आनंदीआनंद बॅंक (राजीव तांबे)

आनंदीआनंद बॅंक (राजीव तांबे)

नेहाची आई मुलांना म्हणाली ः ‘‘घटस्थापना झाली की नवरात्रीला सुरवात होते. या नऊ दिवसांत कुठलं नवीन काम करता येईल, ते तुम्ही शोधायचं आहे आणि करायचंही आहे. त्यासाठी तुम्हाला कुठली कुठली कामं करता येतील, याची आपण एक बॅंक करणार आहोत. नऊ दिवस रोज वेगवेगळी कामं करा किंवा आवश्‍यक वाटल्यास एकच काम नऊ दिवस करा; पण असं काम केल्यानंतर त्याविषयी तुम्ही किमान पाच ओळी तरी लिहायच्या आहेत...’’

आ  ज सगळे नेहाच्या घरी जमले होते. अन्वय, पालवी, शंतनू, वेदांगी आणि पार्थ सगळेच वेळेवर आले. आज मुलंच एक स्पेशल चटकदार डिश तयार करून पालकांना खायला देणार होते.

थोडा वेळ किचनमध्ये किचनाकिचनी करून मुलं हात पुसत बाहेर आली.
नेहाची आई म्हणाली ः ‘‘आज मी तुम्हाला एक वेगळंच काम देणार आहे, त्यासाठी तुम्हाला रोज एक तास तरी खर्च करावा लागेल. एखाद्‌वेळेस तुम्हाला दीड ते दोन तासही खर्च करावे लागतील...’’
‘‘पण करायचं काय तासभर...? आणि दीड तासभर? आणि दोन तास? अभ्यासबिभ्यास नाही ना गं?’’ पार्थ कुरकुरलाच.
‘‘आधी नीट ऐक तर...’’
‘‘पण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे की एकेकट्यानं?’’ वेदांगीनं विचारलं.
‘‘अरे, आधी सगळं ऐकून घ्या; मग विचारा की प्रश्न. घटस्थापना झाली की नवरात्रीला सुरवात होते.

या नऊ दिवसांत कुठलं नवीन काम करता येईल, ते तुम्ही शोधायचं आहे आणि करायचंही आहे. त्यासाठी तुम्हाला कुठली कुठली कामं करता येतील, याची आपण एक बॅंक करणार आहोत. नऊ दिवस रोज वेगवेगळी कामं करा किंवा आवश्‍यक वाटल्यास एकच काम नऊ दिवस करा; पण असं काम केल्यानंतर त्याविषयी तुम्ही किमान पाच ओळी तरी लिहायच्या आहेत...’’

‘‘म्हणजे जो चांगलं लिहील किंवा चांगलं काम करेल, त्याला बक्षीस काय मिळणार आहे? चांगल्या कामाकरता चांगलं घसघशीत बक्षीस हवं,’’ असं शंतनूनं म्हणताच आईनं फक्त ‘‘ना...ना...’’ करत मान हलवली.
‘‘ही कुठली स्पर्धा नाही की कुठली परीक्षाही नाही. तुम्ही तुमच्या आवडीचं काम करणार आहात. तुम्ही खूप वेगळं काम करणार आहात आणि मुख्य म्हणजे, तुम्ही तुमच्या आनंदासाठी काम करणार आहात, कुठल्याही बक्षिसासाठी नाही.’’
‘‘पण फक्त एक ते दीड तासात करता येईल असं कोणतं काम असेल? तेच सुचत नाहीए,’’ डोकं खाजवत पालवी म्हणाली.

