माझं आवडतं झाड (राजीव तांबे)

माझं आवडतं झाड (राजीव तांबे)

‘‘माझ्या निबंधातली पहिली काही वाक्‍यं अशी होती...‘मला ही बाग अजिबात आवडत नाही. कारण माझ्या आवडीचं झाड या बागेत नाही. जगातली सगळी झाडं लाकडाची असतात; पण माझ्या आवडीचं झाड लाकडाचं नाही; त्यामुळं त्या झाडावर कुणाला चढताच येत नाही...’ ’’

आ ज सगळे शंतनूच्या घरी वेळेच्या आधीच जमले होते. पार्थ आणि नेहा तर सगळ्यांच्या आधीच येऊन बसले होते. थोड्याच वेळात अन्वय, वेदांगी आणि पालवी हेही आले. सगळे प्रचंड उत्सुक होते. कारण, आज नाटक-बॅंकेतली एकपात्रिका शंतनू आणणार होता. ते सगळे मिळून ती वाचणार होते आणि एकपात्रिका कशी सादर करावी, याबाबतचं एक टिपण अन्वय घेऊन येणार होता. हे टिपण ‘चाललो दिल्लीला’ या एकपात्रिकांच्या पुस्तकात त्याला मिळालं होतं.

आज सगळे इतके एक्‍साइट झाले होते, की शंतनूलासुद्धा गरमागरम सामोसे खायची आठवण झाली नाही!
सगळे गोलाकार बसले आणि म्हणाले ः ‘‘अरे अन्वया, आता वाच ते टिपण लवकर म्हणजे आपली अर्धी तयारी झालीच म्हणून समज.’’
‘‘ओके. तर, ऐका हे टिपण ः
एकपात्री नाट्य सादर करण्यापूर्वी...
संहिता काळजीपूर्वक वाचा. उद्गारचिन्ह, प्रश्‍नचिन्ह असलेली वाक्‍यं अन्‌ त्यामागच्या भावना समजून घ्या.
ज्या ठिकाणी क्षणभर थांबणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी मोकळी जागा सोडलेली असून तिथं अशी... खूण - म्हणजे तीन टिंब - आहे. वाचून झाल्यावर डोळे बंद करून सलगपणे आठवण्याचा प्रयत्न करा व त्याच वेळी रंगमंचावरच्या आपल्या हालचाली कशा असतील, याचा विचार करा. आता पुस्तक उघडून पुन्हा वाचा. त्या वेळी हालचालींचं भान ठेवून आवाजातल्या चढ-उतारांवर लक्ष केंद्रित करा. आपला चेहरा अधिकाधिक बोलका असायला हवा. शब्दोच्चार स्पष्ट आणि खणखणीत असावेत. कार्यक्रमाअगोदर तुमचं समाधान होईपर्यंत सराव करा आणि न भिता कार्यक्रम सादर करा. तुम्ही यशस्वी होणारच.’’
‘‘वॉव! यामुळं तर मला खूपच नवीन गोष्टी कळल्या.’’
‘‘हसू नका; पण खरं सांगायचं तर माझी अर्धी भीती कमी झाली.’’
‘‘मग मला वाटतंय, आता सामोसा आणि फराळाचा प्रसाद खाल्ल्यावर उरलेली अर्धी भीतीही गायब होईल,’’ शंतनूचं हे वाक्‍य पूर्ण होण्याआधीच स्वयंपाकघरातून मोठी माणसं फराळाच्या बश्‍या घेऊन आलीच.
चकली खात वेदांगी म्हणाली ः ‘‘आता मला त्या एकपात्री नाट्याची फार उत्सुकता आहे. मला जर आवडलं तर मी ते आमच्या शाळेत करीनच.’’
‘‘मी तर आमच्या सोसायटीच्या गॅदरिंगमध्ये करीन.’’
‘‘पण हे एकपात्री नाट्य सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी आणि त्यांचं मानधन याची चौकशी केली आहेस का तू?’’
तोंडात सामोसा कोंबत शंतनू म्हणाला ः ‘‘खॉतॉना प्रॉश्‍न विचॉरू नकोस. यॉची उत्तरे ताँड मॉकळं झाल्यावर देईन.’’
मस्तपैकी फराळ हादडून आणि त्यावर गारेगार सरबत पिऊन शंतनू म्हणाला ः
‘‘आता जरा जिवात जीव आला. आता आमच्या नाटक-बॅंकेतलं एकपात्री नाट्य वाचतो...’’
‘‘अरे, पण त्याचं नाव काय?’’
