सावलीचा पाठलाग (राजीव तांबे)

सावलीचा पाठलाग (राजीव तांबे)

‘‘मोबाईलमधला कंपास कसा वापरावा, हे तुम्हाला समजावं म्हणूनच मी हा खेळ तयार केलाय; पण तुम्ही जर थोडा विचार केलात आणि सूर्याकडं न पाहता सूर्यप्रकाशामुळं नेमकं काय होतंय, याच्याकडं लक्ष दिलंत तर तुम्ही उत्तराच्या लवकर जवळ जाल. कळलं का...?’’ टुणकन्‌ उड्या मारत सगळेच म्हणाले ः ‘‘आलं लक्षात. आता संध्याकाळ जवळ येत असल्यानं सावल्या लांब होऊ लागल्या आहेत. आम्हाला या सावल्यांचाच वेध घ्यावा लागेल. हो ना?’’

या  रविवारी कुणाच्या घरी न भेटता बागेतच भेटायचं ठरलं होतं. नेहा, वेदांगी, पार्थ, पालवी आणि शंतनू या सगळ्यांनी बागेतल्या झाडाखालीच बैठक मारली. तोपर्यंत नेहाचे आई-बाबा तिथं पोचलेच. दुपारचं जेवण जड झालं होतं आणि गारेगार सावलीत डोळेही जड होऊ लागले होते.
वेदांगी म्हणाली ः ‘‘आज आपण गप्पागप्पीचा खेळ खेळू या का?’’ ‘‘म्हणजे.. आपण मागं एकदा तो खुर्चीचा खेळ खेळलो होतो, तसा का?’’
‘‘अगदी तसाच काही नाही; पण थोड्या वेगळ्या प्रकारचा. मला त्या खुर्चीखेळावरूनच सुचलाय हा खेळ. उद्या शाळेत ऑफ तासाला मी वर्गात खेळीन म्हणते, हा खेळ.’’
‘‘म...आम्हाला आधी सांग तर...’’

‘‘खुर्चीखेळात आपण फक्त ‘वेगवेगळ्या खुर्च्या’ या बाबीवरच सगळं लक्ष केंद्रित केलं होतं; पण परवा मला एक वेगळीच कल्पना सुचली. गोष्ट एकच असते, तिचा उपयोगही एकच असतो; पण त्या दोन्ही गोष्टींच्या आकारात प्रचंड फरक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कधी नसतात. त्यांची ठिकाणं वेगवेगळी असतात. अं...म्हणजे उदाहरणार्थ, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी आणि बाथरूमची कडी. दोन्ही कड्यांचं काम एकच; पण म्हणून त्यांच्या जागा बदलून चालणार नाही आणि म्हणूनच त्यांचे आकार भिन्न. सहज विचार करताना आपल्याच घरात अशा ४९ गोष्टी मला ‘दिसून आल्या’...!’’
‘‘हं. म्हणजे अशा भन्नाट गोष्टी ओळखण्याची शर्यत लावायची का?’’
‘‘अं...म्हणजे झाड आणि गवत...चालेल?’’ असं पार्थनं विचारताच नेहा म्हणाली ः ‘‘नाही, नाही. त्या दोन वेगळ्याच गोष्टी समजायच्या.’’ पालवी म्हणाली ः ‘‘आजोबांची १२ काड्यांची मोठी छत्री आणि आईची पर्समध्ये मावणारी छोटी थ्री-फोल्ड छत्री.’’

‘‘येस. एकदम बरोबर. अशा आणखी ३९८ गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत, तर हो जाय गुरू...चक्कर शुरू.’’ ‘‘मला तर डोळ्यांसमोर पहिली खाण्याचीच गोष्ट दिसते. म्हणजे बाबा ऑफिसात नेतात तो फुल जेवणाचा मोठा उभा डबा आणि माझ्या दप्तरातला पोळी-भाजीचा चपटा डबा,’’ असं शंतनूनं म्हणताच वेदांगी म्हणालीच ः ‘‘मला वाटलंच होतं, याची अजून ‘खाऊ खाऊ’ कशी सुरू नाही झाली.’’
‘‘आपल्या गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मोठी सिमेंटची टाकी आणि आपल्या घरातली प्लास्टिकची पाण्याची टाकी.’’ ‘‘व्वा...हे छान आहे,’’ असं बाबांनी म्हणताच शंतनूनं नाराजीच्या सुरात विचारलं ः ‘‘म्हणजे माझा डबा तुम्हाला आवडला नाही वाटतं?’’ शंतनूला थोपटत बाबा म्हणाले ः ‘‘तो तर खूपच छान आहे.’’
‘‘मी सांगतो...मी सांगतो,’’ असं म्हणत पार्थ पुढं म्हणाला ः ‘‘बाबांचा आंघोळीचा मोठ्ठा टॉवेल आणि...आणि...काय ते आता तुम्हीच सांगा..’’ सगळे हळूच हसले; पण कुणीच काही बोललं नाही. ‘‘घरातल्या भिंतीवरचा मोठ्ठा टीव्ही आणि आपल्या मोबाईलमध्येपण दिसतो की टीव्ही.’’

