महानुभाव आणि वारकरी

महानुभाव आणि वारकरी

वारकरी आणि महानुभाव यांच्यात आंतरक्रिया कशी होऊ शकते हे पाहायचं असेल, तर त्यासाठी बाभुळगावकर शास्त्री यांच्यासारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. शास्त्रीबाबांनी विपुल ग्रंथसंपदा निर्मिली आहे. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या विषारी वातावरणात सांप्रदायिक सद्‌भाव निर्माण व्हावा, यासाठी शास्त्रीबाबांसारख्या संत-महंतांची आज समाजाला गरज आहे. शास्त्रीबाबांकडं मी विशिष्ट संप्रदायाचा म्हणून पाहत नाही. संप्रदायाच्या मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीकच वाटतात.
 

महाराष्ट्राच्या इतिहासात ‘महानुभाव’ नावाचं एक अद्‌भुत पर्व आहे; पण ते अनेकांना आणि विशेष म्हणजे अजूनही पुरेसं ज्ञात नाही. विशिष्ट वेशामुळं महानुभाव संप्रदायाचे भिक्षू ओळखू येतात हे खरं असलं तरी गृहस्थाश्रमी महानुभाव ओळखता येत नाहीत आणि भिक्षूंची ओळखही ‘हे एका विशिष्ट पंथाचे आहेत,’ एवढ्यापुरतीच मर्यादित असते. त्यांच्या आचारविचार- धोरणांविषयी फारच थोडी माहिती असते आणि जी असते तीसुद्धा बऱ्याच प्रमाणावर गैरसमजांवर आधारित असते. 

ही परिस्थिती निर्माण होण्यात काही वाटा स्वत: सांप्रदायिकांचाही आहे, हे नाकारण्यात काही मतलब नाही. महानुभावांनी या प्रकारची गुप्तता आणि गूढता का स्वीकारली याचीही चर्चा अभ्यासक करत असतात. त्याचं एक कारण म्हणजे पंथाचे ईश्‍वरी अवतार श्रीचक्रधर यांना तत्कालीन धर्मसत्तेनं व राजसत्तेनं दिलेली क्रौर्याची व अन्यायाची वागणूक. दुसरं कारण पंथाच्या म्हणून सांगण्यात आलेल्या एका विशिष्ट धारणेत सापडतं. स्वत: चक्रधरांनीच आपला उद्देश हा ‘गौप्य’ आहे, त्याची ‘हाटचौहारी’ वाच्यता करू नये, अशा सूचना केल्याचं दिसून येतं. उत्तरकालीन महानुभावांनी स्वामींचा हा आदेश शब्दश: घेतला व आपल्या पंथाचे विचार फक्त अधिकृत दीक्षितांनाच समजावेत, असा कायमस्वरूपी बंदोबस्त करून ठेवला. त्यांनी अनेक सांकेतिक लिप्या तयार केल्या व आपल्या पोथ्या त्यात बंदिस्त करून टाकल्या. या प्रकारामुळं पंथाचे विचार अधिकृत स्वरूपात राहिले असतील; परंतु त्यांच्या प्रसारावर मर्यादा पडली. 

दुसरं असं, की या पंथात बौद्ध, जैन या धर्मांप्रमाणे अनुयायांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गृहस्थाश्रमात राहून संसार- प्रपंच करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा आणि दुसरा म्हणजे संन्यस्त जीवन जगत ईश्‍वरचिंतन आणि उपदेश करणाऱ्यांचा म्हणजेच संन्याशांचा. बौद्ध-जैनांचे शब्द वापरायचे झाल्यास ‘श्रावक’ आणि ‘श्रमण’ असा हा भेद आहे. पंथातल्या गुप्त सांकेतिक लिप्यांचं ज्ञान पंथाबाहेरच्या लोकांना होणं तर अशक्‍यच; परंतु पंथातल्या गृहस्थधर्म पाळत साधना करणाऱ्यांनाही होणं कठीण. या परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना त्यासाठी महंतांवरच अवलंबून राहावं लागणार, हेही उघड आहे. 