‘‘माझं आवडतं झाड...’’
‘‘तुझं आवडतं झाड? कोणतं रे?’’
‘‘अरे यार, ते त्या एकपात्री नाट्याचं नाव आहे.’’
तर ऐका ः (पडदा बाजूला होतो तेव्हा रंगमंचावर कुणीच नाही. इतक्‍यात शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी रंगमंचावर येते).
नमस्कार.
ही गोष्ट आहे आमच्या वर्गातली...एकदम खरीखुरी गोष्ट.
आमच्या शाळेच्या बाजूलाच मोठी बाग आहे.
आता, बाग आहे म्हणजे बागेत खूप झाडं आहेत, हे तुम्ही ओळखलंच असेल! (प्रेक्षकांकडं पाहून, थोडसं थांबून...‘ओळखलं ना?’) शाब्बास!
(आवाज बदलून) हॅहॅ! शाबास...कारण, झाडाशिवायच्या बागेला मैदान म्हणतात हो!!
(प्रौढ आवाजात, नाटकीपणे तोऱ्यात बोलू लागते) ‘हं...तर आता सुविचार लिहून घ्या. ‘मैदानाची बाग करावी पण.. ..बागेचे मैदान करू नये.’ ’
(मूळ आवाजात खेळकरपणे बोलते) काय? अगदी वर्गात बसल्यासारखं वाटलं ना? अहो वाटणारच. सुविचार म्हटलं की वर्गातल्या भिंती आणि रिकामा फळा आठवतो.
अहो, रिकामा म्हणजे... एकदा का फळा भरला की तो बिचारा सुविचार कोण वाचतोय? असो...असो.
मला निबंधलेखनाचा कंटाळाच आहे. याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे, तो अमुक अमुक ओळीतच लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे, ‘एखादा शब्द’ लिहायला चुकून चुकला तर मागच्या पानावर तो शब्द (हलक्‍या आवाजात) वेड्यासारखा पाच पाच वेळा लिहावा लागतो.
(मूळ आवाजात) ‘हं. तर निबंधाविषयीची परवाची गंमत सांगते.’
खिडकीतून बागेकडं पाहत बाई म्हणाल्या (बाईंच्या आवाजात हेल काढत बोलते) ‘‘मुलांनो..., निबंधाचा विषय लिहून घ्या. (थोडंसं थांबून) निबंध दहा ओळीत लिहा...
(मूळ आवाजात) बाईंचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अरुण म्हणाला ः (अरुणच्या आवाजात) ‘बाई, बाई.. ‘निबंध दहा ओळीत लिहा’ या विषयावर निबंध लिहायचा का?’
सगळी मुलं फॅक्‌ करून हसली.
बागेत हरवलेल्या बाई एकदम दचकल्या. (चढ्या आवाजात) ः ‘निबंधाचा विषय लिहून घ्या...’
अरुण हळूच कुरकुरत म्हणाला, (आवाज बदलून) ः ‘पण... मघाशी तर सांगितला ना विषय... म... आता हे काय...?’
(चढ्या रागीट आवाजात) ‘गडबड नकोय. निबंधाचा विषय आहे ‘माझं आवडतं झाड.’ प्रत्येकानं धा-धा ओळी लिहायच्या आहेत का...य?’ (मूळ आवाजात) सर्व मुलांनी सवयीनं माना डोलावल्या.
बाई अचानक म्हणाल्या ः (गंभीर आवाजात) ः मुलांनो, निबंध लिहिण्याआधी आपण ‘आवडत्या झाडावर चर्चा करू या.’
(मूळ आवाजात) ‘चर्चा’ या शब्दाचा नेमका अर्थ आम्हाला माहीतच नव्हता. कारण, वर्गात नेहमी बाई बोलतात, ओरडतात किंवा खेकसतात. आम्ही फक्त ऐकतो. त्यामुळं ‘चर्चा’ या शब्दाचा अर्थ, वर्गातल्या प्रत्येक मुलानं आपापल्या सोईनं घेतला. चर्चा करायची म्हणजे काहीतरी करायचं, एवढं सर्वांना समजलं.
वर्गात चर्चेला गंभीरपणे सुरवात झाली...(वेगवेगळे आवाज/आवाजात चढ-उतार)
मीरा म्हणाली ः ‘‘बाई, मी बागेत जाऊ?’’
प्रमोद म्हणाला ः ‘‘बाई, मी झाडावर चढू?’’
अशोक ओरडला ः ‘‘बाई, मी कैऱ्या पाडणार...’’
