ओ बापू, आप तो रोज 'ट्रेन्ड' में है!

सम्राट फडणीस
सोमवार, 2 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

आसाराम बापूंचे वय आहे 75 वर्षे. आदिवासी विकास, महिला सबलीकरण, विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी त्यांच्या संस्थेने काम केले आहे. आसाराम आश्रम हा सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल असलेला उद्योग आहे. जगभरात सुमारे दोन कोटींहून अधिक साधक आसाराम बापूंना मानतात. यातील अनेक साधक भक्तीभावाने रोज 'ट्विट' करताना न चूकता त्यांच्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल करतात. 

परवाच्या 31 डिसेंबरच्या शनिवारी गुजरातच्या आसाराम बापू या कथित अध्यात्मिक गुरूंच्या अटकेला चाळीस महिने पूर्ण झाले. बलात्कारसह लैंगिक छळाचा आरोप आसाराम बापूंवर आहे. राजस्थानातील जोधपूर न्यायालयात आणि गुजरातेतील सूरतमध्ये वेगवेगळ्या खटल्यांमध्ये या आरोपांची सुनावणी सुरू आहे. भारतीय न्यायालयांचा निःपक्षपातीपणा जगप्रसिद्ध आहे. मात्र, कोर्टात सुरू असलेली सुनावणी मान्य नसलेले बापूंचे साधकगण गेले दोन वर्षे 'ट्विटर'च्या दारात त्यांना दोषमुक्त करून रोजच्या रोज सोहळे साजरे करत आहेत. 

भारतात गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विराट कोहलीपर्यंत कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला जे जमलेले नाही, ते आसाराम बापूंच्या साधक परिवाराने करून दाखवले आहे. अटकेनंतर जवळपास रोजच्या रोज साधक परिवार 'ट्विटर'वर बापू निरागस असल्याची द्वाही फिरवत आहेत. नवीन वर्षातल्या पहिल्या दोन्ही दिवशी हॅपी न्यू इयर आणि मोदींच्या भाषणाला बापू भक्तांनी मागे टाकले. 'विश्व गुरू भारत अभियान' या नावाने भक्तांनी 'ट्विटर'वर आणलेली ट्रेन्ड'ची लाट आधीच्या दोन वर्षातल्या बापू भक्तांच्या 'ऑनलाईन भक्ती'ला साजेशीच आहे. 

कसे आणले जातात ट्रेन्ड?
'ट्विटर'वर गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक ट्रेन्ड आणण्याची किमया बापूंच्या साधकांनी ज्या पद्धतीने साधली आहे, त्याला तोड नाही. भारतीय वेळेनुसार भल्या पहाटे बापू भक्त 'ट्विटर'वर विशिष्ट हॅशटॅग वापरून ट्विट करायला सुरूवात करतात. उपलब्ध माहितीनुसार, कोणता हॅशटॅग कधी वापरायचा याची माहिती बापूंच्या देशभर पसरलेल्या भक्त परिवारातील मोजक्या लोकांना आदल्या रात्री पाठविली जाते. त्यानुसार, सकाळी लवकर बापूंप्रति भक्ती म्हणून सकाळी लवकर ट्विट केले जातात. प्रत्येक भक्त नेमून दिलेले काम चोख पार पडतो. काही मिनिटात देशभरातून विशेषतः उत्तर भारत आणि मध्य भारतातून शेकडो भक्त काही हजार ट्विट करतात आणि आसाराम बापूंच्या 'महानतेचा' संदेश 'ट्विटर'वर येणाऱया भारतातील प्रत्येक युजरपर्यंत पोहोचवला जातो. 

