चविष्ट रंगपंचमी (राजीव तांबे)

चविष्ट रंगपंचमी (राजीव तांबे)

बाबा पार्थला समजावत म्हणाले ः ‘‘तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची राहिलीच. लाल, पिवळा आणि निळा हे तीन प्राथमिक रंग आहेत. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही रंगात मिसळून हे रंग बनवता येत नाहीत. त्यामुळं जर पार्थ, तुला निळा रंग हवा असेल तर तू मगाशी जसं दोन रंगांचं मिश्रण करून गुलाबी रंग तयार केलास तसा निळा रंग तयार करता येणार नाही. तुला घरातच निळा रंग शोधावा लागेल आणि शोधलास तर तुला नक्कीच सापडेल.’’

या  रविवारी सगळे पालवीकडं जमणार होते. दोन दिवस अगोदर पालवीनं सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं ः ‘‘हा रंगपंचमीच्या आधीचा रविवार आहे. आपण त्यासाठी खास बेत केला आहे, म्हणून येताना पालक आणि कोथिंबिरीच्या दोन जुड्या, बिटाचे दोन कांदे आणि चिंच घेऊन या बरं. बाकीचं सामान मी आणते आहे.’’ हे ऐकताच सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता वाटू लागली, की पालक, कोथिंबीर, बीट आणि चिंच घेऊन पालवी करणार तरी काय? होळीच्या दिवशी पुरणपोळी खातात, पुरणाचे मोदक खातात, नाहीतर काहीतरी गोडधोड करतात; पण पालेभाज्या, कोथिंबीर आणि चिंच घेऊन ही पालवी गोड पदार्थ कसा करणार? रंगपंचमीच्या आदल्या रविवारी बहुधा आपल्याला कुठला तरी भयानक पदार्थच खावा लागणार. शंतनू नेहाला म्हणाला ः ‘‘पालवीचा काहीतरी खतरी प्लॅन दिसतोय. मी तिच्याकडं जाण्याआधी घरून काहीतरी खाऊनच जाईन. उगाच तिकडं पालकपोळी, बीटमोदक आणि चिंचचटणी कोण खाणार?’’

सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन नेहा, शंतनू, वेदांगी आणि पार्थ वेळेवर हजर झाले. घरात पाऊल ठेवताच शंतनू म्हणाला ः ‘‘पालवी, आज मी कुठलेच चित्रविचित्र पदार्थ खाणार नाही...आधीच सांगून ठेवतोय.’’
पालवीची आई म्हणाली ः ‘‘अरे, पण तुला पुरणपोळी तरी आवडते की नाही?’’ शंतनू मान हलवत म्हणाला ः ‘‘हो. आवडते की. पहिली पुरणपोळी दुधात बुडवून आणि दुसरी पुरणपोळी तुपात भिजवून खायला आवडते...पण...पण मग हे पालक, चिंच, बीट कशासाठी?’’
‘‘अरे शंतनू, फक्त पालक, बीट आणि चिंचच नव्हे, तर आणखीपण काही गोष्टी आणल्यात मी,’’ असं पालवीनं सांगताच सगळेच ओरडले ः ‘‘म्हणजे आणखी काय आता...?’’
‘‘हळद, गाजरं, भोपळा, मुळा, चहा, कॉफी आणि मातीसुद्धा आणली आहे...’’
यावर सगळेच किंचाळले ः ‘‘का...य? चहा, कॉफी आणि माती?’’‘‘अरे, खाण्यासाठी नव्हे, तर चित्र रंगवण्यासाठी.’’  ‘‘आता हे काय नवीनच?’’
‘‘रंगपंचमीला लोक एकमेकांची तोंडं रंगवतात आणि तेही कुठलेही घाणेरडे रंग वापरून किंवा घातक रसायनं वापरून रंगवतात. आपण तोंड रंगवण्याऐवजी चित्र रंगवू आणि तेही नैसर्गिक रंग वापरून.’’
‘‘वॉव ! ही तर नवीनच आयडिया आहे’’.
वेदांगीनं विचारलं ः‘‘पण हे रंग तयार कसे करायचे?’’
बाबा म्हणाले ः ‘‘अं...मला वाटतं, जरा खाटखूट करून तुम्हीच शोधून काढा बरं. अगदीच अडलं तर मी सांगीन रंग कसे तयार करायचे ते.’’
शंतनूनं पालकाच्या भाजीची जुडी घेतली आणि दोन्ही हातात धरून कपडे पिळतात तशी ती कचकून पिळली. हिरवागार रस खाली आला आणि त्याचबरोबर त्याचे तळहातसुद्धा हिरवेकंच झाले.

