आकळावा श्रीपती येणे पंथे। (रामरावमहाराज ढोक)

आकळावा श्रीपती येणे पंथे। (रामरावमहाराज ढोक)

‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात लाखो वारकऱ्यांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेनं पडत आहेत. मंगळवारी (ता. चार जुलै) आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची भेट घडेल आणि हा चैतन्य सोहळा कळसाध्याय गाठेल. हा सोहळा, वारकऱ्यांच्या भावना, पंढरपूरचं महत्त्व, संतसाहित्यातून घडणारं परब्रह्म दर्शन आदी गोष्टींचा विविध अंगांनी वेध.

या  जन्मात आपल्याला हा नरदेह मिळाला. तोही भारत देशात मिळाला, हे आणखी भाग्य आहे. त्यातून तो महाराष्ट्रात मिळाला आणि साधू संताच्या अवतारानंतर मिळाला, हे महत्‌भाग्य म्हणावं लागेल.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक
विठ्ठलचि एक देखलिया


जगत हे न्यायालय आहे. ईश्वर हा न्यायाधीश आहे. संत वकील आहेत, तर जगतातील जीव आरोपी आहेत. जीवरूपी आरोपीना ईश्वररूपी न्यायाधीशापर्यंत पोचवण्यासाठी संतरूप वकील सोबत असावे लागतात. हे ‘वकील’ आळंदीतले संत ज्ञानेश्वर महाराज असतील, देहूचे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज असतील, किंवा राज्यातल्या अनेक तीर्थस्थळांमधले संतगण असतील. ही सर्व संतमंडळी ईश्वररूपी न्यायाधीशापर्यंत नेतील, यात शंका नाही. यालाच अनुसरून रामायणामध्ये एक प्रसंग सांगता येईल. चौदा वर्षं वनवासासाठी श्रीरामप्रभू निघतात, तेव्हा सारा समाज त्यांच्यासोबत जायला निघतो. मात्र, रामप्रभूंनी त्यांना आपल्याबरोबर येऊ दिलं नाही. श्रीरामप्रभू या वेळी भारद्धाज ऋषींच्या आश्रमात थांबले. भारद्वाज ऋषी यांनी आपल्या चार शिष्यांना त्यांच्यासोबत अरण्याचा रस्ता दाखवण्यासाठी पाठवलं. त्यानंतर श्रीरामप्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण तिघेच वनवासाला गेले. राम वनवासाला गेले, हे कळल्यानंतर भरत त्यांच्या भेटीसाठी निघाला, तेव्हा भरत समस्त समाजाला सोबत घेऊन निघाले. जंगलात भिल्लांनीही श्रीरामप्रभूंच्या भेटीसाठी बरोबर येण्याची विनंती भरताला केली. भरतानं त्यांनाही बरोबर घेतलं. याचा अर्थ भरत हे सत्‌युगातले संतच होते आणि श्रीरामप्रभू ईश्वर होते.
प्रभू का यथार्थ दर्शन करना है।
तो संतों के साथ जाना है।

किंवा
संतांचे संगती मनोमार्ग गती
आकळावा श्रीपती येणे पंथे

वारीमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक अशी तिन्ही प्रकारची सेवा घडत असते. पंढरपूरला पायी जाताना कायिक सेवा घडते. मुखानं ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असं नामस्मरण करताना वाचिक सेवा घडते, तर अखंड सावळ्या विठुरायाची वारी रूजू करण्याचा विचार मनात असणं ही मानसिक सेवा घडते. त्यामुळंच आषाढी वारी हे तीन प्रकारचं तपच मानलं जातं. वारकरी संप्रदायात वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कासयात्रा पाच, द्वारकेचे तीन
पंढरीशी जाय एक वेळा

काशीच्या पाच यात्रा आणि द्वारकेच्या तीन यात्रा या सर्व यात्रांचं पुण्य एका आषाढीच्या पायी वारीने मिळते, असे संतप्रमाण आहे. विठ्ठल हा योग्याला भावतो. ज्ञान्याला तो कळतो आणि भक्ताला आकळतो. एखादा मनुष्य रस्त्यानं जात असताना घरातून धूर येत असेल, तर त्याला कळतं- इथं धूर येतो म्हणजे इथं काहीतरी सुरू आहे. म्हणजे त्याला केवळ भावतं. दुसरा माणूस खिडकीतून पाहतो, तर त्याला तिथं स्वयंपाक सुरू असल्याचं कळतं. तिसरा माणूस पास घेऊन त्या घरात जातो, तो जेवणाचा आस्वाद घेतो, तेव्हा म्हणजे त्याला ते ‘आकळतं.’
भावबळे आकळे एरवी ना कळे।
करतळी आकळे तैसा हरी।।

संतांच्या सोबत भावरूप पास घेऊन गेलात, तर ईश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही.
संतचरणी माथा ठेविला सद्‌भाव
तेथे भेटे देव आपोआप

संतांच्या संगतीत भाव ठेवून विठ्ठलाकडं गेलात, तर तो भेटल्याशिवाय राहत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यातल्या संत मांदियाळीतल्या पालखी सोहळ्यासोबत चालत वारीत येतात. कायिक, वाचिक; तसंच आत्मिक सुखाचा आनंद घेतात. म्हणूनच संप्रदायातली सर्वोच्च साधना म्हणून पंढरीच्या वारीकडं पाहिलं जातं. इथं जाती-पातीच्या भिंती संपून जातात. नामस्मरणात विठुरायाच्या गावाला जायचं. काही मागणं मागायचं नाही. केवळ त्यांची वारी त्यांच्या चरणी रूजू करायची इतकाच भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो.

(शब्दांकन ः शंकर टेमघरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com