम्हा दोघांचीही त्या गणित-भीतीतून सुटका होईल.’’
शेतकरी म्हणाले ः ‘‘अहो, तुमची ती सगळी गणितं त्या तुमच्या शहरातलीच असतात बघा. जमिनीची खरेदी-विक्री, शेताची मोजणी, किती एकरासाठी किती खत आणायचं, हे हवंच की गणितात.’’

लेखक म्हणाले ः ‘‘मला जरा वेगळाच मुद्दा मांडायचा आहे. आपण गणितं तर नव्यानं लिहूतच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, आम्ही लेखक मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही गणिताच्या रंजक गोष्टी लिहू. गोष्टी वाचत वाचत आणि गोष्टी सोडवत सोडवतच मुलं त्यांच्या नकळत गणित शिकली पाहिजेत. अशा गोष्टी लिहिण्याचं आव्हान आम्ही लेखक स्वीकारत आहोत.’’
शास्त्रज्ञ म्हणाले ः ‘‘गणिताप्रमाणेच विज्ञानाचीही बिकट अवस्था आहे.’’
सगळेच म्हणाले ः ‘‘म्हणजे?’’
शास्त्रज्ञ म्हणाले ः ‘‘जरा स्पष्टच सांगतो म्हणून रागावू नका. अहो, पालकांना वाटतं की जे काही विज्ञान आहे, ते फक्त पाठ्यपुस्तकात आहे आणि शिक्षकांना वाटतं की पाठ्यपुस्तक पुरं केलं की विज्ञान संपलं. मुलाला विज्ञानात जरी ५१ मार्क मिळाले, तरी त्याला सगळं विज्ञान समजलं, असं काही शिक्षकांना वाटतं; पण तसं नसतं ना हो.’’
पालक तावातावानं म्हणाले ः ‘‘तुम्हाला कुणी सांगितलं की पालकांना असं वाटतं म्हणून? सांगा...सांगा.’’
शास्त्रज्ञ शांतपणे म्हणाले ः ‘‘सांगतो. सगळेच पालक असे असतात, असं मी म्हणत नाहीए; पण बहुतेक पालक असे असतात. उदाहरणार्थ ः चौथीतल्या एका मुलानं बाबांना प्रश्न विचारला, ‘सीलिंग फॅनची पाती फिरतात; कारण तो पंखा फिरतो म्हणून. म...पंख्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली दांडी का फिरत नाही?’ किती चांगला प्रश्न आहे हा; पण हा प्रश्न ऐकून ते पालक मुलावरच डाफरले, ‘दिसतंय ना फिरत नाही ते? कसले फालतू प्रश्‍न विचारतोस? गप्प बैस.’ प्रश्न विचारणारा मुलगा हुशार असतो, हेच त्या पालकांना कळलं नाही.’’

शास्त्रज्ञ म्हणाले ः ‘‘खरं म्हणजे अशा वेळी, ज्या दुकानात पंखा दुरुस्त करतात, त्या ठिकाणी मुलाला घेऊन गेलं पाहिजे. उघडलेला पंखा त्याला दाखवला पाहिजे आणि त्याचं कुतूहल चाळवलं पाहिजे, म्हणजे त्याच्या मनात आणखी प्रश्न निर्माण होतील. मनात प्रश्न निर्माण होणं, ही तर शिकण्याची पहिली पायरी आहे.’’
‘‘हो; पण तसं होत नाही. जर आपल्याला प्रश्‍नाचं उत्तर माहीत नसेल, तर तसं सांगावं की. आणि दोघांनी मिळून शोधावं की.’’ मुख्याध्यापकांना थांबवत लेखक म्हणाले ः ‘‘एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे.’’
‘‘कोणती.. कोणती?’’
‘‘आपण कधीही, कुठंही, केव्हाही आणि कुणाकडूनही शिकू शकतो, हा विश्‍वास मुलांच्या मनात मोठ्या माणसांनी त्यांच्या बोलण्यातून नव्हे, तर त्यांच्या कृतीतून रुजवला पाहिजे, तर आणि तरच फरक पडू शकेल.’’
शेतकरी म्हणाले ः ‘‘शेतात मिळून काम करता करता सगळेच एकमेकांकडून शिकत असतात.’’

पालक म्हणाले ः ‘‘सांगितलेली कुठलीच गोष्ट ही मुलं ऐकत नाहीत. काय करायचं? त्यांच्या अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी बंदच केल्या पाहिजेत असं वाटतं..’’
शेतकऱ्यानं विचारलं ः ‘‘म्हणजे..?’’
‘‘अहो, त्यांना क्रिकेट खेळायला पाहिजे, कराटे शिकायला पाहिजे, गाण्याच्या क्‍लासला जायला पाहिजे, कथक शिकायला पाहिजे, मैदानावर हुंदडायला पाहिजे आणि घरी आल्यावर टीव्हीवरच्या मॅच पाहायला पाहिजेत...’’
कपाळाला हात लावत शेतकऱ्यानं विचारलं ः ‘‘एवढं सगळं एकाच दिवशी...? कम्माल आहे!’’
शेतकऱ्याचे हात धरत मुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘अहो, एवढं सगळं रोज करायचं असेल तर मुलं शाळेत कधी जाणार?’’
‘‘हां. ते पण खरंच.’’
शास्त्रज्ञ म्हणाले ः ‘‘माझं एकदा ऐकून पाहा. अभ्यासाबरोबर मुलांना याचीही गरज असते. मुलांचा आवडता खेळ, गाणं किंवा त्यांच्या आवडीचा छंद बंद केला तर त्यांचा अभ्यास कधीच होणार नाही. अभ्यास करणाऱ्या कुणालाही विरंगुळा हा हवाच असतो.’’
शेतकरी म्हणाले ः ‘‘आम्ही शेतात कामं करतो म्हणजे अभ्यासच करतो; पण आम्ही रात्री देवळात भजनी मंडळात जातो. भजनं म्हणतो. सगळा थकवा पळून जातो. खरं सांगतो, आमचं भजनी मंडळ बंद केलं तर आम्हाला शेतावर कामं करायला सुधारणार नाही. आमचं टॉनिक आहे ते!’’
लेखक आणि गणिततज्ज्ञ म्हणाले ः ‘‘खरंय. असं ‘टॉनिक’ सगळ्यांनाच आवश्‍यक असतं.’’