‘‘तेच तर शोधायचं आहे.’’
‘‘शोधत नाही म्हणून सापडत नाही आणि सापडत नाही म्हणून आम्ही काम करत नाही.’’
आई म्हणाली ः ‘‘असं नव्हे. आपण सकारात्मक विचार करू या. या तुझ्या विचारातलं म्हणजे वाक्‍यातलं ‘नाही’ हे काढून टाकून हेच वाक्‍य सकारात्मक कर पाहू आणि पाहाच रस्ता मिळतो की नाही ते...’’
‘‘आम्हाला काम करायचंच आहे म्हणून आम्ही काम शोधतो म्हणजे आम्हाला काम मिळेलच.’’
‘‘शाबास!’’
टिचकी वाजवत अन्वय म्हणाला ः ‘‘मला एक गोष्ट सुचते आहे. आमच्या शेजारी रोहन राहतो. तो तिसरीत आहे. गेले तीन-चार दिवस तो गणितावरून आईची बोलणी खातोय. मी त्याच्या गणितातल्या अडचणी सोडवीन.’’
‘‘व्वा! फारच छान.’’
आई म्हणाली ः ‘‘आता आपण एक खाऊ करण्याचा ब्रेक घेऊ. आता तुम्ही मुलं किचनमध्ये किचनाकिचनी करताना शोधाशोधीही करा. चटकदार खाऊ तयार झाला की चकाचक कामांची यादीही सांगा. चला, सगळ्या बल्लवाचार्यांनी कृपया किचनात जावं... सगळी मोठी माणसं तुमच्या हातचं खायला फारच उत्सुक आहेत.’’
चिंच आणि खजुराची आंबट-गोड तपकिरी घट्ट चटणी...लसूण आणि लाल मिरच्यांची लालभडक पातळ चटणी...हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची सणसणीत चटणी...कुरमुरे, शेव, उकडलेले बटाटे, चुरलेल्या पुऱ्या, कांदा-कैरीचे पातळ काप, मसाला डाळ हे सगळं मस्त कालवून त्यावर कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि सरतेशेवटी कुटलेल्या लवंगपाण्याचा हबका...अशी चटकदार-चमचमीत भेळ हापसल्यावर सगळ्यांच्या जिभेला धार आली. नाका-तोंडातून पाणी वाहू लागलं. हायहुई आणि सूंसूं करत सगळे जण गोड गारेगार सरबत प्यायले, तेव्हा जिवात जीव आला.
या खतरूड-खटखटीत भेळेला सगळ्या मोठ्या माणसांनी नाक पुसत आणि तोंड टिपत शाबासकी दिली.
आई म्हणाली ः ‘‘चलो गुरू...हो जाओ शुरू...’’
मुलं तयारीतच होती. त्यांनी किचनमध्ये भेळाभेळी करताना शोधाशोधी केलीच होती. सगळे जण एकापाठोपाठ बोलू लागले.
 
अन्वयचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही सगळे जण आमच्या शाळेतला किंवा आमच्या शेजारचा किंवा आमच्या परिसरातला एक लहान मुलगा ‘अभ्यासदत्तक’ घेऊ. म्हणजे त्याला अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्याला मदत करू. इतकंच नव्हे तर, समजा आम्हाला त्याची अडचण सुटली नाही तर आम्ही इतरांची किंवा आमच्या शिक्षकांची मदत घेऊन त्याची अडचण सोडवूच. आम्हीही त्याच्या बरोबर शिकू.

  आम्ही सगळ्यांनी वृक्षारोपण केलं आहे. आम्ही प्रत्येकानं किमान तीन झाडं तरी लावली आहेत; पण आम्हाला सांगताना लाज वाटते, की त्या झाडांचं पुढं काय झालं, हे आम्ही पाहिलंसुद्धा नाही; पण आता आम्ही आमची ही चूक सुधारू इच्छितो. आम्ही आमच्या झाडांची पाठराखण तर करूच; पण त्यासाठी आम्ही आमच्या मित्रांची, शाळेची आणि घरातल्या सगळ्यांची मदतही घेऊ. गुरांपासून वाचण्यासाठी त्या इवल्या झाडांना कुंपण करू. पाणी घालू. रोज लक्ष देऊ.

  आम्ही सगळे जण गावातल्या नगर वाचनालयाचे सभासद आहोत. त्या ठिकाणी कर्मचारीवर्ग अपुरा असल्यानं पुस्तकांची फार हेळसांड होते. आम्ही आणि आमचे मित्र मिळून प्रत्येक जण महिन्यातले किमान तीन तास नगर वाचनालयासाठी देईल. पुस्तकांची वर्गवारी करणं, पुस्तकांच्या नोंदी करणं, पुस्तकं व्यवस्थित ठेवणं, जुन्या पुस्तकांची काळजी घेणं, सभासदसंख्या वाढवणं, वाचनालयाच्या मदतीनं ‘लेखक तुमच्या भेटीला’ असे कार्यक्रम आयोजित करणं यासाठी आम्ही मदत करू.
  दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारचे दोन तास आम्ही ‘खास मुलांसाठी’ राखून ठेवणार आहोत. परिसरातली दिव्यांग मुलं, कर्णबधीर मुलं, दृष्टिहीन मुलं किंवा विशेष गरजा असणारी मुलं यांच्यासाठी आम्ही हे दोन तास त्या मुलांच्या सोईनं देणार आहोत. त्यांना गोष्टी सांगणं किंवा वाचून दाखवणं, त्यांची अभ्यासाची पुस्तकं त्यांना वाचून दाखवणं, त्यांच्या सोबत खेळणं किंवा त्यांच्यासोबत काही शून्य खर्चाचे विज्ञानाचे प्रयोग करणं असं काहीसं करणार आहोत किंवा त्यांच्या बरोबर छोटीशी सहल काढणं, मस्त भटकणं...

