रंगीत शोधाशोधी (राजीव तांबे)

रंगीत शोधाशोधी (राजीव तांबे)

दोन-दोनचे गट तयार झाले. दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांची नावं मुलांनी लिहून घेतली. मुलं खिडकीत गेली आणि आता दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांना मॅच होणाऱ्या गोष्टी शोधू लागली. मॅचिंग वस्तू मिळताच आनंदानं ओरडू लागली. खिडकीत उभं राहून १० मिनिटं कधी संपली, हे कुणालाच कळलं नाही.

आज सगळे नेहाच्या घरी जमले होते. वेदांगी, पार्थ, शंतनू आणि पालवी.
नेहाची आई किचनमध्ये काहीतरी करत होती. बाबा आरामात बसले होते.
घरात येताच सगळ्यांना गरम होऊ लागलं. पंखा सुरू होता, तरी गरम होत होतं. इतक्‍यात हातवारे करत शंतनू म्हणाला ः ‘‘अहो बाबा, ती खिडकी उघडा ना. सगळा वाराच बंद झालाय. त्यामुळं गरम होतंय.’’

‘‘अरे, आज आपण खिडकीचाच खेळ खेळणार आहोत. थोडा खाऊ खाऊ आणि मग खिडकीतून पाहू. काय?’’ असं बाबांनी म्हणताच शंतनू आनंदानं ओरडला ः ‘‘तर हो जाए खादाडी, बाद में खिडकी उघडी.’’
‘‘आपण हा खेळ दोन भागांत खेळल्यानंतर तुम्ही मात्र तिसरा भाग सुचवायचा आहे. आपली ही खिडकी तशी मोठी आहे. म्हणजे एकाच वेळी तुम्ही पाचही जण खिडकीत उभे राहू शकता...’’
‘‘पण खिडकीत उभं राहून काय करायचं...?’’
‘‘अरे, आधी मी काय सांगतोय ते ऐका आणि मग हवे तेवढे प्रश्‍न विचारा.’’
‘‘ओके, ओके... सांगा, सांगा.’’

‘‘तुम्ही पाचही जणांनी पाच मिनिटं खिडकीत उभं राहायचं आहे. अतिशय शांतपणे. बाहेर दिसणारी प्रत्येक गोष्ट नीट पाहायची आहे. तुम्ही पाच मिनिटांत किमान ४० गोष्टी नीट पाहू शकता. पाहू शकता की नाही...?’’
‘‘हो तर. सहजच. चाळीसच काय, मी तर १०० गोष्टीपण फटाफट पाहू शकेन. खरंच...’’ शंतनूला थांबवत बाबा म्हणाले ः ‘‘हो. तू चाळीसपेक्षा नक्कीच जास्त गोष्टी पाहू शकशील; पण माझा प्रश्‍न होता ः ‘‘पाच मिनिटांत ४० गोष्टी ‘नीट’ पाहू शकाल का?’’
नेहा विचार करत म्हणाली ः ‘‘अं...नक्कीच नीट पाहता येतील; पण ‘नीट’चा अर्थ काय? नीट पाहायच्या म्हणजे कशा पाहायच्या?’’
‘‘चांगला प्रश्‍न विचारलास. या ‘नीट’मध्येच या खेळाची गंमत गुंफलेली आहे. तुम्ही वस्तू नीट पाहायच्या आहेत म्हणजे त्यांच्या रंगांसकट नीट पाहायच्या आहेत. पाच मिनिटांनंतर मी तुम्हाला वस्तू आणि त्यांचे रंग लिहायला सांगणार आहे...’’
‘‘व्वा, व्वा! हे तर एकदम सोपं आहे. कधी सुरू करायचं?’’ पार्थनं अधीर होऊन विचारलं.

‘‘पण...पण आम्हाला सगळ्या रंगांची नावं माहीत नसतील, तर काय करायचं? म्हणजे...वस्तू माहीत आहे; पण त्या वस्तूच्या नेमक्‍या रंगाचं नाव जर आम्हाला माहीत नसेल, तर आम्ही काय करायचं, असं मला विचारायचं आहे,’’ एका दमात इतकं लांबलचक वाक्‍य बोलल्यावर पालवीला दम लागला.
डोकं खाजवत पार्थनं विचारलं ः ‘‘पण असं कसं होईल?’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘होईल. नक्कीच होईल. पाहा नं, त्या समोरच्या दोन विटांचे रंग एकदमच वेगळे आहेत. एकीचा रंग आहे विटकरी; पण दुसरीचा...?’’
‘‘दुसरीचा रंग धुळकट विटकरी,’’ नेहा पटकन म्हणाली.
‘‘शाबास. आता तुम्हाला खेळ कळू लागला आहे. ...तर तुम्हाला रंगाचं नाव माहीत नसेल, तर त्या रंगाची ओळख करून घ्या. त्या रंगाचं बारसं करा. तुम्हाला योग्य वाटेल ते नाव त्या रंगाला द्या; पण तुमच्या या ‘नवीन रंगा’वरून इतरांना ती वस्तू ओळखता आली पाहिजे. ओके?’’
‘‘पण हा खेळ खेळायचा कसा?’’

