सखी ! (रेश्‍मा दास)

रेश्‍मा दास
रविवार, 27 मे 2018

एके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकत असलेलं हिला दिसलं...

आयुष्यात साथ खूप महत्त्वाची असते; मग वेळ, प्रसंग, परिस्थिती कोणतीही अन्‌ कसलीही असो. समोर येणाऱ्या संकटांचा सामना करायचा असेल तर कणखर व्हावं लागतं आणि अशा वेळी भरभक्कम साथ मिळाली तर संकटांची वाटही सहजपण पार करता येते.

एके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकत असलेलं हिला दिसलं...

आयुष्यात साथ खूप महत्त्वाची असते; मग वेळ, प्रसंग, परिस्थिती कोणतीही अन्‌ कसलीही असो. समोर येणाऱ्या संकटांचा सामना करायचा असेल तर कणखर व्हावं लागतं आणि अशा वेळी भरभक्कम साथ मिळाली तर संकटांची वाटही सहजपण पार करता येते.

हिलाही अशीच साथ मिळाली....एका बाभळीच्या झाडाची! ती हिची जणू बाभळसखीच!
हिच्या या जगावेगळ्या सोबतीविषयी ऐकून तिला "वेडी' समजून हसतही असत काहीजण. मात्र, जवळ असूनही जवळ नसणाऱ्या चालत्या-फिरत्या "निर्जीव' माणसांपेक्षा न बोलता बरंच काही बोलणाऱ्या "सजीव' बाभळीचीच साथ हिला लाख मोलाची वाटते.

हिच्या घरापासून हिचा क्‍लास दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. ही रोज पायीच जाते. जाताना-येताना ओळखीची बरीच माणसं भेटतात. आधीच हिचा स्वभाव बोलका असल्यानं आजी-माजी विद्यार्थी, त्यांचे पालक, मिटिंग्ज्‌, मेळावे, बचतगट, सामाजिक योजना यांमुळे सर्वत्र हिच्या ओळखी वाढल्यानं "नमस्कार', "हाय-हॅलो' करत 10 मिनिटांच्या प्रवासाला हिला 20-25 मिनिटं लागायची. ती झुडुपवजा बाभळ रस्त्याच्या कडेला हिला रोज पाहायची. सतत हसतमुख असणाऱ्या, ओळखीच्यांशी आवर्जून बोलणाऱ्या हिच्याविषयी त्या बाभळीला कुतूहल वाटायचं. सकाळी सकाळी घाईगर्दीच्या वेळी हिला लगबगीनं जातानाही ती बाभळ हिला न्याहाळायची आणि दिवसभराचं काम करूनही संध्याकाळी फ्रेश चेहऱ्यानं ही घरी जात असतानाही ती बाभळ हिला निरखायची...
कधी विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागल्यानं...कधी बेस्ट परफॉर्मर म्हणून सत्कार झाल्यानं...कधी आणखी कुठल्या कारणानं ही खूश होऊन घरी जाताना हिचे आनंदाने चमकणारे डोळे वाचायची ती बाभळ...!
रविवारच्या एका दिवसाच्या विरहानंतर सोमवारी सकाळी पुन्हा भेट व्हायची दोघींची... त्या वेळी हिला बाभळसखी थोडीशी हिरमुसल्यासारखी वाटायची...पण बारकाईनं पाहिलं तर हिला दिसायचं तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलेलं...
हिची बाभळीला आणि बाभळीची हिला सवय झाली होती.
न बोलताच त्या एकमेकींशी खूप काही बोलायच्या.
खूप दिवसांनंतर हिनं घातलेला नवीन ड्रेस पाहून हिच्याइतकाच आनंद बाभळीलाही व्हायचा. हिनं तिच्या नवऱ्यासाठी गाडी आणि लॅपटॉपचं गिफ्ट दिलं अन्‌ त्या दोघांना त्या गाडीवरून जाताना पाहून त्यांच्यापेक्षा त्या बाभळीलाच हिचं जास्त कौतुक वाटायचं!
हिच्या करिअरच्या वर चढत जाणाऱ्या पायऱ्या पाहून बाभळीलाही हर्ष व्हायचा. ही आपल्या मुलीचा हात हातात गुंफून जात असताना कोवळ्या काट्यांतून बोबड्या गोष्टी बाभळही पुटपुटायची.
हिच्या हसण्यात ती हसायची...
हिच्या रडण्यात ती रडायची...
एकंदरीतच काय तर...
हिच्या असण्यात ती असायची...