नियोजनबद्ध प्रचार
आसाराम बापूंची ट्विटर प्रचार यंत्रणा नेमकी कोण चालवते, हे आजपर्यंत उघड झालेले नाही. मात्र, ट्विट करण्यासाठी पगारी प्रचारक नेमले असण्याची शक्यता गेल्या दोन वर्षांत अनेकदा व्यक्त झालेली आहे. 'ट्विटर' वापरण्यातले कौशल्य, हॅशटॅग निवडण्यामागचे चातुर्य आणि ट्विट, रिट्विट, मेसेजमधले वैविध्य पाहता व्यावसायिक सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीशिवाय रोजच्या रोज हा पसार शक्य वाटत नाही. ट्रेन्ड आणण्यामध्ये आघाडीवर असलेल्या काही ट्विटर अकाऊंटवरून दर चार-सहा महिन्यांनी जुनेच ट्विट परत परत केले जातात. भक्त परिवाराला स्मरणशक्तीशी काही देणे-घेणे नसल्याने हेच ट्विट पुन्हा पुन्हा नव्याने आणखी लोकांपर्यंत पोहोचवून ट्रेन्ड आणले जातात. 'ट्विटर'चा अल्गॉरिदम सोपा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त वेळा ज्या विषयावर 'ट्विट' करतात, तो विषय ट्रेन्डमध्ये दिसतो. त्यातून तो सर्वच ट्विटर युजरपर्यंत जातो. सर्वसाधारपणे बातम्यांचे विषय, नव्या चित्रपटांचे विषय ट्रेन्डमध्ये असतातच; पण त्या आधी सकाळी लवकर तसा काहीच विषय नसतो. परिणामी, बापूंचे साधक त्यांना रोजच 'ट्रेन्ड'मध्ये आणतात. 

बापू 'निर्दोष'
आसाराम बापूंचे वय आहे 75 वर्षे. आदिवासी विकास, महिला सबलीकरण, विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी त्यांच्या संस्थेने काम केले आहे. आसाराम आश्रम हा सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल असलेला उद्योग आहे. जगभरात सुमारे दोन कोटींहून अधिक साधक आसाराम बापूंना मानतात. यातील अनेक साधक भक्तीभावाने रोज 'ट्विट' करताना न चूकता त्यांच्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल करतात. 

सर्वपक्षीय 'बापू'
भारतीय दंडविधान संहिता 376 (बलात्कार) आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आसाराम बापूंवर दाखल आहेत. मात्र, राजकीय नेते त्यांच्याबद्दल बोलणे टाळतात. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सत्तेच्या काळात बापूंवर जमिनींची खैरात केली आहे. दोन्ही पक्षांनी भरभरून जमिनी बापूंच्या आश्रमांना दान दिलेल्या आहेत. त्यामुळे, राजकीय पक्षांबद्दल साधक परिवार फारसे नकारात्मक बोलताना ट्विटरवर दिसत नाही. तथापि, बलात्काराचा कायदा आणि माध्यमे बापूंना न्याय देऊ शकत नाही, ही भूमिका वारंवार ट्विटरवरून मांडली जाते. बापूंवरील खटल्याच्या सुनावणीचे वार्तांकन ज्या ज्या दिवशी असेल, त्या त्या दिवशी साधक हजारो ट्विट करून ऑनलाईन माध्यमांचे लक्ष बापूंच्या कार्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यातून कायदा कसा चुकीचा राबविला जातो, यावर भर दिला जातो. 

खटल्यातील दिरंगाई
वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आसाराम बापूंविरुद्धच्या खटल्यातील दिरंगाईही नकळतपणे साधकांचा रोष वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे. या दिरंगाईतूनच 'हिंदू संतांविरुद्धच' गुन्हे दाखल होत असल्याच्या अपप्रचाराला खतपाणी मिळते आहे. आमच्या गुरूवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, म्हणून कायदाच बदलण्याची मागणी करण्याचा आचरट प्रकार कदाचित खटला निकाली झाला, तरच निकालात निघू शकेल. अन्यथा, रोज सकाळी 'ट्विटर'वर बापू ट्रेन्डमध्ये राहणारच.

(छायाचित्र सौजन्यः India Today)