गायनात बुद्धिवादी सौंदर्यदृष्टी महत्त्वाची (सानिया पाटणकर)

sania patankar
sania patankar

सप्त सुरांनी माझं अवघं जीवन व्यापून टाकलं आहे. हे सप्त सूर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. या वाटचालीत माझ्या गुरूंनी मला दिशा दाखवली. कुटुंबातले सगळेच सतत पाठीशी राहिले. मग मी काय केलं? मी सतत शोधत राहिले, असंख्य अडचणींना तोंड देत, गुरूंवर श्रद्धा ठेवून रियाज, श्रवण, चिंतन, मनन करत राहिले. अर्थात आजही तेच सुरू आहे.. हा शोध न संपणारा आहे. थोडं काही हातात आलं की असं वाटतं, अजून किती दूर जायचंय...!

आमच्या घरी सगळ्यांनाच शास्त्रीय संगीताची अतिशय आवड होती. आई-बाबा मला आणि भाऊ समीप याला सवाई गंधर्व महोत्सवाला आणि पुण्यातल्या सगळ्या मैफलींना न्यायचे. चौथ्या वर्षी आई मला चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडं नाट्यगीत शिकायला न्यायची. पाचव्या वर्षापासून लीलाताई घारपुरे यांच्याकडं माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं. त्यांनी मला अतिशय प्रेमानं शिस्तबद्ध शिक्षण दिलं. घरी बाबा रोज रियाजाला बसवायचे. सातव्या वर्षी मी पहिल्यांदा मोठ्या स्टेजवर यमन राग, नाट्यसंगीत आणि भजन सादर केलं.

दहावीत असताना डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची मैफल ऐकल्यावर "मला यांच्याकडंच शिकायचं,' असा मी ध्यासच घेतला. त्यांनी गायिलेल्या "भूप' रागाची कॅसेट ऐकून तयारी केली आणि तो त्यांना म्हणून दाखवल्यावर त्यांनी शिकवण्याला मान्यता दिली. त्यानंतर 14 वर्षं पुणे ते मुंबई प्रवास करून अश्विनीताईंकडं माझं शिक्षण सुरू झालं. तेव्हापासून तेजस्वी अशा "जयपूर-अत्रौली' घराण्याशी नातं जडलं ते कायमचंच!

"जयपूर'चं स्वर-लयीशी घट्ट नातं. बोल-आलापीचे अंदाज...तानांची वक्र अवघड वळणं...भावोत्कटता... शब्दोच्चारण...अनवट राग...हे सगळं गळ्यावर चढवताना दमछाक व्हायची! गुरूंसोबत मैफलीत साथ करून श्रोत्यांशी संवाद साधायला शिकले. एमकॉममध्ये मला "गोल्ड मेडल' मिळाल्यावर "आता सीएस कर' असाच सल्ला अश्विनीताईंनी मला दिला. मी नंतर "संगीतविशारद'ही पूर्ण केलं. आकाशवाणीच्या सुगम, उपशास्त्रीय आणि शास्त्रीय या तिन्ही स्पर्धांत मी पहिली आले. सीएसचा अभ्यास, पुणे-मुंबई खेपा, स्वतःचा रियाज या सगळ्यात खूप ओढाताण व्हायची; पण अश्विनीताईंसमोर तानपुरा हातात घेऊन बसले की मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा. ""मी कुणी मोठी गुरू नाही, तर तुमच्यापुढं काही पावलं वाटचाल करणारी एक साधकच आहे. जे मला भावलं, जाणवलं ते तुम्हाला सांगते,'' इतका साधा आणि सरळ दृष्टिकोन त्यांचा होता. न पेलणाऱ्या "दहा-बारा तास रियाजा'चं ओझं त्यांनी माझ्यावर कधीच टाकलं नाही, तर वैचारिक, बुद्धिवादी सौंदर्यदृष्टीकडं माझं लक्ष वळवलं.

