तिसरी पायरी (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 9 एप्रिल 2017

‘‘आज पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या प्रश्नावर इतका विचार केला. त्यासाठी खूप वेळ दिला आणि विशेष म्हणजे, यासाठी इतरांची मदतपण घेतली. म्हणून मी उत्तराच्या जवळपास जाऊ शकले. आज मला खूप आनंद झालाय. मला वाटतं, ‘आपल्याला कुणीतरी काही सांगावं आणि तेच आपण करावं,’ हे काही योग्य नाही; ही पण घोकंपट्टीच झाली ना हो? आपण बदलू या.

‘‘आज पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या प्रश्नावर इतका विचार केला. त्यासाठी खूप वेळ दिला आणि विशेष म्हणजे, यासाठी इतरांची मदतपण घेतली. म्हणून मी उत्तराच्या जवळपास जाऊ शकले. आज मला खूप आनंद झालाय. मला वाटतं, ‘आपल्याला कुणीतरी काही सांगावं आणि तेच आपण करावं,’ हे काही योग्य नाही; ही पण घोकंपट्टीच झाली ना हो? आपण बदलू या.

या  रविवारी चमत्कारच झाला. पालवीच्या घरी सगळ्या मुलांचे केवळ पालकच जमले आणि त्यातही दोन नवीन पालक. हा काय प्रकार आहे, तेच पालवीच्या आई-बाबांना कळेना.
भुवया उंचावत, डोळे मोठे करत पालवीच्या बाबांनी विचारलं ः ‘‘हे काय? सगळी मुलं कुठं गेली? आणि हे अचानक तुम्ही कसे काय आलात? आणि हे नवीन कोण?’’
पालवीच्या बाबांना थांबवत शंतनूचे बाबा म्हणाले ः ‘‘मी सांगतो सगळं. गेल्या रविवारी खरं म्हणजे आम्ही कुणीच मुलांना पाठवायला तयार नव्हतो. आम्हाला परीक्षेची भीती होती; पण मुलं तुमच्याकडून आल्यापासून पार बदलून गेली...’’
‘‘म्हणजे? काय झालं काय, असं?’’

‘‘अहो, चांगलंच झालं. न सांगता अभ्यासाला बसू लागली. आम्ही काही सांगायला गेलो तर शंतनू म्हणाला ः ‘बाबा, मी सीरियसली अभ्यास करतोय...प्लीज, डिस्टर्ब करू नका. अभ्यास करण्याची सकारात्मक पद्धत आम्हाला पालवीच्या आईनं सांगितली आहे आणि आता पाहाच तुम्ही, माझ्या मार्कांमध्ये फरक पडतो की नाही ते!’ अहो, खरं सांगतो...शंतनू अभ्यासाबद्दल इतक्‍या आत्मविश्वासानं बोलू शकेल, असा विचार मी स्वप्नातसुद्धा कधी केला नव्हता. तो झपाटल्यासारखा अभ्यास करतोय आणि तेही आनंदानं. बाकीच्या सगळ्यांचा पण तोच अनुभव आहे.’’
नेहाची आई म्हणाली ः ‘‘आणखी एक गंमत म्हणजे, परीक्षेहून घरी येताना नेहा हसतच आली. हा माझ्यासाठी मोठाच शॉक होता. कारण आतापर्यंत परीक्षेहून आल्यावर सतत तिची कुरकुर सुरू असायची. ‘पेपरच कठीण काढला होता...’, ‘प्रश्नच आठवले नाहीत...’ ‘लिहायला वेळच पुरला नाही...’ ‘हे नाही आणि ते नाही...’ तर ती आल्या-आल्या  म्हणाली ः ‘अगं आई, या वेळी मला आधी न आठवलेल्या तीन प्रश्नांची उत्तरंपण नंतर आठवली. हे ऐकल्यावर मला तर अतिशय म्हणजे अतिशयच आनंद झाला.’’