मोहन किंचाळला ः ‘‘नाय...नाय...मी कैऱ्या पाडणार. माझा नेम सही आहे.’’
काही मुलं आनंदानं नाचत ओरडली ः ‘‘हो, हो...चालेल चालेल. आम्ही मीठही आणलं आहे.’’
मोहन आणि अशोक म्हणाले ः ‘‘म...ठरलं तर. बाई...बाई, तुम्ही रखवालदाराकडं लक्ष ठेवा. आम्ही कैऱ्यांचा ढीग करतो.
मीरा म्हणाली ः ‘‘व्वा, व्वा! दहा ओळींच्या निबंधासाठी प्रत्येकाला दहा दहा कैऱ्या! मज्जाच मज्जा! असे निबंध रोज हवेत.’’
वर्गात एकच गडबड-गोंधळ सुरू झाला.
(वेगवेगळ्या आवाजात) ‘मी छोटे छोटे दगड गोळा करते,’ ‘मीही कैऱ्या पाडणार,’ ‘मी रुमाल आणतो,’ ‘आपण पटापट कैऱ्या गोळा करू या,’ ‘मीठ लावून कैऱ्या काय मस्त लागतात ना?’ ‘बाई...बाई, आम्ही तुम्हालाही देऊ कैऱ्या...’
(मूळ आवाजात) ही करकरीत चर्चा ऐकून बाईंना गरगरायला, भरभरायला लागलं होतं. त्यांचं डोकं सुन्नं झालं होतं. त्यांचे हात थरथरायला लागले होते. डोळे लहान-मोठे होत होते.

इतक्‍यात एक मुलगा ओरडला (अत्यंत उत्साहपूर्ण आवाजात) ः ‘चला, सगळ्यांनी बागेत चर्चा करायला. चला...चला. उगाच चांगल्या चर्चेला उशीर नको.’
शॉक लागल्यासारखी सगळी मुलं ताडकन्‌ उठली...
आणि दोन्ही हात वर करून रागानं थरथरत बाई ओरडल्या ः ‘‘थांबा.’’
मुलं फुसकन्‌ खाली बसली!
‘‘अरे, याला चर्चा नव्हे, तर गोंधळ म्हणतात, चर्चाबिर्चा...’’
पुढं बाईंना काही बोलताच आलं नाही. कारण...दारात मुख्याध्यापक उभे होते.
मुख्याध्यापकांनी मुलांना विचारलं ः ‘‘काय चाललंय वर्गात?’’
हात वर करून अरुण म्हणाला ः ‘‘सर, निबंधावर चर्चा करण्यासाठी आम्ही बागेत चाललो होतो.’’
सगळी मुलं आनंदानं ओरडली, ‘‘होऽऽऽऽऽ. हो...हो... हो...’’
बाई भीतीनं गारठल्या. त्यांचे पाय लटलटू लागले. चेहरा कसनुसा झाला. त्या आवंढा गिळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या; पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
आता मुख्याध्यापक काय बोलतात इकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मुख्याध्यापक आम्हा सर्वांकडं पाहत म्हणाले ः ‘‘व्वा! छानच! बागेत झाडाखाली जाऊन चर्चा करणं, कविता म्हणणं, गोष्टी सांगणं, तर कधी कधी नाचही करणं... व्वा, फारच छान! मलाही आवडतात अशा गोष्टी...’’
मुख्याध्यापक समोर आहेत, हे विसरून सगळी मुलं एकदम ओरडली ः ‘‘हूऽऽऽ’’
आणि...
मुख्याध्यापकांनी हात वर करताच, बटण दाबल्याप्रमाणे मुलं क्षणात गप्प बसली!
आता बाईंना जरा बरं वाटलं. त्या उठून उभ्या राहिल्या.
मुख्याध्यापक हात उंचावत म्हणाले ः ‘‘चला ऽ ऽ चला ऽ ऽ बागेत चर्चा करायला चला ऽ ऽ, झाडाखाली बसून निबंध लिहायला चला ऽऽ.’’
मुख्याध्यापक आम्हा मुलांना घेऊन बागेत गेले.
आम्ही बागेत फिरलो...भटकलो...बागडलो...आणि...झाडावरसुद्धा चढलो; पण शहाण्या मुलांप्रमाणे आम्ही कैऱ्याबियऱ्या पाडल्या नाहीत. कारण...(हळू आवाजात) रखवालदार आणि मुख्याध्यापक आमच्या मागंमागंच होते. (दुःखी स्वरात) त्यामुळं आमचा नाइलाज झाला.
