२ टू २ टू खेळ (राजीव तांबे)

२ टू २ टू खेळ (राजीव तांबे)

‘‘आता खेळ नीट समजून घ्या. आपल्या मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत, की ज्या एका शब्दातच आणखी एक, दोन किंवा तीन शब्द लपलेले असतात. म्हणजे एकाच शब्दात अनेक शब्द लपलेले असतात. या शब्दांच्या मदतीनंच हा खेळ खेळायचा आहे. अशा शब्दांना आपण ‘टूटू शब्द’ म्हणू या.’’

शाळेचं गॅदरिंग, त्याच्या रंगीत तालमी, वर्गाचं हस्तलिखित, वर्गसजावट, शाळेतल्या मैदानी खेळांच्या विविध स्पर्धा यांमुळं मुलांचा रविवार प्रचंड व्यग्र असे. रविवारी सकाळी कुणी रंगीत तालमीला शाळेत, तर कुणी पोहण्याच्या सरावाला पाण्यात असे. तरीपण दुपारी दोन तास वेळ मुलांनी काढलाच.
नेहाच्या घरी सगळे जमले होते. आज वेदांगीनं नवीन खेळ सुचवला होता.
नेहा, पार्थ, वेदांगी, शंतनू, पालवी आणि अन्वय हे सगळे खेळायला बसणार तोच नेहा म्हणाली ः ‘‘या खेळात आपण मोठ्यांनाही घेऊ शकतो; पण एका अटीवर...’’
भुवया उंचावत पालवीच्या आईनं विचारलं, ‘‘कोणत्या अटीवर?’’
नेहा म्हणाली ः ‘‘खेळताना तुम्ही आम्हाला कोणतीच मदत नाही करायची; पण...’’
‘‘आता पण काय ऽ ऽ य?’’
‘‘अगं, तुम्हालाच काही मदत हवी असेल तर ती तुम्ही आमच्याकडं मागायची.’’
‘‘मंजूर...मंजूर...’’ सगळी मोठी माणसं हसतच म्हणाली.
‘‘आपण हा खेळ दोन गटांत खेळणार आहोत.’’
‘‘साई सुट्ट्यो’ करून दोन गट तयार झाले.
पहिल्या गटात पार्थ, नेहा आणि शंतनू.
दुसऱ्या गटात अन्वय, पालवी आणि वेदांगी.
दोन्ही गट समोरासमोर बसले.

‘‘आता खेळ नीट समजून घ्या. आपल्या मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत, की ज्या एका शब्दातच आणखी एक, दोन किंवा तीन शब्द लपलेले असतात. म्हणजे एकाच शब्दात अनेक शब्द लपलेले असतात. या शब्दांच्या मदतीनंच हा खेळ खेळायचा आहे. अशा शब्दांना आपण ‘टूटू शब्द’ म्हणू या. पहिल्या गटातला पार्थ उभा राहील आणि ‘उत्सुकता’ हा टूटू शब्द सांगेल. त्याबरोबर दुसऱ्या गटातलं कुणीही उठून लगेचंच या टूटू शब्दात लपलेला ‘ताक’ किंवा ‘उत्सुक’ यापैकी कोणताही एक शब्द किंवा दोन्ही शब्द ओळखेल आणि त्या शब्दांचा वाक्‍यात उपयोग करेल.