‘‘यो यो आपुन को जम गया...जम गया. पालकसे हिरवा रंग आ गया...आ गया,’’ असं शंतनूनं म्हणताच पालवी म्हणाली ः ‘‘कमाल आहे तुझी. अरे, हा तर त्या पालकाच्या जुडीबरोबर हिंदीलापण पिळतोय. - मात्र, हे न ऐकताच शंतनू पालेभाजीच्या मागं हात धुऊनच लागला. नेहानं बीट खसखसून किसलं आणि फडक्‍यात घालून घट्ट पिळलं तेव्हा दाट गुलाबी रंग मिळाला. वेदांगीनं हळद पाण्यात घालून थोडावेळ उकळली. पाणी गाळून घेतल्यावर पिवळाधमक रंग मिळाला. शंतनू वाटच पाहत होता. त्यानं पिवळा आणि हिरवा रंग एकत्र करून नवीन रसरशीत पोपटी रंग तयार केला. हा नवीन रंग पाहताच सगळ्यांनीच आपल्या रंगीत हातांनी जोरदार रंगीत टाळ्या वाजवल्या. इतक्‍यात पालवी एका हातात छोटा लाकडाचा तुकडा आणि दुसऱ्या हातात सहाण घेऊन आली. हे दोन्ही नेहाला देत ती म्हणाली ः ‘‘हे आहे रक्तचंदन. आजीच्या औषधाच्या बटव्यात होतं. सहाणेवर थोडसं पाणी घेऊन हे जरा उगाळ बरं.’’ नेहा घसघसून रक्तचंदन उगाळू लागली. उगाळताना थोडं थोडं पाणी घालू लागली. आणि सहाणेवर घट्ट लालभडक लालेलाल रंगाची मऊशार साय तरंगू लागली. आणि नेहा आनंदानं ओरडली ः ‘‘ला..ला..ल लला ला..ललाल...लालेलाल’’.

पार्थनं मुळा खसखसून किसला. फडक्‍यात घेऊन आईच्या मदतीनं चांगला पिळला. पातळ दुधट पांढरा रंग मिळाला. मग त्यानं नेहाकडचा थोडा घट्ट लालभडक लालेलाल रंग घेतला. त्यात मुळ्याचा थोडा पातळ दुधट पांढरा रंग घातला आणि तजेलदार कचकचीत गुलाबी रंग तयार झाला. कॉफीचं पाणी उकळून आणि गाळून चमकदार प्रवाही तपकिरी रंग मिळाला. चिंच पाण्यात कालवून दाट चिकट चॉकलेटी रंग मिळाला. पार्थ म्हणाला ः ‘‘भारताचा ध्वज रंगवायचा आहे. त्यासाठी केशरी रंग कसा मिळवायचा?''
‘‘हॅ.. केशरापासून...’’
झालं. आईनं पाण्यात केशराच्या थोड्या काड्या टाकून पाणी उकळलं आणि झाला की सणसणीत केशरी रंग तयार.
आता पार्थ म्हणाला ः ‘‘निळा रंगपण हवा. मी कुठल्या रंगात कुठला रंग मिसळू म्हणजे निळा रंग तयार होईल?’’
बाबा पार्थला समजावत म्हणाले ः‘‘तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची राहिलीच. लाल, पिवळा आणि निळा हे तीन प्राथमिक रंग आहेत. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही रंगात मिसळून हे रंग बनवता येत नाहीत. त्यामुळं जर पार्थ तुला निळा रंग हवा असेल तर तू मगाशी जसं दोन रंगांचं मिश्रण करून गुलाबी रंग तयार केलास तसा निळा रंग तयार करता येणार नाही. तुला घरातच निळा रंग शोधावा लागेल आणि शोधलास तर तुला नक्कीच सापडेल.’’

