न बोलणाऱ्यांच्या ऐका गोष्टी (राजीव तांबे)

न बोलणाऱ्यांच्या ऐका गोष्टी (राजीव तांबे)

शंतनू म्हणाला ः ‘‘निर्जीवांना बोलता येत नाही हे खरंच आहे; पण आपण कल्पना केली, तर आपण त्यांचं बोलणं नक्कीच ऐकू शकू. उदाहरणार्थ, मी जेव्हा खुर्चीवरून उठतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं, की खुर्ची आनंदानं श्‍वास घेऊन म्हणत असणार ः ‘चला बरं झालं. हा एकदाचा उठला. आता जरा हलकंहलकं वाटतंय.’ फळा आणि डस्टरसुद्धा आपापसात बोलत असतील, मोबाईल आणि चार्जरसुद्धा गप्पा मारत असतील. सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलत असतातच, फक्त आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला ऐकू येत नाही. आज आपण कुठल्याही दोन वस्तूंच्या कानगोष्टी ऐकणार आहोत आणि आठ ओळींत त्या लिहिणार आहोत.’’

शंतनू कधीपासून वाट पाहत होता. हात चोळत तो आईला म्हणाला ः ‘‘अगं ही यायला उशीर म्हणजे खायला उशीर, हे यांना समजत नाही का? दहा मिनिटं उशीर म्हणजे खूपच झालं ना गं. आई..?’’
आई हसतच म्हणाली ः ‘‘अरे शंतनू येतीलच सारे आता....आणि मुख्य म्हणजे आज आपल घड्याळं दहा मिनिटं पुढं आहे बरं का?’’
इतक्‍यात दरवाज्यातून आत उडी मारत पार्थ म्हणाला ः ‘‘आम्ही आलो आहोत आणि माझ्या नाकाला वास चुरचुरला आहे. माझी जीभ खवळली आहे..’’
पार्थला हलकेच धपाटा देत पालवी म्हणाली ः ‘‘काऊ, आज काय बेत आहे?’’ कॉलर टाइट करत शंतनू म्हणाला ः ‘‘प्लीज, मला विचारा. आज का शेफ मै हूँ. आज आहे स्पायसी इटालियन पास्ता गार्निश विथ कॉटेज मसाला चीज अँड हर्ब.’’
‘‘तू कुठं शिकलास हे पास्ते-बिस्ते?’’
‘‘मी परवा टीव्हीवर पाहून लिहून घेत असताना. अचानक लाइट गेले. त्यामुळं मला अर्धीच रेसिपी समजली. मग मी माझ्या मनानं त्यात भर घालून ही खास डिश तयार केली.’’ शंतनूनं असं म्हणताच सगळे घाबरून म्हणाले ः ‘‘बापरे! आम्ही हे खाऊ शकू ना?’’ आई हसतच म्हणाली ः ‘‘काही हरकत नाही. काल आमच्यावर प्रयोग झालाय. खूप मस्त झालाय हा शंतूपास्ता.’’
खासमखास ‘शंतूपास्ता’ हादडल्यानंतर सगळे खेळायला बसले. आजच्या खेळाची आयडिया शंतनूची होती. ‘‘आज आपण न बोलणाऱ्यांशी गप्पा मारणार आहोत आणि न बोलणारे काय बोलतात, ते आपण ऐकणार आहोत..’’
शंतनूला थांबवत अन्वय वैतागून म्हणाला ः ‘‘मित्रा तू शंतूपास्ता खाल्ला आहेस की भंतूभास्ता? तू काय बोलतो आहेस ते तुला कळतंय ना..?’’
‘‘माझं बोलणं पूर्ण ऐकल्यानंतरच काय ते विचारा..’’ ‘‘ओके. ओके. बोल मित्रा बोल.’’
‘‘खरं म्हणजे निर्जीवांना बोलता येत नाही हे खरंच आहे; पण आपण कल्पना केली, तर आपण त्यांचं बोलणं नक्कीच ऐकू शकू. उदाहरणार्थ, मी जेव्हा खुर्चीवरून उठतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं, की खुर्ची आनंदानं श्‍वास घेऊन म्हणत असणार ः ‘चला बरं झालं...हा एकदाचा उठला. आता जरा हलकंहलकं वाटतंय.’ फळा आणि डस्टरसुद्धा आपापसात बोलत असतील, मोबाईल आणि चार्जरसुद्धा गप्पा मारत असतील. इतकंच काय, सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलत असतातच, फक्त आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला ऐकू येत नाही. आज आपण कुठल्याही दोन वस्तूंच्या कानगोष्टी ऐकणार आहोत आणि आठ ओळीत त्या लिहिणार आहोत. ओके?’’
सगळेच आनंदानं ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के. मस्तममस्त आयडिया. चलो गुरू हो जाय शुरू.’’
सहा जण सहा कोपऱ्यांत बसले. घरात एकदम शांतता निर्माण झाली. मुलं एकाग्र होऊन ‘न बोलणाऱ्यांच्या’ गोष्टी लक्षपूर्वक ऐकू लागली. ऐकताऐकता मध्येच तोंड वेडवाकडं करू लागली, तर काही नकळत हातवारे करत बोटं हलवू लागली. सुमारे २९ मिनिटांत सगळे जण तैय्यार झाले. प्रत्येकानं न बोलणाऱ्या वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकून त्या थोडक्‍यात लिहिल्या होत्या.
नेहा म्हणाली ः ‘‘आधी मी वाचते. माझ्या गोष्टीचं नाव आहे ‘उच डाच गप्पा!’ तर ऐका.’’