सगळ्या मुलांनी झाडाखाली बसून ‘माझं आवडतं झाड’ हा निबंध लिहिला.
खूप मुलांनी आपापले निबंध वाचून दाखवले. निबंध ऐकताना मुख्याध्यापक आणि रखवालदार यांचे चेहरे मोहरले. बाईही खूश झाल्या.
पण...(थोडं थांबून)
पण ऽऽ माझ्या निबंधातली पहिली पाच वाक्‍यं ऐकली आणि...
त्या तिघांचे चेहरे काळवंडले. डाग पडलेल्या कैरीसारखे दिसू लागले. मुलं गडबड करू लागली.
रखवालदार ओरडला ः ‘‘अशक्‍य...केवळ अशक्‍य...असं काही असूच शकत नाही ऽऽ’’
मोहन ओरडला ः ‘‘काहीतरी लोचा झालाय..’’
‘मला अचानक वेडाचा झटका तर आला नाही ना?’ किंवा ‘माझा स्क्रू ढिला झाला की काय?’ असा संशय येऊन सर्वजण माझ्याकडं पाहू लागले.
मुख्याध्यापक, बाई आणि रखवालदार तर बुचकळ्यात पडलेच; पण मुलंसुद्धा पार चक्रावून गेली.
(हात उंचावत) ‘थांबा...’ (दोन क्षण थांबून)
माझ्या निबंधातली ती पहिली पाच वाक्‍यं तुम्हाला सांगते, मग तुम्हीच ठरवा काय ते...
ऐका..
मला ही बाग अजिबात आवडत नाही. कारण, माझं आवडीचं झाड या बागेत नाही.
जगातली सगळी झाडं लाकडाची असतात; पण माझ्या आवडीचं झाड लाकडाचं नाही; त्यामुळं त्या झाडावर कुणाला चढताच येत नाही.
माझ्या आवडीच्या झाडावर येणारं फूल एवढं मोठं, एवढं मोठं, एवढं मोठं असतं, की दुसऱ्या कुठल्याच झाडावरचं फूल एवढं मोठं, एवढं मोठं नसतं.
माझ्या आवडत्या झाडावरच्या फुलातून इतकी इतकी, इतकी इतकी, इतकी इतकी फळं बाहेर येतात, की जगात दुसऱ्या कुठल्याच झाडावरच्या फुलातून इतकी इतकी, इतकी इतकी फळं बाहेर येत नाहीत.
माझ्या आवडत्या झाडाचं पान खूप खूप, खूप खूप, खूप खूप मोठं असतं, की दुसऱ्या कुठल्याच झाडाचं पान इतकं खूप खूप, खूप खूप मोठं नसतं.
माझ्या आवडत्या झाडाला एका वेळी फळं लागतात शंभर...रोज खा त्याची फळं, तर येईल पहिला नंबर!
का ऽऽ य? कळलं का माझं आवडतं झाड...?
ठीकाय्‌..
भलत्या वेळी आणि केळी खायच्या वेळी उगाच जास्त बोलू नये...
म्हणून आता थांबते.
बराय.
‘‘व्वा, एकदम मस्तम्‌ मस्त. मी हे करणारच.’’
‘‘खूप मजा येईल हे करायला.’’
‘‘ते...ते लेखकाची परवानगी आणि मानधन...?’’
‘‘अरे हां. ते सांगायचं राहिलंच की. तर याचे लेखक आहेत राजीव तांबे आणि त्यांनीच सांगितलं आहे, की ‘जर रंगमंचावर हे मुलांना सादर करायचं असेल, तर माझी परवानगी घेण्याची अजिबात गरज नाही.’ पण...त्यांचं मानधन मात्र भरमसाठ आहे...’’
‘‘बापरे...किती?’’
‘‘आणि आपण मुलं मानधन कसं काय देणार त्यांना? पैसे कुठून आणायचे?’’
‘‘अंह. मानधन मुलांनी द्यायचंच नाहीए.’’
‘‘ॲऽऽ? मग कुणी द्यायचं?’’
‘‘प्रेक्षकांनी...!’’
सगळेच किंचाळले ः ‘‘काऽऽय?’’
‘‘हो. त्यांनी सांगितलं आहे की ‘मुलांनी माझं एकपात्री नाट्य रंगमंचावर सादर केल्यानंतर सभागृहात दुमदुमणारा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट हेच माझं मानधन...’ आता बोला.’’
‘‘वॉऽऽव ! हे तर एकदम फंडू का गुंडू. मस्तम्‌ मस्त.’’
सगळेच जण हात उंचावत ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com