अजूनही वेळ गेलेली नाही (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 2 एप्रिल 2017

‘‘आपण सकारात्मक विचार केला म्हणून आपल्याला सकारात्मक परिणाम दिसला. निराश न होता स्वतःवर विश्‍वास ठेवून लढलं तर यश समोर हात जोडून उभंच असतं. आपण आपल्यावरचा विश्‍वास गमावला, तर आपण निराशेच्या दरीत कोसळतो. आपण आपला विचार कसा बदलायचा, हे प्रत्येकानं ठरवायचं आहे.’’

‘‘आपण सकारात्मक विचार केला म्हणून आपल्याला सकारात्मक परिणाम दिसला. निराश न होता स्वतःवर विश्‍वास ठेवून लढलं तर यश समोर हात जोडून उभंच असतं. आपण आपल्यावरचा विश्‍वास गमावला, तर आपण निराशेच्या दरीत कोसळतो. आपण आपला विचार कसा बदलायचा, हे प्रत्येकानं ठरवायचं आहे.’’

आता सोमवारपासून परीक्षा सुरू...तरीपण या रविवारी सगळ्यांनी भेटायचं ठरवलं. सगळ्यांच्याच आई-वडिलांना परीक्षेची भलतीच चिंता.
‘एखाद्या रविवारी नाही भेटलं तर काय जगबुडी होणार आहे का? परीक्षा आहे तोपर्यंत घ्या की रविवारच्या खेळाला सुटी. काय हरकत आहे? मग सुटीत खेळा रोजच रविवारचे खेळ. उद्या परीक्षा आहे, तर आज अभ्यास करायला नको का?’ असं दहापैकी सात पालकांचं मत होतं आणि त्या सातपैकी चार पालकांचं तर ठाम मत होतं. मात्र, उरलेल्या तीन पालकांनी त्यांना थोपवून ठेवलं होतं.

‘सारखा सारखा अभ्यास करून मुलं कंटाळतात. घरातल्यांनी मुलांना सारखं अभ्यासावरून छेडलं तर मुलं वैतागतात. अभ्यासानंतर मुलांना थोडा विरंगुळा हवा असतो आणि असा विरंगुळा मिळाला की मुलांच्या मनावरचं अभ्यासाचं दडपण दूर होतं. साहजिकच, मुलांची अभ्यासाची गती वाढते,’ असं त्या तीन पालकांचं पक्कम्‌ पक्कं मत होतं. म्हणून तर हा ‘डेंजर रविवार’ पालवीच्या घरी ठरला होता.
‘त्या सात पालकांनी’ पालवीच्या आईला आधीच फोन करून सांगितलं होतं, की उगाच खाऊ-पिऊचा मोठा घाट घालू नका. तासाभरात सोडा हं मुलांना. उद्यापासून त्याची परीक्षा आहे नं. अभ्यास नको का करायला?’ पालवीच्या आईनं फक्त ‘हो-हो’ म्हटलं होतं.