  आम्हा सगळ्यांना एक मस्त कल्पना सुचली आहे. ती खरोखर अमलात येईल की नाही, ते काही दिवसात कळेलंच. आम्ही नेहमी महिन्याच्या पहिल्या रविवारी आमच्या परिसरात एक यात्रा काढणार आहोत. आम्ही आणि आमचे मित्र घराघरात जाऊन लोकांना सांगतील की, ‘आम्ही आपल्या भागांतल्या सगळ्यांसाठी एक वाचनालय सुरू करत आहोत, यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे; पण तुम्ही आम्हाला पैसै न देता तुमच्या घरातली जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी द्या. तुम्ही जर दर महिन्याला आम्हाला पाच किलो रद्दी दिलीत, तर तुम्ही आमच्या वाचनालयाचे एक महिन्यासाठी सभासद होऊ शकता. तुम्हाला महिनाभर पुस्तकं फुकट वाचायला मिळतील. आणि समजा तुमची रद्दी जर पाच किलोपेक्षा कमी असेल, तर तुमच्या घरातली कुठलीही दोन पुस्तकं रद्दीसोबत वाचनालयाला भेट द्या आणि महिन्याभराचं सभासदत्व मिळवा.

    हे एकदा लोकांना कळलं, की रविवारी यात्रा काढण्याची गरजच राहणार नाही. लोक आपणहून पाच किलो रद्दी किंवा सोबत दोन पुस्तकं घेऊन येतील आणि वाचनालयाचं सभासदत्व घेतील. रद्दी विकून आम्ही वाचनालयासाठी पुस्तकं आणू. वाचनालयाची जबाबदारी परिससातले आजी-आजोबा आणि सेवानिवृत्त लोक सांभाळतील.’
  माझ्या आजी-आजोबांना पत्त्यांचे खूपच खेळ माहीत आहेत. उदाहरणार्थ ः पैसा-पैसा, झब्बू, गड्डा झब्बू, लॅडीज्‌, सात-आठ, पाच-तीन-दोन, मुंबरी, बदाम सात, ओपन झब्बू, नॉट ॲट होम, चॅलेंज...अन्वयची आजी तर बुद्धिबळात चॅम्पियन आहे. आमच्या आई-बाबांनाही हे खेळ माहीत असतील; पण एकतर त्यांना हे खेळ आम्हाला शिकवायला वेळ नाही आणि आम्हाला हे खेळ माहीत नाहीत म्हणून ते आमच्याशी हे खेळ खेळत नाहीत. मग आम्हाला नाइलाजानं मोबाईलवर खेळ खेळावे लागतात. यावर एक उपाय म्हणजे, महिन्यातला प्रत्येक पहिला रविवार हा ‘खेळ-रविवार’ म्हणजे ‘गेम-संडे’ असणार आहे. या दिवशी फक्त दोन तास आम्ही आजी-आजोबांसोबत पत्ते खेळू, ऊनो खेळू, स्पेल चेक खेळू किंवा बुद्धिबळ खेळू. नवीन खेळ शिकू, सराव करू आणि शक्‍य झाल्यास आजी-आजोबांना हरवूही! पण मोबाईल-खेळांपासून लांब राहू.

