साप, ससा आणि सॉसची सोपी गोष्ट (राजीव तांबे)

साप, ससा आणि सॉसची सोपी गोष्ट (राजीव तांबे)

‘‘आता आपल्याकडं ‘वर्ड बॅंक’ आहे. या वर्ड बॅंकेत ३३ शब्द आहेत. आता आपण यातले जास्तीत जास्त शब्द वापरून एक गोष्ट लिहायची आहे; पण ही गोष्ट कमीत कमी पाच ओळी किंवा जास्तीत जास्त सात ओळींचीच हवी. तर आता कृपया सर्व महान लेखकांनी आपापली गोष्ट लिहायला सुरवात करावी...’’

मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारपासून घराघरात परीक्षेचे खारे वारे आणि मतलई वारे एकाच वेळी वाहू लागतात. काही घरांत तर अभ्यासाची चक्रीवादळं घुमू लागतात; त्यामुळं आता या रविवारी काय करायचं, हे ठरवण्यासाठी शंतनू, नेहा, पालवी, वेदांगी आणि पार्थ शनिवारीच एकत्र भेटले.

शंतनू म्हणला ः ‘‘मला वाटतं, उद्या आपण मुलंमुलंच बाहेर कुठंतरी भेटू. कारण कुणाच्याही घरी आपण भेटलो, की लगेचच अभ्यासाचं कीर्तन सुरू होणार. हो किनई?’’
पालवी म्हणाली ः ‘‘तुझं म्हणणं एकदम खरं आहे रे; पण मला सांग, भेटून करायचं काय? काहीतरी फंडू आयडिया शोधली पाहिजे...’’
वेदांगी चुळबुळत म्हणाली ः ‘‘अं...मी एक सुचवू का?’’
‘‘अगं, विचारतेस काय? चल सुचव...’’
‘‘अं...मला वाटतं, या वेळी आपण कुणाच्या तरी किंवा आमच्या घरीच जमू या,’’ यावर नेहा वैतागून म्हणाली ः ‘‘आता पुन्हा हे काय?’’
वेदांगी पुढं म्हणाली ः ‘‘अगं ऐक ना, आपण घरीच भेटू; पण अभ्यासाचा खेळ खेळू. मग घरातलेपण खूश. आपण खेळल्यामुळं खुशमखूश. काय...?’’
‘‘पण अभ्यासाचा खेळ म्हणजे? अभ्यास की खेळ?’’
‘‘म्हणजे खेळता खेळता अभ्यास. खरंच खूप मजा येईल. मला माहीत आहेत असे काही अभ्यास-खेळ.’’

‘‘मग ठरलं तर, आपण सगळ्यांनी उद्या वेदांगीच्या घरी भेटायचं. ओके?’’
सगळे एका सुरात म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सगळे वेदांगीच्या घरी जमले.
वेदांगीचे बाबा म्हणाले ः ‘‘आता परीक्षा जवळ आल्यानं तुम्हाला अभ्यास करायचा असेल म्हणून आज तुम्ही एकच खेळ खेळा बरं. वेदांगीनं तुमच्यासाठी एक मस्त खेळ तयार केला आहे; पण तो अभ्यासाचा खेळ आहे बरं का. चला, थोडासा खाऊ खाऊन घ्या आणि खेळण्यासाठी तयार व्हा.’’
आता सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली, की वेदांगी कुठला अभ्यासाचा खेळ घेणार? म्हणजे असा खेळ, की ज्यामुळं अभ्यास झाला म्हणून मोठी माणसं खूश, तर खेळ खेळायला मिळाला म्हणून मुलंही खूश!
गरमागरम शिरा खाऊन मुलं खेळासाठी तयार झाली. वेदांगीनं सगळ्यांना एकेक कागद दिला आणि म्हणाली ः ‘‘तुम्ही एका ओळीत प ची आणि दुसऱ्या ओळीत स ची चौदाखडी लिहायची...’’
‘‘आता हे काय नवीनच? बाराखड्या लिहायला आम्ही का कुकुलं बाळं आहोत?’’
‘‘आता आणि हे चौदाखडी म्हणजे काय?’’