टूटू शब्द ऐकल्यानंतर मनातल्या मनात त्यातल्या अक्षरांची फिरवाफिरव करून त्यात लपलेले शब्द ओळखणं हे या खेळातलं कौशल्य आहे. टूटू शब्दातले शब्द शोधत असतानाच नवीन टूटू शब्द शोधणं हे या खेळातलं आव्हान आहे. एका गटानं टूटू शब्द सांगितल्यावर दुसऱ्या गटानं त्यातले लपलेले शब्द केवळ २९ सेकंदांतच ओळखायचे आहेत. ते जर ओळखता आले नाहीत तर दुसऱ्या गटाच्या डोक्‍यावर एक टूटू. ज्या गटाच्या डोक्‍यावर जास्त टूटू, तो गट हरला,’’ वेदांगी बोलायची थांबली.
पार्थ म्हणाला ः ‘‘...तर करू या सुरवात. मला एक सॉलिड शब्द सुचलाय. तर.. आमच्या गटाचा टूटू शब्द आहे ‘पोपट.’ ’’
चटकन उभं राहत पालवी म्हणाली ः ‘‘यामध्ये तर तीन शब्द आहेत. पोप, पोट आणि पट. आता यातल्या काही शब्दांचा वाक्‍यात उपयोग करा.’’
‘‘येस, ‘पोप म्हणाले, पटपट खा; पण पोटभर खाऊ नका, थोडं इतरांसाठीही ठेवा,’’ असं पालवीनं म्हणताच त्यांच्या गटानं टाळ्या वाजवल्या. वेदांगी म्हणाली ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे ‘भारत.’
नेहा पटकन उभं राहत म्हणाली ः ‘‘यात तीन शब्द लपलेले आहेत. भात, भार आणि तर. आता वाक्‍यात उपयोग ः ‘भात तर खा; पण भार होईल इतका खाऊ नका.’ ’’
नेहा म्हणाली ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे ‘सुकुमार.’
पालवी पटकन काही बोलणारच होती, इतक्‍यात अन्वयनं तिला खाली बसवलं. १० सेकंद झाली तरी अन्वय काहीच बोलत नव्हता. पालवीची आणि वेदांगीची चुळबूळ वाढली. आता शेवटचे सात सेकंद राहिले होते. अन्वय टुणकन्‌ उडी मारून उठला आणि म्हणाला ः ‘‘या टूटू शब्दात सुमारे सहा शब्द लपलेले आहेत. सुमार, कुमार, सुर, मार, सुरमा आणि रमा. आता वाक्‍यात उपयोग ः ‘रमा कुमारला म्हणाली, ‘कुठला तरी सुमार नव्हे, तर चांगला सुर सुरमा माझ्या डोळ्यात घाल, नाहीतर मला मार खावा लागेल.’’
सगळ्यांनीच मनापासून टाळ्या वाजवल्या.
पालवी म्हणाली ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे  ‘आठवण.’
शंतनू धडपडत उठत म्हणाला ः ‘‘यात पाच शब्द लपलेले आहेत. आठ, वण, आण, आठव आणि आव. अंऽऽऽ आता वाक्‍यात उपयोग ः ‘जरा नीट आठव, मी तुला आठ आणे आण असं सांगितलं होतं? तुझा वण दाखव असं नाही.’ ’’
पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
वेदांगी म्हणाली ः ‘‘आता शेवटची फेरी. नंतर आपण खेळात बदल करणार आहोत.’’
शंतनू म्हणाला ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे ‘सारवण.’
वेदांगी म्हणाली ः ‘‘या शब्दात एकूण सात शब्द लपलेले आहेत. वर, सार, वरण, वण, रण, साव आणि वसा. जेव्हा तीन किंवा चारपेक्षा जास्त लपलेले शब्द असतील, तेव्हा कुठलेही तीन किंवा चार शब्द वाक्‍यात उपयोग करण्यासाठी निवडावेत, असाही एक पर्याय या खेळात आहे. वाक्‍यात उपयोग ः ‘वर म्हणाला, जेवताना वर्षभर सार आणि वरण घ्यावं, असा मी वसा घेतला आहे, तो मोडला तर घरात रण माजेल.’’
अन्वय म्हणाला ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे ः ‘पावडर.’
पटकन उडी मारून पार्थ उभा राहात म्हणाला ः ‘‘या शब्दात एकूण सात शब्द लपलेले आहेत. पाव, डर, वड, पार, वर, रड आणि पाड. आता मी वाक्‍यात उपयोग करणार ः ‘वडाच्या पारावर बसून तो पाव खात असताना त्याचा पाय घसरला; पण तो रडला नाही.’ ’’

