जीव गुदमरतोय... चला, शुद्ध हवा येऊ द्या!

Air Pollution
Air Pollution

पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांमुळे आता आपलाच जीव गुदमरतोय! ऐन दिवाळीचे आनंदी वातावरण असताना दिल्लीकरांची जी ‘दमकोंडी’ झाली, ती आपल्या वाट्याला कधीही येऊ शकते. हवेची दिशा आपल्याला ठरविता येत नाही. ‘मला काहीच फरक पडत नाही’ ही वृत्ती ठेवली तर विषारी हवा उद्या आपल्याला गाठू शकते. कारण पर्यावरण ऱ्हास आणि गंभीर प्रदूषणाचा हा विळखा एवढ्या झपाट्याने वाढतो आहे की, काही शहरांमधील नागरिकांवर लवकरच ऑक्सिजनचा सिलिंडर सोबत घेऊन फिरण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही...
 

पर्यावरण हा विषय तसाही आपल्या प्राधान्य क्रमांत शेवटून पहिला आहे. ‘मुझे कुछ फरक नही पडता’, ‘मै क्या अकेला हूँ क्या?’ ही आपली वृत्ती. विकास कामे झाली पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल... ही आपल्या राजकीय नेत्यांची वृत्ती. एकंदरीत कथित विकासाच्या हव्यासामुळे आता आपलाच श्वास कोंडायला लागला आहे. जागे होण्याची ही योग्य वेळ आहे. दिवाळीच्या काळात आपल्या राजधानी दिल्लीच्या हवेने प्रदूषणाची जी धोकादायक पातळी गाठली होती ती आपल्याला धोक्याचा इशारा देण्यासाठी पुरेशी आहे. त्यानंतरही आपण झोपेचे सोंग घेतले तर झोपेतच परागंदा होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. 

पर्यावरण रक्षणाबाबत आपल्याकडे जनजागृती वाढली असली तरी ती पुरेशी नाही. आज वैयक्तिक किंवा सरकारी पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी होणारे प्रयत्न अतिशय तोकडे आहेत. एकंदरीत पर्यावरण रक्षण हा विषयच आपल्याला नकोसा वाटतो आहे. मात्र, आज पर्यावरण रक्षणाला पहिली पसंती दिली नाही तर पुढील अनेक पिढ्या गारद करण्याचा गुन्हा आपल्या भाळी लागू शकतो एवढे मात्र नक्की...!

वायू प्रदूषणाचे गांभीर्य ओळखा...

पर्यावरण प्रदूषणाला अनेक कंगोरे आहेत. आपण आज केवळ हवेचे प्रदूषण आणि त्याच्या घातक परिणामांबाबतच बोलू... अन्नाविना व्यक्ती निदान महिनाभर तरी जगेल... पाण्या विना आठवडाभर...पण, श्वास गुदमरला तरी... काही सेंकदही पुरेसे आहेत नाही का? यावरून हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्याचे महत्त्व लक्षात येते. हवेचे प्रदूषण हे मनुष्यच नाही तर प्राणी आणि वनस्पतीच्या मुळावरही उठले आहे. हवा प्रमाणाबाहेर प्रदूषित झाल्याने दरवर्षी विविध आजार होऊन अनेक व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. ही संख्या एचआयव्ही किंवा मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षाही अधिक आहे. आपण जो श्वास घेतो त्यात ७८ टक्के नायट्रोजन आणि २१ टक्के ऑक्सिजनचे प्रणाम असायला हवे. या शिवाय १२ अन्य घटकांची टक्केवारीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. मात्र, हे प्रमाणही बिघडले आहे. या प्रदूषित हवेतील सर्वांत घातक घटक आहे पार्टिक्युलेट  मॅटर अर्थात अतिसुक्ष्म धुलिकन. ते श्वासावाटे थेट हृदयात जातात. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. एवढेच नव्हे तर त्याचे मानवी शरीरावर अनेक घातक परिणाम होतात. शिवाय नायट्रोजन ऑक्साइड, हायड्रो कार्बन, कार्बन मोनॉक्साइड यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.  व्यक्तीचे आयुष्यही कमी होते. वायू प्रदूषणामुळे सरासरी ३.५ वर्षे आयुष्य घटत आहे. दिल्लीत तर तब्बल सहा वर्षांनी आयुष्य कमी होत आहे. अतिसुक्ष्म धुलिकनांमुळे लहान मुलांवर खूपच घातक परिणाम होतात. दात, डोळे आदी अवयवांवर परिणाम होतो. व्यक्तीच्या आनुवांशिक गुणसूत्रांतही बदल होत असल्याचे अलिकडील अभ्यासात आढळले आहे. एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांचे अन्नही खराब होते.