रविवारी सकाळी नेहा, पार्थ, वेदांगी आणि शंतनू हे जमले. अभ्यासाचं सुदर्शन चक्र सगळ्यांच्या डोक्‍यावर फिरत असल्यानं सगळे गंभीर चेहरा करून बसले.
‘‘अरे, आज आपण अभ्यासाचीच मजा करणार आहोत.’’
‘‘म...म्हणजे अभ्यास करायचा की मजा करायची?’’
‘‘आणि मुख्य म्हणजे, मजा केली तर ती घरी सांगायची की नाही?
‘‘कारण नुसतीच मजा केली तर मग घरी गेल्यावर आमचाच अभ्यास होईल.’’
शंतनू दबक्‍या आवाजात म्हणाला ः ‘‘पालकांचा गृहपाठ आमच्याच पाठीवर नको व्हायला.’’ हे ऐकून सगळेच गालातल्या गालात हसले.
‘‘आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास तर सोपा होईलच; पण तुमचे मार्कही वाढतील,’’ पालवीच्या आईनं असं म्हणताच मुलांचे चेहरे खुलले.
‘‘मला सांगा, प्रश्‍नाचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करता?’’
‘‘अं...मला आईनं सांगितलं आहे, की प्रश्‍नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल, तर ते किमान चार-चार वेळा लिहून काढलं पाहिजे. काढते लिहून.’’
‘‘आई, मला पहाटे उठवते; मग मी कठीण प्रश्‍नांची उत्तरं पाठ करते.’’
‘‘मीपण तीन वेळा उत्तरं लिहून काढतो. लिहिता लिहिता आपोआप पाठ होतातच.’’
‘‘मला तेच तेच लिहायचा जाम कंटाळा आहे. मी प्रश्‍नांची उत्तरं पाच-सहा वेळा वाचतो आणि जेवढं आठवेल तेवढं लिहितो.’’
‘‘पण आई, तू असा प्रश्‍न का विचारलास?’’
कारण, तुमच्या सगळ्यांची अभ्यास करण्याची पद्धतच चुकीची आहे.
सगळी मुलं एका सुरात ओरडली ः ‘‘का...य? चू...क?’’
‘‘हो. तुमच्याकडून खरी गोष्ट समजावी म्हणून मी मुद्दामच चुकीचा प्रश्‍न विचारला.’’
‘‘म्हणजे...?’’
‘‘गोष्ट क्रमांक एक, प्रश्‍नाचं उत्तर कधीही पाठ करायचं नाही...’’
‘‘पाठ करायचं नाही...? म...काय करायचं?’’
‘‘पाठ नाही केलं तर लिहायचं काय?’’
प्रश्‍नाचं उत्तर पाठ केल्यावर सगळ्यात मोठा धोका म्हणजे, मधला एक जरी शब्द विसरला की गाडीला ब्रेक लागतो. म...पुढचं काहीच आठवत नाही आणि अशा वेळी जर का आपला आत्मविश्‍वास कमी कमी होऊ लागला, तर मग झालीच पंचाईत. पुढच्या प्रश्‍नांची उत्तरंपण चटकन आठवत नाहीत. हो की नाही?
हे ऐकताच नेहा म्हणाली ः ‘‘माझं असं खूप वेळा होतं; पण...पण म...काय करायचं अशा वेळी?’’
आणखी दोघांनी नेहाकडं पाहत ‘हो-हो-हो-हो’ करत माना हलवल्या.
‘‘उत्तर पाठ करायचं नाही तर प्रश्‍न समजून घ्यायचा...’’आईला थांबवत नेहा आणि शंतनू दोघं म्हणाले ः ‘‘अगं, आम्हाला समजेल असं सांग ना. आधीच त्या परीक्षेच्या भीतीनं उत्तरांचा चिवडा झालाय.’’
आई त्यांना समजावत म्हणाली ः ‘‘नीट लक्ष द्या. अजून वेळ गेली नाही. न समजता कुठलीही गोष्ट पाठ केली तर ती विसरण्याची शक्‍यताच अधिक. म्हणून आधी प्रश्‍न समजून घ्यायचा. म्हणजे हा प्रश्‍न कशाबद्दल आहे? कुठल्या घटकाबद्दल आहे? याचा विचार करायचा. नंतर या प्रश्‍नाच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे कुठले असू शकतील, याची छोटीशी यादी तयार करायची आणि ही यादी लक्षात राहण्यासाठी या मुद्द्यांचा एक पासवर्ड तरी तयार करायचा किंवा त्या यादीतले प्रमुख तीनच मुद्दे लक्षात ठेवायचे. बस्स. उत्तर पाठ करण्याची गरज नाही.’’
‘‘पण यामुळं काय होईल?’’
‘‘आणि तो पासवर्ड किंवा ते तीन मुद्देच विसरलो तर...?’’