संगीतविषयक एका मोठ्या पत्रात त्या मला लिहितात ः ""...भावनावेग आणि संवेदनशीलता यांमधला फरक जाण! भावनेच्या भरात वाहवत न जाता बुद्धीचा अंकुश तिच्यावर कायम राहू दे. माझ्या बरोबरीनं शेवटच्या तिहाईपर्यंत ताना घ्यायला फक्त तूच उरतेस; पण माझ्याच छायेत राहून स्वतःचं अस्तित्व तू कसं शोधू शकशील?'' आणि म्हणून कालांतरानं त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला माझं साथीला बसणं कमी केलं. ""सतत मागं बसून साथ केलीस तर स्वतः मैफलीची जबाबदारी घेऊन पुढं बसण्याची सवय कशी होणार?'' असा त्यांचा फार मोलाचा विचार होता.

डॉ. अरविंद थत्ते यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान संगीततज्ज्ञाकडं शिक्षण घेणं हा अंर्तबाह्य हलवून टाकणारा अनुभवही मला मिळाला. श्रुतिस्थानं, लय-तालाची गणितं, एकेका रागाच्या 40-50 बंदिशी शिकताना देहभान हरपून जायचं. सांगीतिक जाणिवा अधिकाधिक प्रगल्भ होत जायच्या. पंडित वसंतराव राजूरकर, पंडित शरद साठे यांच्यासारख्या दिग्गजांकडं टप्पा, सरगमगीत मला शिकता आलं. अश्विनीताईंच्या स्वनिर्मित बंदिशींच्या "रागरचनांजली' या ध्वनिफितीत गायन करत असतानाच जयपूर-अत्रौली घराण्याच्या अनवट रागांचा अभ्यास मी पंडित मिलिंद मालशे यांच्याकडं सुरू केला. दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सवात वेगवेगळ्या कलाकारांचं गायन ऐकताना "मी कधीतरी या स्टेजवर बसून गाणार' हे स्वप्न मी पाहत असे. ...आणि जेव्हा खरंच "सवाई'त गाण्याचं आमंत्रण आलं, तेव्हा माझे अश्रू थांबत नव्हते. "सवाई'त गायन करणं हा अविस्मरणीय अनुभव होता.

स्वतःला आलेल्या आनंदाची अनुभूती श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न रंगमंचावर प्रत्यक्ष सादरीकरणातून कलाकार करत असतो. सध्याच्या काळाचा वेग, व्यावहारिकता, स्पर्धात्मकता यांमध्ये कलाकाराचा कस लागतो. पूर्वी चार चार तास एक राग गाणारे, वाजवणारे कलाकार होते आणि ऐकणारे श्रोतेही होते. मात्र, आज रागाची सुसूत्र मांडणी, स्वरवाक्‍यांचं नक्षीकाम, गायकीतलं वैविध्य, तिन्ही सप्तकांचा विचार या सगळ्या गोष्टी थोडक्‍या वेळात त्यातल्या भावनांसह अगदी सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोचवणं हे फार मोठं आव्हान आहे.

माझ्या या वाटचालीचा विचार करताना, मला सर्वात भक्कम आधार मिळाला तो माझ्या कुटुंबाचा. माझं गायन ऐकून मला लग्नाविषयी विचारणारा धीरज हा माझ्या प्रत्येक मैफलीचा खरा समीक्षक असतो. सासू-सासरे, मुलगा सिद्धान्त हे सगळे जण माझ्या यशाचे आधारस्तंभ आहेत. सप्त सूर हे माझे सखे-सोबती, मार्गदर्शक आणि माझी गरज होऊन बसले आहेत. आता कुठं तानपुरे जुळले आहेत... मैफल सुरू झाली आहे... सुरांच्या दुनियेत माझी समाधी अशीच लागणार आहे... भारतीय संगीताच्या या अमर्याद सागरात थेंबाच्या रूपानं जरी माझं अस्तित्व असलं तरी मी भरून पावेन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com