क्रमाक्रमानं (राजीव तांबे)

क्रमाक्रमानं (राजीव तांबे)

‘‘प्रवासात कुठलीही गोष्ट खिडकीतून बाहेर फेकायची नाही किंवा रस्त्यावर टाकायची नाही. त्यासाठी जवळ बाळगायच्या आहेत कचरा-पिशव्या. सगळा कचरा या पिशव्यांमध्ये गोळा करायचा आणि मग त्या पिशव्या स्टेशनवरच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या. आपण आपला देश आपल्या घरासारखाच स्वच्छ ठेवला पाहिजे.’’

शंतनू, नेहा, पार्थ, वेदांगी आणि अन्वय हे सगळे पालवीच्या घरी जमले होते. दोन दिवस अगोदरच पालवीच्या बाबांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं ः ‘‘या आणि यापुढच्या रविवारी असं दोन भागांत आपण खेळणार आहोत आणि तेही या रविवारी घरीच आणि उद्या चक्क ट्रेननं प्रवास. मग पुढच्या रविवारी प्रवास-गप्पा.’’
त्यामुळं मुलं भलतीच उत्तेजित झाली होती. ‘‘काय करायचं? सांगा ना काय करायचं? अशी मुलांची भुणभुण सुरू होती. मुलांची तोंडं बंद होण्यासाठी आई खाऊ घेऊन आली. बाबा मात्र गप्प बसून होते.
मुलांचं खाणं संपलं आणि आता मुलं काही बोलणार इतक्‍यात बाबा म्हणाले ः ‘‘पालवी, जा...घेऊन ये.’’
आता सगळेच उत्सुकतेनं पालवी काय आणते ते पाहू लागले.

पालवीनं चाकं असलेली एक बॅग ओढत आणली. सगळ्यांच्या मधोमध ठेवली. उघडली. बॅगेतलं बोचकं बाहेर काढून ठेवलं. आता कुणालाच कळेना...हे काय ?
‘‘हे आहे या रविवारचं जबरी-खबरी काम. म्हणजे रंगीत तालीम. मेन शो मात्र उद्या,’’ असं बाबांनी म्हणताच अन्वय म्हणाला ः ‘‘बाबा, आम्हाला समजेल असं काहीतरी सांगा ना... रंगीत तालीम आणि मेन शो म्हणजे काय?’’
‘‘हो, हो, हो...यही तो सरप्राइज है! तर आजचा भाग एक. ही आहे प्रवासाची बॅग. या रविवारी तुम्ही प्रवासाची तयारी करायची आहे आणि उद्या प्रवास करायचा आहे.’’
एकदम हल्लागुल्ला सुरू झाला. मुलं ओरडू लागली ः ‘‘उद्या दे धमाल की कमाल. उद्या करा भागम्‌ भाग. उद्या अटको सटको ट्रेन से भटको..’’

बाबा म्हणाले ः ‘‘अरे, जरा ऐकून घ्या. आजच्या परीक्षेत पास झालात तरच उद्या अटको सटको ट्रेन से भटको. प्रवासाची तयारी म्हणजे बॅगेत कपडे कोंबणं नव्हे आणि बॅग भरताना हज्जार वेळा उचकपाचक करणं तर नव्हेच नव्हे. जरा समजून घ्या. या बोचक्‍यातल्या सगळ्या गोष्टी बॅग भरताना वापरल्या गेल्या पाहिजेत; पण याचा अर्थ सगळ्याच गोष्टी बॅगेत गेल्या पाहिजेत असंही नाही. एकदा बॅगेत ठेवलेली वस्तू पुन्हा बाहेर काढता येणार नाही. आपल्याला एक सॅकपण घ्यायची आहे; त्यामुळं कुठल्या गोष्टी सॅकमध्ये आणि कुठल्या बॅगेत ठेवायच्या आणि का ठेवायच्या, ते आधी नीट ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बॅगा भरताना किंवा कुठलंही काम करताना एक क्रम असतो. तो क्रम चुकता कामा नये. उदाहरणार्थ ः बॅगेत कपडे भरताना जोडीनं कपडे भरायचे. म्हणजे मोजे आणि रुमाल यांची जोडी. जर मी रुमाल बॅगेत ठेवलेला असेन, तर याचा अर्थ मी मोजेही तिथंच ठेवलेले असायला हवेत. मोजांसाठी पुन्हा बॅगेची उचकपाचक करण्याची गरज नाही. ओके?’’
बाबा पुढं म्हणाले ः ‘‘आता मी हे बोचकं उघडतो. घाई करू नका. नीट पाहून घ्या. आपापसांत चर्चा करा आणि मगच बॅग भरायला सुरवात करा.’’