‘‘यामुळं तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर लिहाल आणि तुम्ही जे लिहाल ते तुमचंच असेल. इतरासारखं छापील नसेल. तुम्ही पाठांतरावर किंवा घोकंपट्टीवर अवलंबून नसल्यानं तुमची लेखनाची गतीपण वाढेल. तुम्ही तयार केलेला पासवर्ड किंवा तुम्ही शोधलेले ते तीन मुद्दे तुम्ही विसरत नाही. कारण, तुम्ही प्रश्‍न समजून घेऊन ते तयार केलेले असतात आणि दुसरं म्हणजे ते तुम्हीच शोधलेले असतात. आपण शोधलेली वस्तू कधीच पाठ करावी लागत नाही. कारण, शोधतानाच ती पाठ होत असते. आणखी काही शंका?’’
‘‘हे खरंतर आम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं...आता?’’
मी मगाशीच म्हणाले ः ‘‘अजून वेळ गेलेली नाही म्हणून आणि मी सांगणार असलेली दुसरी गोष्टही याच्याशीच संबंधित आहे.’’
‘‘दुसरी कुठली आयडिया?’’
‘‘दुसरी आयडिया आणि पहिली या एकमेकींना पूरकच आहेत का?’’
‘‘अं...हो. दुसरी आयडिया एकदम फंडू आहे. ‘सकारात्मक विचार’ करायचा...’’
‘‘आता हे काय नवीन?’’
‘‘पण यात कुठली आली आहे आयडिया?’’
‘‘अरे, माझं बोलण तर पूर्ण होऊ देत. समजा, आपण अशी कल्पना करू या, की ‘एखादा प्रश्‍न समजून घेऊन तुम्ही तयार केलेला पासवर्ड किंवा ते महत्त्वाचे तीन मुद्दे तुम्हाला अजिबात आठवत नाहीएत,’ अशा वेळी मनात नकारात्मक विचार आणायचे नाहीत. ‘‘ ‘आता मला आठवत नाही’, ‘आता माझी वाट लागली,’ ‘फारच कठीण प्रश्‍न आहे हा,’ ‘मला येणारच नाही,’ असा नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही...’’
‘‘बाप रे! आम्ही तर असाच विचार करतो.’’
‘‘आठवलं नाहीतर कुणीही असाच विचार करणार ना?’’
‘‘अवघड प्रश्‍न असेल, काहीच आठवत नसेल तर मग सकारात्मक विचार कसा काय करणार?’’
‘‘तेच मी तुम्हाला सांगतेय. उत्तरातले महत्त्वाचे मुद्दे आठवले नाहीत तर निराश व्हायचं नाही. मनात म्हणायचं, ‘ठीक आहे. बाकीच्या चार प्रश्‍नांची उत्तरं आठवली आहेत. याचाच अर्थ, काही प्रश्‍नांची उत्तरं आधी आठवतात, तर काहींची नंतर आठवतात. या प्रश्‍नांचीही उत्तर मला नंतर आठवतीलच. कारण, मी प्रश्‍न समजून घेतले आहेत. मी मनापासून अभ्यास केलेला आहे.’ खरं सांगते, माझ्यावर विश्‍वास ठेवा, जेव्हा तुम्ही पहिल्या दोन प्रश्‍नांची उत्तरं लिहू लागता, तेव्हाच तुम्हाला अडलेल्या उत्तरांमधलेही मुद्दे सुचू लागतात...’’
‘‘बाप रे, चमत्कारच आहे!’’
‘‘हा चमत्कार नाही. कारण आजपर्यंत तुम्ही असा विचार केला नसेल. आपण सकारात्मक विचार केला म्हणून आपल्याला सकारात्मक परिणाम दिसला. निराश न होता स्वतःवर विश्‍वास ठेवून लढलं, तर यश समोर हात जोडून उभंच असतं. आपण आपल्यावरचा विश्‍वास गमावला तर आपण निराशेच्या दरीत कोसळतो. आपण आपला विचार कसा बदलायचा, हे प्रत्येकानं ठरवायचं आहे.’’
अभ्यासाची नवी दिशा मिळाल्यानं मुलं भलतीच चार्ज झाली. गप्पा मारताना खाऊ खायचा आहे, हेपण विसरून गेली.
आई म्हणाली ः ‘‘चला, आता खाऊ खाऊ ’’
मुलं म्हणाली, ‘‘नाही नाही. आता अभ्यासाला जाऊ जाऊ.’’


पालकांसाठी गृहपाठ :

  •   ‘मुलांनी कसा अभ्यास करावा’ हे पालकांनी फक्त सुचवावं; पण त्याचा अती आग्रह धरू नये.
  •   घोकंपट्टी म्हणजे अभ्यास नव्हे (हे वाचताना काही पालकांना त्रास होईल), तर प्रश्‍न समजून घेणं आणि त्याचं उत्तर आपल्या भाषेत देता येणं हे अधिक महत्त्वाचं आहे.
  •   मुलं अभ्यास करत असतात, तेव्हा मुलांना पालकांचा सहभाग नव्हे, तर ‘सहवास’ हवा असतो, हे कायम लक्षात ठेवा.
  •   मुलांना त्यांची अभ्यासाची पद्धत शोधण्याचं आणि शोधलेली पद्धत पुन्हा बदलण्याचंही पूर्ण स्वातंत्र्य द्या. यातूनच त्यांची अभ्यासाची गती वाढेल.
  •   ‘मुलांना सतत शिकवू नका, तर त्यांना शिकण्याची सकारात्मक प्रेरणा द्या’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!