आता सगळेच म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के.’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘आता आपण खेळाची भाषा बदलू या.’’
‘‘म्हणजेऽऽऽ? खेळताना एकमेकांशी जपानी भाषेत बोलायचं की चिनी?’’
या पार्थच्या प्रश्‍नावर सगळेच ठसफसून हसले.
‘‘अरे, आता आपण इंग्लिश शब्दांमधले टूटू शब्द शोधायचे आहेत; पण या ठिकाणी सध्या तरी आपण फक्त लपलेले शब्दच शोधणार आहोत. त्यांचा वाक्‍यात उपयोग करणार नाही आणि मुख्य म्हणजे टूटू शब्दही असे निवडायचे, की त्या शब्दात कमीत कमी तीन शब्द असलेच पाहिजेत. ओ ऽऽ के?’’
पार्थ म्हणाला ः ‘‘ओके बोके पक्के...चलो, काम शुरू हट के.’’
अन्वय म्हणाला ः ‘‘आमच्या गटाचा पहिला टूटू शब्द आहे Father.’’
पार्थ चटकन हात वर करत म्हणाला ः ‘‘या शब्दातले तीन शब्द मी ओळखले आहेत. Fat, Her आणि Fear.’’
सगळेच आनंदाने म्हणाले ः ‘‘व्वा...व्वा! शाबास पार्थ.’’
आता पार्थ म्हणाला ः ‘‘आमच्या गटाचा टूटू शब्द आहे Chair.’’
पालवी हसतच म्हणाली ः ‘‘छान. या शब्दातले तीन शब्द तर मस्तच आहेत. Air, Hair आणि Rich.’’ आता पालवीच्या गटाचा शब्द होता Table.
नेहानं लगेचच ओळखलं. ती म्हणाली ः ‘‘ ःAble, Bat आणि Tale.’’
मग नेहानंच पुढचा टूटू शब्द सांगितला ः Mango.
आता पालवीचा गट विचारात पडला. त्यांनी दोन लपलेले शब्द ओळखले होते; पण तिसरा शब्द काही त्यांना ओळखता येईना. शेवटची नऊ सेकंदं शिल्लक होती. वेदांगी चटकन म्हणाली ः‘‘ Man आणि Go.’’ शेवटचा एक सेकंद बाकी असताना अचानक पालवी ओरडली ः ‘‘आणि On.’’
त्यापुढं अन्वय म्हणाला ः ‘‘आऽऽऽणि Moan सुद्धा.’’ त्यांच्या डोक्‍यावरचा एक टूटू थोडक्‍यात वाचला.
आता कुणी काही बोलण्याआधीच दोन्ही हात उंचावत पार्थ म्हणाला ः ‘‘थांबा...थांबा...आणि हो, ‘थांबा’ हा काही आमच्या गटाचा ‘टूटू’ शब्द नाही, तर थांबा म्हणजे मराठीत स्टॉप. आता माझ्या नाटकाच्या प्रॅक्‍टिसची वेळ झाली आहे. हा ऽऽऽ मी चाललो.’’
आणि पार्थ पळालाच. त्याच्या पाठोपाठ शंतनू, नेहा आणि वेदांगी याही उठल्या. मग खेळच थांबला.
पुढच्या वेळी खेळताना मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा मिक्‍स करूनच हा खेळ खेळायचा, असं त्यांनी ठरवलं.
‘‘याचा अर्थ असा, की आधी चापायची चमचमीत मिसळ आणि मग खेळायची ही चटपटीत भेळ-भाषा-मिसळ,’’ असं शंतनूनं म्हणताच सगळेजण म्हणालेः ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   भाषा कुठलीही निवडा, पण हा २ टू २ टू खेळ मुलांसोबत खेळाच. हा खेळ मुलांसोबत घरी खेळा, प्रवासात खेळा किंवा अगदी फिरायला गेल्यावरही खेळा. (म्हणजे तेवढा वेळ तुम्ही मोबाईलपासून लांब आणि मुलांच्या जवळ राहाल).
  •   ‘टूटू शब्द ऐकल्यानंतर मनातल्या मनात त्यातल्या अक्षरांची फिरवाफिरव करून त्यांत लपलेले शब्द ओळखणं’ हे या खेळातलं कौशल्य विकसित होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. असे काही टूटू शब्द जमा करण्यासाठी मुलांच्या मदतीनं ते शब्दकोशातून शोधा. हे शब्द ‘टूटू वही’त लिहून ठेवा.
  •   तुमच्याकडं प्रत्येक भाषेतल्या कमीत कमी ७९ टूटू शब्दांचा स्टॉक असलाच पाहिजे.
  •   शोधलेल्या शब्दांचा वाक्‍यात उपयोग केला, तर त्या शब्दात लपलेला अर्थ आणि अर्थच्छटांची ओळख होण्यास मदत होते. मुलांना टूटू शब्दांचा वेगवेगळ्या वाक्‍यांत उपयोग करण्यास प्रोत्साहित करा.
  •   ‘सुसंस्कृत पालक मुलांसोबत खेळताना शब्दांचीच खेळणी वापरतात’ ही प्राचीन वैदिक म्हण फारच महत्त्वाची आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com