शास्त्रज्ञ म्हणाले ः ‘‘तुम्ही रागावू नका; पण मला एक वेगळाच मुद्दा सांगायचा आहे.’’
पालक म्हणाले ः ‘‘सांगा...सांग...तुमचा मुद्दा आम्हाला नाही कळला तर आम्ही समजावून घेऊ; पण तुम्ही सांगाच.’’
‘‘गणित, विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल हे काही वेगवेगळे विषय नाहीत. ते सगळे एकच आहेत...’’
‘‘म्हणजे? आता हे काय नवीनच?’’ सगळेच भुवया उंचावत म्हणाले.
‘‘रोज जगताना, कुठलंही काम करत असताना एखादा विषय वेगळा काढता येत नाही...’’
शेतकरी म्हणाले ः ‘‘तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाहीए. एखादं फक्कड उदाहरण देऊन सांगा...’’ बाकी सगळ्यांनीही माना डोलावल्या.
‘‘आता तुमचं पाहा. तुम्ही शेतात लावणी करता तेव्हा त्या वेळी तुम्ही गणित, विज्ञान, भाषा, इतिहास आणि भूगोलाचा उपयोग करताच की नाही?’’
‘‘कसं काय? हे सगळे विषय वापरत बसलो तर मग लावणी कधी करणार उन्हाळ्यात की काय?’’
‘‘तुम्ही लावणी करताना शेतात ओळी आखून घेता. दोन रोपांतलं अंतर बरोबर ठेवता हे गणितच आहे.’’
‘‘पाऊस किती पडल्यावर, शेतात किती चिखल झाल्यावर आणि रोपं किती वाढल्यावर लावणी करायची? हे विज्ञानच आहे.’’
‘‘भाषा म्हणजे काही फक्त लिहिणं-वाचणं नाही. तण कधी काढायचं, कापणी कधी करायची ही पिकाची भाषा तुम्हाला कळतेच की. तशीच पावसाची भाषाही कळते तुम्हाला.’’
‘‘जसा तुमच्या शेताला इतिहास आहे, तसाच तुमच्या भाषेलाही इतिहास आहे. अनेक वर्षांच्या ठोकताळ्यांवरून, अनुभवांवरूनच तुम्ही पावसाची आणि पिकाची भाषा समजून घेतली आहे.’’
शेतकरी उड्या मारत म्हणाला ः ‘‘कळलं... कळलं...आता सगळं सांगू नका. मला विचार करायला अन्‌ शोधून काढायला तो भूगोल तरी शिल्लक ठेवा.’’
लेखक म्हणाले ः ‘‘व्वा! मला तर लिहिण्यासाटी नवनवीन गोष्टी सुचू लागल्या आहेत.’’

मुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘ही विषयांची गंमतही छान आहे. यासंदर्भात मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. मुलांना गणिताची भाषा, विज्ञानाचा इतिहास, भूगोलातलं विज्ञान ओळखायला प्रेरित केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला त्याचं ‘अभ्यासाचं टॉनिक’ घेण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे, तरच तो सर्व विषयांच्या भाषा आणि सर्व विषयातलं विज्ञान सहजी समजून घेईल.’’

पालक म्हणाले ः ‘‘आमचं काही चुकतही असेल; पण आता मुलांना अभ्यासासाठी त्यांच्या आवडीचं कुठलं ‘टॉनिक’ द्यायचं, हे त्यांनाच विचारून ठरवलं पाहिजे.’’
दोन्ही हात वर करत गणितज्ज्ञ म्हणाले ः ‘‘माझ्या पोटाचं गणित बिघडलं आहे. ते आता चमचमीत खाण्याची भाषा बोलत आहे. कारण पोटाला भुकेचा इतिहास आहे. आता पोटाचा भूगोल होण्याआधीच...’’
‘‘आलो.. आलो’’ असं म्हणत सगळे बाबा हातात ‘खाऊबश्‍या’ घेऊन पळतच आले.

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   असा ‘अदलाबदल-खेळ’ खेळताना तुम्हीसुद्धा त्यात भाग घ्या.
  •   अदलाबदल-खेळामुळं मुलं इतर व्यक्तिरेखांचा विचार करत, त्यांच्या दृष्टिकोनातून एखादी समस्या समजून घेण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करतात.
  •   प्रत्येक वेळी मुलांची मांडणी सफाईदार होईलच असं नाही; पण हे आपण समजून घेऊन मुलांना अधिक वाव दिला पाहिजे.
  •   अदलाबदल-खेळात पालकांनी कुठली भूमिका घ्यायची, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मुलांना असावं.
  •   ‘कितीही अदलाबदल केली, तरी सुजाण पालक आपल्या कृतीतून, आपण कधीही, कुठंही, केव्हाही आणि कुणाकडूनही शिकू शकतो, हा विश्वास आपल्या मुलांना देतात,’ ही भलीमोठी चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com