बाबांनी सावकाश बोचकं उघडलं. बोचक्‍यात खूपच वस्तू होत्या.
मेणबत्ती, जुना टूथब्रश, कुलूप, किल्ल्या, की-चेन, साखळी, रंगीत रिबिन, पेन, कागदी पिशव्या, जुनं वर्तमानपत्र, पुस्तकं, चष्म्याचं घर, पाण्याची बाटली, छोटी डायरी, वेगवेगळे कपडे आणि खूप काही. हे सगळं पाहून तर मुलं गोंधळूनच गेली.
आता यांचा क्रम कसा लावायचा तेच कुणाला कळेना. सगळी मुलं एकदा समोरच्या वस्तूंकडं आणि नंतर एकमेकांच्या तोंडांकडं पाहत होती.
बाबा म्हणाले ः ‘‘ठीक आहे...आपण सुरवात करू या.’’
सगळ्या मुलांनी मनातल्या मनात हुश्‍श केलं.
पहिली तयारी म्हणजे बॅगेच्या चेनवर हलक्‍या हातानं मेणबत्ती फिरवली पाहिजे.
नेहानं चेनवर मेणबत्ती फिरवली. चेन सैल झाली.
जुना टूथब्रश आणि काड्या घेऊन बॅगेच्या चाकांत अडकलेला कचरा, केस, दोरे हे काढलं पाहिजे. नाहीतर प्रवासात जड बॅगा ओढताना फार हाल होतात.
शंतनूनं आणि वेदांगीनं चाकांची साफसफाई तर केलीच; पण त्याच वेळी अन्वयनं चाकांमध्ये दोन थेंब तेलही घातलं.
‘‘आता सांगा बरं, ही झगझगीत पिवळ्या रंगाची रिबिन कशासाठी आहे?’’
हे ऐकल्यावर डोकं खाजवत पार्थ म्हणाला ः ‘‘कुठलं तरी उद्‌घाटनबिद्‌घाटन करायचं असेल...’’ सगळेच हसायला लागले. ‘‘बहुतेक जणांच्या बॅगा लाल, काळ्या किंवा निळ्या असतात. अशा वेळी आपली बॅग चटकन ओळखता येत नाही. म्हणून आपल्या बॅगेच्या हॅंडलला पिवळ्या रिबिनीचे छोटे तुकडे बांधायचे.’’
‘‘हां. म्हणजे पिवळी रिबिन दिसली की बॅग आपली. हो ना ?’’
पालवी आणि वेदांगीनं हॅंडच्या गळ्यात रिबिन अडकवली.
‘‘चला, आता ही बॅग तयार झाली. आता याप्रमाणेच आपली सॅक तयार करा पाहू,’’ बाबा म्हणाले.
पार्थ हळूच पुटपुटला ः ‘‘पण सॅकला तर चाकंच नाहीत..?’’
बाबा म्हणाले ः ‘‘आता तुमच्या दोन्ही बॅगा तयार झाल्या. आता सॅकमधलं सामान आणि बॅगेतलं सामान वेगळं करा पाहू.’’
‘‘मी सांगतो, पाण्याची बाटली सॅकमध्ये...’’
‘‘बरोबर.. पण कशी?’’
‘‘म्हणजे. पाणी भरून.’’
‘‘हो रे. आता उन्हाळा आहे. आपण बाटलीत थंड पाणी भरणार आहोत आणि हे पाणी जास्तीत जास्त वेळ थंड राहावं यासाठी एक आयडिया करणार आहोत. ती कुठली असेल?’’
आता सगळेच बोचक्‍यातल्या गोष्टींकडं पाहू लागले.
अन्वयनं बाबांकडं पाहिलं तर ते जुन्या वर्तमानपत्राकडं पाहत होते. त्याला इशारा समजला. अन्वय टुणकन उठला. त्यानं बाटलीत गार पाणी भरलं. बूच घट्ट बंद केलं. मग बाटलीच्या बाहेरून जुन्या वर्तमानपत्राचे चार कागद घट्ट गुंडाळले आणि त्यावर दोन रबरबॅंड लावले.
‘‘शाबास अन्वय. असा कागद गुंडाळल्यानं बाहेरचा उष्मा कागद रोखून ठेवतो आणि पाणी अधिक वेळ गार राहतं.’’
‘‘हे काय? या चष्म्याच्या घरात चष्माचं नाही? म...ते कशाला घ्यायचं?’’
‘‘सांगा बरं, का घ्यायचं असेल?’’
‘‘मी सांगते. माझ्या बाबांना अशी सवय आहे. प्रवासात जर एखादी डुलकी काढायची असेल किंवा रात्रीचा प्रवास असेल तर झोपताना चष्मा कुठं ठेवायचा? खिशात ठेवला तर मोडण्याची भीती असते. अशा वेळी हे घर कामाला येतं. हे घर सॅकमध्ये ठेवू या.’’
‘‘शाबास नेहा. रिकामं घर आणि उन्हाचा चष्मा एकाच खणात.’’
‘‘जे कुलूप चेनला लावायचं आहे, ते तिथंच लावून ठेवायचं आणि बॅगेचं कुलूप बॅगेला आणि किल्ल्या अडकवलेली की-चेन सॅकच्या वरच्या खणात. बरोबर...?’’
‘‘शाबास शंतनू, आता तुम्हाला नुसता क्रमच नव्हे, तर परस्परसंबंध लक्षात घेऊन काय करायचं, हेही समजू लागलं आहे.’’
‘‘छोटी वही आणि पेन खिशात.’’
‘‘बरोबर; पण पालवी त्यात लिहायचं काय ?’’