याच दरम्यान म्हणजे तेराव्या शतकात पुढं आलेल्या वारकरी पंथाची भूमिका मात्र त्याच्या अगदी विरुद्ध दिसून येते. वारकऱ्यांमध्ये श्रावक- श्रमण असा भेद नसून, तो गृहस्थाश्रमी लोकांचा पंथ आहे. दुसरं असं, की वारकऱ्यांमध्ये गुप्ततेला अजिबात थारा नाही. त्यांचा सर्व काही उघड मामला. 

आणखी एक महत्त्वाचा भेद आहे. महानुभावांचे उपदेशाचे माध्यम म्हणजे गद्य प्रवचन. याउलट वारकऱ्यांचा जोर चाली लावून म्हणण्यावर, नाचण्यावर.

दोन पंथांमधल्या अशा भेदांमुळं महानुभाव पंथापेक्षा वारकरी पंथाचा प्रसार अधिक झाला असल्यास त्यात आश्‍चर्य काहीच नाही; पण तरीही आपल्या पंथाचं हेच खरं स्वरूप आहे आणि त्यातच त्याच्या श्रेष्ठत्वाचं वर्म आहे, असंच पंथीयांना वाटत असणार. या वाटण्याचा एक परिणाम म्हणजे, पंथाच्या स्पर्धकांना व विरोधकांना पंथाविषयी व पंथातल्या सत्पुरुषांविषयी गैरसमज पसरवणं शक्‍य झालं. 

गुप्ततेमुळं होणाऱ्या हानीची पंथाच्या आचार्यांना कल्पना येण्यासाठी विसाव्या शतकाची वाट पाहावी लागली. या काळात विशेषत: खानदेशात वारकरी व महानुभाव यांच्यात मोठा संघर्ष झाला. पंथाची बदनामी केली म्हणून महानुभावांनी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू  विष्णुबुवा जोग महाराज यांच्यावर खटला भरला. खटल्यातून जोग महाराजांची मुक्तता तर झालीच; पण गैरसमजांचं सावट काही संपलं नाही. याप्रसंगी महानुभाव महंतांनी लोकमान्य टिळक, डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याकडं आपली कैफियत मांडली. या दोन विद्वानांनीही पंथाला सहानुभूतीनं समजावून घेतलं व तो हिंदू धर्माचाच एक कृष्णभक्तिसंप्रदाय असल्याचा निर्वाळा दिला. या प्रकरणातून आपण खरे कोण आहोत याची जाणीव एकूण समाजालाच असण्याची गरज महंत मंडळींना समजली व निदान तेवढ्यापुरता का होईना, आपल्या ग्रंथातला आशय लोकांपर्यंत न्यायला हरकत नाही, याचीही खात्री पटली. 

याच दरम्यान आणखीही एक घटना घडली. महाराष्ट्राच्या इतिहासाचे व मराठी भाषेचे विद्वान अभ्यासक, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महानुभावांच्या सांकेतिक लिप्यांचा उलगडा करण्यात यश मिळवलं. त्यामुळं इथून पुढं हे ग्रंथ गुप्त ठेवण्यात काही हशील नाही, हेसुद्धा महानुभाव पंडित समजून चुकले. राजवाड्यांचेच शिष्य गणले जाणारे वि. ल. भावे यांच्याकडं हे पंडित आपल्या पोथ्या घेऊन जाऊ लागले. महानुभावांची ग्रंथसंपत्ती जगासमोर येण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली. प्राचीन मराठी भाषा आणि साहित्य यांच्या थोरपणाचा प्रत्ययही त्यामुळं आला. मराठीच्या इतिहासाच्या अभ्यासक- संशोधक- प्राध्यापकांचं लक्ष तिकडं वळलं. त्यातूनच देशपांडे, नेने, भवाळकर, कोलते, डोळके असे पंथेतर विद्वान पुढं आले. हे एक नवंच दालन होतं. ‘लीळाचरित्र’, ‘स्मृतिस्थळ’ असे चरित्रग्रंथ, ‘रुक्‍मिणीस्वयंवर’, ‘शिशुपालवध’ असे काव्यग्रंथ, सूत्रपाठ व त्यावरची विविध विद्वत्तापूर्ण भाष्यं यांचा परिचय महाराष्ट्राला झाला; परंतु अजूनही ज्यांना अधिकृतपणे पंथीय म्हणता येईल असे आचार्य, महंत पुढं येऊन संशोधक- अभ्यासकांमध्ये मान्य असलेल्या चौकटीत बोलायला तयार नव्हते. त्यांचा ‘लक्ष्य-श्रोता’ पंथीय अनुयायी हाच राहिला. 

