आईने ओळखला माझ्यातला गायक! (पं. संजीव अभ्यंकर)

पं. संजीव अभ्यंकर sanjeevabhyankar@gmail.com
रविवार, 21 जानेवारी 2018

गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते.

गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते.

माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही शास्त्रीय संगीतातली जाणकार विद्वान होती. ती अत्यंत नावाजलेली ‘गानगुरू’ आणि उत्तम गायिका होती. त्यामुळं माझ्यातला ‘लिटल चॅम्प’ तिनं माझ्या लहानपणीच ओळखला होता. मी आठ वर्षांचा असताना पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडं माझं शास्त्रीय गायनाचं रीतसर शिक्षण सुरू झालं. ‘अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफली गाजवणारा ख्यालगायक’ अशीच माझी प्रतिमा असावी, अशी आईची मनोमन इच्छा होती. ख्यालगायनात कलाकाराची निर्मितिक्षमता पणाला लागते. अडीच-तीन तासांची रागसंगीताची मैफल रंगवणं हे सोपं काम नव्हे. त्यासाठी गाण्याच्या तयारीबरोबरच गुरूकडून आत्मसात केलेली विद्या, रचनाकौशल्य, अखंड मेहनत, ताकद आणि संयमाची गरज असते. अथक संगीतसाधना केल्याशिवाय ख्यालगायनाची मैफल रंगवता येत नाही. माझ्या आईला या सगळ्या गोष्टींची जाणीव असल्यामुळं मी १० वर्षांचा असल्यापासूनच तिनं मला, मैफलीच्या दृष्टीनं रागमांडणी कशी करावी, याची तालीम द्यायला सुरवात केली. ‘गोमंतक सेवा संघा’नं सन १९८१ मध्ये - मी १२ वर्षांचा असताना - दीड तासाची शास्त्रीय गायनाची माझी स्वतंत्र मैफल आयोजिली होती. सकाळच्या वेळी पार्ल्याच्या ‘दीनानाथ मंगेशकर सभागृहा’त झालेल्या मैफलीची सुरवात मी आसावरी रागानं केलेली माझ्या आजही स्मरणात आहे.

यानंतर पुणे, मुंबई, कर्नाटकात कुंदगोळ, हुबळी, शिमोगा, बेळगाव, बागलकोट, बंगळूर अशा अनेक ठिकाणी ‘वंडर बॉय’ या शीर्षकाच्या माझ्या बालवयातल्या मैफली चांगल्याच गाजल्या; परंतु माझे आई-वडील जास्त कार्यक्रम घेत नसत. मैफलींच्या निमित्तानं माझा रियाज होईल, या एकमेव उद्देशानं अगदी मोजकेच कार्यक्रम ते स्वीकारत. याचा फायदा असा झाला, की मी एवढ्या लहान वयापासून सकाळ-संध्याकाळ रागदारीचा रियाज आणि विचार करू लागलो. ख्यालगायनासाठी लागणारा संयम या वयापासूनच माझ्यात रुजू लागला.

मध्यंतरी मी ‘दंगल’ हा चित्रपट पाहिला. त्यात आमिर खानची पडद्यावरची व्यक्तिरेखा ज्या सूक्ष्मपणे, ज्या बारकाईनं आपल्या मुलींना घडवते, त्याच सूक्ष्मपणे, त्याच बारकाईनं माझी आई शोभा आणि वडील विजय यांनी मला घडवलं आहे. गाताना हातवारे जास्त तर होत नाहीत ना, मुद्रादोष निर्माण होत नाही ना, व्यायाम व रियाज नियमित होतोय की नाही आदी अनेक गोष्टींकडं त्यांचं सतत काटेकोर लक्ष असायचं.