‘‘अं... सांगते. आपल्या तिकिटाचा पीएनआर नंबर. आपलं स्टेशन अंदाजे किती वाजता येईल आणि मुख्य म्हणजे कुठल्या स्टेशननंतर येईल, हे लिहायचं आणि मधल्या काही स्टेशनच्या वेळाही. त्यामुळं आपल्याला आपली गाडी वेळेत आहे की लेट आहे हे कळू शकेल.’’
‘‘पालवीच्या बोलण्यात मी आणखी भर घालते. डायरीच्या पहिल्या पानावर आपलं नाव, पत्ता आणि फोन नंबर. शेवटच्या पानावर महत्त्वाचे फोन नंबर्स आणि आपण जिथं जाणार आहोत तो पत्ता.’’
‘‘शाबास वेदांगी. तुम्ही तर सगळे आता एक्‍स्पर्ट झालात असं वाटतंय मला.’’
‘‘पण या कागदी पिशव्या कशाला?’’
‘‘मी सांगतो. प्रवासात कुठलीही गोष्ट खिडकीतून बाहेर फेकायची नाही किंवा रस्त्यावर टाकायची नाही. या आहेत कचरा-पिशव्या. सगळा कचरा या पिशव्यांमध्ये गोळा करायचा आणि मग त्या पिशव्या स्टेशनवरच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या. आपण आपला देश आपल्या घरासारखाच स्वच्छ ठेवला पाहिजे.’’
‘‘भले शाबास, अन्वय. तुमच्या टापटीपपणाबद्दल तर माझी आता खात्रीच झाली.’’
‘‘आणखी दोन गोष्टी राहिल्या..’’
‘‘आता कुठल्या?’’
‘‘एक जुना रद्दीपेपर घेतलाच पाहिजे. तो वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडू शकतो. खिडकी घट्ट करण्यासाठी पॅकिंग म्हणून. काही सांडलं तर पुसायला किंवा टिपायला. द्रोण करून सुका खाऊ खायला. खिडकीतून ऊन्ह येत असेल तर कव्हर करायला. जेवताना डबे ठेवायला. सीट पुसायला..’’