माझ्या समजुतीनं ही कोंडी डॉ. पुरुषोत्तम नागपुरे यांनी फोडली. तरुण वयात नरभक्षक वाघाची शिकार करणारे नागपुरे हे नंतर रीतसर दीक्षा घेऊन संन्यास ग्रहण करतील, असं कुणाला वाटलं नसतं; पण हे घडलं खरं. 

नागपुरे यांनी विद्यापीठीय विद्वानांशी संबंध ठेवून (उदाहरणार्थ : डॉ. व. दि. कुलकर्णी) ग्रंथनिर्मिती केली, ‘अज्ञात लीला’ प्रसिद्ध केल्या व शेवटी संपूर्ण ‘लीळाचरित्र’ही संपादित केलं. चक्रधरचरित आधुनिक पद्धतीनं व दृष्टिकोनातून लिहिलं.  

विशेष म्हणजे कादंबरीसारख्या माध्यमाचा अवलंब करण्यातही नागपुरे यांना काही वावगं वाटलं नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचा पहिल्यांदा प्रतिकार करणारा वैदर्भीय राजा राम दरणा याचं नाव महानुभाव साहित्यात येतं; पण त्याची पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. नागपुरे यांनी ती मिळवून तिच्यावर आधारित कादंबरी लिहिली. संन्याशाच्या वेशातला माणूस कादंबरी वगैरे लिहितो, ही गोष्ट पंथीयांना कितपत रुचली असणार, ही शंकाच आहे. तथापि, नागपुरे ते करू शकतात. 

वारकरी आणि महानुभाव यांच्यातल्या संघर्षाच्या संदर्भात नागपुरे यांनी लिहिलेल्या ‘महानुभाव : एक आव्हान’ या पुस्तकाचाही इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. वस्तुत: महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांमध्ये जशी भेदस्थळं आहेत, तशी साम्यस्थळंही आहेत. कृष्ण हे दोघांचंही उपास्यदैवत, त्यामुळं गीता आणि भागवत हे ग्रंथ दोघांनाही प्रमाण आहेत. 

दोन्ही पंथ मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे. अहिंसेच्या तत्त्वावर विश्‍वास असल्यामुळं हे दोन्ही पंथ शुद्ध शाकाहाराचा पुरस्कार करतात.

अर्थात, दैवतांचा विचार केला, तर वारकरी कृष्णाला विष्णूचा अवतार मानतात. हाच कृष्ण पुंडलिकासाठी द्वारकेहून पंढरीत आला व पुंडलिकाच्याच सांगण्यावरून विठ्ठलरूपानं विटेवर उभा राहिला, अशी त्यांची श्रद्धा आहे. तेराव्या शतकातल्या महाराष्ट्रात हीच श्रद्धा प्रचलित होती, असे शिलालेखीय लिखित पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना महानुभाव साहित्यातूनही दुजोरा मिळतो; परंतु महानुभाव हे विष्णूलाच ईश्‍वर न मानता अनेक दैवतांपैकी एक देवता मानतात, तसंच कृष्णाचा विठ्ठलाशी काही संबंध नाही, अशीही त्यांची धारणा आहे. याउलट वारकरी हे महानुभाव ज्यांना ईश्‍वरी अवतार समजतात, त्या चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर यांना ईश्‍वर समजत नाहीत. 

मात्र, अशा प्रकारचे भेद वारकऱ्यांचे वा महानुभावांचे इतर अनेक पंथांशी असणार हे उघड आहे. याचाच अर्थ असा होतो, की उपरोक्त भेदांचे अवाजवी भांडवल करून एकमेकांशी भांडत बसण्याऐवजी, एकमेकांना कोर्टात खेचण्याऐवजी साम्यस्थळांकडं लक्ष दिलं, तर त्यातून महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा फायदाच होईल. अनेक ठिकाणी वारकरी आणि महानुभाव (अर्थात एकाच जातीतले) यांच्यात सोयरसंबंधही होत असल्याचं आढळून येतं (खुद्द नागपुरे यांची सासुरवाडी वारकरी पंथाची आहे. भालचंद्र नेमाडे यांचं घराणं वारकरी असलं, तरी मातुल कुळाकडून त्यांना महानुभाव पंथाची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे), त्यामुळं आपल्या पंथाचा अभिमान बाळगताना दुसऱ्या पंथाची निंदा-नालस्ती करायलाच हवी, असं नाही. 