‘‘पाण्याच्या टाकीवरून आठवलं, गावाला पाणी सोडण्यासाठी पाईप लाईनवर असतात हातानं फिरवायचे मोठे व्हॉल्व आणि घरातला छोटा नळ.’’
पार्थ चुळबुळत म्हणाला ः ‘‘आता माझं बरोबर येणारंच. बाबांच्या सायकलमध्ये हवा भरायचा पंप आहे ना, तो माझ्याएवढा उंच आहे आणि तो दोन हातांनी चेपावा लागतो. माझ्या वाढदिवसाला फुगे फुगवण्यासाठी बाबांनी आणलेला पंप अगदी छोटा आहे. बरोबर ना माझं...?’’
सगळे टाळ्या वाजवत म्हणाले ः ‘‘व्वा.. व्वा!’’
‘‘आणखी एक. प्रवासी ट्रेन. म्हणजे अमृतसर एक्‍स्प्रेस किंवा जम्मू-तावी एक्‍स्प्रेस. अशा गाड्यांना १९ किंवा २१ डबे असतात आणि सिमला किंवा माथेरानला असणारी प्रवासी टॉय-ट्रेन, तिला तीन किंवा चारच डबे असतात.’’
‘‘अं.. मोठमोठ्या कार्यक्रमांत स्टेजवर असते ती पितळेची उंची मोठी समई आणि आपल्या देवघरातलं छोटंसं निरांजन.’’

‘‘लाँड्रीमधली मोठी जड इस्त्री आणि आपल्या घरातली हलकी इस्त्री.’’ ‘‘ट्रक आणि मोटारगाड्या यांचं वजन करणारा वजनसेतू (वेईंग ब्रिज) आणि आपलं वजन दाखवणारा घरातला छोटा वजनकाटा.’’
‘‘संपूर्ण शहराला वीज पुरवणारे अवाढव्य जनरेटर्स आणि वीज गेल्यावर सहजी सुरू करता येणारा, दुकानांच्या बाहेर ठेवलेला खोक्‍यातला जनरेटर.’’
‘‘आम्ही घरी आणतो १५ लिटर तेलाचा डबा; पण आई स्वयंपाक करताना वापरते छोटं तेलाचं भांडं, तसंच तांदळाचं आणि ज्वारीचंपण सांगता येईल की.’’ ‘‘बॅंकेतली भलीमोठी तिजोरी आणि आपल्या कपाटातला चोरखण.’’
‘‘चष्मा असूनसुद्धा आजोबा पेपर वाचताना पेपरावर मोठ्ठं गोल भिंग ठेवूनच पेपर वाचतात आणि आमच्या बाजूचे हसमुखकाका हिऱ्याचे पैलू पाहण्यासाठी अगदी छोटंसं भिंग वापरतात.’’ ‘‘आता शेवटचं मी सांगतो. डीजे लावतात त्या कानठळ्या बसवणाऱ्या स्पीकर्सच्या भिंती आणि फक्त आपल्यालाच गाणी ऐकवणारा हॅंड्‌स-फ्री म्हणजे आपल्या मोबाईलला जोडता येणारा इटुकला इअर-फोन.’’
‘‘येस. आता जरा खेळात बदल करू या..’’