वेदांगीची आई म्हणाली ः ‘‘आमच्याकडचा ‘चमत्कार’ थोडा वेगळा आहे. परीक्षेला जाताना वेदांगीची फे फे उडालेली असायची. आपण अभ्यास केलाय खरा; पण ऐनवेळी आपल्याला आठवेल ना, याचीच तिला भयंकर भीती वाटायची; पण या वेळी तिला एकदम शांत पाहून मीच मनात घाबरले. क्षणभर वाटलं, परीक्षा पुढंबिढं ढकलली की काय? तर वेदूच मला म्हणाली ः ‘आई, मी सकारात्मक विचार करतेय म्हणून मला भीती वाटत नाहीये. कारण, मी मनापासून अभ्यास केला आहे आणि तो मला आठवणार आहे, यावर माझा विश्वास आहे. आता तू माझी काळजी करू नकोस.’ मी त्याच वेळी मनातल्या मनात हात जोडले. तेव्हाच ठरवलं आता तुम्हाला आणि सगळ्यांना भेटलंच पाहिजे.’’

इतक्‍यात ते नवीन आलेले पालक काही बोलणार तोच नेहाचे बाबा म्हणाले ः ‘‘हं सांगायचं राहिलंच. हे अन्वयचे आई-बाबा. अन्वय हा नेहाच्या वर्गात आहे आणि आमचा शेजारीपण आहे.’’
अन्वयची आई म्हणाली ः ‘‘परीक्षा जवळ आली की नेहमी अन्वयची बाकबुक सुरू होते; पण या वेळी नेहानं काय जादू केली माहीत नाही; पण ते दोघं मिळून अभ्यास एन्जॉय करत होते. त्यालाही या मुलांसोबत खेळायचं आहे आणि आम्हालाही तुम्हाला भेटायचं होतं म्हणून...’’
‘‘हो. हो. काहीच हरकत नाही,’’ पालवीची आई म्हणाली, ‘‘हे तुमचं सगळं ऐकताना मला खरंच मुलांचं कौतुक वाटत आहे.’’ हे ऐकताच शंतनूची आई म्हणाली ः ‘‘मुलांच्या अभ्यासाविषयी, त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा याविषयी आम्हाला काहीतरी सांगाच. कारण, आता भीती वाटते की, मुलं व्हायची हुशार आणि आम्ही राहायचो अडाणी.’’

पालवीची आई संकोचत म्हणाली ः ‘‘नाही, नाही, असं काही नाही. माझाही या विषयात फार काही अभ्यास नाही, तेव्हा मी तुम्हाला काय सांगणार?’’
अन्वयचे बाबा म्हणाले ः ‘‘ठीक आहे. आपण गप्पा मारू या. आपापले प्रश्न इतरांसमोर अगदी मनमोकळेपणानं मांडू या. आणि सगळे मिळून या प्रश्नांचा समंजसपणे वेध घेऊ या. मला खात्री आहे, याचा आपल्याला नक्की फायदा होईल.’’
पदराला हात पुसत पालवीची आई म्हणाली ः ‘‘व्वा. चांगली कल्पना आहे. आपण नक्कीच गप्पा मारू; पण आधी चहा घेऊ या.’’
चहापान झाल्यावर अन्वयची आई म्हणाली ः ‘‘माझ्यापासून सुरवात करू या. अन्वय अभ्यासात चांगला आहे; पण त्याला लिहिण्याचा फार कंटाळा. शाळेतल्या वह्यासुद्धा अपूर्ण असतात म्हणून तो नेहमी बोलणी खातो.’’
मान हलवत पार्थचे बाबा म्हणाले ः ‘‘अगदी आमच्याच घरातलं उदाहरण सांगितलंत. दहा मिनिटांचा लिहिण्याचा गृहपाठ पूर्ण करायला त्याला अक्षरशः एक तास लागतो. सतत टंगळमंगळ सुरू. याचा त्याच्यापेक्षा मलाच जास्त त्रास होतो.’’
‘‘खरंय तुमचं; पण एकंदरीतच मुलांना लिहिण्याचा कंटाळा का असतो?’’
‘‘याला अनेक कारण असू शकतात. उदाहरणार्थ ः पेन धरण्याची त्यांची पद्धत सदोष असेल तर बोटांवर ताण तर येतोच; पण त्यामुळं लेखनगतीसुद्धा कमी होते किंवा त्यांना त्यांच्या भाषेत लिहायला मिळत नाही किंवा कंटाळवाण्या-किचकट गोष्टी सक्तीनं लिहायला लागतात. जे लिहितोय त्यातून त्यांना आनंद मिळत नसतो. अशा अनेक कारणांमुळं लेखनाविषयी एक अढी मनात निर्माण होते आणि याबाबत पालकांनी सतत टोचल्यामुळं ही अढी पक्की होत जाते.’’
‘‘पण मग, यातून काही मार्गच नाही का?’’
‘‘किंवा मी असं म्हणेन मुलांच्या नकळत यातून काही मार्ग काढता येईल का?’’
‘‘मुलांच्या नकळत...म्हणजे...?’’
‘‘नकळत म्हणजे. हे गेल्या रविवारचंच उदाहरण पाहा नं. मुलं त्यांच्या नकळतच बदलली. म्हणजे असा काही गमतीशीर खेळ शोधला पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी मिळून असे काही मजेशीर उपक्रम केले पाहिजेत, की मुलांना लिहिण्यातली मजा कळली पाहिजे.’’