खूप नशीबवान म्हणून की काय, मी १३-१४ वर्षांचा असताना, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडेदोकर, गंगूबाई हनगळ, पंडित वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे, ज्योत्स्ना भोळे या सगळ्या दिग्गजांनी माझं गाणं ऐकलं. सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं आणि ‘या मुलाचा जन्म गाण्यासाठीच झाला आहे, त्याला पूर्ण वेळ गाणं करू द्यावं,’ असा प्रेमानं सल्लाही दिला. सगळी शक्ती आणि वेळ मी फक्त संगीतसाधनेसाठीच वापरावा असं, या सगळ्यांचं एकमत होतं. पंडित भीमसेनजी तर माझ्या आई-बाबांना म्हणाले ः ‘हा तर ज्ञानेश्वरांच्या कुळातला आहे’!
सन १९८३ मध्ये - माझ्या चौदाव्या वर्षी - माझ्या आईचे गुरू संगीतमार्तंड पंडित जसराजजी यांनी माझं गाणं ऐकलं. ते अतिशय खूश झाले. ते म्हणाले ः ‘‘मी याला गाणं शिकवेन; पण एका अटीवर. याला गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे माझ्याकडं राहून गाणं शिकावं लागेल.’’ त्यामुळं इयत्ता नववीत असल्यापासूनच एकाग्रतेनं माझी शास्त्रीय संगीतसाधना सुरू झाली. दहावीची परीक्षा संपल्यावर लगेचच पंडित जसराजजींच्या घरी राहून माझा गुरू-शिष्य परंपरेनं पूर्ण वेळ रियाज सुरू झाला.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरा यांचं एक अतूट नातं आहे. गुरूंच्या सहवासाशिवाय ही ‘गुरुमुखी’ विद्या ‘खऱ्या’ अर्थानं प्राप्त होणं मुश्‍किल आहे. सन १९८४ ते १९९४ ही १० वर्षं माझे गुरू जसराजजी यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या चारशेहून अधिक रंगवलेल्या मैफलींना प्रत्यक्ष स्वरसाथ करण्याचं भाग्यही मला लाभलं. त्यांच्या घरी राहून मिळालेल्या विद्येपेक्षा कितीतरी अधिक ज्ञान हे या स्वरसाथीतून मिळत असे. कारण, या मैफलींमध्ये गुरुजी हे त्यांचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असत. प्रत्यक्ष सादरीकरणातून हे ‘कलात्मकतेचं सर्वोत्तम’ इतक्‍या मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणं म्हणजे रत्नांच्या खाणीच्या मधोमध उभं राहिल्यासारखं असायचं!

या गुरुमुखी शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आमची सांगीतिक शिबिरं. मुंबईत दरवर्षी १५ दिवसांची दोन शिबिरं, गुरुजी त्यांच्या अंधेरीतल्या दुसऱ्या घरी घेत असत. या घरात मुद्दामच दूरध्वनी घेतलेला नव्हता. त्यामुळं शिबिरात कोणताही व्यत्यय येत नसे. भोपाळ, वाराणसी, कर्जत या ठिकाणी झालेली महाशिबिरं म्हणजे आम्हा शिष्यांसाठी एक पर्वणीच होती. भोपाळमध्ये एक महिना, तर वाराणसीला गंगेच्या किनाऱ्यावरच्या घरात एक महिनाभर झालेली शिबिरं खूप काही देऊन गेली.

सन १९८५ मध्ये मे महिन्यात कर्जतजवळच्या नसरापूर या लहानशा खेड्यात गुरुजींनी एक शिबिर घेतलं. अतिशय निर्जन अशा ठिकाणी गुरुजींच्या एका स्नेह्यांचं घर होतं. सरपटणाऱ्या प्राण्यांची एक अनामिक भीती रात्रभर मनात असायची. घराचा दिवाणखाना मोठा होता. आम्ही १०-१२ शिष्य त्या दिवाणखान्यात राहायचो. गुरुजींसाठी एक छोटीशी खोली होती. बाहेर व्हरांडा व मोठा उतार...जिथून खाली आल्यावर खळखळून वाहणारं छोटंसं नदीपात्र व पलीकडं डोंगर. अत्यंत मनोहारी असं वातावरण. माणसांच्या आवाजांचं, वाहनांचं कसलंही प्रदूषण नाही. नीरव शांतता. या वातावरणात गुरुजींनी आम्हाला सकाळ-संध्याकाळ भैरव, बिलावल, जौनपुरी, भटियार, तोडी, मुलतानी, पूरिया, मेघ, पूरिया धनाश्री आदी अनेक रागांची तालीम दिली. रागभाव जागृत होणं म्हणजे काय याचा तो एक वस्तुपाठच होता.
भारतीय रागसंगीतातल्या रागांचं एक शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणजे हिऱ्यांच्या दागिन्यांना असणाऱ्या कोंदणासारखं असतं. मात्र, ते ‘साध्य’ नसतं, तर भावरूपी राग जिवंत करण्याचं ‘साधन’ असतं.

नसरापूरच्या वातावरणात सूर्योदयाच्या वेळी शिकवलेला राग भैरव आणि सूर्यास्ताच्या वेळी शिकवलेला राग पूरिया धनाश्री यांची भावनिर्मिती त्या निसर्गाच्या सान्निध्यातल्या वातावरणात अतिशय गडद व्हायची, त्याचीच अनुभूती शहरी वातावरणातल्या प्रेक्षागृहात सगळ्या रसिकांना घडवणं, हे एक मोठं आव्हान पेलण्याचा प्रयत्न एक कलावंत म्हणून मी सततच करत असतो.
गुरुजींबरोबरच्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते.