परिस्थिती बदलते आणि माणसांवर चांगला-वाईट परिणाम करून जाते. हीसुद्धा त्याला अपवाद नव्हती. कमी वयात खूप जबाबदाऱ्या आणि त्याहीपेक्षा चांगले-वाईट अनुभव - चांगले कमी अन्‌ वाईटच जास्त - हिच्या वाट्याला आले होते. हिच्या यजमानांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळं, अपत्यांच्या मृत्यूनं, सासू-सासऱ्यांच्या निधनामुळं आणि उरल्यासुरल्या आपल्या सख्ख्यांनी हिची सोबत सोडल्यानं ही खचून गेली होती.

जवळ होता फक्त आत्मविश्‍वास आणि त्या काटेरी बाभळीसखीची साथ!
धडाधड कोसळलेल्या आघातांमधून बाहेर पडताना हिला बाभळसखीची पावलोपावली साथ लाभत होती. ती हिला सांगायची ः "खचू नकोस. पुन्हा नवे दिवस येणार आहेत...' बाभळीची सगळी पानं गळून पडली तरी ती उभी असायची. "पालवी पुन्हा फुटणार आहे,' असं आशेनं सांगायची. "कपडे काट्यांमध्ये अडकून फाटतात' असं दुनिया म्हणते. मात्र, हिनं तिच्या वाईट परिस्थितीत फाटलेली सलवार दुमडून वापरलेली त्या बाभळसखीच्या टोकदार काट्यांच्या टोकदार नजरेतून सुटलेलं नव्हतं!
आती ही पूर्वीसारखं कुणाशी बोलत नव्हती. ओळखीच्यांशी उसन्या अवसानानंच थोडंसं हसून ओळख द्यायची, एवढंच. नैराश्‍य, नकारात्मकता, नसलेल्यांसाठी रडताना आणि असलेल्या आपल्यांसाठी जगण्याची, त्यांना जगवण्याची हिची धडपड पाहून बाभळसखी हिला जवळ घेऊन म्हणायची ः
"बघ! मी उघडी-बोडकी झाले तरी माझी मुळं भक्कम आहेत. तग धरून आहेत. तुझ्याकडं बघून मी जगण्याची धडपड करते आहे...' आणि बाभळीच्या या आपुलकीच्या दिलाशानं हिला अवसान यायचं.
बाभळ उघडी-बोडकी, काट्याकुट्यांनी वेढलेली असली तरी हिनं आशा सोडलेली नव्हती. बाभळीची भक्कम मुळं आणि हिचा बळकट आत्मविश्‍वास हा दोघींमधला समान दुवा होता.
एके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकताना हिला दिसलं. पाहते तर ते मंगळसूत्र होतं. हिनं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरपर्यंत पाहिलं. कुणी शोधताना दिसेल म्हणून...असेल कुणी तर जाऊन देऊन येऊ या, असा विचार करून हिनं ते वाकून हातात घेतलं. दूरपर्यंत कुणीच नव्हतं. रोज गजबजलेला रस्ता आज निर्जन होता. दहा मिनिटं ही थांबली. मग मागं-पुढं पाहत, कुणी शोधताना दिसत आहे का ते पाहत पाहत ही क्‍लासपर्यंत पोचली.
त्या दिवशी शिकवण्याकडं हिचं लक्ष लागेना. क्‍लास संपला. नेहमीप्रमाणे रात्री उशिरा परतत असताना पुन्हा पावलं त्याच ठिकाणी बाभळीजवळ थबकली. रात्रीचे साडेदहा वाजले होते. रस्त्यावरून एखाद्‌दुसरी गाडी जाताना दिसत होती. बाभळीकडं हिनं पाहिलं. त्या चांदण्यातही काट्यांमधली काळीकुट्ट बाभळ कुठं कुठं पालवायला लागलेली तिला दिसली. बाभळीला आलेले हिरवे उभारे पाहून हिचं मन सुखावलं; पण हातातल्या दुसऱ्याच्या किमती वस्तूनं हिची पुन्हा चलबिचल झाली. मागून बाभळ हळूच हिच्या कानात म्हणाली ः "मघाशी जाताना दिवेलागणीच्या वेळी तुझ्या डोळ्यांत पाणी होतं. पाहिलंय मी. नको करूस यजमानांच्या प्रकृतीची चिंता. आज तुला सौभाग्याचं लेणं सापडलंय आणि ते जिचं आहे तिला ते परत देण्याचा प्रामाणिक हेतू तुझ्या मनात आहे. हाच प्रामाणिकपणा तुझे काळजीभरले डोळे पुसेल. आज मला पालवी फुटतेय. नव्यानं बहरावंसं वाटतंय. तुलाही असाच आनंदाचा बहर येईल एकदा. काळजी करू नकोस...'

दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला जाताना त्याच रस्त्यावर एक बाई काहीतरी शोधत असताना हिला दिसली. "काय शोधताय?' विचारल्यावर त्या बाईनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. नंतर हिच्या लक्षात आलं, की त्या बाईला मराठी कळत नव्हतं. तिनं हावभाव करून गळ्यातल्या मंगळसूत्राकडं बोट दाखवून खाणाखुणा करून सांगितलं. हिनंही ती चीजवस्तू आपल्याकडं असल्याचं त्या बाईला हावभावांनीच सांगितलं व त्या बाईला क्‍लासची जागा दाखवून तिथं 10 वाजता यायला सांगितलं.

बरोबर 10 वाजता आणखी एका बाईला घेऊन ती बाई हिच्या क्‍लासमध्ये आली. छोटं बाळ कडेवर होतं आणि मोठ्या आशेनं ती बाई हिच्याकडं पाहत होती. सोबतच्या बाईनं हिंदीत सांगितलं ः ""ही बाई काल संध्याकाळी रस्त्यानं जात असताना कडेवरच्या बाळानं मंगळसूत्र ओढल्यानं ते तुटलं. अर्धं गळ्यात राहिलं नि अर्धं खाली पडलं.'' त्या बाईनं ते उरलेले मणी मुठीतून हिच्या टेबलवर ठेवले. ते तिच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत होते. सापडलेलं अर्धं मंगळसूत्र हिनंही पर्समधून काढून समोर ठेवलं. त्या बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही. तिचं सौभाग्यलेणं तिला परत मिळणार होतं. त्या बाईच्या सोबत आलेली दुसरी बाई म्हणाली ः ""मजुरी करून पोट भरतात दोघं. मंगळसूत्र हरवल्यामुळं हिच्या नवऱ्यानं रात्री हिला खूप मारलं.'' हे ऐकून हिला खूप वाईट वाटलं. मंगळसूत्र परत करून हिनं त्या बाईचा निरोप घेतला. ही पुन्हा क्‍लासमध्ये गुंग झाली. रात्री शेवटची बॅच संपवून साडेदहा वाजता घरी परत जाताना बाभळसखी मनोमन हसताना दिसली आणि हिलाही समाधान वाटलं.

कालांतरानं हिची परिस्थिती सुधारली. तिकडं बाभळीचीही पालवी चिमुकल्या काट्यांसोबत डोलायला लागली होती. यथावकाश हिचं सगळं चांगलं झालं. कष्टाला फळ आलं...नवीन घर बांधून झालं... यजमानांची प्रकृतीही सुधारली...
बाभळीला पिवळ्यागर्द गोंडस फुलांचा भरगच्च बहर आला. चांगल्याचं आणखी चांगलं होत गेलं.
एके दिवशी जाताना बाभळसखीजवळ ही जरा थांबली. तिच्या काट्यांनी वेढलेल्या फांदीवरून हिनं आपुलकीनं हात फिरवला. हिला काटे टोचले नाहीत. कारण, जगण्यातल्या अशाच काट्यांनी हिला कणखरपणा शिकवला होता.
संध्याकाळी येताना हिनं पाहिलं तर...नव्या इमारतीसाठी झाडं तोडली जात होती...त्यांत हिची "बाभळसखी'ही होती. तिच्या अस्तित्वाच्या खुणाही काही तासांतच नष्ट होऊन गेल्या होत्या. ही घरी येऊन खूप खूप रडली.

खरंच, बाभळ हिच्याशी बोलायची की ही स्वतःच स्वतःशी बोलत असायची??
काहीही असो...आज बाभळ नसली तरी तिचं अस्तित्व हिला जाणवतं. पडत्या काळातलं तिनं दिलेलं ओलाव्याचं प्रेम जाणवतं, मैत्री जाणवते. ती कणखर "बाभळसखी' आता त्या रस्त्यावर नसली तरी ती असते हिच्या जगण्यात
हिच्या रडण्यात
हिच्या हसण्यात
हिच्या असण्यात...!

Web Title: reshma das write article in saptarang