‘‘खरंय. आपण सगळ्यांनी मिळून जर लिहिण्यातली मजा अनुभवली तर आणि तरच ती मजा मुलांपर्यंत पोचवू शकू आणि मग मुलांसोबत लिहिणं एन्जॉयही करू शकू.’’
‘‘व्वा. ही तर फारच छान कल्पना आहे; पण हे करायचं कसं ? कुणाची तरी मदत घ्यायला हवी आणि हा प्रश्न सोडवायलाच हवा.’’
‘‘कुणाला विचारावं?’’
‘‘मला वाटतं, हा प्रश्न आपला आहे. आपणच हा प्रश्न जर खोलात जाऊन समजून घेतला, तर आपल्याला उत्तर मिळू शकेल. आपण या प्रश्नाच्या विविध बाजू तपासू या.’’
‘‘पण ते कसं करायचं?’’
अन्वयची आई म्हणाली ः ‘‘अगदी सोपं. आपण यासाठी एक तीन पायऱ्यांचा खेळ खेळू. आता आपण १२ जण आहोत. आपण तीन-तीन जणांचे चार गट करू या. मुलांना लिहिण्याचा कंटाळा का वाटतो, त्यांना लिहावंसं का नाही वाटत, याची प्रत्येक गटानं आपापसात चर्चा करून एक यादी करायची. यासाठी वेळ आहे फक्त १० मिनिटं.’’
पालक पटापट चार गटांत बसून लिहू लागले.
पहिली दोन कारणं लिहिल्यानंतर मात्र फार काही सुचेना. प्रत्येक गटानं जेमतेम पाच कारणं लिहिली.
‘‘आता दुसरी पायरी. प्रत्येक गटानं आपापल्या कागदांची अदलाबदल करा. आता तुमच्या हातात आलेल्या प्रश्‍नांपैकी किमान दोन प्रश्‍नांची, म्हणजेच समस्यांची, उत्तरं तुम्ही शोधायची आहेत.’’
‘‘म्हणजे आम्ही काय करायचं?’’
‘‘हातात आलेले प्रश्‍न तुमच्याच मुलाचे आहेत. त्यासाठी तुम्हाला मुलाला मदत करायची आहे, तर मग तुम्ही काय काय कराल ? बस्स ते लिहा.’’
‘‘म्हणजे...मी काय करीन? आम्ही मिळून काय करू? किंवा त्यासाठी कुठं मदत शोधू? अशा प्रकारेच लिहू ना?’’
‘‘येस. एकदम बरोबर.’’
एवढा वेळ शांत असणारे पालक आता आपापसात बोलू लागले. काही जण फोन करून डॉक्‍टरांचा, समुपदेशकांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा, मित्रांचा, नातेवाइकांचा आणि त्याहूनही कुणाकुणाचा सल्ला घेऊ लागले.
काही जण गुगलवर शोधू लागले.
काही जण स्वतःच विचार करत काही गोष्टी लिहू लागले.
काही जण एकमेकांना अनाहूत सल्ले देऊ लागले.
हे सगळं असं ३० मिनिटं चाललं होतं.
अन्वयच्या आईनं टाळ्या वाजवल्या, तेव्हा कुठं सगळे शांत झाले. आपण शोधून काढलेले खास उपाय, स्पेशल उपाय, हट के उपाय सगळ्यांनी वाचले. आता सगळ्यांना पुढच्या पायरीची उत्सुकता लागली होती.