‘‘आधी सगळं ऐका. मग प्रश्‍न विचारा. तुम्हा सगळ्यांना बाराखडी माहीतच आहे; पण आता त्यासोबत ॲ आणि ऑ पण घ्यायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ः प पॅ पा पि पी पु पू पे पै पो पौ पं पः याप्रमाणे. आणि हो, का लिहायची ते मी तुम्ही लिहिल्यानंतरच मी सांगणार आहे. चलो, हो जाओ शुरू.’’
सगळ्या मुलांनी आपापल्या कागदावर प आणि स च्या चौदाखड्या लिहिल्या.
‘‘आता तुम्ही प्रत्येकानं लांब लांब बसायचं आहे. प च्या चौदाखडीतली अक्षरं आणि स च्या चौदाखडीतली अक्षरं वापरून प्रत्येकानं किमान २५ शब्द तयार करायचे आहेत. म्हणजेच ही २८ अक्षरं वापरून २५ शब्द तयार करायचे आहेत. आणि हो, शब्द का तयार करायचे आहेत, ते मी तुमचे शब्द तयार झाले की सांगेन. तो फिर, ओ गुरू करो शुरू.’’

पार्थ आणि नेहा दोघं ओरडले-ः  ‘‘२५ शब्द?कसं काय शक्‍य आहे? कुणाचेच होणार नाहीत इतके.’’
‘‘लिहायला सुरवात तर करा, शब्द आपोआप मिळतील आणि यासाठी तुम्हाला वेळ आहे फक्त १२ मिनिटं. आपका टाईम शुरू होता है अब...’’सगळी मुलं माना खाली घालून २८ अक्षरांशी झुंजू लागली. वेगवेगळ्या अक्षरांना जोडून पुटूपुटू लागली. नवीन शब्द मिळाला की ‘यॉ यॉ’ म्हणत तो लिहू लागली. लिहिता लिहिता थांबून आपले शब्द मोजू लागली. सगळ्यात आधी पालवी ओरडली ः ‘‘माझे झाले २५. यॉ यॉ.’’
नेहा हळूच म्हणाली ः ‘‘माझे काही फार नाहीत, अं फक्त १९.’’ आता सगळे पार्थकडं पाहू लागले.
पार्थ म्हणाला ः ‘‘माझे १००’’
सगळेच किंचाळले ः ‘‘काय? शं..भ..र? शक्‍य नाही. पाहू...पाहू...’’
पार्थ आढेवेढे घेत म्हणाला ः ‘‘म्हणजे मला १०० सुचणार आहेत; पण आता मी फक्त दहाच लिहिले आहेत. आता काय...१० वर एक शून्य दिलं की १००.’’
पार्थला थोपटत शंतनू म्हणाला ः ‘‘म्हणूनच तुझा येत नाही पहिला नंबर.’’
‘‘चला...चला...आता आपण एकेक करून आपण लिहिलेले शब्द वाचू या आणि इतरांनी लिहिलेला; पण आपल्याकडं नसलेला शब्द आपण लिहून घेऊ या. म्हणजे सगळ्यांकडं सारखे शब्द होतील.’’

सगळ्यांनी शब्द वाचले. आपण न लिहिलेले शब्द आपल्या शब्दासोंबत जोडले. आता सगळ्यांकडं पुढील ३३ शब्द झाले.
सासू, पैसा, पसा, पंप, पापी, पप्पा, साप, संप, सोस, सॉस, सपसप, पूस, सपासप, ससा, पुसा, पाप, सू, पू, पप्पू, पास, पी, सीसॉ, सोपं, सोपी, सोपे, पोप, पोस, सूप, पीस, पिसे, पंपू, पासपास, पॉप.
आपण सगळे मिळून ३३ शब्द शोधू शकतो, यावर मुलांचा विश्‍वासच बसेना.
वेदांगीच्या बाबांचं लक्ष होतंच. ते म्हणाले ः ‘‘चाललाय ना अभ्यास? की चाललाय नुसताच खेळ?’’
‘‘अहो, बाबा चालतोय कुठला? धावतोय अभ्यास आणि बसलाय खेळ!’’ असं पार्थनं म्हणताच सगळेच फॅ फॅ हसले.
आता काय करायचं?
वेदांगी तयारीतच होती.