हे विचित्र नाव ऐकून सर्वांचे डोळे मोठे झाले आणि भुवया वर झाल्या. हातानंच सगळ्यांना शांत करत नेहा वाचू लागली ः ‘‘आज शनिवार असल्यानं उच आणि डाच या दोघी जणी कपाटात आरामात लोळत होत्या. शनिवारी स्पोर्टस डे असल्यानं शूज मैदानावर गेले होते, तर उजवी आणि डावी चप्पल स्वस्थ होत्या. डावी चप्पल म्हणाली ः ‘काय गं तुझी ही अवस्था? आणि हा अंगठा का चमकतोय?’ उजवी चप्पल म्हणाली ः ‘परवा त्याला सणकून ठेच लागली. माझं थोबाड दगडावर आपटलं आणि अंगठा तुटला ना गं. त्या येड्यानं अंगठ्यावरच राग काढला. अंगठा उपटून फेकूनच दिला.’
‘डाच’ म्हणाली ः ‘अगं तो ‘व्हॉटसॅप’ का ‘फॅटसॅप’ बघत चालतो म्हणून लागली ठेच. त्या बिचाऱ्या अंगठ्याचा काय दोष?’
‘अगं हा अंगठा नवीनच आहे म्हणून आता थोडा चमकतोय; पण थोड्याच दिवसात तो आपल्या अंगठा, पट्टा, वादी, सोल या एकत्र कुटुंबात मिसळून जाईल.’ ‘नक्कीच जाईल. कारण एकेक टाक्‍यानं शिवूनशिवून आणि हलकेच ठोकूनठोकून तो आता आपल्या सोलात एकजीव झालाच आहे.’
नाक वर करून अंगठा म्हणाला ः ‘खरंय ताई. ‘अंगठा सलामत तो मालिक पचास’ असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही.’’’
गोष्ट ऐकल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आता सगळे पार्थकडं पाहू लागले. पार्थ म्हणाला ः ‘‘मी तीन नंबरला वाचणार. आधी नाही.’’ शंतनू म्हणाला ः ‘‘ओके. मी वाचतो. माझ्या गोष्टीचं नाव आहे ‘पंट्युला’ म्हणजे पंखा आणि ट्युबलाइटच्या गप्पा.
‘काय ग ताई, ती थंडीबिंडी कधी सुरू होणारे?’’ असं पंख्यानं विचारताच ट्युबलाइट म्हणाली ः ‘आज रात्री बातम्या पाहिल्यावर सांगीन तुम्हाला हं.’
‘अहो दिवसभर गरगरून चक्कर तर येतेच; पण डोकंही तापतं. मात्र, या घरातल्या माणसांना माझी अजिबात दया येत नाही. स्वतः माझ्याखाली झोपून विश्रांती घेतील; पण मला विश्रांती देणार नाहीत. माझी आपली अहोरात्र गरगर गरगर सुरूच. ताई तुमचं बरं आहे. तुम्हाला रात्री तरी आराम मिळतो.’
‘अहो पंखेराव तरीपण तुम्ही सुखी आहात..’ ‘म्हणजे? डोकं तापलेल्या आणि चक्क आलेल्यांना तू सुखी म्हणतेस? तुझा स्टार्टर बिघडलाय वाटतं?’
‘ऐका तर. आता माझे शेवटचेच दिवस उरले आहेत. पुन्हा आपली भेट नाही हो होणार..’ ‘तुला काय धाड भरलीय? चांगली तर चमकते आहेस?’
‘कालच मी कुजबूज ऐकली की, आता म्हणे माझ्या जागी ‘एलईडीचे दिवे’ लावणार आहेत.’