इतक्‍यात अन्वयची आई म्हणाली ः ‘‘आता तिसरी पायरी तुम्ही ओळखलीच असेल.’’
‘‘नाही. कुठली आहे तिसरी पायरी ?’’
‘‘आपल्या मुलांचे प्रश्न मांडले कुणी ?’’
‘‘आम्ही सगळ्यांनी’’
‘‘आता उत्तरं मिळाली आहेत. त्यांचं विश्‍लेषण करून कामाचा आराखडा तयार करणं आणि कामाला सुरवात करणं, हे करायचं कुणी ?’’
‘‘अर्थात आम्ही सगळ्यांनी..’’
‘‘हीच तर आहे तिसरी पायरी... चलो गुरू करो शुरू.’’
काही पालक गडबडून म्हणाले ः ‘‘हे काही बरोबर नाही हं. तुम्ही आम्हाला नेमकं काही सांगतच नाही. म...आम्ही काय करायचं ?’’
शंतनूची आई म्हणाली ः ‘‘आज पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या प्रश्नावर इतका विचार केला. त्यासाठी खूप वेळ दिला आणि विशेष म्हणजे, यासाठी इतरांची मदतपण घेतली. म्हणून मी उत्तराच्या जवळपास जाऊ शकले. आज मला खूप आनंद झालाय. मला वाटतं, ‘आपल्याला कुणीतरी काही सांगावं आणि तेच आपण करावं,’ हे काही योग्य नाही; ही पण घोकंपट्टीच झाली ना हो? आपण बदलू या. कुणाची वाट न पाहता, आपल्या मुलांच्या प्रश्नांवर आपण मिळून उत्तरं शोधू या. आपण प्रयत्न केले तर यश दूर नाही.’’
‘‘खरंय तुमचं. आपली मुलं सकारात्मक विचार करायला लागली आहेत. आता पाळी आपली आहे.’’
‘‘थोड्याच दिवसांत आपण पुन्हा भेटू आणि त्या वेळी आपण...’’
‘‘त्या वेळी आपण नवीन प्रश्नाला भिडू या.’’
सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
पुन्हा एक चहाची फेरी झाली.
आणि प्रत्येकाच्या मनात तिसरी पायरी पक्की झाली.


पालकांसाठी गृहपाठ

  • आपण सतत पालकांच्या भूमिकेत राहिलो, तर मुलांचे प्रश्न समजत नाहीत. मुलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘मूलकेंद्री विचार’ करायला हवा.
  •   आपल्या हृदयातलं मूल जागं असेल तरच मूलकेंद्री विचार करता येतो.
  •   मुलांना त्यांचे प्रश्न निर्भयपणे मांडता येतील, असं पोषक वातावरण घरात तयार करा.
  •   आपण आपल्या मुलांचे प्रश्न सोडवू शकतो, असा विश्वास बाळगून कामाला लागा.
  •   ‘सगळेच प्रश्न अवघड असतात; पण प्रयत्न केला तर सहजी सुटू शकतात,’ ही चिनी म्हण नेहमीच लक्षात ठेवा.