‘‘बास, बास, शंतनू बास. तुम ने तो कमाल कर दी. मला वाटतं, आता शेवटची गोष्ट राहिली आहे. ती म्हणजे सवडीनं वाचण्यासाठी पुस्तक.’’
‘‘अहो बाबा. सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्ही विसरलात हं,’’ असं पार्थनं म्हणताच सगळे ओरडले ः ‘‘कुठली.. कुठली वस्तू?’’
‘‘अहो बाबा, कपडे नकोत का घ्यायला ? की आपण तसंच जायचं आहे...? म्हणजे एकाच कपड्यावर?’’
ठॅ ठॅ ठो ठो हसण्याचा धमाकाच झाला.
मुलं म्हणाली ः ‘‘आता आमचे कपडे आम्ही आमच्या स्टाईलनं भरू.’’
शंतनू हात उंचावत म्हणाला ः ‘‘बॅगा भरण्याचा क्रम मला समजला; पण पोट भरण्याचा क्रमही लक्षात असू द्या...’’
स्वयंपाकघरातून आवाज आला, ‘‘आहे हो लक्षात.’’
पालवीची आई चटकदार भेळ आणि वाळ्याचं थंडगार सरबत घेऊन आली आणि शंतनूला म्हणाली ः ‘‘आता याचा क्रम तूच ठरव.’’
आईचं बोलणं पूर्ण होण्याआधीच एका हातात भेळ आणि दुसऱ्या हातात सरबताचा ग्लास घेत तो म्हणाला ः ‘‘या दोघांचा पहिला नंबर... कारण दोघंही आहेत सुंदर.’’

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   बॅग व्यवस्थित भरण्यासाठी शिस्तीची गरज असते. ही शिस्त तुमच्या क्रमवारीतून येते आणि ही क्रमवारी तुमच्या तर्कशुद्ध विचारसरणीवरच अवलंबून असते.
  •   वरील शिस्त फक्त बॅगेसाठीच लागू नाही. कुठलंही काम करताना जर कामांची क्रमवारी डोक्‍यात पक्की असेल, तर काम बिनचूक होतंच होतं. इतकंच नव्हे तर, कुठलंही दडपण न येता सहजी होते.
  •   हा खेळ दिसायला सोपा आहे. वाचल्यावर ‘हे काय आम्हाला माहीत नव्हतं का?’ ‘यात काय विशेष?’ असे ‘उच्च विचार’ मनात आले, तर आरशासमोर उभे राहा. आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला विचारा ः ‘‘कुठलंही काम सुरू करताना तू कामाची क्रमवारी विचारपूर्वक ठरवतेस/ठरवतोस का?’’ आणि ती व्यक्ती जे उत्तर देईल ते लक्षपूर्वक ऐका. तुमच्या सुधारणेला इथूनच सुरवात होणार आहे.
  •   प्रवासाला जाणं, घर आवरणं, खरेदीला जाणं, घरात एखादा पदार्थ तयार करणं किंवा सगळ्यांनी मिळून बाहेर जेवायला जाणं अशा कुठल्याही कामाची क्रमवारी मुलांच्या मदतीनं तयार करा.
  •   कामांची क्रमवारी मुलांसोबत बोलून ठरवताना तुम्ही जेव्हा नवीन शिकाल, तेव्हा त्याची खुलेआम कबुली द्या. मुलं तुमच्याकडं आदरानं पाहतील.
  •   ‘आपल्या मुलांसोबत क्रमाक्रमानं शिकत जाणं, हेच सुजाण पालकत्व’  ही चिनी म्हण म्हणूनच महत्त्वाची आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com