‘‘तुम्ही पाचही जणांनी खिडकीत उभं राहायचं आहे. कमीत कमी २५ वस्तू नीट पाहायच्या आहेत आणि यापैकी फक्त दहाच वस्तू तुम्ही त्यांच्या रंगांसकट लिहायच्या आहेत आणि हा आहे खेळाचा पहिला भाग.’’
‘‘आँ...मग दुसरा भाग काय आहे...?’’
‘‘शंतनू, आधी हा पहिला भाग खेळू. मला तर वाटतंय, या खेळाचा दुसरा भाग मीच सुचवेन,’’ पालवी हसतच म्हणाली.
शंतनू, वेदांगी, नेहा, पार्थ आणि पालवी असे सगळे खिडकीत उभे राहिले.
आता उजवीकडं पाहायचं की डावीकडं?
समोर पाहायचं की खाली?
आकाशात बघून चालेल का?
इतर बघतात त्याच वस्तू मी बघायच्या की वेगवेगळ्या बघायच्या?
आधी वस्तू बघायची की आधी रंग?
नुसत्या लक्षात ठेवायच्या की पटकन लिहून घ्यायच्या?

रंगाचं नाव लिहिताना चुकलं तर आपण आऊट होणार का? असे एक ना हजार प्रश्‍न मुलांच्या डोक्‍यात गरगरू लागले. बाबांना याचा अंदाज होताच. मुलांच्या पाठीमागं उभे राहत बाबा म्हणाले ः ‘‘तुमच्या मनातले प्रश्‍न मला ऐकू येत आहेत. खिडकीतून कुठंही पाहा; पण फक्त रंग आणि वस्तू यांवरच लक्ष केंद्रित करा. नंतर काय मजा होते ते पाहू या.’’

चार मिनिटं झाल्यावर बाबा म्हणाले ः ‘‘हं, अजून एक मिनिट बाकी आहे आणि तुम्ही फक्त पाचच वस्तू आणि त्यांचे रंग लक्षात ठेवायचे आहेत.’’ पाच मिनिटं झाल्याची खूण करताच सगळ्या मुलांनी वहीत डोकी खुपसली.
मुलं काय लिहीत आहेत, ते बाबा पाहू लागले.
  मुलांनी लिहिलं होतं ः

  •   व्हॅनिला आईस्क्रीमच्या रंगाचे ढग.
  •   चहा कलरच्या विटा.
  •   काळा कुळकुळीत डोमकावळा.
  •   कडक चहाच्या रंगाची कुंडी.
  •   झगझगीत निळसर आकाश.
  •   पिवळी चकचकीत बाकं.
  •   धुळकट पोपटी पानं.
  •   कोवळी गुलूगुलू गुलाबी पानं.
  •   गाडीची पाणेरी रंगाची काच.
  •   गोणपाटाच्या रंगाचं झाडाचं खोड.
  •   हिरवीगार तुळस.
  •   पिवळाजर्द झेंडू.
  •   शायनिंग जांभळ्या रंगाची गाडी.
  •   काळी मॅटफिनिश स्कूटर.
  •   चॉकलेटी गंज आलेलं लोखंडी दार.
  •   राखाडी धुरकट हवा.
  •   शेजवान सॉसच्या रंगाची गाडी.
  •   गंजकट लाल रंगाची सायकल.
  •   शेंगदाणा चटणीच्या रंगाची कुंडी.
  •   पोपटी मिरचीच्या रंगाची भिंत.
  •   कापूसरंगाच्या भिंती.
  •   मळकट कळकट लाकडी रंगाची दारं.
  •   स्टीलच्या रंगाच्या कड्या.
  •   आकाशाच्या रंगांच्या काचा.
  •   लिंबूसरबताच्या रंगाची काच.

बाबांनी हात उंचावताच सगळे लिहायचे थांबले.
बहुतेक सगळ्याच मुलांनी रंगांची नवनवीन नावं शोधली होती. आता काय करायचं?
मार्क कसे मिळवायचे?
बाबा हसतच म्हणाले ः ‘‘आता खेळाचा दुसरा भाग सुरू होणार आहे आणि आपण गटात खेळणार आहोत.’’
‘‘म्हणजे? आता आम्ही लिहिलेलं वाचायचंच नाही का...? म...लिहून काय उपयोग?’’ वेदांगी हळू आवाजात चिडचिडली.