‘‘आता आपल्याकडं ‘वर्ड बॅंक’ आहे. या वर्ड बॅंकेत ३३ शब्द आहेत. आता आपण यातले जास्तीत जास्त शब्द वापरून एक गोष्ट लिहायची आहे; पण ही गोष्ट कमीत कमी पाच ओळी किंवा जास्तीत जास्त सात ओळींचीच हवी. तर आता कृपया सर्व महान लेखकांनी आपापली गोष्ट लिहायला सुरवात करावी...’’
हे ऐकल्यावर कुणीसुद्धा लिहायला सुरवात केली नाही.
सगळे ढिम्म बसून राहिले.
तोंडाचा आ करून सगळेच एकमेकांकडं बघत बसले.
वेदांगी हैराण झाली. तिला काही कळेना. आपलं सांगायला काही चुकलं की काय, असं तिला वाटू लागलं. तिनं भीत भीत सगळ्यांना विचारलं ः ‘‘काय झालं?’’
सगळे वैतागून म्हणाले ः ‘‘कुठं काय झालं?’’
‘‘ॲ... ? म... लिहीत का नाही?’’
‘‘ॲ...ॲ? लिहिणं एवढं सोप आहे वाटतं? म्हणजे घ्या मेथी आणि करा भाजी, तसं घ्या शब्द आणि लिहा गोष्ट? असं कसं करता येईल गं?’’
इतक्‍यात पालवी म्हणाली ः ‘‘तसं मला एक वाक्‍यं सुचलं आहे; पण पुढं काय लिहू...?’’
‘‘कुठलं वाक्‍यं...? कुठलं वाक्‍यं पालवी?’’ सगळेच म्हणाले.
‘‘पप्पू पंपावर बसला होता, इतक्‍यात तिथं साप आला.’’
‘‘व्वा! मस्तच. मला पुढचं वाक्‍यं सुचतंय...‘‘पप्पा म्हणाले ः ‘अरे पप्पू, बरं झालं साप आला. हे पैसे घे आणि सॉस घेऊन ये.’ ’’
‘‘सॉस म्हणताच सापाच्या आणि पप्पूच्या तोंडाला पाणी सुटलं.’’
‘‘साप म्हणाला, मला नुसता सॉस नकोय. मला सोबत ससापण हवा.’’
‘‘सासू म्हणाली, पण...इथं ससा कसा मिळणार?’’
‘‘तुम्ही फक्त पास-पास पास-पास म्हणा. सपासप उड्या मारत ससा येईल.’’
‘‘सासू म्हणाली, ‘पास-पास पास-पास. ससा आला.’’
‘‘सॉस घेऊन पप्पू आला.’’
‘‘साप आणि ससा सीसॉवर बसून सपसप सॉस खाऊ लागले.’’
‘‘सासू पप्पांना म्हणाली, ‘काय हा सॉस खायचा सोस? कमाल आहे!’’
‘‘सशाच्या मिश्‍यांना आणि सापाच्या नाकाला सॉस लागलं.’’
‘‘ससा आणि साप म्हणाले, बघताय काय? सॉस पुसा.’’
‘‘सासू आणि पप्पांनी सॉस पुसलं.’’
‘‘ससा आणि सापानं पप्पूची पापी घेतली.’’
***

‘‘ए खरंच...गप्पा मारता मारता आपली गोष्ट झालीच की.’’
म्हणजे याचा अर्थ, आपण गोष्ट लिहू शकतो.
खूप चांगली गोष्टपण लिहू शकतो.
‘‘त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, गोष्ट लिहिल्यानंतर आपण काही खाऊपण शकतो.. हो किनई वेदांगीची आई..?’’
तेव्हाच आई म्हणाली ः ‘‘सॅंडविच आणि सॉस तयार आहे. तुम्ही कुठं बसून खाणार, इथं की सीसॉवर?’’

पालकासांठी गृहपाठ
हा शब्द खेळताना मुलं अक्षरांकडून शब्दाकडं आणि शब्दाकडून अर्थपूर्ण वाक्‍याकडं जातात. हा अभ्यासाचाच खेळ आहे; पण तो खेळासारखाच खेळण्यासाठी मुलांना मदत करावी.
 मुलांना मदत करणं म्हणजे मुलांच्या मुक्त विचारांना, त्यांच्या विलक्षण कल्पनाशक्तीला वाव देणं. यासाठी त्यांना प्रेरित करणं.
 मुलं काही वेळा आपल्याला न कळणारी वाक्‍यं लिहितील, न पचणाऱ्या कल्पना मांडतील. त्या वेळी तुमच्या सुधारित कल्पना किंवा तुमचे प्रगल्भ विचार त्यांच्यावर अजिबात लादू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
 मुलं लिहीत असताना समजा तुम्हालाही काही कल्पना सुचल्या, तर मुलांना त्या लगेचच सांगू नका. मुलांचं पूर्ण लिहून झाल्यानंतर, त्यांच्या परवानगीनं तुमच्या त्या (मौलिक) कल्पना त्यांच्यासमोर मांडा. (आणि कृपया) त्या चांगल्याच आहेत, असा हट्ट करू नका.
 वेगवेगळे शब्द घेऊनसुद्धा हा खेळ खेळता येईल.
 या खेळात हार-जीत नाही. मस्त मज्जा करण्यासाठीच हा खेळ खेळायचा आहे.
 ‘स्वतःच्याच पंखांनी उंच भरारी मारता येते. सुजाण पालक आपल्या मुलांना पंख नव्हे, तर उडण्याचं बळ देतात,’ ही प्राचीन चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com