या संदर्भात महंत नागराजबाबा यांचं नाव घ्यायलाच हवं. बाबांनी महानुभावीयांशी खूप चांगले संबंध ठेवले. त्यांच्यामुळं प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांच्यासारखे वारकरी हे महानुभाव- संशोधक झाले. वारकरी आणि महानुभाव यांच्यात आंतरक्रिया कशी होऊ शकते हे पाहायचं असेल, तर त्यासाठी बाभुळगावकर शास्त्री यांच्यासारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. शास्त्रींनी विपुल ग्रंथसंपदा निर्मिली आहे. कादंबरीसारखा फॉर्म हाताळून त्यांनी पंथाचं तत्त्वज्ञान विशद केलं. ‘झांजर’ हे त्यांच्या कादंबरीचं नाव. महानुभाव संन्यासी आणि महानुभाव गृहस्थ यांच्या आचार-विचारांना कवेत घेणारी ही कादंबरी आहे. ‘संन्यास हा संसाराचा पर्याय नसून संसाराचा विस्तार आहे.

पहिल्यातून दुसऱ्याकडं जाण्याची प्रक्रिया स्वाभाविक व सुखद असायला हवी... पारमार्थिकांनी संसाराचा व सांसारिकांचा उपहास करायची, त्यांना तुच्छ मानायची गरज नाही... संसार हा परमार्थाचा पाया आहे,’ असे बंडखोर विचार ते व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यांना आत्मपरीक्षण व आत्मटीका यांचं अजिबात वावडं नाही. माझ्या मते सर्वच संप्रदायांच्या अनुयायांनी त्यांचं साहित्य वाचावं म्हणजे परद्वेष न करतासुद्धा स्वाभिमान टिकवता येतो, हे त्यांच्या लक्षात येईल.

शास्त्रीजींचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे ‘मार्गस्थ’ हे दोन भागांतलं आत्मचरित्र. या आत्मचरित्रामुळं महानुभाव पंथाचं इतकं स्पष्ट दर्शन पहिल्यांदाच मराठी वाचकांना होत आहे. ‘हजारो पृष्ठांची साहित्यनिर्मिती करणारा हा संप्रदाय स्वत:विषयी मौन बाळगून राहिल्यानं त्याच्या विरोधकांचं फावलं व त्याच्याविषयी चुकीच्या समजुती विरोधकांनी रूढ केल्या,’ ही बाभुळगावकरांची खंत आहे. हे मौन तोडणारे ते पहिलेच महानुभाव होत. तुकोबांच्या एका अभंगावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्फुरलेला शब्द वापरून सांगायचं झाल्यास ते महानुभावांचे ‘मूकनायक’ आहेत. महानुभावांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध काय, असं एखाद्याला वाटेल. तर सांगतो, बाबांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी वारकरी संप्रदायाची आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू भानुदासमहाराज हे नाणावलेले कीर्तनकार असून, त्यांनी कीर्तन- प्रवचनाचं रीतसर शिक्षण आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत घेतलं. आपणही तसं करावं, असं एकेकाळी यांनाही वाटत होतं; पण परिस्थिती आणि मुख्य म्हणजे निरक्षरता आड आली. त्यांना अक्षरओळख झाली तीच मुळी महानुभाव पंथात आल्यानंतर!