  परवा गंमतच झाली. माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बाबांनी ‘सरप्राइज गिफ्ट’ म्हणून सहा गिअर असलेली एक महागडी सायकल त्याला घेऊन दिली. सायकल पाहताच तो जोरजोरात रडायलाच लागला. त्याच्या बाबांना कळेचना, ‘आता याला काय झालं, आणि याचं डोकं का फिरलं?’ मग बाबांना कळलं की त्याला सायकल चालवताच येत नव्हती. त्यानं हट्ट केला, ‘मला आत्ताच्या आत्ता सायकल शिकवा.’ बाबा म्हणाले, ‘मला आत्ताच काय; पण संपूर्ण वर्षभर वेळच नाही. तुझी तूच शिक.’ यातून आम्हाला एक कल्पना सुचली. अनेक मुलांना त्यांच्याकडं सायकल नाही म्हणून सायकल चालवता येत नाही. आम्ही सुटीच्या दिवशी अशा मुलांना मैदानावर घेऊन जाऊ आणि सायकल शिकवू आणि तेही एकदाच. नंतर ही सायकल शिकलेली मुलं इतर मुलांना शिकवतील, ही मालिका अशीच सुरू राहील.

  रविवारी सकाळी आमच्या गल्लीत आम्ही ‘स्वच्छता अभियान’ घेऊ. अर्थात त्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागेल. झाडू, घमेली, फिनेल, मास्क हे सगळं महापालिकेच्या कार्यालयातून आणावं लागेल; पण मला खात्री आहे, की सगळे जण उत्साहानं भाग घेतील. दसऱ्याच्या आधी आमची गल्ली चकाचक होईल.
  दसऱ्याला आपट्याची पानं ‘सोनं’ म्हणून लुटतात. एकमेकांना देतात. दुसऱ्या दिवशी या सोन्याचा प्रचंड कचरा झालेला असतो. आम्ही या कचऱ्याचं पुन्हा सोनं करायचं ठरवलं आहे! दुसऱ्या दिवशी हे ‘आदल्या दिवशीचं सोनं’ गोळा करून ते गावातल्या बागेला कंपोस्ट खत करण्यासाठी आम्ही वापरणार आहोत. त्यासाठी बागेत आधीच खड्डे करून ठेवणार आहोत.

  दसऱ्याला सीमोल्लंघन करण्यासाठी आम्ही एक भन्नाट आयडिया शोधली आहे; पण ती आम्ही आत्ताच सांगणार नाही. ही लई भारी आयडिया आम्हाला गुप्त ठेवायची आहे. म्हणजे ती जर जमली तरच सांगू, नाहीतर नाही. तर तशी आम्हाला परवानगी हवी.

सगळी मोठी माणसं टाळ्या वाजवत म्हणाली, ‘‘आहे...आहे...परवानगी आहे.’’
ृ- मुलं दणक्‍यात म्हणाली ः ‘‘तर मग ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
‘‘ही तुमची बॅंक फक्त घेणारी नाही आणि कर्ज देऊन व्याज वसूल करणारी तर नाहीच नाही. तुमची बॅंक निरपेक्षपणे देणारी आहे. त्यामुळं तुमच्या बॅंकेला जसा देण्यात आनंद आहे, तसा घेणाऱ्यालाही आनंद आहे. तुमची ही ‘आनंदीआनंद बॅंक’ आहे. आता पुढच्या वेळी येताना...’’
मोठ्या माणसांना थांबवत मुलं म्हणाली ः ‘‘आता पुढच्या वेळी येताना आम्ही तयारीतच येऊ. कारण...’’
मुलांना थांबवत मोठी माणसंच म्हणाली ः ‘‘कारण...ओके बोके पक्के, तुमचं काम शंभर टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ

  •   मुलांना त्यांच्या आवडीचं काम शोधण्याचं स्वातंत्र्य दिलं की मुलं जोमानं काम करतात.
  •   मुलांवर विश्‍वासानं कामं सोपवा. काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाका. थोडीशी चूक झाली तरी त्यांच्या कामातला चांगलेपणा अधोरेखित करा.
  •   मुलं सकारात्मक होण्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकणं गरजेचं असतं.
  •   खूप वेळा मुलांची काम करण्याची आणि विचार करण्याची पद्धत अगदीच भिन्न असते. अशा वेळी (अनावश्‍यक) उपदेश करण्याची अनिवार इच्छा पालकांना होते. अशा पालकांनी स्वतःला सांभाळावं आणि शांत राहावं.
  •   ‘पालकांच्या विश्वासाच्या गुंतवणुकीवरच मुलांची आनंदीआनंद बॅंक सुरू असते,’ ही चिनी म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com