हवा प्रदूषणास कारणीभूत बाबी...
वायू प्रदूषण हे मानवाने निर्माण केलेले संकट आहे. वाहनांमधून निघणारा धूर, औष्णिक वीज केंद्रांतून बाहेर पडणारा घातक वायू व राख, कचरा जाळल्याने त्यातून निघणारा धूर, विविध बांधकामांमुळे निर्माण झालेली धूळ, शेतांमध्ये पिकांची फवारणी, रासायनिक खतांची मात्रा व जाळपोळ, कारखान्यांमधून निघणारा घातक वायू, विमाने, रॉकेट्स आदींमुळे होणारे प्रदूषण हे घटक जबाबदार आहेत.

पीएम २.५ हे आहे तरी काय?
हवेमध्ये असलेल्या अतिसुक्ष्म धुलिकनांना ‘पीएम’ अर्थात  पार्टिक्युलेट मॅटर म्हटले जाते. एवढे सुक्ष्म असतात की, ते साधारण डोळ्यांनी दिसत नाहीत. आपल्या केसांची जाडीच्या ३० पट सुक्ष्म जाडीचे असतात. पीएम २.५ हे २.५ मायक्रॉनपेक्षाही कमी असतात आणि पीएम १० हा त्याच्या दहाव्या भागाएवढा असतो. या अतिसुक्ष्म धुलिकनांमुळे हवेतील दूषित घटकांचे प्रमाण वाढते शिवाय कोणत्याही अडथळ्याविना हे थेट हृदयात जातात आणि अतिशय घातक परिणाम करतात.

हिवाळ्यातच का वाढते प्रदूषण?
हिवाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे हे अतिसुक्ष्म धुलिकन खाली येतात. हवेचा वेगही मंदावतो. त्यामुळे धुलिकन आणि धूर व धुके त्यात मिसळते आणि स्मॉग तयार होतो. त्यामुळे ही प्रदूषित हवा खालीच राहते आणि ती आपल्या थेट संपर्कात येते आणि त्याचे घातक परिणाम होतात. त्यामुळे हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत वायू प्रदूषण अधिक असते.

भारतात वाढता धोका...
आज जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात वायू प्रदूषणाचा धोका अधिक आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांपैकी सुमारे २२ शहरे ही भारतातील आहेत. जगातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांमध्ये चौथे शहर हे भारतातील आहे. दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतातील हवा अधिक प्रदूषित आहे. नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही शहरांनी प्रदूषणात चांगलीच आघाडी घेतली आहे. वायू प्रदूषणावर निंयत्रण मिळविण्याचे आपले प्रयत्नही अगदी तुटपुंजे आहेत. जगभरात कोळशाचा वापर कमी होत असताना तो आपल्याकडे वाढतो आहे. आपण विकासाच्या बाबतीत ज्या देशांचा आदर्श ठेवतो त्या अमेरिका आणि चीनमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय कडक केले असून त्यात सातत्यही आहे. आज चीनमधील ९५ टक्के औष्णिक वीज निर्मिती केंद्रांवर प्रदूषण नियंत्रणाचे उपाय केले आहेत. भारतात हे प्रमाण दहा टक्केही नाही. त्या शिवाय प्रदूषणनियंत्रणासाठी कठोर कायदे आहेत तसेच त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणाही आहे. 

वायू प्रदूषणावर नियंत्रण...
वायू प्रदूषण हे कोणत्याही व्यक्तीला विळख्यात घेऊ शकते.विशेषतः शहरं आणि औद्योगिकिकरण झालेले भाग हे अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे वाढत्या वायू प्रदूषणावर आळा घालायचा असेल तर सर्वप्रथम हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा उभी राहायला हवी. आज चीनमध्ये  ९०० शहरांत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा ही १५ हजार ठिकाणी उभारली आहे. कदाचित हा आकडा त्याहून अधिक असेल पण आपल्याकडे २३ शहरांत ३९ ठिकाणीच अशी यंत्रणाआहे.  त्या शिवाय कठोर कायदेही आहेत.

उपाय कोणते?
सर्वप्रमथ औष्णिक वीज केंद्रांवरील प्रदूषण नियंत्रणात आणणे, शहरांतील वाहन कोंडी थांबविणे, विकास कामांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदे व अंमलबजावणी करणारी यंत्रणा उभारावी लागेल. लोकांमध्येही जनजागृती करावी लागेल. शहरांमध्ये वाहनांवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करा लावावा तसेच पार्किंगसाठीही मोठे दर ठेवावेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढेल. प्रदूषण नियंत्रण मंडळे ही नावापुरतीच न राहता ती अधिक सक्रिय करावी लागतील. औद्योगिक प्रदूषण रोखावे लागेल. शिवाय वैयक्तिक जाणीव जागृतीवरही भर द्यावा लागेल. शहरांतील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा जाळण्याचे प्रकार थांबवावे लागतील. झांची संखा वाढवावी लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com