बाबांनी परंपरेचा आदर राखला; पण परंपरेला शरण जायचं नाकारलं. पारंपरिक पोथ्यांची घोकंपट्टी करून तिच्या आधारे पांडित्यप्रदर्शन करण्याऐवजी सर्वसामान्य लोकांच्या भाषेत त्यांच्या अनुभवाच्या आधारे निरूपण करण्याची; इतकंच नव्हे, तर त्यासाठी वेगळ्याच माध्यमाचीही हाताळणी करण्याची आवश्‍यकता त्यांच्या ध्यानी आली. एकाच काळात निर्माण झालेल्या महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांच्या विस्तारात व लोकप्रियतेत एवढा फरक का असावा, याचा त्यांनी गंभीरपणे विचार केला. वारकरी सांप्रदायिकांच्या निरूपणामधला साधेपणा लोकांना भावतो. महानुभाव पंथप्रवर्तक चक्रधरांच्या निरूपणात तसाच सरळपणा आहे, स्पष्टता आहे; पण त्यांच्या नंतरच्या काळात तो पारिभाषिक जंजाळात अडकला, त्यामुळं हा पंथ विचारांत दुर्बोध आणि आचरणातही अवघड झाला. ही कोंडी बाबांनी फोडली. त्यासाठी त्यांनी चक्क वारकऱ्यांच्या कीर्तनपद्धतीचा अवलंब केला. त्याही पुढं जाऊन ते आपल्या कीर्तनातून वारकरी पंथाचे, ज्ञानोबा- तुकोबांचे अभंग- ओव्या गाऊ लागले. महानुभाव पंथाच्या दृष्टीनं पाहिलं तर या प्रकाराला क्रांतीच नव्हे; तर बंडखोरीच म्हणावी लागते. त्यासाठी बाबांना बाह्य आणि आंतरिक संघर्ष करावा लागला. त्याची कहाणी ‘मार्गस्थ’ या आत्मचरित्रात ते सांगतात.

यापुढचं पाऊल म्हणजे बाबांनी महानुभावपंथीयांना कीर्तन शिकवण्यासाठी चक्क एक विद्यालयसुद्धा चालवलं. त्यांचा या वाटेवरचा प्रवास फारच रोचक आहे. ‘‘निवडक अभंगांच्या चाली वारकऱ्यांच्या मदतीनं आम्ही आत्मसात करत होतो. अभंग म्हणजे लहान जागेत बनवलेली सुंदर इमारत. अभंगरचनेत सूत्रबद्धता आहे, आशयाची खोली आहे, अभंगाचं प्रत्येक चरण रसात्मक आहे. काव्य व तत्त्वज्ञानाचा संगम म्हणजे अभंग. अभंग म्हणजे सूत्रावरचं भाष्य. अशा सुंदर अभंगाला वारकरी संप्रदाय नवीन चालीचा पेहराव चढवतात, तेव्हा जुनाच अभंग नवं रूप घेऊन आपल्या समोर उभा राहतो,’’ हे अभंगाचं मूल्यमापन करणारा माणूस वारकरी नसून महानुभाव आहे, हा सुखद धक्का आहे. 

शास्त्रीबाबांचा प्रवास सोपा नव्हताच. स्वत: चक्रधरांची ‘गीतु विखो’ ही सूत्रोक्ती त्यांच्या आड येऊ शकत होती; पण त्यांनी त्या सूत्राच्या अर्थाचीही वेगळी व्यवस्था लावली. त्यासाठी लागणारी प्रतिभा व धैर्य अर्थातच त्यांच्याकडं आहे. ‘प्रचाराची धुरा महानुभावांनी (म्हणजे संन्यासदीक्षा घेतलेल्यांनी) वासनिकांकडंच (म्हणजे गृहस्थाश्रमातल्या लोकांकडं) सोपवायला पाहिजे होती व त्यांनी पोथी व आपल्या साधनेतच लक्ष द्यायला हवं होतं,’ हे त्यांचे विचार महानुभाव संप्रदायात उलथापालथ घडवून आणणारेच आहेत. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या विषारी वातावरणात सांप्रदायिक सद्‌भाव निर्माण करणाऱ्या अशा अनेक संत-महंतांची समाजात गरज आहे. बाभुळगावकर शास्त्रीबाबांकडं मी विशिष्ट संप्रदायाचा म्हणून पाहत नाही. संप्रदायांच्या मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. ते सर्वधर्मसहभावाचे प्रतीकच वाटतात. त्यांच्यामुळं मला तरी कितीतरी अज्ञात गोष्टी ज्ञात झाल्या.

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com