‘‘वाचायचं की...पण वेगळ्या पद्धतीनं वाचायचं...’’ असं बाबांनी म्हणताच पार्थ म्हणाला ः ‘‘वाचायची कुठली वेगळी पद्धत? म्हणजे काय उलट-सुलट वाचायचं?’’
‘‘अरे, माझं बोलणं पूर्ण तरी होऊ दे. हं, तर तुम्ही वाचायचं आहेच; पण वाचताना फक्त रंगाचं नाव वाचायचं आहे. वस्तूचं नाव मात्र अजिबात वाचायचं नाही.’’
पालवीची वही हातात घेत बाबा पुढं बोलू लागले ः ‘‘म्हणजे उदाहरणार्थ, पालवीनं लिहिलं आहे ः ‘गाडीची पाणेरी रंगाची काच.’ मात्र, हे वाक्‍य वाचताना पालवी वाचेल ः ‘पाणेरी रंग.’ मग ‘पाणेरी रंगा’ची वस्तू तुम्ही शोधून काढायची आहे. तुम्ही शोधलेली वस्तू आणि पालवीनं शोधलेली वस्तू एकच असेल, तरच तुम्हाला मार्क मिळतील. म्हणून आपण दोन-दोन जणांचे तीन गट करणार आहोत.’’
‘‘पण बाबा, आम्ही तर पाच जणं आहोत. म...दोन-दोन जणांचे तीन गट कसे होतील?’’ असं वेदांगीनं विचारताच आई हसतच म्हणाली ः ‘‘मीपण लिहिल्या आहेत पाच रंगीत गोष्टी.’’

‘‘वॉव! हे आम्हाला माहीतच नव्हतं,’’ सगळेच आनंदानं ओरडले. ‘‘हं, आणि शेवटची सूचना. रंगाचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही जी वस्तू शोधणार आहात, ती या खिडकीतून दिसणारी हवी, काल्पनिक नको. चला गटांत बसा. रंगांची नावं सांगा आणि सुरू करा ‘रंगीत शोधाशोधी’.’’
दोन-दोनचे गट तयार झाले. दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांची नावं मुलांनी लिहून घेतली. मुलं खिडकीत गेली आणि आता दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांना मॅच होणाऱ्या गोष्टी शोधू लागली. मॅचिंग वस्तू मिळताच आनंदानं ओरडू लागली.
खिडकीत उभं राहून १० मिनिटं कधी संपली, हे कुणालाच कळलं नाही.
बाबा म्हणाले ः ‘‘थांबा आता.’’ तेव्हा मुलं भानावर आली. बाबा हसतच पुढं म्हणाले ः ‘‘खेळाचा तिसरा भाग म्हणजे, या खेळात मार्क नसल्यानं सगळेच जिंकतात...’’
मुलं किंचाळली ः ‘‘ऑ...असं का? आम्ही तर शोधल्या आहेत रंगीत वस्तू...’’
‘‘एकाच रंगाच्या अनेक वस्तू असतात आणि एकाच वस्तूत अनेक रंगही असतात, याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून आहे हा खेळ...’’
‘‘खरंय बाबा. आतापर्यंत मी कधी इतके रंग शोधलेच नव्हते.’’
‘‘आणि फक्त रंग घेऊन वस्तूही शोधल्या नव्हत्या...’’
‘‘मला तर रंगांची नवीन १९ नावं कळली.’’

‘‘मी अगदी खरं सांगते, या शंतनूनं शोधलेल्या त्या नवीनच रंगांच्या वस्तू शोधताना माझ्या तोंडाला रंगीत फेस आला...’’
इतक्‍यात दोन्ही हात उंचावत शंतनू म्हणाला ः ‘‘चला...चला...आता आपण कुरकुरीत, चमचमीत, चटकदार आणि चवीष्ट गोष्टींचे रंग खाता खाताच शोधू या.’’

---------------------------------------------------------------------------------------

पालकांसाठी गृहपाठ :

  •   मुलांनी रंगाचं एखादं नाव शोधलं आणि ते तुम्हाला आवडलं नाही तरी शांत राहा. (इच्छा नसली तरीही) त्याचं कौतुक करा; पण कृपया त्याला हिणवू नका.
  •   रंगांची नवनवीन नावं शोधण्यासाठी मुलांना प्रेरित करा. यासाठी मुलांसमोर वेगवेगळे पर्याय ठेवा आणि त्यांनी निवडलेला पर्याय (कृपया) मान्य करा. या वेळी मुलं तुमच्याकडं आदरानं बघतील.
  •   मुलांनी अधिक शोधक, चौकस व्हावं, त्यांची शब्दसंपदा वाढावी आणि यातूनच त्यांची सर्जनशीलता वाढीला लागावी, यासाठी हा खेळ आहे.
  •   मुलांसोबत तुम्हीसुद्धा या खेळात भाग घ्या. किमान पाच रंगांची नावं शोधा.
  •   ‘हार-जीत’चा विचार न करता ‘आपण नवीन काय पाहिलं? आपण नवीन काय शिकलो?’ याबाबत मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. ‘तुम्ही काय नवीन शिकलात?’ हेही मुलांना विनासंकोच सांगा.
  •   ‘मुलांसोबत शिकणारे पालकच मुलांसोबत मोठे होतात,’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.

---------------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com