ध्येय निश्‍चिती

ध्येय निश्‍चिती

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारीच होणार, हे ध्येय निश्‍चित ठरवलेले असतानाही अनेकांच्या मनाची चलबिचल का होत असावी? यश काही पावलांवर आपली वाट पाहत उभे असतानाही अनेकजण स्पर्धा परीक्षेचा नादच का सोडून देत असावेत? सतत येणारे अपयश तरुणांच्या ध्येयाचा बुलंद बुरुज सहज नेस्तनाबूत का करीत असेल? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तरुणांच्या ध्येय निवडीच्या पद्धतीत, ध्येयाच्या स्पष्टतेच्या अभावात व ध्येय निश्‍चितीच्या प्रक्रियेत लपलेली असतात.

लहानपणापासून अनेक वेळा माणसाच्या कानावर पडलेला शब्द म्हणजे ध्येय निश्‍चिती. कदाचित ध्येयाची निवड हा असा एकमेव विषय असेल, ज्यावर आपल्या देशात सर्वाधिक प्रबोधन झाले असेल; पण तरीही तरुणांमध्ये या विषयाबाबत म्हणावे तितके गांभीर्य दिसत नाही. आपल्याकडे ध्येयाची निवड हा व्यक्तीचा व्यक्तिगत विषय नसून सार्वजनिक चिंतनाचा विषय असतो. व्यक्तीच्या ध्येय निश्‍चितीवर अनेक दृश्‍य व अदृश्‍य घटकांचा दांडगा प्रभाव असल्याचे दिसते. ध्येय निश्‍चिती ही व्यक्तीच्या आवडी-निवडी, क्षमता, कौशल्य, ज्ञानाचा आवाका पाहून केली जात नाही; तर अनेकजण ध्येयाची निवड ही पैसा, मान, प्रतिष्ठा व परीक्षेचे गुण पाहून करतात. स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णयही अनेकांनी असाच काही तासांत घेतलेला असतो. काही क्षणात घेतलेल्या निर्णयासाठी अनेक वर्षे घाम गाळून अभ्यास करण्याची वेळ येते. अपयश फिरून फिरून आपली ध्येयाची परीक्षा पाहायला लागते. तेव्हा बऱ्याच जणांच्या उसन्या संयमाचा बांध फुटतो. अनेक वर्षांची मेहनत वाया जाते. हे टाळण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांनी स्वतःच्या ध्येय निश्‍चितीच्या पद्धतीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

ध्येयाची स्पष्टता?
केवळ मला हे करायचे आहे, हे ठरवणे म्हणजे ध्येयाची स्पष्टता नव्हे, तर मला हे का करायचे आहे? किती वेळात करायचे आहे? व कुणासाठी करायचे आहे, याची सुस्पष्ट उत्तरे मिळवणे म्हणजे ध्येय स्पष्ट करणे होय. माणसाचे ध्येय हे नितळ निळ्या पाण्यासारखे स्पष्ट असावे. ध्येयाची जितकी स्पष्टता अधिक, तितके ते ध्येय गाठण्याची शक्‍यता बळावते. ध्येय निवडीची प्रक्रिया हे एका दिवसातील सोपस्कार नसतात. तर अनेक दिवस स्वतःच्या विचारांचा, सवयींचा, वर्तणुकीचा, आवडी-निवडीचा, क्षमतांचा कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता तटस्थपणे स्वतःच स्वतःचा अभ्यास करणे व योग्य निष्कर्षापर्यंत पोचणे या प्रक्रियेत अभिप्रेत असते. जेव्हा तटस्थपणे आपण स्वतःकडे पाहू शकत नाही, वैचारिक गोंधळ वाढतो, तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घेऊ शकता; पण दुसऱ्याने ठरवून दिलेले ध्येय हे आपले स्वतःचे ध्येय कधीच बनू शकत नाही. कारण अशा ध्येयात स्पष्टतेचा अभाव असतो. म्हणून नैराश्‍य आलेल्या प्रत्येकाने ध्येय निश्‍चितीचे शास्त्र समजावून घ्यायलाच हवे.

ध्येयासाठी हे करूयाच...

 अचूक ध्येय निश्‍चितीसाठी आपण स्वतःचे चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःच स्वतःला जाणून घेण्यास सुरुवात करू शकता. शांत बसून आपल्या आवडी-निवडी, बलस्थाने, दुर्बल स्थाने कागदावर लिहून काढा.
 आपले अनेक वर्षांचे स्वप्न हेच आपले ध्येय बनू शकते; पण त्यासाठी वास्तवाच्या दगडावर ते घासून त्यांचे अस्सलपण तपासता आले पाहिजे.
 अवास्तव अपेक्षा म्हणजे ध्येय असू नये. ज्या कामात खरोखरच आपल्याला आनंद मिळतो असे ध्येय निवडावे. कारण आनंद देणारे कामच आपली ओळख निर्माण करून देते.
 पैसा हे ध्येय निवडीचे साधन असू नये. कारण पैसा मिळणाऱ्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या सर्वांनाच पैसा मिळतोच असे नाही. कामावर जिवापाड प्रेम करणाऱ्यांनाच प्रचंड पैसा मिळतो हा इतिहास आहे.

 r.s.khaire@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com