पार्थ विचार करू लागलाः ‘घरात कुठं बरं असेल निळा रंग?’ इतक्‍यात आईनं पार्थकडं पाहत हातातला पांढरा रुमाल फडकवला आणि पार्थ आनंदानं ओरडलाः ‘‘वॉव! कळलं मला.’’ आणि धावत जाऊन तो निळीची बाटली घेऊन आला. निरनिराळे नैसर्गिक रंग आणि एकमेकांत मिसळून तयार झालेले नवीन रंग असे एकूण ११ रंग आता मुलांकडे तयार होते. आता थोड्या वेळात ही रंगसंख्यापण वाढणार होती. कारण लाल आणि पिवळा मिळून ऑरेंज रंग तयार झाला. पिवळा आणि निळा मिळून चमकदार हिरवा तयार झाला. निळा आणि लाल मिळून चकचकीत जांभळा तयार झाला. ‘‘आता सगळे मिळून चित्र काढू या आणि रंगवू या’’, असं बाबांनी म्हणताच शंतनू म्हणाला ः ‘‘मला जरा वेगळं सुचतं आहे...’’  ‘‘आता काय नवीन?’’  रंगपेटीतल्या रंगांसारखे हे रंग नाहीत. म्हणजे रंगपेटीतले रंग अगदीच पुळपुळीत असतात. म्हणजे रंग वेगवेगळे असले तरी त्यांचा पुळपुळीतपणा सारखाच असतो...

शंतनूला थांबवत वेदांगी म्हणालीः ‘‘म्हणजे नक्की काय?’’ ‘‘म्हणजे हे बघा, आपण तयार केलेले रंग वेगवेगळे आहेतच; पण प्रत्येक रंगाला त्याचा म्हणून एक पोत आहे. काही रंगांना चिकटपणा आहे, तर काही रंग मऊशार आहेत. माती पाण्यात कालवून तयार केलेल्या रंगाला खरबरीतपणा आहे, तर केशरी रंगाला सणसणीत चमक आहे. काही रंग खूपच पातळ आहेत, तर काही भलतेच दाट आहेत. त्यामुळं आपल्याला चित्र काढताना आणि चित्र रंगवताना फक्त रंगांचाच नव्हे, तर त्या रंगांचा जो पोत आहे, त्याचाही विचार केला पाहिजे.’’ ‘‘आपले रंग पुळपुळीत नाहीत हे अगदी खरं आहे. कारण, आपल्या रंगांना पोत तर आहेच; पण त्यांना वास आहे आणि चवही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे रंग अजिबात अपायकारक नाहीत...तर आणखीन एक गोष्ट सुचते आहे. पुळपुळीत रंग वापरायची सवय असल्यानं आपण नेहमीच कागदावर सपाट चित्र काढत आलो; पण या दाट, घट्ट आणि प्रवाही रंगांचा वापर करून आपण द्विमिती आणि त्रिमिती चित्रही तयार करू शकू...’’
‘‘अं... अं... कसं काय?’’

‘‘आपण चित्र पुठ्ठ्यावर तयार करू. कालवलेल्या मातीचा छोटासा डोंगर करू, कॉफीच्या रंगानं त्याला शेडिंग करू. पायवाटेसाठी चिंचेचा रंग वापरू. पायवाटेवर काड्या टोचून त्यावर हिरवी झाडं काढू. निळ्या आकाशात उडणारे लाल चोचीचे पोपटी पोपट काढू...’’
‘‘सगळंच सांगू नकोस. आम्हाला आणखीही वेगळं सुचतंय.’’ ...तर मग चला सुरू करा तेजतर्रार रंगांची चविष्ट अन्‌ सुवासिक रंगपंचमी! मुलांनी आणखी कुठली चित्र काढली असतील, हे तुम्ही मला सांगू शकाल?

-----------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ :

  •   मुलांनी रंग तयार केल्यानंतर...‘केवढे हे रंग? केवढी ही नासाडी? एवढ्या भाजीत आपण महिनाभर जेवलो असतो’ असे ‘काटकसरीचे सुविचार’ जर मनात आले तर ते मनातल्या मनातच गिळून टाका. तब्येत सुधारेल.
  •   ‘रंगपंचमीचे कपडे’ घालूनच खेळायला बसा. म्हणजे मग कितीही मोठा डाग पडला तरी घरात शांतताच राहील!
  •   मुलांनी पुनःपुन्हा मागितले तरच त्यांना तुमचे ‘सल्ले’ द्या.
  •   मुलांच्या चित्रात लुडबूड न करता तुमचे चित्र तुम्हीच रंगवा किंवा एका जागी स्वस्थ बसा.
  •   ‘चित्र काढता-काढता चित्ररूप आणि रंगवता रंगवता रंगरूप झालेल्या आपल्या मुलांकडं शहाणे पालक लांबूनच पाहतात,’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.

-----------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com