वयाच्या पंधराव्या वर्षी माझा आवाज बदलला, सर्व मुलांचा बदलतो तसा. आणि मग माझी खर्जसाधनाही सुरू झाली. पहाटे साडेचार ते पाच वाजता उठून भैरव रागाचा रियाज मी सलग १० वर्षं केला. स्वरसाधना आणि तानपलटे दोन्ही. या १० वर्षांत मी सकाळ, दुपार व रात्र असा तीन वेळा रियाज करत असे. शिकलेले सगळे राग गळ्यावर चढवण्याचा रियाज; इतका की डोक्‍यात आलेली प्रत्येक स्वरावली गळ्यातून जशीच्या तशी उमटलीच पाहिजे. प्रवासात असताना अभ्यास करून मी पुणे विद्यापीठातून बीकॉमची पदवी सहज मिळवली. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागला नाही.
गुरुजींकडं शिकत असतानाच त्यांच्या संमतीनंच माझ्या करिअरची सुरवात झाली. सन १९८९ मध्ये - म्हणजे विसाव्या वर्षी - ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त माझं गाणं झालं. सन १९९० चा आकाशवाणीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर सन१९९१ मध्ये एचएमव्हीनं माझी ध्वनिफीत प्रकाशित केली व माझा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. वयाच्या बाविसाव्या वर्षापासूनच जालंधरपासून ते दक्षिणेत चेन्नईपर्यंत आणि पश्‍चिमेला राजकोट-भावनगरपासून ते पूर्वेला कोलकता-भुवनेश्वरपर्यंत कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप व पश्‍चिम आशियातल्या देशांतही अनेक कार्यक्रम झाले. कार्यक्रमांच्या बरोबरीनं संगीतसाधनाही अखंड सुरूच राहिली.
लहानपणापासूनच अपेक्षांचं मोठं मोझं मी माझ्या खांद्यावर पेललं आहे. देवानं मला जितका उत्तम गळा दिलेला आहे, तितकीच कफप्रकृतीही दिलेली आहे! पण आवाजाचा टोन उत्तम राहावा व आवाज कायम हुकमी स्वच्छ राहावा म्हणून १५ वर्षांचा असल्यापासूनच मी दही, ताक, सफरचंद, केळ हे मला त्रास देणारे पदार्थ खाणं बंद केलं आहे.

करिअरच्या सुरवातीपासूनच नवनिर्मितीकडं माझा जास्त ओढा आहे. नवनिर्मिती हा माझा स्थायीभाव बनला आहे. माझ्या स्वरचित बंदिशी व भक्तिरचनांच्या बरोबरीनं, माझी गायकी नजरेसमोर ठेवून अनेक संगीतकारांनी उत्तमोत्तम रचनांची निर्मिती केली. ही निर्मिती मी माझ्या मनासारखी करूनही घेतली, म्हणूनच विविध कंपन्यांसाठी १०० तासांहून अधिक ध्वनिमुद्रण माझ्या आवाजात उपलब्ध आहे. यात अभिजात शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, भावगीत, मराठी गझल, संस्कृत भक्तिरचना, पार्श्वगायन या सगळ्या प्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासननिर्मित समर्थ रामदास स्वामींचा अंदाजे सात हजार ८०० ओव्यांचा संपूर्ण ‘दासबोध’ माझ्या आवाजात इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. माझ्या स्वतःच्या रचनांचं ध्वनिमुद्रणही मोठ्या संख्येनं www.sanjeevabhyankar.com या माझ्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे.

जगभरातल्या २०० हून अधिक शहरांत अनेक वेळा झालेल्या अभिजात शास्त्रीय गायनाच्या १५०० हून अधिक मैफलींचा अनुभव आज माझ्या पाठीशी आहे. आपली साधना योग्य मार्गावर आहे की नाही याचा एक सुरेख मापदंड असतो व तो म्हणजे, जेव्हा मागं वळून पाहता आपलं स्वतःचंच गाणं एका वर्षापूर्वीच्या गाण्यापेक्षा जास्त प्रगल्भ झालेलं आहे असं वाटत राहतं, तेव्हा समजावं की साधना योग्य दिशेनं सुरू आहे.

माझी पत्नी अश्विनी हिची समर्थ साथ मला लाभलेली असून, तिच्या या सुयोग्य साथीमुळं मी आज एकाग्रचित्तानं संगीतसाधना करू शकत आहे. एक उत्तम गुरू म्हणून निवडक चांगले शिष्य निर्माण व्हावेत, असा माझा प्रयत्न आहे. त्या दिशेनंही वाटचाल सुरू आहे.

या सगळ्या प्रवासात सन १९९६ चा फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, सन १९९८ चा ‘गॉडफादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा सन २००८ चा प्रतिष्ठेचा कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान...असे करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळालेले हे पुरस्कार वेगळीच ऊर्मी देऊन गेले. मात्र, कोणत्याही कलाकारासाठी रसिकमान्यतेचा पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार असतो आणि याबाबतीत मी अत्यंत नशीबवान आहे. कारण, संगीतप्रेमी रसिकांचं भरभरून प्रेम व आशीर्वाद मला मिळालेले आहेत. हे प्रेम सदैव असंच राहो ही प्रार्थना...

Web Title: sanjeev abhyankar write article in saptarang