‘आपल्यात म्हणतात ना, ‘ही माणसं काय दिवे लावतील आणि कुणाचे फॅन होतील हे काही सांगता येत नाही’ ते अगदी खरंय बघ.’’’
पार्थ टाळ्या वाजवत म्हणाला ः ‘‘मस्तच. मी फॅनचा फॅन आहे..’’ त्यावर हळूच पालवी म्हणाली ः ‘‘म..लाव दिवे.’’ पार्थला ऐकू आलं नाही; पण बाकी सगळे मात्र ठणठणून खणखणीत हसले. पार्थ म्हणाला, ‘‘मी रुटॉ यांना गप्पा मारताना ऐकलं आहे..’’
‘‘आता रे रुटॉ कोण?’’
‘‘सुटॉ म्हणजे रुमाल आणि टॉवेल.
टॉवेल म्हणाला ः ‘अहो रुमाल भाऊ, तुम्ही आमच्या कुटुंबातले सर्वांत धाकटे; पण सर्वांत तुमची मजा असते आणि आम्हाला नेहमी सजा असते.’

रुमालानं भीतभीत विचारलं ः ‘दादा मला काही कळलं नाही. मला समजेल असं सांगा ना.’
टॉवेल फडफडत म्हणाला ः ‘अरे, तू त्यांच्या खिशात बसतोस आणि दुनियादारी करून येतोस. रंगीबेरंगी जग पाहून येतोस. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी भटकून येतोस. खूप प्रवास करतोस; पण आमचा प्रवास मात्र बाथरूममधून दोरीवर आणि दोरीवरून कपाटात. बाहेरचं जगच आम्हाला माहीत नाही रे.’
‘अहो ही माणसं मला खिशात असं काही कोंबतात, की मी घुसमटून जातो. मला खिशातून बाहेर काढतात ते एकतर त्यांचं नाक पुसायला किंवा मळकट तोंड चोळायला. त्यामुळं संध्याकाळपर्यंत माझा अगदी चोळामोळा होऊन जातो.’
हे ऐकल्यावर टॉवेल इतक्‍या जोरात फडफडून हसला, की तो दोरीवरून घसरला आणि जमिनीवर पसरला.’’
सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. पार्थ खूश झाला. वेदांगी म्हणाली ः ‘‘मी अगदी कमी लिहिलं आहे, कारण मला इतक्‍या जणांची बोलणी ऐकू येऊ लागली, की नेमकं कुणाच्या गप्पा लिहाव्यात तेच मला कळेना. मी वही आणि पुस्तकाच्या गप्पा लिहिल्या आहेत.