‘‘पण.. आपल्याला ३९८ गोष्टी शोधायच्या आहेत ना?’’
‘‘हो. शोधायच्या आहेतच; पण त्या सगळ्या आत्ताच शोधल्या पाहिजेत असं काही नाही आणि त्या सगळ्या तुम्हीच शोधल्या पाहिजेत असंही नाही.’’
‘‘म्हणजे? आम्हाला नाही कळलं?’’
‘‘असं काय करता? तुम्ही आता इतक्‍या गोष्टी शोधल्यात. आता घरी गेल्यावर तुमच्या आई-वडिलांच्या मदतीनं, शाळेत गेल्यावर तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीनं आणखी भरपूर गोष्टी शोधून काढा. मला खात्री आहे, तुम्ही सगळे मिळून ३९८ पेक्षा सहजच जास्त गोष्टी शोधाल.’’
‘‘हा खेळ जरा वेगळा आहे. माझ्या घड्याळाप्रमाणे अजून सूर्य मावळायला किमान ९७ मिनिटं वेळ आहे. इथं मी बारीक बारीक खडे ठेवून एक वर्तुळ तयार केलं आहे. त्या ठिकाणी उभं राहून ९७ मिनिटांनी सूर्य मावळताना तो नेमक्‍या कुठल्या झाडाच्या मागं असेल ते बरोब्बर सांगायचं. तसंच सकाळी उगवताना तो कुठल्या झाडाच्या मागं असू शकेल, हे मात्र तुम्ही अंदाजानंच सांगायचं आहे आणि हे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त २७ मिनिटं मिळणार आहेत.’’
‘‘पण हे एकदम नेमकेपणानं कसं काय सांगता येईल?’’
‘‘माझ्या मोबाईलमध्ये कंपास म्हणजे होकायंत्र आहे. त्याच्या मदतीनं नेमकेपणाच्या खूपच जवळ जाणारं उत्तर आपल्याला मिळू शकेल.’’
‘‘म्हणजे तुम्ही मोबाईलमधला कंपास वापरणार; पण त्याआधी आम्ही काय वापरायचं? आम्ही कसं शोधायचं?’’ ‘‘मोबाईलमधला कंपास कसा वापरावा, हे तुम्हाला समजावं म्हणूनच मी हा खेळ तयार केलाय; पण तुम्ही जर थोडा विचार केलात आणि सूर्याकडं न पाहता सूर्यप्रकाशामुळं नेमकं काय होतंय, याच्याकडं लक्ष दिलंत तर तुम्ही उत्तराच्या लवकर जवळ जाल. कळलं का...?’’

टुणकन्‌ उड्या मारत सगळेच म्हणाले ः ‘‘आलं लक्षात. आता संध्याकाळ जवळ येत असल्यानं सावल्या लांब होऊ लागल्या आहेत. आम्हाला या सावल्यांचाच वेध घ्यावा लागेल. हो ना?’’
‘‘येस! तो हो जाय गुरू...कर दो चक्कर शुरू.’’
आणि मुलं मोकाट सुटलीच. वेदांगीनं एक सुकलेली फांदी आणली. शंतनूनं ती वर्तुळाच्या समोर धरली. पालवी आणि नेहा सावलीच्या दिशेनं खुणा करत होत्या. त्याच वेळी पार्थ म्हणाला ः ‘‘कमालच आहे तुमची. फांदी कशाला पाहिजे? मी फांदीपेक्षा मोठा आहे. मीच उभा राहतो की. माझी सावली बघा.’’
आणि ठो ठो हसत सगळे म्हणाले ः ‘‘अरे, तुझी कशाला? आम्ही आमच्याच सावल्या बघू की! का...य? चला, सावलीचा पाठलाग करू या..’’
तुम्हाला काय वाटतं? सावलीचा पाठलाग करत ते ‘नेमक्‍या’ झाडापर्यंत पोचतील? मावळतीचं ‘नेमकं’ आणि उगवतीची झाडं अंदाजानं ते शोधू शकतील?
अशा वेळी तुम्ही असंच केलं असतं की काही वेगळं केलं असतं? मला कळवाल?
मी तुमच्या ‘नेमक्‍या’ पत्रांची वाट पाहतोय.

-------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ ः

  •   ‘एकच गोष्ट, एकच उपयोग; पण आकारात प्रचंड फरक’ हा खेळ खेळल्यानं मुलं बहुविध पद्धतीनं विचार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा खेळ खेळत असताना, तुम्हाला सुचलेली गोष्ट मुलांना स्पष्टपणे न सांगता त्यांना ‘फक्त क्‍लू’ द्या.
  •   ‘क्‍लू देणं’ म्हणजे एखादी गोष्ट मूकपणे दाखवणं, सुचवणं किंवा ‘त्या गोष्टी’च्या संदर्भातला प्रश्‍न विचारून मुलांना बोलतं करणं.
  •   लक्षात ठेवा, तुम्ही क्‍लू दिल्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट न सांगता मुलांनी वेगळीच सांगितली तर त्यांचं कौतुक करा. कारण, तुमच्या ‘क्‍लू’मुळं मुलांच्या विचारांनी भरारी घेतली आहे.
  •   कागदावर आकृत्या काढून ‘दिशा’ शिकवता येत नाहीत. दिशा शिकण्यासाठी दिशेचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो आणि हा अनुभव दिशेचा शोध घेतल्यानंच मिळू शकतो.
  •   ‘जे सावलीला भिडतात, तेच तळपत्या तेजाला कवेत घेतात’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!

-------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com