जो मन जिंकेल, तोच रण जिंकेल

जो मन जिंकेल, तोच रण जिंकेल

मनाची चंचलता बऱ्याचदा माणसाच्या उत्तुंग ध्येयाला सुरुंग लावण्याचे काम करते. यश आवाक्‍यात आले असतानाही केवळ चंचल स्वभावामुळे अनेकजण स्पर्धेतून बाद होताना आपण पाहतो. मनाच्या सवयींची व अगाध सामर्थ्याची जाणीव योग्य वेळी झाल्यास कोणत्याही स्पर्धेत अस्तित्व निर्माण करता येते. स्पर्धा परीक्षेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात तर मनाचा निग्रह, एकाग्रता, मनोधैर्य याची नितांत गरज आहे. कारण मनाच्या अमर्याद क्षमतांची जाणीव होणे हेच यशाच्या दिशेने टाकलेले पाऊल होय.

कोणत्याही स्पर्धेत असणारी अनिश्‍चितता स्पर्धा करणाऱ्यांची मने सतत कुरतडत असते. अपयशाची भीती मनाच्या संयमी वृत्तीची अनेक वेळा परीक्षा पाहत असते. स्पर्धेत अपयश आले तर काय करायचे? हा यक्ष प्रश्‍न अनेकांना रात्रभर सुखाची झोप देत नाही. त्यामुळे स्पर्धा करणारा, स्पर्धा परीक्षा देणारा तरुण एकाच वेळी दोन विभिन्न पातळीवर लढताना आढळतो. बौद्धिक पातळीवरची लढाई निरंतन अभ्यासाची कास धरून जिंकता येइलही; पण स्पर्धेतील बेभरवशामुळे मनाच्या खोल गाभाऱ्यात चाललेल्या आंदोलनाचे काय, हाच आजच्या घडीला स्पर्धेत स्वतःचे भविष्य आजमावणाऱ्या तरुणांसमोरचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. मानसिक आंदोलने हाताळायचे कोणतेच शास्त्रशुद्ध कौशल्य विद्यार्थ्याकडे नसल्याने अनेकांचा होणारा कोंडमारा काळीज पिळवटून टाकतो आहे. कारण अत्यंत कमी जागांसाठी लाखो विद्यार्थी स्वतःला स्पर्धेच्या अग्निकुंडात झोकून देताना, तुम्ही पाहिले असतील. त्यातले काहीजण स्वतःच्या संपूर्ण क्षमतांचा वापर करून स्पर्धेत आपले आव्हान निर्माणही करतात. पण एवढे करूनही जर विजयाने हुलकावणी दिली, तर मात्र असे विद्यार्थी मनाने पार खचून जातात. ते इतके खचतात की, पुन्हा नव्याने आव्हानाची शुभ्र शिडे उभारण्याची मानसिकताच घालवून बसतात. स्पर्धेत पाय ठेवताना मनाच्या सामर्थ्याची पुरेशी ओळखच न झाल्याने बऱ्याच जणांची ही अवस्था होत असते. म्हणूनच स्पर्धेत येणाऱ्या तरुणांनो लक्षात ठेवा, स्पर्धा कोणतीही असो, जो मनात जिंकतो तो रणातही नक्की जिंकतो.

मन उधाण वाऱ्याचे  
मनाचा अल्लडपणा, चंचलता, अवखळपणा हा सर्वज्ञात आहे. पण मन लावून स्पर्धेत स्वतःचे भविष्य आजमावणाऱ्याने मात्र मनाच्या अगाध लीला ओळखण्याची क्षमता जाणीवपूर्वक विकसित केली पाहिजे. जेव्हा कधी आपण मोठ्या ध्येयाचा पाठलाग करीत असतो, तेव्हा मनाच्या खऱ्या प्रेरक शक्तीची आपल्याला नितांत गरज असते. योग्य वेळी मनात चाललेल्या सकारात्मक विचारांना ओळखणे, जाणीवपूर्वक सकारात्मक दृष्टिकोनाचा विकास करणे, नैराश्‍य, नकारात्मक भावना, वेळेचा अपव्यय करणारे छंद टाळून स्वतःला नेहमी स्पर्धेसाठी तयार ठेवण्याचे काम आपले सदृढ व सशक्त मनच करीत असते. म्हणूनच स्पर्धेत स्वतःला झोकून देताना आपले मानसिक आरोग्य नेहमी निरोगी व चांगले राहील, याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. मनात वेळोवेळी चाललेली आंदोलने तटस्थपणे अनुभवणे, योग्य वेळी मनाला स्वयंसूचना देणे, सतत मनाच्या पूर्ण क्षमतांचा वापर करण्याची क्षमता बाळगणे म्हणजेच मनावर विजय मिळवणे होय. 

मन करा रे प्रसन्न
- प्रत्येकाने स्वतःच्या शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकल्प करावा.
 - मनात वारंवार चाललेले विचार वहीवर लिहून काढायची सवय लावून घ्यावी. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या मनात डोकावण्याची संधी मिळते.
- विचार लिहिताना मन कोणत्याही एका भावनेच्या आहारी जाणार नाही, याची काळजी घ्या. तटस्थ राहून मनाचा अभ्यास केल्यास आपल्याल्या मनाची विचार करण्याची पद्धती, मनाच्या सवयी यांचा साक्षात्कार होईल.
- आपले ध्येय नेहमी मनाला पटवून सांगण्यासाठी आपण स्वतःला स्वयंसूचना देऊ शकता. एकदा मनाने ध्येयाला मनापासून स्वीकारले की, नक्कीच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकता.
- मनाचा निग्रह, एकाग्रता, मनोधैर्य एका दिवसात वाढत नाही, त्यासाठी अनेक दिवस मनाशी संवाद साधावा लागतो.
- मानवी मन हे चंचल आहेच; पण जो या चंचलतेला आवर घालून मनाला आपल्या ध्येयामागे खेचून आणण्यात यशस्वी होतो, तोच वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होतो.
- चला तर मग मनापासून मनाला जिंकण्याच्या कलेत पारंगत होऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com