पुस्तकानं विचारलं ः ‘आमच्यात जशी वेगवेगळ्या विषयाची पुस्तक असतात तशा वेगवेगळ्या विषयाच्या वह्या असतात का गं?’
कव्हर उचलून वही म्हणाली ः ‘हो असतात तर. प्रयोगाची वही, चित्रकलेची वही, आलेखाची वही, पाढे लिहायची वही, हिशोब लिहायची वही, हजेरी लिहायची वही, खायच्या प्यायच्या रेसिपी लिहिण्यासाठी रेसिपीवही, टेलिफोन नंबर्स लिहिण्यासाठी वेगळी वही, निरनिराळ्या नोंदी करण्यासाठी नोंदवही, खिशात ठेवायची पॉकेटवही, सॅकमध्ये ठेवायची वही, न वापरलेल्या कागदांपासून तयार केलेली रफवही असे खूप प्रकार आहेत आमच्यात. तसं आमचं कुटुंब मोठंच आहे आणि रोज आमच्याच नवनवीन सदस्यांची भर पडतच असते.’
पुस्तक म्हणालं ः ‘व्वा! हे ऐकून आनंद झाला. एकदा आपल्या दोन्ही कुटुंबाचं मिळून एक गेटटुगेदर ठेवलं. पाहिजे...’
‘माणसं इतकी पुस्तक वाचतात तरी त्यांना एवढं समजत नाही..?’
‘अगं वहीताई, आपल्यात म्हणतात नं, ‘नुसती पुस्तकं वाचून अक्कल येत नाही, तर वहीत लिहावं पण लागतं ते काय उगाच?’
‘म्हणून तर आपली जोडी अजरामर आहे.’
पुस्तक म्हणालं ः ‘दे पानाळी.’
वहीनं पुस्तकाच्या पानावर आपली पानं फडफडवली.’’
‘‘व्वा! हे तर एकदम सहीच झालंय,’’ असं शंतनूनं म्हणताच सगळ्यांनी हसतच माना डोलावल्या. अन्वय म्हणाला ः ‘‘आता मी. मी आपल्या शाळेतल्या वर्गांच्या गप्पा ऐकत होतो.
रात्र झाली. सगळीकडे सामसूम झाली. शाळेच्या मैदानात शाळेतले वर्ग गप्पा मारायला जमले. पाचवीचा वर्ग म्हणाला ः ‘आज आमच्या वर्गात सॉलिड मजा आली. हसून हसून माझ्या खिडक्‍या खिळखिळ्या झाल्या.’
आठवीचा वर्ग वैतागून म्हणाला ः ‘अरे काय ते सांग लवकर. हे म्हणजे दोन अक्षरं लिहायला खडूचा बॉक्‍स घेण्यासारखंच आहे.’
‘अरे, आज तो दुसऱ्या बाकावर बसणारा सुजय पेंगत होता. सरांच्या शिकवण्याकडं याचं लक्षच नाही. सरांनी त्याला अचानक उठवलं आणि विचारलं ः ‘सरपटणाऱ्या प्राण्यांची दोन उदाहरणं सांग. सांग लवकर.’
सुजय गांगरला. त्याच्या डोळ्यावर झोप. त्याला काही कळेचना. बाजूलाच बसलेल्या निमिषनं वहीवर लिहिलं साप. मग सुजय म्हणाला ः ‘साप.’
सर म्हणाले ः ‘शाबास. आता दुसरं उदाहरण सांग.’ सुजयनं पुन्हा निमिषच्या वहीत पाहिलं आणि जोरात म्हणाला ः ‘दुसरा साप.’
यानंतर मात्र सुजयच्या पाठीवर साप वळवळले असतील हे तुम्ही ओळखलंच असेल.’
बालवाडीचा वर्ग म्हणाला ः ‘आमच्याकडं तर एक चार पायाचं छोटं मूल येतं.’
सगळेच वर्ग घाबरून किंचाळले ः ‘काऽऽऽऽऽऽ? चाऽऽऽऽर पायाचं मूल? कसं काय शक्‍य आहे?’
‘त्या चार पायाच्या छोट्या मुलाला शेपटी पण आहे..’
पहिलीचा वर्ग दाराच्या कड्या कडकडून वाजवत म्हणाला ः ‘अरे त्याला कुत्रा म्हणतात कुत्रा! तो मुलगा नाहीये, ते कुत्र्याचं छोटं पिलू आहे. शाळा सुटल्यावर ते वर्गात जाऊन झोपतं.’
हे ऐकताच सर्व वर्गांच्या दाराच्या कड्या कडकडून हसूनहसून इतक्‍या जोरात वाजू लागल्या, की शाळेचा वॉचमन घाबरून पळत आला. मग मात्र सगळे वर्ग पळाले आपापल्या जागांवर.’’
हे ऐकताच सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. वेदांगी म्हणाली ः ‘‘हे खरं असणार. कारण आमचा बालवडीचा वर्ग उघडला, की कुत्र्याचं एक पिल्लू बाहेर पडायचं आणि आम्ही आत जायचो.’’
आता सगळे पालवीकडं पाहू लागले. पालवी म्हणाली ः ‘‘खरं सागू का? न बोलणाऱ्यांच्या गप्पा ऐकण्यातच माझा इतका वेळ गेला, की मला लिहायला वेळच शिल्लक राहिला नाही. मी त्यांना किती वेळा सांगितलं, की जरा प्लीज गप्प बसा. मला लिहायचं आहे. पण छे! त्यातला एक तापतोय आणि पिन मारतोय, तर दुसरा मला त्याचे खतरीफतरी रिंगटोन ऐकवतोय. ओळखलं असेलच तुम्ही या दोघांना..?’’
सगळ्यांनी एकच कल्ला केला, ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   म्हटलं तर या गप्पा आहेत. मात्र, या साध्यासुध्या गप्पा नाहीत. मुलांना नकळत वेगळ्या प्रकारे विचार करायला त्या शिकवतातच पण इतरांची वेदना जाणून घ्यायलाही त्या प्रवृत्त करतात.
  •   मुलाशी गप्पा माराच; पण त्यातूनच मुलं नकळत शिकत आहेत ना, याकडं लक्ष ठेवा.
  •   मुलांना तुमच्याशी गप्पा माराव्यात असं वाटत असेल, तर तो तुमचा सन्मान समजा. पण तसं वाटत नसेल, तर आरशासमोर उभं राहून, आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला त्याचं कारण विचारा.
  •   ‘मुलांशी गप्पा म्हणजे काही ऊतू जाणारं दूध नव्हे तर विचारांची साय असते,’ ही चिनी म्हण लक्षात असू द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com